माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, July 26, 2020

मांदारने घाट

पावसाची एक सर येऊन गेली होती. जूनमध्ये अशा सरी सतत चालूच राहतात. पण संततधार मात्र राहत नाही. यासाठी जुलैची वाट पहावी लागते. जुन मधल्या अशा छोट्या सरीही धरतीला हिरवेगार करत असतात. पाऊस आणि धरणीतून येणारा सुगंध जून व्यतिरिक्त इतर कोणत्याही महिन्यात येत नाही. अशा वातावरणात जुन्नरच्या परिसरात फेरफटका मारण्याचा मोह आवरत नाही. कोणतेही एक ठिकाण निवडायचं आणि प्रवास चालु करायचा. सह्याद्रीच्या डोंगररांगात फिरणारी पावसाळी स्वच्छ हवा मन तृप्त करून टाकते. अशाच एका वातावरणात मांदारणे घाट रस्त्याने भटकंती चालू केली. ओतूरपासून उदापुरात येईस्तोवर समोरचा हटकेश्वर डोंगर दिसत होता. माळशेज मधून आलेले ढग हटकेश्वराच्या माथ्याला धडका देत होते. जणू काही ते महादेवाचा तो डोंगरच लोटण्याचा प्रयत्न करीत असल्याचा भास होत होता. हवेत चांगलाच गारवा भरून आलेला होता. रस्त्यावरची गर्दी तशी तुरळकच होती. उदापुरातून थेट मांदारनेच्या रस्त्याला लागलो. हिरव्यागार वनराईतून हा रस्ता वळणे घेत घाट माथ्याकडे जातो. समोर मांदारनेच्या डोंगररांगा दृष्टीस पडू लागल्या. चक्रीवादळाच्या एका पावसात तशी बरीच हिरवाई तयार झाली होती. त्यामुळे निसर्गचित्रे विविध ठिकाणी तयार झाल्याची दिसली. घाटाच्या खाली गाडी उभी केली व सह्याद्रीच्या शुद्ध हवेचा आस्वाद घ्यायला लागलो.








Monday, July 20, 2020

माणिकडोहातली कुकडी नदी

जून मधला ऊनपावसाचा खेळ त्यादिवशी चालू होता. कधी आकाश नभच्छादित होत होतं तर कधी लख्ख ऊन पडत होतं. वातावरण मात्र स्वच्छ होतं. अगदी दूरदूरचे डोंगर सुद्धा स्पष्ट दिसत होते. जुन्नर मधून नाणेघाटला वर्‍हाडी डोंगरही चांगला स्पष्ट दिसत होता. ढगांची बरीच गर्दी तिथे झालेली दिसली. अशा वातावरणात जुन्नर मधलं निसर्गसौंदर्य न्याहाळत बसणं म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच. निसर्गाचे ते वेगळं रूप अशा स्वच्छ वातावरणात मनमोहक भासतं. अशा या भटकंतीचे योग तसे आम्हाला फारच कमी येतात. परंतु, त्यादिवशी आम्ही भाग्यवान ठरलो. माणिकडोह धरणाचा रस्ता धरला आणि असंच भटकत निघालो. गाव येण्याच्या पूर्वी डावीकडे एक रस्ता कुकडी नदीच्या पात्रात जातो. त्याच रस्त्याने आमचे मार्गक्रमण चालू झाले. नदीचे पात्र त्याठिकाणी फारच रुंद आहे. शिवाय वेगवान प्रवाहामुळे पात्रात विविध निसर्ग रचना तयार झालेल्या दिसतात.
त्यादिवशी धरणांमधून पाण्याचा प्रवाह बराच वेगाने वाहत होता. नदीच्या पुलापाशी आलो तेव्हा त्या प्रवाहात नदीचे रौद्ररूप अनुभवयास मिळाले. या ठिकाणी एक छोटासा पूल आहे. छोटासा यासाठी की, नदीचे पात्रही तितकच छोटं आहे. इतक्या छोट्या भागातून नदी वेगाने पुढे जाते. कदाचित पात्रांमध्ये विविध निसर्ग रचना तयार झाल्या असाव्यात. साधारणतः अर्धा किलोमीटरपर्यंत हा प्रवाह दिसून येतो. इथेच नदीच्या काठावर मळगंगा देवीचं मंदिर आहे.
त्यादिवशी ऊन आणि ढग यांचा जो खेळ चालला होता, त्यामध्ये मंदिर अतिशय सुंदर भासत होतं. मागे पिंपळेश्वराचा रानदेवाचा डोंगर आणि त्यावर पडणारे सोनेरी ऊन, यात नदीचा प्रवाह आणि त्यावरचं सुंदर मंदिर फोटोग्राफी साठी एकदम अनुकूल वातावरण तयार झालं होतं. त्याचा पुरेपूर आनंद आम्हाला घेता आला.




