माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, April 3, 2020

कुलाबा किल्ला

सन २००७ मध्ये कुलाबा किल्ला सगळ्यात पहिल्यांदा पाहिला होता. नाशिकला महाविद्यालयाला शिकवायला असताना मुलांसोबत त्यांच्यावर देखरेख ठेवायला गेलो होतो. त्यावेळी किल्ल्यावर जाता आले नाही. समुद्रात भरती चालू होती व किल्ला पूर्ण पाण्यात होता. त्याला केवळ दुरूनच पाहणे आमच्या नशिबात आले. त्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी आमचे अलिबागला जाणे झाले. दुपारी आम्ही अलिबागला पोहोचलो होतो. दुपारनंतर अलिबाग समुद्र किनार्‍यावर गेलो. तेव्हा समजले की, समुद्राची ओहोटी चालू आहे. समुद्र किनाऱ्यावरून किल्ल्यापर्यंत जाण्याचा रस्ता पूर्ण रिकामा झाला होता. त्यामुळे थेट किल्ल्यावर जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. समुद्राच्या त्या रेतीला तुडवीत आम्ही दहा-पंधरा मिनिटात किल्ल्यावर पोहोचलो. प्रत्यक्ष सर केलेला हा माझा पहिलाच जलदुर्ग! किल्ल्याची बांधणी तशी अजूनही ही भक्कम आहे. आत मध्ये बरीच वस्तीही दिसून आली. परंतु त्या मानाने स्वच्छता मात्र आढळत नव्हती. किल्ल्याच्या तटबंदीवर काही तोफा ठेवलेल्या आहेत. तिथून अलिबाग समुद्रकिनाऱ्याचे व समोरच्या अथांग सागराचे मनोहारी दर्शन होतं. किल्ला तसा विस्तीर्ण आहे. परंतु आणखी साफसफाई करून व्यवस्थित ठेवता येऊ शकतो, असं दिसतं. शेवटच्या टोकावरून अथांग सागराचे दर्शन तासन्तास करता येऊ शकते. गिरिदुर्गावरील वृक्षसृष्टीप्रमाणेच या जलदुर्गावरील सागर सृष्टीही अतिशय सुंदर भासते. अलिबाग सारख्या प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यावर असल्याने या किल्ल्यावर विनाकारण फिरणाऱ्या हौशी पर्यटकांची जास्तच गर्दी दिसते. त्यांना आवर घालण्याची गरज आहे. बाकी खऱ्या दुर्ग प्रेमींसाठी हा किल्ला म्हणजे पर्वणीच म्हणता येईल.














No comments:

Post a Comment