माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, December 3, 2012

त्र्यंबक गड



गोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.
इ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.
इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.  [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]
किल्ला म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी त्र्यंबकेश्वराच्या भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे. गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते! गडमाथ्यावरील पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या, त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...

छायाचित्रे:
त्र्यंबक गडाचे कडे

त्र्यंबक वरील गडाचे अवशेष

समोर दिसणारा हरिहर किल्ला

किल्ल्याच्या मागच्या बाजूस गंगा-गोदावरी मंदिर

कातळांत कोरलेल्या गडवाटा

Sunday, August 26, 2012

मोहदरी घाट (छायाचित्रे)

नाशिक व सिन्नर यांना जोडणाऱ्या ’नाशिक-पुणे’ राष्ट्रीय महामार्गावर हा छोटा घाट आहे. नाशिकपासून २२ तर सिन्नरपासून हा ६ किमी अंतरावर आहे.

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट

मोहदरी घाट


चामर लेणी / चांभार लेणी


नाशिकच्या उत्तरेकडे साधारणत: ८ कि.मी. अंतरावर जैन लेणी आहेत, त्यास चामर लेणी वा चांभार लेणी असेही म्हणतात. नाशिक-पेठ रस्ता वा नाशिक-दिंडोरी रस्त्यावर ही लेणी आहेत. हे दोन्ही रस्ते गुजरात कडे जाण्याचे मार्ग आहेत. नाशिक शहरातून ह्या चामर लेणी टेकडीचे सहज दर्शन होते. टेकडीच्या पायथ्यास म्हसरूळ गावी श्री पारसनाथ मंदिर १९४२ साली बांधले आहे. या लेण्यांना तीर्थराज गजपंथ असेही संबोधले जाते. पायथ्यापाशीच क्षेमेंद्र किर्ती यांची समाधीही आहे. ही लेणी साधारणत: ४०० फूट उंचीवर आहेत व वरती जाण्यासाठी ४३५ पायऱ्या चढून जावे लागते. पायऱ्या चढून गेल्यावर इंद्र व अंबिका देवीच्या मूर्त्या प्रथम दर्शनी पडतात. पुढे साडे तीन फुट उंचीची परसनाथाची मूर्ती आहे. ही लेणी कराव्या शतकात बांधली असून जैनांच्या पवित्र तिर्थांपैकी एक आहेत. इथे अनेक जैन संतांचे श्वेत चरण पाहायला मिळतात.
याच टेकडीवर चांभार लेणी नावाच्या लेण्याही अस्तित्वात आहेत. मुख्य मंदिरात भगवान महावीरांची भव्य मूर्ती पाहावयास मिळते. या टेकडीवरून संपूर्ण नाशिकचे दर्शनही घेता येते. दिंडोरी की पेठ रोडवरून येथे यायचे असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं तर नाशिक-पेठ रस्त्यावरूनच इथे यायला मुख्य रस्ता आहे. निमाणी बस स्थानकावरून बोरगड बस इथे येते. शिवाय तिवली फाटा येथे येणारी बसही ’गजपंथ’ वरूनच जाते. आमचा प्रवास हा रामशेज किल्ल्यावरून येथवर पायीच झाला होता. चामर लेणींच्या मागेच रामशेज किल्ला नज़रेस पडतो. इथुन पायी अंतर सात-आठ किलोमीटर असावे. एकाच दिवसांत दोन्ही ठिकाणी भेटी देता येतात.
 छायाचित्रे:
पेठ रोडवरील दिशादर्शक

