माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, February 9, 2022

एका अल्पावधीत ग्लॅमरस झालेल्या किल्ल्याची गोष्ट

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाशकातल्या अनेक अपरिचित किल्ल्यांवर किल्ल्यांची आम्ही भ्रमंती करायला लागलो होतो. त्यातच त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्याबद्दल माहिती समजली.
त्यादिवशी तिथीनुसार येणारी शिवजयंती शनिवारी आली होती. शिवाय सुट्टीचा दिवस असल्याने आम्ही अर्थात मी आणि माझ्या भावाने हरिहर किल्ला सर करण्याची योजना आखली. पहाटे पाच वाजताच आम्ही नाशिक वरून प्रस्थान केले. थंडी संपून उन्हाळ्याची सुरुवात होऊ लागली होती. परंतु वातावरणात गारवा मात्र कायम होता. त्र्यंबकेश्वर परिसरातील दुगारवाडी हा नाशिक जिल्ह्यातला एक सुप्रसिद्ध धबधबा होय. यापूर्वीच्या वर्षाऋतू मध्ये दुगारवाडीला भेट दिली होती. याच रस्त्यावर ढगांमध्ये लपाछपी खेळणारा हरिहर किल्ला पहिल्यांदा पाहिला होता. त्यामुळे त्याचे भौगोलिक स्थान माहीत होते. दुगारवाडीच्या दिशेने जाणारा हाच मार्ग चालत आम्ही हरिहरच्या दिशेने निघालो होतो. सकाळी सातच्या दरम्यान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या हर्षेवाडी गावामध्ये आम्ही पोहोचलो. रस्त्यामध्ये कुठेच किल्ल्याच्या नावाची पाटी नव्हती. तसेच रस्ते देखील फारसे चांगले नव्हते. परंतु जंगलातील वळणावळणाचे रस्ते असल्यामुळे प्रवासाचे काही वाटले नाही. तसं पाहिलं तर हर्षवाडी एक आदिवासी गाव होतं. या भागात मानवी वस्ती तशी फार कमीच जाणवली. समोर हरिहर किल्ल्याचे सर सरळसोट पाषाण दिसत होते. कदाचित याच बाजूने वर जाण्यासाठी रस्ता असावा, असे आम्हाला वाटले. सकाळच्या वेळेस या परिसरात कुणीच नसल्यामुळे एका उजाड माळरानावर आम्ही बाईक पार्क केली. हेल्मेट कुठे ठेवायचे? हा प्रश्न होताच. त्यामुळे ते आम्ही बरोबरच घेऊन निघालो. थोडीशी मळलेली पायवाट किल्ल्याच्या दिशेने जाताना दिसली. अजूनही कोणत्याही मनुष्याचे दर्शन आम्हाला झाले नव्हते. किल्ल्याच्या दिशेने जाणारी पायवाट चालतच आम्ही मार्गक्रमण करू लागलो. दोन ते तीन ठिकाणी दगडाचे अवघड पॅचेस होते. ते पार करताना कस लागला. अखेरीस बालेकिल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचलो. समोर पाहिले तर जवळपास ९० अंशामध्ये असणाऱ्या पायऱ्या दिसल्या आणि काळजामध्ये धस्स झाले. या पायर्‍या चढून जायच्या? असा प्रश्नवाचक उदगार मनात उमटला. त्या क्षणी त्या पायऱ्या अतिशय अवघड वाटत होत्या. इथपर्यंत आलो तेच खूप झाले...  