माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, November 27, 2022

शिवकालीन पूल

महाबळेश्वर ते प्रतापगड रस्त्यावर जावळीच्या जंगलामध्ये पेटपार नावाचं गाव आहे. याच गावामध्ये कोयना नदीवर हा शिवकालीन अर्थात सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वीचा पूल आजही आपले भक्कम अस्तित्व टिकवून आहे! महाबळेश्वरवरून प्रतापगडच्या दिशेने जाताना किल्ल्याच्या अलीकडे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला एक रस्ता जंगलामधून जातो. सुमारे तीन किलोमीटर अंतरावर नदी पार करण्यासाठी हा पूल बांधलेला होता. आजही तो अत्यंत भक्कम असून याहीपुढे अनेक दशके वापरात येऊ शकतो! नदीच्या काठावर एक छोटेखानी गणेश मंदिर देखील आहे. 

Location: https://goo.gl/maps/X1TatnEWftZFJSeX6






Monday, November 21, 2022

रस्ते

हिरव्या घनदाट जंगलातून जाणारे काळे कुळकुळीत आणि सपाट डांबरी रस्ते म्हणजे निसर्ग सौंदर्याचा नवा मापदंड होय. या रस्त्यांवरून इच्छित स्थळी प्रवास करण्याची मजा काही वेगळीच असते! सौंदर्य स्थळे पाहण्याकरता केलेल्या प्रवास त्रासदायक वाटत नाही. उलट तो प्रसन्नता आणि शितलता घेऊनच आपल्या सवे चाललेला आहे की काय असं वाटून जातं! 



Tuesday, November 15, 2022

चिवळा समुद्रकिनारा

मालवणच्या चिवळा समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा पावसाच्या सरी मंदपणे कोसळत होत्या. समुद्राला उधाण आलेलं होतं. भरतीची वेळ होती. समुद्राच्या लाटा वेगाने किनाऱ्यावर आदळत होत्या. वातावरणात एक समृद्ध ताजेपणा भरलेला वाटत होता. वातावरण ढगाळ असलं तरी बऱ्यापैकी स्वच्छ झालेले होते. लाटांचा आवाज सातत्याने समुद्राच्या रौद्रपणाची आठवण करून देत होत्या. रहदारी देखील अतिशय तुरळक होती आणि समुद्रकिनाऱ्यावरचं ते सौंदर्य बहरून आलं होतं. वाटत होतं की आपण एका वेगळ्याच विश्वात हरवलेलो आहोत. शहराच्या गलबलाटापासून दूर निसर्गाच्या सहवासात अद्भुत मानसिक शांतता अनुभवत होतो. कदाचित ती आपल्या परिसरामध्ये अतिशय कमी अनुभवायला मिळत असेल. 




Friday, November 11, 2022

शिरोडा समुद्रकिनारा

मनुष्य सातत्याने परिश्रम करत थकून जातो. म्हणून सातत्याने काही ना काही काम करत असणारा प्रत्येक जणच थकत असतो, ही आपली मानसिकता झालेली आहे. याच कारणास्तव निसर्ग का थकत नाही? या प्रश्नाने आपल्याला आश्चर्य वाटतं!
करोडो वर्षांपासून समुद्र फेसाळत्या लाटा घेऊन किनाऱ्याला धडकतो आहे. तो कधीही थकत नाही. निसर्गाचे गीत तो कोट्यावधी वर्षांपासून तसेच गात आहे. आपण फारच कमी कालावधीसाठी त्याच्यासोबत असतो. त्याचा आनंद लुटत असतो आणि त्याच्या परिश्रमांची दाद देखील देत असतो. शिकण्यासारखं भरपूर आहे त्याच्याकडून. त्यातलं थोडं जरी आत्मसात केलं तरी जीवन सार्थकी लागलं, असं समजायचं!


