माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Thursday, November 21, 2019

मस्तानीची कबर, पाबळ

सन 2006 मध्ये सर्वप्रथम पाबळला जाण्याचा योग आला होता. त्याच वेळेस पहिल्यांदा पाबळ गावात मस्तानीची कबर आहे, असे समजले. परंतु, तेव्हा भेट दिली नव्हती. मागील आठवड्यात इतक्या वर्षांनी पाबळला जाताना हे ठिकाण पाहण्याची संधी मिळाली. पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगरपासून पाबळ गाव वीस किलोमीटर अंतरावर आहे. या गावामधल्या लोणी रस्त्यावर डाव्या बाजूला बाजीराव पेशव्यांच्या मस्तानी बाईसाहेबांची समाधी बाहेर एकाकी पडल्याचे दिसते. त्या शेजारीच गावचे सुन्नी कब्रस्तान आहे. मस्तानीच्या कबरीभोवती सध्या सिमेंटचे बांधकाम करण्यात आले आहे व चबुतराही बांधलेला आहे. परंतु सध्याची त्याची अवस्था पाहता महाराष्ट्रातल्या एका दुर्लक्षित स्थळांपैकीच हे एक ठिकाण असल्याचे जाणवते.








Tuesday, November 19, 2019

चौरंगा दत्त मंदिर टेकडी, पेठ

पुणे-नाशिक महामार्गावरचा सर्वात पहिला बायपास रस्ता तयार झाला होता आंबेगाव तालुक्यातल्या पेठ या गावी! याच गावाच्या मागे दूरवर एक डोंगर दिसतो व त्यावर एक भव्य मंदिरही बांधल्याचे दिसते. हाच चौरंगा डोंगर होय. या डोंगरावर एक दत्तमंदिर आहे. पेठ गावातून एक रस्ता घोडेगाव कडे जातो. या रस्त्यावर उजवीकडे एक पाण्याची टाकी आहे. तिथून डाव्या बाजूला एक फाटा फुटून एक रस्ता भावडी गावात जातो. सदर रस्त्याने पुढे गेल्यावर आपला सौरंगा डोंगराच्या दिशेने प्रवास चालू होतो. हा परिसर बऱ्यापैकी चढाचा परंतु बिनाझाडीचा आहे. सौरंगा डोंगरावर दत्ताचे मंदिर झाल्याने आता थेट वरपर्यंत गाडी जाण्याचा रस्ता तयार केला आहे. पायथ्यापासून डांबरी रस्त्याने थोडे वर गेल्यास एक आश्रम दृष्टीस पडतो. तेथून पुढचा रस्ता कॉंक्रिटचा बांधलेला आहे. मी या डोंगरावर गेलो तेव्हा घाट रस्ता चालू होण्यापूर्वीच गाडी पायथ्याला पार्किंग केली व पायी रस्ता पार करायला सुरुवात केली. रस्त्याची चढण तशी बर्‍यापैकी आहे. परंतु, रस्ता सपाटच असल्याने फारशी दमछाक होत नाही. केवळ तीन वळणांमध्ये कॉंक्रिटचा रस्ता थेट माथ्यावर जातो. पावसाळ्यात येथुन नयनरम्य नजारा पाहायला मिळतो. माथ्यावर दत्ताचे बऱ्यापैकी मोठे मंदिर बांधले आहे. मंदिरात काळ्या पाषाणातली मूर्ती आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिर खेड तालुक्यात तर पायथा आंबेगाव तालुक्यात मोडतो. भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिराचेही असेच आहे. अवसरी घाटापासून खेड घाटात पर्यंतचा व बहुतांश आंबेगाव तालुक्याचा परिसर येथून न्याहाळता येऊ शकतो. डोंगरावर फारशी झाडे नसल्याने उन्हाळ्यात वैराण अवस्था पाहायला मिळते.











Friday, November 15, 2019

इंदिरा पाझर तलाव, खेड घाट

पुणे-नाशिक रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता राजगुरुनगर चा खेड घाट हाच सगळ्यात अवघड घाट उरल्याचे दिसते! या घाटाच्या झाडीतुन खाली पाहिल्यास एक सुंदर जलाशय तुडुंब भरलेला दिसतो. या तलावाच्या सर्व बाजूंनी डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होतो. सदर तलावाचे नाव आहे इंदिरा पाझर तलाव.
तलावाच्या मुख्य बांधाकडे जायचे असल्यास राजगुरुनगर कडून घाट सुरू होण्यापूर्वी डाव्या बाजूला एक रस्ता खालच्या दिशेने जाताना दिसतो. या रस्त्याने साधारणतः अर्धा किलोमीटर पुढे गेल्यात इंदिरा पाझर तलावाचा दृष्टीस पडतो. तिथून तलावाचे पूर्ण दृश्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता.
 