आता परत मागे फिरू या, असाही विचार मनामध्ये आला. परंतु थोडे पुढे गेल्यानंतर समजले की, प्रत्येक पायरीला दोन्ही बाजूंना खोबणी केलेल्या आहेत. त्यांना पकडून वरती जाणार जाता येणे शक्य होते. मग आम्ही धाडस करून त्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. इथून खाली निसटलो तर आजूबाजूला बघायला देखील कोणी नाही, हा विचारच भीतीदायक होता. परंतु हा थ्रिलींग अनुभव घ्यायचा आहे, असे आम्ही मनोमन ठरवले व पायऱ्या चढायला सुरुवात केली. एक एक करत साधारणतः पन्नास एक पायऱ्या चढत आम्ही मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. किल्ले भ्रमंतीमध्ये आलेला तो आजवरचा एक रोमांचकारी अनुभव होता. दरवाजातून पुढे गेल्यावर एका कोरलेल्या कपारीतून पुढे देखील अशाच प्रकारच्या पायऱ्या तयार केलेल्या दिसल्या. आम्ही त्यादेखील तितक्याच सावधतेने हळूहळू चढत वरच्या दिशेने मार्गक्रमण केले. थोड्याच वेळामध्ये शेवटचा दरवाजा देखील दृष्टीस पडला. तो पार केल्यानंतर किल्ला सर केल्याचे समाधान प्राप्त झाले होते. किल्ल्यावर काहीच वर्दळ नव्हती. काही उघडी मंदिरे, दोन-तीन तळी व एक सर्वोच्च टोक. शिवाय एका बाजूला धान्याचे भव्य कोठार...  इतकीच काय ती या किल्ल्याची संपत्ती होती! दूरवर दिसणाऱ्या धान्यकोठारांशी माकडांचा एक समूह उड्या मारताना दिसला. आमची चाहूल लागल्यामुळे त्यातली निम्मी माकडे तर निश्चित पळून गेली असावी. किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरून खाली उतरताना एक परदेशी आणि एक भारतीय व्यक्ती किल्ला पाहायला आलेली दिसली. या दुर्गदर्शनामध्ये आम्हाला दिसलेले ते दोघेच मनुष्य प्राणी होते. त्यादिवशी एक अद्भुत आणि रोमांचकारी किल्ला बघण्याचे समाधान आम्हाला लाभले.

दहा वर्षानंतर...

मधल्या काळामध्ये पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले. या वाहून गेलेल्या पाण्यामध्ये सोशल मीडिया नावाचा घटक अतिशय वेगाने कार्यरत झाला होता. समाज माध्यमांद्वारे हळूहळू हरिहर किल्ल्याची माहिती सर्वदूर पोहोचली. अगदी हौशे, नवशे आणि गवशे ट्रेकर्स फिरण्यासाठी या किल्ल्यावर तुडुंब गर्दी करू लागले. आमच्या हरिश्चंद्रगडासारखी परिस्थिती या ठिकाणी तयार झाली. गुगलवर तुम्ही नुसते हरिहरगड जरी सर्च केले तरी शेकडो व्हिडीओ, लेख व ब्लॉग तुम्हाला दिसून येतील. इतकी लोकप्रियता या किल्ल्याने मधल्या काळात प्राप्त केली. खऱ्याखुऱ्या ट्रेकर्सपेक्षा निव्वळ हुल्लडबाजी करायला येणाऱ्या पर्यटकांची इथे अधिक गर्दी होऊ लागली. याची प्रचिती या वर्षी केलेल्या ट्रेकमध्ये आम्हाला आली.
