माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, November 28, 2016

भ्रमंती [हिवरे-मिन्हेर]

अलिबाबाला त्याची हिरे-माणिकांनी भरलेली गुहा सापडावी तसा मला हिवरे-मिन्हेरचा हा परिसर गवसला होता. परवा वनदेवाच्या पर्वतावरून दूरवर दिसलेले वरसुबाईच्या डोंगररांगेतील एका टोकावरील मंदिर मला खुणावू लागले होते. हे मंदिर मी यापूर्वी मी कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे त्याचा मागोवा घेण्याचे मी मनाशी ठरवले. निरगुडेहून इंगळूनला जाणारा हा रस्ता इतका खडतर होता की, एके काळी यावर डांबर होतं यावर कुणाचा विश्वासच बसला नसता! मात्र मंदिराचा वेध घेण्यासाठी हाच मार्ग मला योग्य वाटला. राळेगण गावात आलो अन मंदिराच्या डोंगराकडे जाण्याची वाट दिसू लागली. पायथ्याशी सालोबा महाराजांचे मंदिर उन्हात चमकू लागले होते. डोंगराच्या त्या गर्द झाडीत इतका सुंदर घाट बनविलाय, हे पहिल्यांदाच पाहिले. बालकवींच्या ’हिरवे हिरवे गाल गालिचे, हरिततृणांच्या मखमलीचे’ या कवितेप्रमाणे हिरवी मखमल त्या पूर्ण डोंगरावर पसरलेली अन त्यातून नागमोडी वळणाचे रस्ते बनविलेले! उंचीगणिक जी शुद्ध हवा त्या वातावरणात भरली होती, ती शहराभोवतीही कधीच मिळणार नाही इतकी निर्मळ होती. नागमोडी वळणे घेत मी टोकावरच्या मंदिराचाच वेध घेत होतो. दूरचा बराच मोठा टप्पा दृष्टीस येत होता. झुंजुमुंजु झाल्याने आजुबाजुच्या गावांमधील रेलचल चालु झाली होती. मीना खोरे अन दाऱ्या घाटाचा तो परिसर एकाच दृष्टीत आला होता. असं वाटायचं, एका जागी स्तब्ध उभं राहून फक्त निसर्गदर्शन करत बसावं अन सृष्टीचा तो नेत्रदिपक नजारा डोळ्यांत साठवत राहावं. घाटाच्या एका उंच जागेवरून  प्रसन्नगड, हनुमानगड-निमगिरी अन पर्वतगड किल्ले एकाच रांगेत दिसत होते. किल्ल्यांवर नजर ठेवणारा तो टेहाळणी बुरूजच होता. सह्यपर्वतांचे थर एका रांगेत उभे राहून प्राणीमात्रांचे रक्षण करीत बसले होते. शेवटी मंदिरदर्शन म्हणजे केवळ औपचारिकताच उरली. नुकतेच बांधकाम केलेल्या त्या मंदिरात शेंदूर लावलेले पाषाणदेव पाहायला मिळाले. याच घाटाने भीमाशंकराच्या जंगलात उतरण्याची नवी  वाट दाखवली होती...

















 

Saturday, November 26, 2016

गिरिभ्रमण [मानमोडी पूर्वेकडून]

कालचा दुधारीचा ट्रेक करताना दूरवर मनमोडीचा डोंगर नजरेस पडला. तेव्हाच उद्या मानमोडीचा ट्रेक करायचे ठरविले. नियोजित वेळेप्रमाणे सकाळी खानापूर-धामनखेल च्या रस्त्याने गाडी पळवत नेली. सातवाहनांच्या लेण्यांमुळे हा डोंगर परिचित होताच, पण ह्या पर्वताच्या टोकावर दोन मंदिरांचे दर्शन झाले होते. त्यामुळे पुन्हा मानमोडीच्या दिशेने मोर्चा वळवला होता.
पायथ्याशी वैभव वर्पे यांची गाठ पडली व त्यांच्या रूपाने नवा गिरीमित्र अन वाटाड्या भेटला. छोटयाश्या जंगलातून वाट काढत पठारावर पोहोचलो. पूर्ण माळरानच ते. पुढची वाटचाल करताना टोकावरचे खंडोबा मंदिर दृष्टीस पडले. आजूबाजूचा परिसर धुक्याच्या लोळात अंधुक दिसत होता. त्याच धुक्यात सूर्यदेवही अगदीच अंधुक दिसू लागले होते. मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा साडेसात वाजून गेले तरी पहाटे सहाचा अनुभव येत होता. या ठिकाणावरून मानमोडी डोंगराची लांबी, रुंदी अन उंची पूर्णपणे कळते. लेण्यांचे दर्शन मात्र होत नाही. दूरवर याच डोंगरकपारीत असणाऱ्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन झाले तेव्हा उद्याचा बेत ठरला होता...
हजारो वर्षांपासून अंगाखांद्यावर लेण्या घेऊन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या डोंगराचा पूर्वेकडून केलेला छोटेखानी ट्रेकही तितकाच रिफ्रेशिंग होता.