Saturday, July 18, 2020

हवाई मुलुखगिरी, लेखक-मिलिंद गुणाजी, छायाचित्र-उद्धव ठाकरे

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे आणि पर्यटनावर बंदी असल्याने किल्ले भ्रमंती करता येत नाही. दुर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी सध्या कठीण काळ चालू आहे! त्यामुळे पावले घरात थांबली आहेत आणि किल्ले ओस पडलेले आहेत.
घरच्या घरी किल्ले पाहण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय म्हणजे दुर्गभ्रमंती वर लिहिली गेलेली पुस्तके. अनेक पुस्तकांमध्ये छायाचित्रे समाविष्ट नाहीत. परंतु उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांचं "हवाई मुलुखगिरी" हे पुस्तक मात्र अपवाद आहे. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांचे रंगीत बर्ड आय व्ह्यूज या पुस्तकातून पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशी छायाचित्रे या पुस्तकांमध्ये आहेत. भुईकोट किल्ले, गिरीदुर्ग आणि सागरी दुर्ग अशा सर्व प्रकारचे किल्ले यात समाविष्ट आहेत. सह्याद्रीचं दुर्गसौंदर्य उद्धव ठाकरे यांनी अप्रतिमरीत्या आपल्या कॅमेरामध्ये बंदिस्त केलं आहे. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी छायाचित्रे या पुस्तकात पाहता येतात. आमच्या जुन्नर मधले जवळपास सर्वच किल्ले या पुस्तकात आहेत. याशिवाय लेणी, घाटवाटा कोकण कडा अशा विविधरंगी छायाचित्रांनी हे पुस्तक सजलेलं आहे. पावसाळ्यातली छायाचित्रे तर अतिशय मनमोहक आहेत. त्यांच्याकडे पाहातच रहावसं वाटतं. पुस्तकात केवळ छायाचित्रच नाही, तर मिलिंद गुणाजी यांनी किल्ल्यांची वर्णने देखील केलेली आहेत. त्यामुळे घरबसल्या सह्याद्रीची भ्रमंती करण्यासाठी हे पुस्तक एक उत्तम "आधार"
म्हणून बघता येईल!




 