चामरलेणे पहाड

पायथ्याशी असणारे मंदिर

प्रवेशद्वार

मंदीराचे दर्शन

महावीरांची चार दिंशांची मुख असणारी मू्र्ती

भगवान महावीर

टेकडीवरून नाशिक दर्शन

Tuesday, August 7, 2012

लोणजाई टेकडी


नाशिक जिल्हा हा बहुतांशी सातमाळच्या पर्वतरांगेत येतो. येथील काही तालुक्यांमध्ये डोंगर हा अगदीच विरळा असल्याचे दिसून येते. त्यातीलच एक निफाड तालुका होय. महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणारा निफाड हा एक सधन प्रदेश आहे. परंतु, या ठिकाणी डोंगरदऱ्यांची अगदीच वानवा आहे. लोणजाई टेकडी हा एकमेव उंच प्रदेश निफाड तालुक्यात येतो. पहाडांची संख्या कमी असल्यानेच या प्रदेशाला नि-पहाड अर्थात निफाड असे संबोधले जाते, असे येथील रहिवासी सांगतात.
निफाड तालुक्यातील नैताळे हे नाशिक-औरंगाबाद मार्गावरील एक छोटे गांव आहे. येथुन सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लोणजाई टेकडी आहे. नैताळे पासून जवळ असली तरी प्रशासकिय दृष्टीने ती विंचुर या गावाच्या हद्दीत येते. विंचुर हे तालुक्यातील एक मोठे गांव असुन तेही याच महामार्गावर आहे. लोणजाई फारसे उंच नाही. निफाडच्या दृष्टीने ते तसे उंचच मानावे लागेल. या टेकडीवर गेल्यावर आजुबाजुचा पूर्ण सपाट परिसर दिसून येतो. दूरदूर पर्यंत कोणताच पर्वत दिसून येत नाही. त्यामुळे परिसरातुन अनेकजण येथे फिरायला येतात. नैताळे व विंचुर अश्या दोन्ही ठिकाणाहून इथे पोहोचता येते. वरपर्यंत गाडीही जाऊ शकते. टेकडीच्या माथ्यावर लोणजाई देवीचे मंदीर आहे. आधी ते छोटे होते व आता त्याचा जिर्णोद्धार होऊन ते भव्य करण्यात आलेले आहे. दरवर्षी येथे नित्यनेमाने देवीचा उर्सव भरतो. या पहाडावर काही गुंफाही आहेत. पावसाळ्यात छोटीशी सैर करण्यास येथे परिसरातील लोक प्राधान्य देतात. संपूर्ण परिसराचे छान दर्शन या टेकडीवरून होते. एक तासाची हिवाळी वा पावसाळी सफर करण्यासाठी येथे जाण्यास काहीच हरकत नसावी. 

छायाचित्रे:
रस्त्यावरून दिसणारी लोणजाई टेकडी

लोणजाई टेकडी

लोणजाई टेकडी पायथा

लोणजाई टेकडी वरून

निफाडच्या शेतीचे दृश्य

अन्य रांगा

लोणजाई मंदीर

लोणजाई देवी

लोणजाई मंदीर बांधकाम अवस्थेत

Friday, June 29, 2012

सिद्धार्थ उद्यान, औरंगाबाद

बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच मांदियाळी एकाच ठिकाणी असणारी खूप कमी ठिकाणे महाराष्ट्रात आहेत. राज्यातील महानगरपालिकांनी त्यासाठी सोयही केलेली आहे. मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या औरंगाबाद शहरात असणारे व महापालिकेने तयार केलेले सिद्धार्थ उद्यान हे एक मोठे ठिकाण आहे. बगिचा, उद्यान, सर्पोद्यान, मत्स्यालय, प्राणिसंग्रहालय अशी सर्वच स्थळे सिद्धार्थ उद्यानात पाहायला मिळतात.
औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाला लागूनच महापालिकेने हे उद्यान उभे केले आहे. दोन्हींची भिंत एकच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे या ठिकाणाला पोहोचणे अगदी सोपे आहे. सुट्टीच्या दिवशी इथे मोठी गर्दी पाहायला मिळते. औरंगाबाद शहरातील नागरिक सुट्टी कुटंबासोबत घालवण्यासाठी या उद्यानाला भेट देतात. शिवाय जिल्ह्यातील अनेक शाळांच्या सहलीही इथे भेट देताना दिसत आहेत. उद्यानात प्रवेश केल्याबरोबरच भगवान गौतम बुद्धांची मोठी मूर्ती समोर दृष्टीस पडते. यावरूनच उद्यानाला सिद्धार्थ उद्यान असे नाव का दिले याचे उत्तर मिळते. मूर्तीच्या आजुबाजूच्या परिसरात बागबगिचा फुलविण्यात आला आहे. शिवाय मोठे गवती लॉन्सही आहेत. डाव्या बाजुने गेल्यास प्रथम मत्स्यालय दृष्टीस पडते. अनेक नाना प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतात. मुख्य उद्यानाबरोबरच मत्स्यालय व प्राणिसंग्रहालयात प्रवेश मिळाविण्यासाठी वेगळी प्रवेश फी द्यावी लागते, हे विशेष! सर्पोद्यानासाठी मात्र प्रवेश शुल्क नाही. प्रत्येक सर्पोद्यानात दिसतात तसे सुस्त झालेले साप याही उद्यानात पाहायला मिळाले. पण, विविध प्रकारचे साप पाहून आपली ज्ञानवृद्धी होते, याचेच समाधान मानावे. भारतातील सर्व मुख्य जातीतील साप इथे पाहायला मिळतात. उद्यानात सर्वात शेवटी प्राणिसंग्रहालय आहे. उद्यानातील सर्वात मोठा भाग इथेच व्यापला गेलेला आहे. वाघ, सिंह व बिबट्याबरोबरच अनेक रानटी प्राणी येथे दृष्टीस पडतात. त्यांना मुक्त संचार करता यावा म्हणून पिंजऱ्यांचे क्षेत्रफळ अधिक करण्यात आले आहे.
औरंगाबाद शहरात कधी जाणे झाल्यास इथे भेट देण्यास हरकत नसावी.

छायाचित्रे:

भगवान बुद्धांची मूर्ती

मत्स्यालय प्रवेशद्वार

मत्स्यालय

मत्स्यालय

लॉन्स

हत्ती कारंजा

प्राणिसंग्रहालय

प्राणिसंग्रहालय

सर्पोद्यान प्रवेशद्वार

सर्पोद्यान