माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, November 28, 2016

भ्रमंती [हिवरे-मिन्हेर]

अलिबाबाला त्याची हिरे-माणिकांनी भरलेली गुहा सापडावी तसा मला हिवरे-मिन्हेरचा हा परिसर गवसला होता. परवा वनदेवाच्या पर्वतावरून दूरवर दिसलेले वरसुबाईच्या डोंगररांगेतील एका टोकावरील मंदिर मला खुणावू लागले होते. हे मंदिर मी यापूर्वी मी कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे त्याचा मागोवा घेण्याचे मी मनाशी ठरवले. निरगुडेहून इंगळूनला जाणारा हा रस्ता इतका खडतर होता की, एके काळी यावर डांबर होतं यावर कुणाचा विश्वासच बसला नसता! मात्र मंदिराचा वेध घेण्यासाठी हाच मार्ग मला योग्य वाटला. राळेगण गावात आलो अन मंदिराच्या डोंगराकडे जाण्याची वाट दिसू लागली. पायथ्याशी सालोबा महाराजांचे मंदिर उन्हात चमकू लागले होते. डोंगराच्या त्या गर्द झाडीत इतका सुंदर घाट बनविलाय, हे पहिल्यांदाच पाहिले. बालकवींच्या ’हिरवे हिरवे गाल गालिचे, हरिततृणांच्या मखमलीचे’ या कवितेप्रमाणे हिरवी मखमल त्या पूर्ण डोंगरावर पसरलेली अन त्यातून नागमोडी वळणाचे रस्ते बनविलेले! उंचीगणिक जी शुद्ध हवा त्या वातावरणात भरली होती, ती शहराभोवतीही कधीच मिळणार नाही इतकी निर्मळ होती. नागमोडी वळणे घेत मी टोकावरच्या मंदिराचाच वेध घेत होतो. दूरचा बराच मोठा टप्पा दृष्टीस येत होता. झुंजुमुंजु झाल्याने आजुबाजुच्या गावांमधील रेलचल चालु झाली होती. मीना खोरे अन दाऱ्या घाटाचा तो परिसर एकाच दृष्टीत आला होता. असं वाटायचं, एका जागी स्तब्ध उभं राहून फक्त निसर्गदर्शन करत बसावं अन सृष्टीचा तो नेत्रदिपक नजारा डोळ्यांत साठवत राहावं. घाटाच्या एका उंच जागेवरून  प्रसन्नगड, हनुमानगड-निमगिरी अन पर्वतगड किल्ले एकाच रांगेत दिसत होते. किल्ल्यांवर नजर ठेवणारा तो टेहाळणी बुरूजच होता. सह्यपर्वतांचे थर एका रांगेत उभे राहून प्राणीमात्रांचे रक्षण करीत बसले होते. शेवटी मंदिरदर्शन म्हणजे केवळ औपचारिकताच उरली. नुकतेच बांधकाम केलेल्या त्या मंदिरात शेंदूर लावलेले पाषाणदेव पाहायला मिळाले. याच घाटाने भीमाशंकराच्या जंगलात उतरण्याची नवी  वाट दाखवली होती...

















 

No comments:

Post a Comment