 

Thursday, November 10, 2022

म्हसवंडी घाट

म्हसवंडी हे अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातलं आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरचं डोंगरात लपलेलं गाव. पुणे जिल्ह्यातल्या आमच्या गावापासून हे गाव फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. गावातून म्हसवंडीकडे जाणारा रस्ता देखील पक्का नाही. बालाघाटाच्या या डोंगर रांगेमध्ये अनेक छोट्या छोट्या वाटांनी अहमदनगर आणि पुणे जिल्हा जोडलेला आहे. त्यातीलच पिंपरी पेंढार ते म्हसवंडी जोडणारी ही वाट 'मॉर्निंग वॉक'साठी असणार एक उत्तम ठिकाण होय.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून उत्तरेकडे जाणारा एक कच्चा रस्ता दिसतो. या रस्त्याने पुढे गेल्यानंतर उजवीकडे जाणारा रस्ता म्हसवंडी कडे जातो. या रस्त्यावर अजूनही मी डांबर पडलेलं पाहिलेलं नाही! डोंगराच्या पायथ्याशी गेलं की बऱ्यापैकी सुंदर वनराई दृष्टीस पडते. याच वनराईतून एक छोटासा घाट रस्ता म्हसवंडीच्या दिशेने जातो.
इथं पायथ्याशी गाडी लावली तेव्हा सकाळच्या प्रहरी निरव शांतता अनुभवता येत होती. विशेष म्हणजे जंगलामध्ये मोरांचे प्रमाण लक्षणीय आहे. पायीच घाटरस्ता चालत असताना उजव्या बाजूला थोडं उंचावर मोर आणि लांडोर अगदी सहजपणे बागडताना दिसले. त्यांच्याही पलीकडे मोरांचे चित्कार ऐकू येत होते. अगदी काही सेकंदांमध्ये त्यांच्याजवळ जाऊन त्यांना पकडू शकतो. इतक्या जवळ ते होते! निसर्गाच्या या खुल्या मैदानामध्ये मुक्त संचार करणारे मोर पाहिले की निसर्ग स्वातंत्र्याची प्रकर्षाने आठवण येते. मोरांव्यतिरिक्त अन्यही निरनिराळ्या पक्षांची किलबिल सकाळच्या प्रहरी व्यवस्थित ऐकू येत होती. या निसर्गसंगीताला कानामध्ये साठवताना काहीतरी नवं शोधल्याचा मलाही भास झाला. तो वळणावळणाचा घाट रस्ता चढत मी मुख्य खिंडीपाशी आलो तेव्हा दोन-तीन गवळ्यांचे दर्शन झाले. इथून उजवीकडचा रस्ता म्हसवंडीच्या दिशेने जातो. मी त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. तोवर सूर्योदय झालेला नव्हता. आकाश बऱ्यापैकी ढगांनी अच्छादलेले दिसून आले. पण पूर्वेच्या क्षितिजावर ढगांची तशी कमीच गर्दी होती. चालताना हवेतला गारवा काहीसा जाणू लागला. थोड्याच वेळात सूर्याची केशरी किरणे पूर्व क्षितिजावरून दिसायला लागली आणि दूरवर डोंगराच्या कुशीत वसलेलं म्हसवंडी गाव उजळून निघताना दिसलं. पावसाळा नुकताच संपला असल्याने अजूनही बऱ्यापैकी हिरवाई होती. शिवाय निरनिराळ्या रानफुलांची गर्दी देखील रस्त्याच्या आजूबाजूला दिसून आली. गावाकडचे जीवन म्हणजे याच नैसर्गिक वनराईमध्ये बागडणारं असतं. शहरी जीवनाला वैतागलेल्या अनेक जीवांसाठी तो एक शांततेचा आधार असू शकतो. असेही वाटून गेलं!
बराच वेळ पूर्वेकडून हळूहळू वर येणाऱ्या सूर्याकडे टक लावून मी बघत होतो. त्या समाधीस्थ मुद्रेमध्ये निश्चित किती वेळ गेला असेल, हे मला अजूनही आठवत नाही. 







