माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, June 22, 2012

नांदूर-मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य


महाराष्ट्रातील काही मोजक्या पक्षी अभयारण्यांपैकी एक म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. नाशिक जिल्ह्यातील निफ़ाड तालुक्यात नांदूर येथे हे अभयारण्य आहे. नाशिकच्या जीवनवाहिनी असणाऱ्या गोदावरी व कादवा या नदींच्या संगमावर बांधलेले धरण म्हणजे नांदूर-मध्यमेश्वर होय. या धरणाच्या बॅकवॉटर परिसरात सतत अनेक पक्षांची रेलचेल असते. शिवाय यात अनेक स्थलांतरीत पक्षांचाही समावेश असतो. निरनिराळ्या पक्षांच्या किलबिलाटात नांदूर-मध्यमेश्वर परिसर सतत गजबजलेला दिसतो. त्यामुळेच नांदूर-मध्यमेश्वर बंधारा अर्थात गोदावरी-कादवा संगम परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. धरणामध्ये डावीकडून येणारी गोदावरी व उजवीकडून वाह्णारी कादवा यांचा सुरेख संगम पाहता येतो. नांदूर-मध्यमेश्वर हे नाव तेथील संगमेश्वर व मध्यमेश्वरच्या प्राचीन मंदिरांमुळे पडले आहे. धरणाच्या बॅकवॉटर परिसरात संगमेश्वर तर धरणाच्या खाली गोदावरी नदी तीरावर मध्यमेश्वरचे मंदिर पाहता येते. पाणी कमी असताना धरणाच्या बांधाऱ्यावरुन विविध पक्षांचे दर्शन करता येते. सँडपायपर्स, किंगफ़िशर, टिटवी यांसारख्या पक्षांची येथे नेहमीच ये-जा असते. पाण्यावर स्थिर राहून अचानक सूर मारणारे किंगफ़िशर्स हे येथील नेहमीचे दृश्य. आपल्या आवाजाने आसमंत भारावून टाकणारा भारद्वाज, धनेश, तांबट व कोतवाल असे विविध पक्षीही येथे पाहायला मिळतात. शिवाय धरणावरुन दिसणारा सुर्यास्त हा नयनरम्य असतो. हा परिसर नाशिकपासून ५० किमीवर आहे. तसेच तो निफ़ाड या तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या १३ किमीवर आहे. स्वत:चे वाहन असेल तर या परीसरात पोहचणे खूप सोपे पडते. महाराष्ट्रातील पक्षी अभयारण्य म्हणून येथे भेट देण्यास काही हरकत नसावी.

छायाचित्रे:

संगमेश्वर मंदीर

संगमेश्वर

धरण

संगम परिसर

धरणातील मध्यमेश्वर मंदीर

No comments:

Post a Comment