माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, April 4, 2020

रेवदंडा बीच

पुण्याहून अलिबागला निघायच्या आधी आजूबाजूला कोणकोणते समुद्रकिनारे आहेत, याची गुगल मॅप वर माहिती काढून घेतली होती. त्यात रेवदंडा बीच पहिल्या क्रमांकावर होता. त्याची बरीच माहिती जमवली होती. शिवाय याच रेवदंड्याला किल्लाही असल्याने हा बीच करायचाच ठरवले होते. अलिबागच्या परतीच्या प्रवासात केलेला हा बीच होय. अलिबागहून निघालो व थेट रेवदंड्याला पोहोचलो. रेवदंडा गावातून एक रस्ता समुद्राच्या दिशेने जातो. नेहमीसारखी नारळाची दाट झाडी व त्यातून दिसणारा रेवदंडा समुद्रकिनारा फारच मनोहारी होता. बीचवर तशी काही गर्दी नव्हती. सकाळी ढगाआड गेलेला सूर्य बाहेर आलेला व भरतीचे पाणी आता बऱ्यापैकी शांत झाले होते. त्यामुळे हा समुद्रकिनाराही शांत-निवांत असाच भासला. दुपारच्या उन्हात समुद्राची निळेशार पाणी निसर्गचित्र तयार करीत होते. त्यामुळे समुद्रकिनार्‍याची खरी मजा येते लुटता आली. येथून समोरच कोरलाई किल्ला दिसतो. समुद्रकिनाऱ्यावरील गिरिदुर्ग असल्याने या वेळी जाऊन बराच उशीर झाला असता. त्यामुळे हा मार्ग आम्ही निवडला नाही. बाकी या दौऱ्यात पाहिलेल्या तिन्ही समुद्रकिनाऱ्यामध्ये सर्वात स्वच्छ किनारा म्हणून रेवदंडा चे नाव घेता येईल.









Friday, April 3, 2020

कुलाबा किल्ला

सन २००७ मध्ये कुलाबा किल्ला सगळ्यात पहिल्यांदा पाहिला होता. नाशिकला महाविद्यालयाला शिकवायला असताना मुलांसोबत त्यांच्यावर देखरेख ठेवायला गेलो होतो. त्यावेळी किल्ल्यावर जाता आले नाही. समुद्रात भरती चालू होती व किल्ला पूर्ण पाण्यात होता. त्याला केवळ दुरूनच पाहणे आमच्या नशिबात आले. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी आमचे अलिबागला जाणे झाले. दुपारी आम्ही अलिबागला पोहोचलो होतो. दुपारनंतर अलिबाग समुद्र किनार्‍यावर गेलो. तेव्हा समजले की, समुद्राची ओहोटी चालू आहे. समुद्र किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत जाण्याचा रस्ता पूर्ण रिकामा झाला होता. त्यामुळे थेट किल्ल्यावर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. समुद्राच्या त्या रेतीला तुडवीत आम्ही दहा-पंधरा मिनिटात किल्ल्यावर पोहोचलो. प्रत्यक्ष सर केलेला हा माझा पहिलाच जलदुर्ग! किल्ल्याची बांधणी तशी अजूनही ही भक्कम आहे. आत मध्ये बरीच वस्तीही दिसून आली. परंतु त्या मानाने स्वच्छता मात्र आढळत नव्हती. किल्ल्याच्या तटबंदीवर काही तोफा ठेवलेल्या आहेत. तिथून अलिबाग समुद्रकिनाऱ्याचे व समोरच्या अथांग सागराचे मनोहारी दर्शन होतं. किल्ला तसा विस्तीर्ण आहे. परंतु आणखी साफसफाई करून व्यवस्थित ठेवता येऊ शकतो, असं दिसतं. शेवटच्या टोकावरून अथांग सागराचे दर्शन तासन्तास करता येऊ शकते. गिरिदुर्गावरील वृक्षसृष्टीप्रमाणेच या जलदुर्गावरील सागर सृष्टीही अतिशय सुंदर भासते. अलिबाग सारख्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर असल्याने या किल्ल्यावर विनाकारण फिरणाऱ्या हौशी पर्यटकांची जास्तच गर्दी दिसते. त्यांना आवर घालण्याची गरज आहे. बाकी खऱ्या दुर्ग प्रेमींसाठी हा किल्ला म्हणजे पर्वणीच म्हणता येईल.