Monday, November 7, 2022

फोंड्याच्या घाटात

पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटवाटा आहेत. पावसाळ्यामध्ये या घाटवाटा निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या असतात. इतर ऋतूंमध्ये देखील त्यांचे सौंदर्य कमी होते असं नाही. त्यामुळे कोकणात प्रवेश करत असताना कोकणातील हे घाट नेहमीच आम्हाला आकर्षित करतात. इथे थांबून इथलं निसर्गसौंदर्य निहाळण्याचा आनंद आम्ही घेत असतो. पावसाळ्यातील इथलं सौंदर्य काही वेगळंच असतं. ते तासंतास न्याहाळत बसणं म्हणजे एक पर्वणीच असते!
चहुकडे पसरलेलं हिरवगार रान, जंगल आणि डोंगरांवरून चाललेली ढगांची मस्ती ही या घाटवटांमधील महत्त्वाची सौंदर्य स्थळं होत. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या फोंडा घाटातून प्रथमच प्रवास केला. इतर घाटवाटांप्रमाणेच हा देखील निसर्ग सौंदर्याची उधळण करत असलेला एक आकर्षक घाट रस्ता आहे. कोकणात प्रवेश करीत असताना आपले स्वागत इतक्या सुंदर घाटाने होते, तेव्हा प्रवासाची मजा काही औरच असते! 







Friday, November 4, 2022

एक नवखा ट्रेकर

एका कार्यशाळेच्या निमित्ताने अहमदनगरला जाणे झाले. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कार्यशाळा होती. कार्यशाळेची वेळ सकाळी नऊ ते चार अशी होती. पुण्याबाहेरच्या कोणत्याही शहरामध्ये गेलो की तिथल्या इतिहासाची आणि प्राचीन वास्तूंची भेट मी नक्कीच घेतो. यावेळेस अहमदनगरच्या मांजरसुंबा किल्ल्यावर सैर करायची होती. पण कुणीतरी जोडीदार हवा होता. कार्यशाळेच्या विद्यार्थी व्यवस्थापन समितीमध्ये तृतीय वर्षात शिकणारा वैभव शिंदे याच्याकडे माझ्या राहण्याची आणि खाण्याची जबाबदारी देण्यात आली होती. तो मूळचा औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री इथला. देवगिरी किल्ल्याच्या परिसरामध्ये राहत असला तरी त्याने तो किल्ला देखील पाहिलेला नव्हता! एकंदरीत त्याने आजवर एकही किल्ला पाहिलेला नव्हता. म्हणून हा माझ्यासोबत किल्ल्यावर येईल की नाही? याची साशंकताच होती. परंतु मी जेव्हा त्याला किल्ल्यावर ट्रेक करण्याकरिता विचारले तेव्हा त्याने लगेचच होकार दिला. त्यामुळे मलाही सोबत मिळाल्याने हायसे वाटले. उद्या सकाळी सहा वाजता तयार रहा, असे मी त्याला सांगितले. एकंदरीत तो आज्ञाधारक वाटत होता.
सहा वाजता तो तयार होईल, याची खात्री देखील होती. बरोबर सकाळी सहा वाजता मी औरंगाबादकडे जाणाऱ्या फाट्यावर पोहोचलो. तो तिथे तयारच होता. आम्ही मार्गक्रमण चालू केले. अर्ध्या तासामध्ये किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. त्याचा आयुष्यातला हा पहिलाच किल्ला होता. माझ्यासोबत त्याने देखील किल्ल्याची पूर्ण भ्रमंती केली. आम्ही फोटो देखील काढले. त्याच्या एकंदरीत हालचालीवरून त्याला हा प्रवास आवडला असावा, असे मला वाटले. श्रीगणेशा तर झालाच होता. आता इथून पुढे महाराष्ट्रातील बाकीचे किल्ले देखील सैर करेल, असं त्यांने मला सांगितलं. आणखी एका मराठी मुलाला किल्ले प्रवासाची आणि करून दिल्याचे समाधान मला त्यादिवशी लाभले होते. मला विश्वास आहे की, इथून पुढच्या सुट्ट्यांमध्ये तो नक्कीच आपली दुर्ग भ्रमंती पुढे चालू ठेवील.