माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, September 19, 2022

लेण्यांतील महादेव

लहानपणीपासूनचा तो आमचा ओळखीचाच डोंगर होता. रात्रीच्या अंधारात त्याचा काळाकभिन्न आकार देखील ओळखीचा झाला होता. परंतु काही महिन्यांपासून त्याच्यावर रात्री लाईटचे खांब दिसायला लागले. दिवसा इतक्या दुरून ते दिसत नव्हते. परंतु रात्रीच्या अंधारामध्ये तिथल्या दिव्यांचा प्रकाश व्यवस्थित दिसून यायचा. वरती जाणाऱ्या रस्त्यावर हे विजेचे खांब लावलेले होते. वीज मात्र पूर्ण डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलेली नव्हती. मध्यभागाच्या खालीच शेवटचा खांब दिसत होता. म्हणजेच त्या भागामध्ये कुठलेसे मंदिर निश्चितच होते. मग एक दिवस ठरवले की या मंदिराला भेट देऊन यायची.
गुगल मॅपवर त्याचा माग घेतला तेव्हा समजले की इथे एक छोटीशी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये मंदिर बांधलेले आहे. मग एक दिवस सकाळीच मॉर्निंग वॉकच्या उद्देशाने या डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालू केले. मुंबईच्या दिशेने जाताना पिंपरी पेंढार गाव सोडले की लगेचच उजवीकडे जाणारा एक छोटेखानी काँक्रीटचा रस्ता लागला. अगदी थोड्याच अंतरावर त्याला पुन्हा दोन फाटे फुटलेले दिसले. उजवीकडचा रस्ता डोंगरापलीकडील म्हसवंडी गावामध्ये जातो. तर डावीकडचा पिंपरी पेंढार मधील खारावणे या वस्तीच्या दिशेने जातो. हाच रस्ता पकडला आणि पुढे चालू लागलो. थोड्याच अंतरावर वाडीची मुख्य वस्ती लागली. तशी बऱ्यापैकी मोठी वस्ती या ठिकाणी दिसून येत होती. वस्ती संपली की एक कच्चा रस्ता डोंगराच्या दिशेने जाताना दिसला.
सकाळच्या प्रहरी या रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. सूर्य वर आलेला. परंतु ढगांमागे झाकोळलेला होता. त्याची किरणे अधून मधून पडत. परंतु पावसाळी वातावरणामुळे बहुतांश तो झाकलेलाच दिसत होता. वातावरण तसं शांत होतं. रमतगमत प्रवास करण्यासारखा तो परिसर होता आणि त्याला वातावरणाची देखील साथ लाभली होती. थोड्याच अंतरावर डावीकडे एक छोटासा पाझर तलाव दिसून आला. पावसाळ्याची ही सुरुवातच होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात पाणी त्यामध्ये साठलेले दिसले. विविध पक्षांची रेलचेल आजूबाजूच्या झाडांवर दिसून येत होती. निसर्गाचे ते मनमोहक संगीत ऐकत काही काळ तिथेच उभा राहिलो. पक्ष्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. नावाचं काही घेणेदेणे नव्हतं पण त्यांचे ते निरनिराळे आवाज मन तृप्त करत होते. कदाचित त्यांनाही माझी चाहूल लागली असावी. म्हणूनच थोड्याच वेळात एका मोठ्या थव्याने तेथून काढता पाय घेतला. आता समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या देवराईमधून पक्षांचा किलकिलाट ऐकू येत होता. अंतर बरंच असलं तरी वातावरणातल्या त्या नैसर्गिक शांततेमध्ये तो आवाज मन प्रसन्न करत होता.
मग असाच पुढे चालू लागलो. थोडीशी वस्ती देखील तिथे होती. इथूनच उजव्या बाजूला देवराईची सुरुवात होती. प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना कधीतरी आमची सहल या भागात आली होती. त्यानंतर बहुतेक २५ ते ३० वर्षांनी मी या ठिकाणी आलो होतो! जुन्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला. कदाचित याच ठिकाणी बसून आम्ही खेळ खेळलो होतो आणि रमत गमत डबे देखील संपवले होते! आज तो भाग पूर्णपणे देवराईने फुललेला होता. त्या देवराईच्या कडेकडेने गेल्यावर एका ठिकाणी डाव्या बाजूला जाणारा रस्ता होता. कुणाचं तरी बरंच मोठ शेतीक्षेत्र या ठिकाणी दिसून आलं. शिवाय गावठी गायींचा एक मोठा गोठा देखील होता. तो मागे पडल्यावर थोड्याच अंतरावर उजव्या दिशेला जंगलामधून डोंगराच्या दिशेने जाणारा जाणारी एक मस्तपैकी रुळलेली पायवाट दिसून आली. या क्षणी त्या पूर्ण परिसरामध्ये मी एकटाच मनुष्यप्राणी होतो!