Friday, July 17, 2020

पिंपळगाव जोगा

जुन्नर मधल्या सर्वात मोठे धरण म्हणजे पिंपळगाव जोगा होय. हे धरण भरलं म्हणजे इथला पाऊस भरपूर झाला, असं मानलं जातं. या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपळगाव जोगा धरण बऱ्यापैकी भरलेलं होतं. पावसाची एक सर पडून गेल्यावर वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ झाले होतं. सह्याद्रीच्या कड्यांवर ढगांची गर्दी जमू लागली होती. अशा वातावरणात यंदाच्या पावसाळ्यात ही आमची पहिली भ्रमंती चालू झाली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून खिरेश्वरच्या दिशेने निघालो. माळशेज घाटात पुणे जिल्ह्याची सीमा संपते, त्याच्या साधारणतः किलोमीटरभर अलीकडे उजवीकडे खिरेश्वर गावाकडे जाणारा रस्ता आहे. हाच रस्ता पुढे हरिश्चंद्रगडाकडे जातो. धरणाच्या मागच्या भिंतीवरून हा रस्ता बांधला आहे. येथून एमटीडीसीचे माळशेज घाटातील विश्रामगृह अगदी स्पष्ट दिसते. शिवाय घाटातील डोंगर रंगांवर ढगही गर्दी करताना दिसतात.
भैरव गडाचा सुळका दिसू लागला की, आपण धरणाच्या भिंतीच्या मध्यावर पोहोचलेलो असतो. इथून माळशेज घाटाचा पहारेकरी सिंदोळा अतिशय मनमोहक भासतो. तसं पाहिलं तर पूर्ण धरणाला फेरी मारेपर्यंत सिंदोळा किल्ल्याची विविध रुपं येथून न्याहाळता येतात.
खिरेश्वर गावापाशी पुष्पावती व काळू नदीची उगमस्थाने आहेत. त्यापैकी काळू नदी ठाणे जिल्ह्यात वाहते व पुष्पावती नदी पुढे पुणे जिल्ह्यातून प्रवास करते. धरणाच्या बांधावरून हेमाडपंती नागेश्वर मंदिर न्याहाळता येऊ शकते. सुंदर वनराईत हे मंदिर एकाकीपणे ठाण मांडून बसल्याचे दिसते. समोरच हरिश्चंद्रगडाच्या उंच उंच डोंगर रांगा पसरलेल्या दिसतात. खिरेश्वर गावातून उजव्या बाजूला जाणारा रस्ता पिंपळगावजोगा गावाच्या दिशेने जातो. अजूनही रस्त्याची स्थिती तशी फारशी चांगली नाही. पण मजा अशी की, या रस्त्यावरून प्रवास करताना उजवीकडे धरणाचा अथांग जलाशय व डावीकडे उंचच उंच पर्वतरांगा पाहता येतात. जुलै-ऑगस्टमध्ये या डोंगररांगात असंख्य जलप्रपात कोसळताना दिसतात. असे अनेक अज्ञात धबधबे या परिसरात आहेत. खिरेश्वरचा जलपरी धबधबा मात्र निश्चित भेट देण्यासारखाच आहे. कोल्हेवाडी, साबळेवाडी, सांगणोरे व भोईरवाडी ह्या रस्त्यावरची प्रमुख गावे वस्त्या होय. सांगणोरे गावच्या परिसरात हिवाळा ऋतूत फ्लेमिंगोही पाहता येतात. शिवाय निसर्गचित्र न्याहाळण्यासाठी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. धरणाचे पाणी शांत असते तेव्हा पलीकडील सिंदोळा, निमगिरी, हडसर किल्ला नयनरम्य निसर्ग चित्र तयार करताना दिसतात.







Thursday, July 16, 2020

बदगीचा घाट

जुन्नर मधून अहमदनगर जिल्ह्यात जाणाऱ्या तीन घाटवाटा आहेत. त्यापैकी लागाचा घाट सर्वात चांगला गाडीरस्ता होय. आता बदगी-बेलापूरचा घाटही चांगल्या स्थितीत आला आहे. जुन्नरच्या खामुंडी गावातून एक रस्ता जवळचा डोंगराच्या दिशेने उत्तरेकडे जातो. या रस्त्याने आपण डोंगरापलीकडच्या बेलापूर-बदगी गावात उतरू शकतो. घाट तसा सुंदर आहे. पावसाळ्यात हिरव्यागार वनराईने नटलेला असतो. या घाटातून चढत जात आपण परत म्हसवंडीच्या घाटाने जुन्नरमध्ये उतरू शकतो.
त्याचीच माहिती देणारी ही चित्रफित...