 


Wednesday, November 13, 2019

खंडोबा टेकडी, विठ्ठलवाडी

कळंब गावातून चास कडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारणत: दोन किलोमीटर उजवीकडे एक रस्ता टाकेवाडी च्या दिशेने जातो. या फाट्यावर एक छोटेखानी जंगल आहे. विठ्ठलवाडी हे इथले गाव. जंगलातून थोडंसं पुढे गेल्यावर पहिलाच उजव्या बाजूचा वळण घेणारा कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने चार-पाच घरे लागतात यातील शेवटचे घर हे खंडोबा टेकडीच्या पायथ्याचे घर होय. टेकडीवरच्या मंदिराची चावी याच घरात भेटते. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा त्याबद्दल माहिती नव्हती. घरातल्या लोकांनी स्वतः मला चावी आणून दिली होती. त्याच घराच्या मागच्या बाजूने एक छोटी पायवाट या टेकडीवर जाते. फार फार तर दहा मिनिटांमध्ये आपण या टेकडीवर पोहोचतो. टेकडीवर जाण्याकरता मोठा रस्ता बनविण्याचा प्रयत्न झाला असावा, असे दिसते. परंतु, अजूनही तो पूर्णतः कच्चा आहे. टेकडीवर खंडोबाचे छोटेखानी मंदिर आहे. येथून आंबेगाव तालुक्यातला बराचसा मोठा परिसर दृष्टीक्षेपात येतो. कळंब गाव व पुणे-नाशिक महामार्गही पूर्णपणे दिसतो. दुपारच्या वेळेस या टेकडीवरची हवा मात्र आनंदाची झुळूक वाटावी अशीच असते. टेकडीच्या दुसऱ्या बाजूनेही खाली उतरण्यास रस्ता आहे. स्वतःची गाडी घेऊन गेला नसल्यास या ठिकाणावरून उतरण्यास काहीच हरकत नाही.











Monday, November 11, 2019

शमाधर दर्गा, एकलहरे

पुणे-नाशिक महामार्गावर मंचरच्या पुढे मंचर खिंड ओलांडली की डाव्या बाजूला एका डोंगराच्या टोकावर पांढऱ्या रंगाचं बांधकाम दिसतं. तोच शमाधर दर्गा होय. रस्त्यावर जाता-येताना मला नेहमीच्या दर्ग्याच्या डोंगरावर जाण्याचे आकर्षण वाटत आले होते. शेवटी एक दिवस तो योग आलाच. या दर्ग्याचा डोंगर हा बर्‍यापैकी उंच आहे. लांबून मात्र त्याच्याकडे जाण्याचा रस्ता कुठून आहे, हे लवकर ध्यानात येत नाही. त्यासाठी स्थानिकांनाच हा रस्ता विचारावा लागतो. मंचर खिंडीतून साधारणत: एक किलोमीटर पुढे एक चौधरी निसर्ग ढाबा आहे. याच ढाब्याच्या अलीकडे त्याला लागून एक सरळसोट रस्ता वरच्या डोंगराच्या दिशेने जातो. पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती फारशी बरी नसते. परंतु, अगदी कारही या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाईल असे गृहीत धरता येऊ शकते. एकलहरे गावातून पलीकडच्या सुलतानपूर गावात जाण्यासाठीचा हा एक कच्चा रस्ता आहे. खूपच मुश्किलीने या डोंगरातून बाईक पलिकडच्या गावात जाऊ शकते. परंतु शमाधरला जाण्यासाठी पायपीट करत गेले तर योग्यच. मी या दर्ग्याच्या डोंगरावर पहिल्यांदा गेलो, तेव्हा एकटाच होतो मला एकट्यालाच रस्ता शोधायचा होता. पायथ्याशी एका ठिकाणी चौकशी केली तेव्हा समजले की, डोंगराच्या निम्म्या पासून पायऱ्या आहेत. त्यामुळे ही खूण लक्षात ठेवत मार्गक्रमण चालू केले. मळलेल्या पायवाटेने निम्म्यापर्यंत गेल्यावर डाव्या बाजूला शमाधर दर्ग्याचे सर्वोच्च टोक दिसू लागले. तसेच काही अंतरावर पायऱ्याही दिसत होत्या. सिमेंटने बांधलेल्या पांढऱ्या रंगाच्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत होत्या. त्यांच्या समोरच उजव्या बाजूला पाण्याचे छोटेखानी टाके दृष्टीस पडले. ते पावसाळा नुकताच संपल्याने तुडुंब भरलेले होते. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पायर्‍यांच्या शेजारच्या एका कठड्यावर थोडी विश्रांती घेतली व पुन्हा मार्गक्रमण चालू ठेवले. थोड्याच वेळात सिमेंटच्या पायर्‍या संपून दगडी पायर्‍या चालू झाल्या होत्या. एखाद्या किल्ल्याला असाव्यात अशा त्या पायऱ्या होत्या. वळणावळणाचा सुन्दर रस्ता व आजूबाजूला दाट झाडी होती. त्यातून एखादा किल्ला चढावा, असे भासत होते. खालच्या सिमेंटच्या पायर्‍या एक दोन वर्षांत खराब होतील परंतु, दगडी पायऱ्या कित्येक वर्षे पाय रोवून उभ्या राहतील, अशाच होत्या. अखेरीस एक छोटी विश्रांती घेऊन मी दर्ग्याच्या जवळपास पोहोचलो. अलीकडे तीन-चार मोठाले दगड लावून ठेवलेत. त्यांनाही दर्ग्याचा पांढरा रंग देण्यात आला होता. त्यातून एक चिंचोळी वाट या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर अर्थात शमाधर दर्ग्यापाशी जाते. अन्य दर्ग्यांसारखा हाही एक दर्गा होता. पण महत्त्वाचे म्हणजे दर्ग्याची जागा वगळता या टोकावर अन्य फारशी जागा नव्हती. उजव्या बाजूला जिथे दर्ग्याची सावली पडत होती, तिथे फरशा टाकलेल्या होत्या. दुपारचे साडेबारा वाजलेले, उन्हाची तीव्रताही वाढलेली होती. त्यात या टोकावर वारा सुटलेला व आजूबाजूच्या पावसाळ्यात वाढलेली दाट झाडी होती. मग काय, त्या सावलीतल्या फरशीवर अंग टाकले व आकाशाकडे बघून डोळे बंद केले. आम्हाला निसर्गसानिध्य इतके का आवडते? तर ते याच आल्हाददायक वातावरणासाठी! खरे तर निसर्ग आपल्याला जितका देतो तितका इतर कोणीच देत नाही.
दहा मिनिटांनी तिथून उठलो व समोरचा परिसर निहाळायला सुरुवात केली. हा डोंगर बराच उंच असल्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्याचा मोठा परिसर या ठिकाणावरून दिसत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारायणगाव व मंचर ही दोन्ही गावे एकाच वेळी दिसतील, असे हे एकमेव ठिकाण असावं! शिवाय येथून नारायणगड किल्लाही दिसत होता. अशा या सुंदर ठिकाणाहून परतण्याची इच्छा तर होत नव्हती. त्यामुळे जड अंत:करणाने परतीच्या वाटेला चालायला सुरुवात केली.