हर्षवाडी गावामध्ये आता नव्याने टोलनाका सदृश फाटक उभारले गेले होते. तिथे पावत्या पाडण्याची देखील सुविधा करण्यात आली होती. शिवाय आम्ही सकाळी साडे सहाच्या दरम्यान या पोहोचलो. सुट्टीचा दिवस नसून देखील तोवर बऱ्याच गाड्या पार्किंगमध्ये आधीपासूनच उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एक टेम्पो ट्रॅव्हलर दुरून कुठून तरी आलेली होती. तिच्यामध्ये असेच अतिउत्साही पर्यटक आल्याचे दिसत येत होते. किल्ल्याच्या मुख्य पायर्‍यांपर्यंत चढून गेलो तोवर फारशी गर्दी नव्हती. वातावरण आल्हाददायक झालेले होते. शिवाय सूर्यही बऱ्यापैकी वर आलेला होता. एकंदरितच फोटोग्राफीसाठी एक उत्तम वातावरण तयार झाले होते. तेव्हाच दहा वर्षांपूर्वीचा हरिहरगड आठवला. इथवर येईपर्यंत चार ते पाच ठिकाणी विविध खाद्यपदार्थांची दुकाने व उपहारगृहे देखील उघडलेली दिसली. शनिवार-रविवारी कदाचित इथे तुडूंब गर्दी होत असावी. आजूबाजूच्या गावकऱ्यांना रोजगाराचे नवे दालन उघडले असले तरी किल्ल्यावर प्लॅस्टिकच्या कचऱ्याची बरीच गर्दी देखील दिसून आली. आपल्या परिसरातील किल्ले आजही या प्लास्टिकच्या विळख्यात अजून वेगाने अडकत असल्याचे दिसतात. हरिहर याच दिशेने वेगाने प्रगती करताना वाटला. बालेकिल्ल्याच्या पायर्‍या चढायला सुरुवात केली व मध्यावर जाऊन थांबलो. तेवढ्यात किल्ल्यावरील माकडांचे आमच्यावर आक्रमण झाले. ही माकडे माणसाळल्यासारखी अतिशय जवळ येत होती. अगदी बॅगला हात लावून तिथे काही सापडते का, याची देखील चाचपणी करत होती! दहा वर्षांपूर्वी हीच माकडे आम्हाला पन्नास फुटावरून बघून पळून गेली होती. आज त्यांची बरीच उत्क्रांती झालेली दिसली! उत्साही पर्यटकांमुळे किल्ल्यांवरील माकडे माणसाळतात आणि त्याचा त्रास सर्वांनाच होतो. तशीच गत झाली होती. उतरताना देखील या माकडांनी इतर पर्यटक आणि ट्रेकर्सना बराच त्रास दिला. कोणत्या प्राण्यांना भूतदया दाखवायची? याचे प्रशिक्षण देखील मानवप्राण्याला द्यायला हवे, असे वाटून गेले. माकडांना माणसाने टाकलेल्या खाद्य पदार्थांची सवय झाल्यामुळे आता ते स्वतःचे खाद्य स्वतः शोधताना दिसत नाहीत. पायर्‍या चढून वर गेल्यावर मुख्य दरवाजाच्या समोरच अजून एक दुकान थाटलेले दिसले. येथून वर जाण्याचा रस्ता लवकर समजत नव्हता. किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो तोवर खालून येणाऱ्यांची बरीच गर्दी झालेली होती. शिवाय बराच आरडाओरडा देखील ऐकू येत होता. यावरूनच सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता आला. एकेकाळी अतिशय निर्जन व शांत असलेला किल्ला एक 'भयावह' पर्यटन स्थळ झालेला दिसून आला. किल्ल्याच्या माथ्यावर माकडे नसल्यामुळे यावेळेस किल्ला पूर्ण बघता आला, हे सौभाग्यच मानावे असे होते. किल्ला उतरताना विविध प्रकारच्या पर्यटकांची गर्दी दिसून आली. वर सांगितल्याप्रमाणे हौसे, नवसे आणि गवशे अशा सर्वच श्रेणीतील सो-कॉल्ड ट्रेकर्स किल्ल्यावर येत होते. हाफ चड्डी घातलेले, टाईट जीन्स घातलेले आणि थ्री-फोर्थ पॅन्ट घालून देखील ट्रेकिंग करणारे अनेक नवट्रेकर्स किल्ला चढताना दिसले. सोशल मीडिया एखाद्या किल्ल्याला किती ग्लॅमरस रुप देऊ शकतो, याचे मूर्तिमंत उदाहरण हरिहरच्या रूपाने दिसून आले. खाली येईपर्यंत हर्षेवाडी गावात देखील वाहनांची बरीच गर्दी झालेली दिसली.
यंदाच्या नाशिक दौऱ्यातील पहिल्याच किल्ल्याची भ्रमंती एका वेगळ्या दृष्टिकोनातून करता आली, त्यासाठीच हा लेखप्रपंच.