 

Sunday, July 12, 2020

आडोशीच्या माळरानावर

पावसाळ्यातला नाणेघाट व आमचं अतूट नातं...  हे साधारणतः अबाधित ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. या वर्षीही अशीच आडवाटेवरची भ्रमंती घाटात करण्याचा विचार केला होता. त्यातूनच भोरांड्याच्या दाराची योजना आखली. पहाटे पाच वाजता मी आणि भाऊ दोघेही घरून निघालो. घरापासून नाणेघाटाचं अंतर सुमारे पन्नास किलोमीटर असावं. सूर्योदय होईपर्यंत नाणेघाटात पोहोचण्याचा मानस होता आणि झालंही तसंच. कुकडेश्वरच्या पुढे निघालो तेव्हाच उजाडायला लागलं होतं. जूनच्या काही सरी पडून गेल्या होत्या. त्यामुळे अवकाशात ढगांची गर्दी तर होतीच. इकडे जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात या सर्वच महिने हा भाग ढग आच्छादित असतो. त्यादिवशीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. साडेसहाच्या सुमारास आम्ही घाटघर गाव मागे सोडून नाणेघाटाच्या रस्त्याला लागलो. डावीकडे जीवधन किल्ला व समोर नानाचा अंगठा वाहत्या ढगांमध्ये लपाछपी खेळताना दिसत होते. परंतु, पाऊस पडण्याची चिन्हे नव्हती. घाटाच्या अलीकडे एका फाट्यावर उजवीकडे वळालो व थेट भोरांडेदाराच्या रस्त्याला लागलो. या रस्त्याने हा माझा पहिलाच प्रवास होता. घाटमाथ्यावरची ही पायवाट माळशेज घाटात भोरांडे गावात उतरते. म्हणून तिला भोरांड्याचे दार म्हटले जाते. तिथे काही हॉटेल तयार झाली आहेत. मागच्या काही वर्षात नाणेघाट परिसरात निसर्गाच्या बोकांडी बसलेल्या काही रचनांपैकी ही एक मानवनिर्मित रचना होती.
रस्त्याला गाडी पार्क केली व समोर घाटमाथ्यावर दिसणारा भैरवगड समोर ठेवून पदभ्रमंती चालू केली. मोरोशीचा भैरवगड हा माळशेज घाटातील एक खडी चढण असलेला व रोमहर्षक वातावरणातला एक सरळसोट किल्ला होय. पिंपळगाव जोगा धरणाच्या बांधावरून त्याची एक बाजू दिसते व त्याचीच विरुद्ध बाजू नाणेघाटातून दिसते. त्या दिवशी सकाळी माळशेज घाटातील ढग कमी होते, म्हणून भैरवगड व्यवस्थित दिसत होता. अंजनावळे गावचा जो वर्‍हाडी डोंगर आहे, त्याच्या मागच्या बाजूस भव्य माळरान आहे. या माळरानावर आमची भ्रमंती चालू झाली. इथल्या गावाचं नाव आहे, आडोशी. कदाचित डोंगराच्या आडोशाला असल्याने त्याला आडोशी नाव पडले असावे. विशेष म्हणजे कडा उतरून खाली गेल्यावर जे खाली गाव लागते त्याचे नाव आहे मोरोशी. वरचं गाव पुणे जिल्ह्यातलं तर खालचं ठाणे जिल्ह्यातलं. त्यांच्या यमक नावाचा संदर्भ मात्र आम्हाला मिळवता आला नाही.
आडोशीच माळरान तसं बरच विस्तीर्ण आहे. भोरांडयाच्या दारापासून प्रत्यक्ष कड्यापर्यंत दोन-अडीच किलोमीटरचा अंतर असावं. परंतु नभाच्छादित वातावरणात हिरव्यागार माळावरून अंगावर पावसाचे हलके तुषार घेत चालताना आम्हाला बिलकुल थकवा जाणवत नव्हता. पलीकडे भोरांड्याच्या गुना  कड्यावरही ढगांची भली मोठी गर्दी झाली होती. वऱ्हाडी डोंगरावरही तशीच परिस्थिती होती. मागे जीवधन किल्लाही अंगावर ढग ओढून घेत आहे की काय, असे जाणवत होते. अशा वातावरणात निर्मनुष्य माळरानावर आमची पायपीट चालू होती. बऱ्याच ठिकाणी पाण्याने खुळखुळणारे झरे वाहत होते. सकाळी पक्ष्यांची चालू झालेली किलबिल व झऱ्यांचा खुळखुळणारा आवाज नादमधुर निसर्ग संगीतच तयार करत होता. अधून-मधून ढगांची ये-जा ही चालूच होती. वीस पंचवीस मिनिटात आम्ही माळरानाच्या अखेरच्या कड्यावर पोहोचलो. झाडांची गर्दी जास्त नव्हती. कड्यावरून खाली डोकावल्यावर माळशेज घाटातलं विस्तीर्ण जंगल नजरेस पडलं. समोरच्या ढगांमध्ये भैरवगडाचा सरळसोट कडा नजरेस पडला. दूरवरून घाटातल्या गाड्यांचे आवाज येत होते. काळू नदीचा प्रवाह वेग धरू लागला होता. शिवाय जंगलातल्या पशुपक्ष्यांचे नादमधुर संगीतही ऐकू येत होते. मध्येच ढगांमधून हलक्या जलधारा बरसू लागल्या होत्या. त्यात पुन्हा सर्व डोंगररांगा ढगांमध्ये लुप्त होत होत्या. शहराच्या भयावह गोंगाटापासून दूर आम्ही एका निसर्ग चिंतन करणार्‍या स्थळापाशी पोहोचलो होतो. असं वाटत होतं की, इथून परतीची वाट धरूच नये. तासन्तास निसर्गाचा तो अद्भुत खेळ पाहत तेथेच ठाण मांडून बसावं. खरोखरच सह्याद्रीच्या अशा अनेक अद्भुत ठिकाणी मन:शांती लाभते ती कदाचित इतर कुठेही लाभत नसावी!