Sunday, November 20, 2016

गिरिभ्रमण [दुधारी पर्वत]

तब्बल दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेला गिरिभ्रमणाचा योग...
छोटा पण ताजातवाना....
मायभूमी जुन्नरच्या सानिध्यात...
चहूबाजूंनी गिरिदुर्गांनी वेढलेल्या भूमीत गिर्यारोहणाची मजाच काही औरच असते...
पहाटेचा उत्साह अन गुलाबी थंडीतला रिफ्रेशिंग अनुभव...
धुक्याच्या दुलईत दूरवर दिसणारी खेडी, धरणांचा शांत व शीतल विस्तृत जलाशय...
शिवनेरी ते नारायणगड... हटकेश्वर, लेण्याद्रीच्या सुलेमान टेकड्या अन मानमोडीचा डोंगर...
सर्वच हा उत्साह ताजातवाना करणारं... पुन्हा नव्या जोमाने गिरिशिखरे पादाक्रांत करण्यासाठी... प्रोत्साहित करणारं...
विलक्षण अन विलोभनीय...


















Saturday, November 19, 2016

भ्रमंती [मीनेश्वर मंदिर]

साधूचं कूळ अन नदीचं मूळ शोधू नये असं म्हणतात. साधूच्या मूळाबद्दल माहिती नाही पण नदीच्या मूळ शोधण्याची आम्हाला भारीच हौस. त्याची सुरूवात नाशिकच्या गोदावरीपासून आम्ही केली होती. त्यानंतर नद्यांची उगमस्थाने शोधण्याचा धडाकाच लावला.  जुन्नरच्या कुकडी व पुष्पावतीनंतर आता मीनी नदीचा क्रमांक लागला. परवा तांबेवरून घंगाळदऱ्याकडे जाताना एका बाबांना लिफ्ट दिली होती तेव्हा त्यांनी या उगमस्थानाविषयी माहिती दिली. मग माझा प्रवास सुरू झाला. जुन्नरच्या चतुर्गंगांमधील मीना ही कुकडीनंतरची दुसरी मोठी नदी. इतिहासाच्या एका पुस्तकात शिलाहार राजा झंझ याच्या विषयी माहिती वाचली होती. गोदावरीपासून भीमेच्या खोऱ्यापर्यंत झंझाने बारा विविध नद्यांच्या उगमस्थानी बारा विविध शिवालये बांधली होती. यातील आज अनेक हेमाडपंथी शिवालये सुस्थितीत आहेत तर काही शेवटची घटका मोजतायेत. अहिल्यातीर्थ, रत्नेश्वर, हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वर, कुकडेश्वर अन भीमाशंकर ही यातील नावाजलेली शिवालये होत. मीना नदीच्या काठावर ब्रह्मनाथाच्या मंदिराचा संदर्भ आहे. प्रत्यक्षात पारूंडे येथे असणारे हे शिवालय मीना नदीच्या एका डोंगराच्या पलिकडे आहे. त्यामुळे राजा झंझनेच हे मंदिर बांधले आहे का, याविषयी माझ्या मनात संभ्रमच आहे.
परवा मीनेश्वर मंदिराविषयी समजले तेव्हा मी लगेचच त्या दिशेने कूच केली. आंबोली हे पुणे जिल्ह्यातले शेवटचे गांव. चहुबाजुंनी पर्वतांनी वेढलेले हे गांव आंबोली धबधबा, ढाकोबा अन दाऱ्याघाट या तीन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. या गावात येतो तेव्हा नुसतं पायी इथल्या डोंगर दऱ्यांमधून फिरायचा मोह आवरत नाही. आंबोलीच्या अलिकडे एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जातो. अगदीच कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने पुढे गेल्यावर कड्यांच्या पायथ्याशी मीनेश्वर महादेवाचे अलिकडच्या काळात बांधलेले छोटेखानी मंदिर आहे. कुकडेश्वराची प्रतिकृतीच ती! फरक इतकाच मीनेश्वराचे मंदिर हे हेमाडपंथी शैलीत मोडत नाही. मागच्या कोकणकड्याच्या त्या गर्द झाडीतून झुळझुळ वाहणारे ते स्वच्छ पाणी एका नंदिमुखातून पुढे जाताना दिसते. डोंगराच्या माथ्यावरून एका औदुंबराच्या मुळापासून या पाण्याचा उगम होतो. अतिशय शांतता असलेला हा परिसर केवळ नदीच्या पाण्याच्या आवाजाने निसर्गसंगीत निर्माण करत बसलाय...