माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, July 12, 2020

आडोशीच्या माळरानावर

पावसाळ्यातला नाणेघाट व आमचं अतूट नातं...  हे साधारणतः अबाधित ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. या वर्षीही अशीच आडवाटेवरची भ्रमंती घाटात करण्याचा विचार केला होता. त्यातूनच भोरांड्याच्या दाराची योजना आखली. पहाटे पाच वाजता मी आणि भाऊ दोघेही घरून निघालो. घरापासून नाणेघाटाचं अंतर सुमारे पन्नास किलोमीटर असावं. सूर्योदय होईपर्यंत नाणेघाटात पोहोचण्याचा मानस होता आणि झालंही तसंच. कुकडेश्वरच्या पुढे निघालो तेव्हाच उजाडायला लागलं होतं. जूनच्या काही सरी पडून गेल्या होत्या. त्यामुळे अवकाशात ढगांची गर्दी तर होतीच. इकडे जुन्नरच्या पश्चिम पट्ट्यात सह्याद्रीच्या डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात या सर्वच महिने हा भाग ढग आच्छादित असतो. त्यादिवशीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. साडेसहाच्या सुमारास आम्ही घाटघर गाव मागे सोडून नाणेघाटाच्या रस्त्याला लागलो. डावीकडे जीवधन किल्ला व समोर नानाचा अंगठा वाहत्या ढगांमध्ये लपाछपी खेळताना दिसत होते. परंतु, पाऊस पडण्याची चिन्हे नव्हती. घाटाच्या अलीकडे एका फाट्यावर उजवीकडे वळालो व थेट भोरांडेदाराच्या रस्त्याला लागलो. या रस्त्याने हा माझा पहिलाच प्रवास होता. घाटमाथ्यावरची ही पायवाट माळशेज घाटात भोरांडे गावात उतरते. म्हणून तिला भोरांड्याचे दार म्हटले जाते. तिथे काही हॉटेल तयार झाली आहेत. मागच्या काही वर्षात नाणेघाट परिसरात निसर्गाच्या बोकांडी बसलेल्या काही रचनांपैकी ही एक मानवनिर्मित रचना होती.
रस्त्याला गाडी पार्क केली व समोर घाटमाथ्यावर दिसणारा भैरवगड समोर ठेवून पदभ्रमंती चालू केली. मोरोशीचा भैरवगड हा माळशेज घाटातील एक खडी चढण असलेला व रोमहर्षक वातावरणातला एक सरळसोट किल्ला होय. पिंपळगाव जोगा धरणाच्या बांधावरून त्याची एक बाजू दिसते व त्याचीच विरुद्ध बाजू नाणेघाटातून दिसते. त्या दिवशी सकाळी माळशेज घाटातील ढग कमी होते, म्हणून भैरवगड व्यवस्थित दिसत होता. अंजनावळे गावचा जो वर्‍हाडी डोंगर आहे, त्याच्या मागच्या बाजूस भव्य माळरान आहे. या माळरानावर आमची भ्रमंती चालू झाली. इथल्या गावाचं नाव आहे, आडोशी. कदाचित डोंगराच्या आडोशाला असल्याने त्याला आडोशी नाव पडले असावे. विशेष म्हणजे कडा उतरून खाली गेल्यावर जे खाली गाव लागते त्याचे नाव आहे मोरोशी. वरचं गाव पुणे जिल्ह्यातलं तर खालचं ठाणे जिल्ह्यातलं. त्यांच्या यमक नावाचा संदर्भ मात्र आम्हाला मिळवता आला नाही.
आडोशीच माळरान तसं बरच विस्तीर्ण आहे. भोरांडयाच्या दारापासून प्रत्यक्ष कड्यापर्यंत दोन-अडीच किलोमीटरचा अंतर असावं. परंतु नभाच्छादित वातावरणात हिरव्यागार माळावरून अंगावर पावसाचे हलके तुषार घेत चालताना आम्हाला बिलकुल थकवा जाणवत नव्हता. पलीकडे भोरांड्याच्या गुना  कड्यावरही ढगांची भली मोठी गर्दी झाली होती. वऱ्हाडी डोंगरावरही तशीच परिस्थिती होती. मागे जीवधन किल्लाही अंगावर ढग ओढून घेत आहे की काय, असे जाणवत होते. अशा वातावरणात निर्मनुष्य माळरानावर आमची पायपीट चालू होती. बऱ्याच ठिकाणी पाण्याने खुळखुळणारे झरे वाहत होते. सकाळी पक्ष्यांची चालू झालेली किलबिल व झऱ्यांचा खुळखुळणारा आवाज नादमधुर निसर्ग संगीतच तयार करत होता. अधून-मधून ढगांची ये-जा ही चालूच होती. वीस पंचवीस मिनिटात आम्ही माळरानाच्या अखेरच्या कड्यावर पोहोचलो. झाडांची गर्दी जास्त नव्हती. कड्यावरून खाली डोकावल्यावर माळशेज घाटातलं विस्तीर्ण जंगल नजरेस पडलं. समोरच्या ढगांमध्ये भैरवगडाचा सरळसोट कडा नजरेस पडला. दूरवरून घाटातल्या गाड्यांचे आवाज येत होते. काळू नदीचा प्रवाह वेग धरू लागला होता. शिवाय जंगलातल्या पशुपक्ष्यांचे नादमधुर संगीतही ऐकू येत होते. मध्येच ढगांमधून हलक्या जलधारा बरसू लागल्या होत्या. त्यात पुन्हा सर्व डोंगररांगा ढगांमध्ये लुप्त होत होत्या. शहराच्या भयावह गोंगाटापासून दूर आम्ही एका निसर्ग चिंतन करणार्‍या स्थळापाशी पोहोचलो होतो. असं वाटत होतं की, इथून परतीची वाट धरूच नये. तासन्तास निसर्गाचा तो अद्भुत खेळ पाहत तेथेच ठाण मांडून बसावं. खरोखरच सह्याद्रीच्या अशा अनेक अद्भुत ठिकाणी मन:शांती लाभते ती कदाचित इतर कुठेही लाभत नसावी!










 




 

No comments:

Post a Comment