 




 

Friday, July 10, 2020

ठिकेकरवाडी

जुन्नर मधल्या पुष्पावती नदीच्या काठावर वसलेलं ठिकेकरवाडी हे गाव होय. ते ओतूर-ओझर मार्गावर स्थित आहे. नेतवड गावात पुष्पावती व मांडवी नदी एकत्र आल्यावर दोन्हींचा एकत्रित जलप्रवाह ठिकेकरवाडीपाशी फेसाळत्या जलप्रपातामध्ये पाहता येतो. नदीतल्या उंच-सखल पाषाण रचनांमुळे इथे बरेच धबधबे नदीपात्रात तयार झालेले दिसतात. गावातून नेतवडकडे जाण्यासाठी नदीवर एक पूल बांधलेला आहे. तिथून नदीचे नयनरम्य रूप दिसून येते. जलप्रवाहाचा वेग वाढला की, फेसाळत्या दूधसागरांचे धवधबे पाहण्याचा मनमुराद आनंद येथे घेता येतो.





 


Tuesday, July 7, 2020

रानहळद

पावसाच्या सुरुवातीला जुन्नरमध्ये सह्याद्रीच्या डोंगररांगात भटकंती करत असताना एका झुडुपात एक सुंदर फूल दिसून आलं. एखाद्या झुडप्याच्या पायापाशी ते सुंदर रोपटे व त्याचं फुल अतिशय आकर्षक भासत होतं. गुलाबी-पिवळ्या अशा दोन रंगांची फुलं एकाच झाडाला कशी असू शकतात? हा प्रश्न मला पडला. त्यामुळे त्याचा लागलीच फोटो घेऊन नंतर तज्ञांना या बाबतीत विचारले. तेव्हा ते रानहळदीच फुल असल्याचं समजलं. त्याला शिंदळवान असेही म्हणतात. खरं तर ही गुलाबी फुलं असून फुलांचे ब्रॅक्ट (फुलांच्या देठाशी असलेले लहानसे पान) आहेत. ते लांब व मांसल पाकळ्यांचा सारखे दिसतात व पाकळ्या सारखेच आकर्षक असतात. म्हणून परागीभवन करणारे कीटक त्यांच्याकडे आकर्षित होतात. त्यातही तळाकडे बरॅक्ट हिरव्या रंगाचे व टोकाकडे गुलाबी रंगाचे असतात. त्यांच्या तळाशी छोटी छोटी खरी फुलं लपलेली असतात. या नरसाळ्या सारख्या आकाराच्या फुलाची पाकळी पिवळ्या रंगाची असते व कांगारूच्या पोटातून बाहेर डोकावणाऱ्या पिल्लासारखी एकटीच मान बाहेर काढुन पाहत असते. हळदीप्रमाणे ही वनस्पतीही औषधी असते. तिला 'गौरीची फुलं' असेही म्हणतात. अशा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती संवर्धन करण्याची गरज आहे.


Monday, July 6, 2020

कांदळीची श्रीविष्णू मूर्ती