Saturday, November 2, 2019

हुतात्मा बाबू गेनू स्मारक, महाळुंगे पडवळ

पुणे-नाशिक महामार्गावर घोड नदीच्या काठावर मंचर जवळ कळंब नावाचे गाव आहे. या गावातून महाळुंगे पडवळ गावाकडे जाण्यासाठी एक छोटेखानी रस्ता आहे. त्यावर हुतात्मा बाबू गेनू जन्मस्थळ असल्याची कमान दिसते. गेली कित्येक वर्ष ही कमान मी पहात आलो. हुतात्मा बाबू गेनू बद्दल इतिहासाच्या पुस्तकात वाचले होते. परंतु इतके वर्ष बाबू गेनू चे गाव प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला नव्हता. त्या दिवशी मी या गावाला व स्मारकाला भेट द्यायचे ठरवले. कळंब गावापासून महाळुंगे पडवळ हे गाव सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे. रस्ता मात्र अतिशय सुंदर आणि दोन्ही बाजुला दाट झाडी आहे. रस्ता सरळ असल्याने कुठे चुकण्याचा संभव येत नाही. गावात पोहोचण्यापूर्वी दोन-तीन ठिकाणी खालील छायाचित्रात दिसत आहेत, अशी क्रांती शिल्पे बनवली आहेत.


शेवटचे क्रांति शिल्प आपल्याला बाबू गेनू सैद याच्या मूळ घराचा व स्मारकाचा रस्ता दाखवते. या ठिकाणावरून उजव्या बाजूला सैदवाडीमध्ये बाबू गेनू चे मूळ घर आजही आहे. तर डाव्या बाजूला महाळुंगे पडवळ गाव आहे. गावात शिरल्या बरोबरच समोरच ग्रामसचिवालयाची इमारत दिसते. तिच्या उजवीकडे जिल्हा परिषद शाळा व डावीकडे हुतात्मा बाबू गेनू स्मारकाचे मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडते.
अन्य हुतात्मा स्मारकांप्रमाणे याही ठिकाणी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे. त्याभोवती सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. बागेच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर हुतात्मा बाबू गेनू ची क्रांती शिल्पे कोरण्यात आली आहेत. त्यावरूनच हुतात्म्याचे कर्तृत्व आपल्याला प्रतीत होते. प्रत्येक शिल्पा शेजारी माहितीचा फलकही आहे. स्मारकाच्या मध्यभागी मुख्य सभागृह बांधले आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होत असावेत. बाबू गेनू चा प्राणाहुतीमुळे गावाचे नाव देशभरात पोहोचले. त्यामुळे गावकऱ्यांनी त्याच्या स्मृती खूप चांगल्या रीतीने जपून ठेवल्याचे दिसते.