जंगल तसं फारसं घनदाट नव्हतं. शिवाय पशुपक्ष्यांच्या आवाजामध्ये तिथली नैसर्गिक शांतताही जास्त भंग पावत नव्हती. वाटसरूंचा हा नेहमीचा रस्ता असल्याचे दिसत होते. म्हणून मी देखील हिमतीने त्या जंगलातल्या वाटेने चालू लागलो. आता दूरवरून मोरांच्या ओरडण्याचे देखील आवाज येऊ लागले होते. कुठेतरी माकडांची मस्ती चालू होती. त्यामुळे झाडांचे शेंडे हलताना दिसायचे. अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये काँक्रिटच्या पायऱ्या दिसायला लागल्या. लेण्यांच्या दिशेने जाण्यासाठी गावकऱ्यांनीच या पायऱ्या बांधल्या असाव्यात. पायऱ्यांचा रस्ता हा पूर्ण नव्हता. मध्येच चांगली पायवाट लागायची आणि काही ठिकाणी खोदलेल्या पायऱ्या दिसत होत्या. या पायऱ्या चढत वर आल्यानंतर जंगलाची तीव्रता काही अंशी कमी झालेली दिसली. मागे पाहिले तर बऱ्यापैकी मोठा परिसर दृष्टिक्षेपामध्ये आलेला होता. ज्या मुख्य रस्त्यावरून आतमध्ये वळालो तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ देखील येथून दिसायला लागला होता. आपल्या शेती क्षेत्रावर विविध कामे करणारे शेतकरी देखील आता दिसत होते.
डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालूच ठेवले. वळणावळणाचा आणि चढणीचा तो रस्ता दहा मिनिटांमध्येच सपाटीवर आला. उजव्या बाजूला थोडे चालत गेल्यानंतर डोंगराला असणारी ती अनारम्य नैसर्गिक गुहा दिसायला लागली. पर्वताच्या पोटामध्ये असणारं ते नैसर्गिक लेणं त्याचा नैसर्गिकपणा जपून होतं. याच लेण्यांमध्ये शिवलिंगाची स्थापना केल्याचे दिसले. आजच्या युगातील टाइल्स आणि सिमेंटचा लेप लावून लेण्यांमध्ये मंदिर सजवलेलं होतं. सकाळी सकाळी कुणीतरी येथे दिवा लावून गेलं होतं. मी पोहोचलो त्यावेळेस मात्र हा परिसर पूर्णतः निर्मनुष्य होता. शांत आणि निवांत होता. डोंगराच्या पोटामध्ये आपण बसलेलो आहोत आणि समोर अख्खा तालुका न्याहाळत आहोत, असं भासत होतं. पशु-पक्षांची किलबिल अजूनही निसर्ग संगीत तयार करीत होतं आणि खालच्या घनदाट जंगलामध्ये मोरांचे चित्कार देखील अधून मधून ऐकू येत होते. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आवडेल अशीच ती अद्भुत जागा होती. शिवाय पावसाळी वातावरण असल्याने वातावरणातील आल्हादपणा मन एकाग्र करायला मदत करीतच होता.
बराच वेळ तिथेच शांतपणे बसून राहिलो. अजूनही एक चतुर्थांश डोंगर चढलेलो होतो. म्हणजेच अजूनही बराचसा डोंगर चढायचा बाकी होता. या डोंगराच्या मुख्य माथ्यावर काय असावे? ही उत्सुकता मला देखील होती. मघाशी थोडं चढून आल्यावर जिथे डावीकडे वळालो त्याच ठिकाणी उजवी दिशेने जाणारा देखील एक रस्ता होता. कदाचित तोच डोंगर माथ्याकडे जात असावा.
अजूनही परतीसाठी बराच वेळ होता म्हणून डोंगर माथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. लेण्यांपासून परत फिरताना जाणारा रस्ता याच डोंगराला काहीसा वळसा मारून वरच्या दिशेने जातो. हा वळसा पूर्ण झाला. त्या ठिकाणी सरळसोट रस्ता डोंगर माथ्याच्या दिशेने जाताना दिसला. डोंगराच्या मागच्या बाजूने बहुतांश परिसर दृष्टीक्षेपात येत होता. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, नारायणगाव, ओतूर आणि जुन्नर हे चारही मोठी गावे या ठिकाणावरून दिसत होती! कदाचित अतिशय कमी ठिकाणांपैकी हे एक ठिकाण असावे. अधून मधून पावसाचे भुरभुरणारे थेंब पडत होते. परंतु ते लागून राहिले नाहीत. वातावरणातील मंद ओली हवा मन प्रसन्न करत होती. असं वाटत होतं की याच ठिकाणावरून तासनतास हा परिसर न्याहाळत बसावा.
वातावरणातील शांतता विलक्षण होती म्हणूनच पशुपक्ष्यांचे आवाज सुस्पष्टपणे ऐकू येत होते. या डोंगराच्या माथ्यावर कुणीतरी झेंडा लावलेला होता. कदाचित त्या ठिकाणी आणखी छोटेसे मंदिर बनवलेले असावे. या डोंगर माथ्याकडे जायची इच्छा होती परंतु वेळ तितका शिल्लक राहिलेला नव्हता. म्हणून आलेल्या रस्त्याने पुन्हा मागे फिरलो. प्रत्यक्ष आपल्याच गावामध्ये इतका सुंदर मनोहारी आणि नयनरम्य परिसर आहे, याची प्रचिती मला देखील पहिल्यांदाच आली होती!

गुगल लोकेशन: https://goo.gl/maps/MUf86CfPyatL8NmT9