आपल्या देशात विष्णूच्या अवतारांचीच मंदिरे जास्त असल्याने प्रत्यक्ष श्रीविष्णूंची मंदिरे फारच कमी आहेत. श्रीविष्णूंच्या जितक्या मूर्ती आज आहेत, त्यातील बहुतांश मूर्ती ह्या प्राचीन आहेत. अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती जुन्नरच्या कांदळी गावात आढळते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील कुकडी नदी काठावरचे वडगाव कांदळी हे गाव. जुन्नरच्या एमआयडीसीसाठी प्रामुख्याने ओळखले जाते. याच गावात श्रीविष्णू व कालिकामातेचे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीविषयी पर. के. घाणेकरांच्या 'जुन्नरच्या परिसरात' (स्नेहल प्रकाशन) या पुस्तकात विस्तृत माहिती दिलेली आहे.

सुमारे २० वर्षांपूर्वी (इ.स. १९९६ मध्ये) कुकडी नदीच्या पात्रात वाळू उपसा करीत असताना एक मूर्ती आढळली. ही मूर्ती चतुर्भुज होती. २ मीटर उंचीच्या आणि ९० सें.मी. रुंदीच्या, काळ्या पाषाणात घडवलेली ही समभंग अवस्थेतील प्रतिमा आहे. १३-१४ व्या शतकातील असणारी ही मूर्ती काही बाबतींत वैशिष्ट्यपूर्ण आहे.

श्रीविष्णू मूर्तीच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्म अशी आयुधे असतात. त्यांच्या क्रमांनुसार म्हणजे कोणते आयुध कोणत्या हातात आहे, त्यानुसार केशव-माधव नारायण-गोविंद... उपेंद्र, हरी, कृष्ण असे विष्णूमूर्तीचे २४ प्रकार घडविले जातात.

विष्णू मूर्तींच्या प्रभावळीवर विष्णूचे दशावतार अलंकृत केलेले असतात. विष्णूमूर्ती समवेत डावीकडे लक्ष्मी म्हणजे श्रीदेवी, उजवीकडे भूदेवी म्हणजे पृथ्वी, गरुड, साधक/उपासक/सेवक यांचेही अलंकरण असू शकते.

कांदळी गावातील कालिकामाता मंदिराच्या गाभाऱ्यात डावीकडे विष्णुमूर्ती सुरक्षित ठेवली आहे. तिची पूजाही केली जाते. या मूर्तीची काही वैशिष्ट्ये आहेत. मूर्तीचा खालचा उजवा हात वरदमुद्रेत असून, त्या हातात कोणतेही आयुध नाही. वरच्या उजव्या हातात चक्र, वरच्या डाव्या हातात गदेचा दांडा व वरचा फुगीर भाग या दरम्यान धरलेली गदा असून, खालच्या डाव्या हातात पन्हाळीचे टोक वरच्या बाजूस येईल अशा पद्धतीने धरलेला शंख दाखविला आहे. जर खालच्या उजव्या हातात पद्म म्हणजे कमळ असते, तर ही विष्णुमूर्ती प च-ग-श आयुध क्रमाने श्रीधर विष्णूची ठरली असती.

