माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, February 27, 2017

गिरिभ्रमण : जमनानाथ

आज निश्चित कुठं जायचं ते ठरवलं नव्हतं.  जुन्नरमध्ये डोंगरांची कमी नाहीये. त्यामुळे असाच नवा डोंगरमार्ग शोधू, याची खात्री होती. सकाळी वडज गावात आलो तेव्हा धरणाच्या पलिकडच्या डोंगरावर एक पांढरी मंदिरासारखी आकृती दिसली. तेव्हाच आजचे ध्येय गवसल्याचे वाटले. तिथुन चाललेल्या एका सद्गृहस्थाला विचारले, "काका, त्या डोंगरावरच्या मंदिरात कसे जायचे?" यावर त्यांनी सांगितले की, ते मंदिर नसून पाण्याची टाकी आहे. मनातल्या मनात मला पोपट झाल्याचे जाणवले! परंतु, पारूंडे गावात येणेरे फाट्यावर आल्यावर डोंगरावरचे ते मंदिर स्पष्ट दिसले. रस्ता मात्र त्या बाजुने नव्हता. गावाच्या अलिकडे उजव्या बाजूला असणाऱ्या गोरक्षवली बाबा दर्ग्याच्या जवळून एक रस्ता या डोंगराकडे जात होता. थोडी चौकशी केल्यावर समजले की, सदर मंदिर जिमनानाथाचे आहे. मग, पावसाळ्यातील पाण्याच्या ओहोळांनी तयात झालेल्या रस्त्याने मी डुलतडुलत या मंदिराच्या दिशेने निघालो. सकाळची थंडीची लहर आणि सूर्यकिरणांचा वर्षाव अंगावर घेत मी पायवाटा शोधू लागलो. या दिशेला चिटपाखरूही नव्हते. डोंगर चढू लागल्यावर पारूंडे गावचा विस्तार नजरेस येऊ लागला होता. एका छोटेखानी खिंडीत पोहोचल्यावर पलिकडे वडज धरण व दूरवर शिवनेरी किल्ला नजरेस पडत होता. आता पायवाट बऱ्यापैकी रूळलेली वाटली. दोन्ही बाजुंच्या डोंगररांगा स्पष्ट दिसू लागल्या होत्या. डोंगरावरच्या काटेरी झुडूपातून वडज धरण फारच सुंदर दिसत होते. अशावेळी छायाचित्रांचा मोह सुटत नाही. मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा सूर्य बऱ्यापैकी वर आलेला. दूरवर साखर कारखान्याच्या धूराचे लोट आसमंतात जाताना दिसत होते. अशा उंचीवर येऊन निसर्गवाचन करण्याची मजा काही वेगळीच असते.
बाहेरून पांढरा रंग दिलेल्या त्या मंदिरात शंकराची पिंडी व काही देवतांचे फोटोही होते. शिववार असणाऱ्या सोमवारीच या ठिकाणी भाविकांची रेलचेल असावी, असे एकंदरित वाटले. आराधना न करण्यासाठी इथे येणारा माझ्यासारखा वाटसरू विरळाच नाही का?