Thursday, April 2, 2020

रामशेज भ्रमंती

रामशेज किल्ल्यावर केलेला पहिला ट्रेक पावसाळी होता तो आजही मला आठवतोय. आशेवाडीपर्यंत रिक्षाने प्रवास व तिथून पायपीट करत पूर्ण किल्ला पालथा घातला होता. तिथून परत माघारी येताना चांभारलेणी पायी फिरून आलो होतो. कमीत कमी दहा किलोमीटर तरी तो पायी प्रवास होता. त्यानंतर बरेचदा रामसेजवर जाणे झाले. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये व सकाळ-दुपार-संध्याकाळ या तीनही वेळेस हा किल्ला मी सर केला आहे. नाशिक पासून सर्वात जवळचा किल्ला होय. तेथे रस्त्यावर आशेवाडी गावात तो स्थित आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील लढवय्या असा देदीप्यमान इतिहास या किल्ल्याला लाभलाय. रामशेज हा इतर कोणत्याही डोंगराशी जोडलेला नाही. स्वतंत्र असा मैदानी किल्ला आहे. शिवाय चढनही सोपी आहे. जास्तीत-जास्त पाऊण तासात हा किल्ला सर करता येऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यात सर केलेला ज्ञानेश्वरीचा हा पहिलाच किल्ला होय. जानेवारी महिन्यात माझं आरवायके महाविद्यालयात ट्रेनिंग सेशन असल्याने नाशिकला पाच-सहा दिवसांचा आमचा मुक्काम ठरलेला होता. जानेवारी महिन्याच्या कडाक्याच्या थंडीत आमचं आगमन नाशिकमध्ये झालं. तारीख होती एक जानेवारी २०२०. पुण्याहून नाशिकला पोहोचता पोहोचता संध्याकाळचे साडेचार वाजले होते. त्यानंतर आमचा प्रवास किल्ले सर करण्याच्या दिशेने चालू झाला. सव्वापाच वाजता पायथ्यापासून आमची सुरुवात झाली. नेहमीप्रमाणे ज्ञानेश्वरी उत्साहीत होती. यावेळी तिने एकटीने चालत हा किल्ला सर केला. विशेष म्हणजे यावेळी ती पूर्णपणे माझ्याच सोबत होती! जवळपास अर्ध्या तासाच्या चढाईनंतर आम्ही किल्ल्यावरच्या राम मंदिरापाशी आलो. सूर्य किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने असल्याने इथपर्यंत सावलीच पडलेली होती. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर सूर्यनारायणाचे दर्शन झाले. रामशेजचा सूर्यास्त यावेळी दुसऱ्यांदा अनुभवला होता. ते भाग्य या वेळी लाभले यातच सर्वात मोठे समाधान होते. ज्ञानेश्वरीने नेहमीसारखी मस्ती याही किल्ल्यावर केली. परंतु खचलेला मुख्य दरवाजा व इतर किल्ला पूर्णपणे पाहता आला नाही. खाली येईपर्यंत पूर्णपणे अंधार झाला होता. पार्किंगच्या जागेत शेवटपर्यंत फक्त आमचीच गाडी उभी असलेली दिसली.









Wednesday, April 1, 2020

नागाव बीच

बीचवर फिरायचं याच उद्देशाने अलिबागला गेलो. परंतु समुद्राला ओहोटी असल्याने संध्याकाळी त्याचं त्याचं पाणी खूप खोल गेले होतं. त्यामुळे आलिबाग समुद्रकिनाऱ्यावर समुद्रातल्या त्या पाण्याशी भेट झाली नव्हती! त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून इथून सात किलोमीटर असणाऱ्या नागाव समुद्र किनार्‍यावर जायचे आम्ही ठरवले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा होता. परंतु तरीही वातावरण ढगाळ झाले होते. कालच्या ओळखीमुळे कुलाबा किल्ला पूर्ण बघता आला, त्याचे शल्य नव्हते. अलिबागच्या बाहेर आल्यावरच अस्सल कोकणी शेतीतल्या नारळाच्या बागा दिसू लागल्या. तेव्हा पुढे कोकणचा 'फील' यायला लागला होता. मागच्या त्या किनार्‍यावर मात्र तोबा गर्दी झाली होती. काल कुणालाच अलिबागला पाणी दिसले नव्हते. त्यामुळे ती दुसऱ्या दिवशी सकाळी नागावला दिसली. बीच तसा नेहमीसारखाच, पण समुद्राला उधाण आले होते. शिवाय ढगातून अधून-मधून सूर्यदेवाचे दर्शन व्हायचे. विशेष म्हणजे खग्रास सूर्यग्रहणाचा तो काळ होता. नऊच्या दरम्यान सूर्याला ग्रहण लागणार होते. फक्त एखाद्या सेकंदाकरिता त्या खग्रास ग्रहणाकडे मी पाहिले होते. ही एक मोठी आठवण. बाकी बीच तर उत्तमच होता.