मूर्तीच्या प्रभावळीमधील अलंकरणही वेगळे आहे. मूर्तीच्या उजव्या बाजूकडे खालून वर या क्रमाने मत्स्य-कूर्म-वराह-नृसिंह-वामन हे अवतार दिसतात, तर मूर्तीच्या डावीकडे वरून खाली या क्रमाने राम-परशुराम-विष्णू प्रतिमा अंकन-बुद्ध व कल्की दाखविले आहेत. वस्तुत: आधी परशुराम व नंतर राम असायला हवा.

त्याचप्रमाणे त्यानंतरची प्रतिमा कृष्णाची असायला हवी. मूर्तीवर जमलेले तेलकट कीटण मूर्तीचे बारकावे दाखविण्यात अडचणीचे ठरते. त्यामुळे ही चतुर्भूज प्रतिमा विष्णूची की कृष्णाची हे नक्की सांगता येत नाही.

हीच गोष्ट मूर्तीच्या डाव्या-उजव्या पायांशी असलेल्या छोट्या आकारात दाखविलेल्या दंपतींची. अशा दंपती मूर्ती स्थापन करणाऱ्या राजदंपती किंवा अन्य उपासकांच्या असू शकतील. सर्वसाधारणत: भूदेवी आणि एखादा साधक/सेवक किंवा गरुड यांच्या प्रतिमा उजवीकडील पायापाशी आणि श्रीदेवी म्हणजे लक्ष्मी आणि एखादा साधक/सेवक/उपासक यांच्या मूर्ती विष्णुप्रतिमेच्या डाव्या पायाजवळ असतात.

श्रीविष्णू मूर्तीच्या मनगटात कंकणे, दंडांवर बाजूबंद किंवा केयूर, पायात पादांगुले व तोडे, गळ्यात एकसर असलेले पाच हार, त्यातील सर्वांत खालच्या हारात मोठ्या आकाराचा मणी- कौस्तुभ दाखविला आहे. कानात कर्णभूषणे आणि डोक्यावर करंडक मुकूट आहे. त्याच्यावरच्या बाजूला कीर्तिमुख आहे. विष्णु मूर्तीच्या मस्तकाच्या डाव्या-उजव्या बाजूला छोटे विद्याधर दाखविले आहेत.


Sunday, July 5, 2020

हरणटोळ

हरणटोळ हा झाडांमधून वस्ती करणारा साप होय. तो पूर्णपणे झाडावरच राहतो. त्याची माहिती व चित्र केवळ पुस्तकात पाहिली होती. परंतु जुन्नरच्या माळरानांवरील झाडीमध्ये त्याचे पहिल्यांदाच दर्शन झाले. नाणेघाट परिसरातील एका झाडावर भक्ष्याच्या शोधार्थ तो दृष्टी लावून बसला होता. भिंतीवरची पाल अशी एक तिच्या भक्षाकडे नजर लावून बसलेली असते, तसाच त्याचा पवित्रा दिसून आला. तीक्ष्ण नजर, वखवखणारी जीभ, हिरवट रंग आणि फार फार तर एक मीटर लांबीचा तो हरणटोळ झाडांच्या तीन-चार फांद्यांवर विस्तारलेला दिसला. आमची चाहूल त्याला कदाचित लागली नसावी. झाडाच्या खाली वाकून जाताना तो मला दिसला. मग मी रस्ता बदलला. झाडाला वळसा घालून पुढे आलो. एक साप इतक्या जवळून पहिल्यांदाच पाहिला होता.
पहिल्या फोटोमध्ये झाडात तो बिलकुल दिसून येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा साप बिनविषारी आहे!