माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, July 17, 2020

पिंपळगाव जोगा

जुन्नर मधल्या सर्वात मोठे धरण म्हणजे पिंपळगाव जोगा होय. हे धरण भरलं म्हणजे इथला पाऊस भरपूर झाला, असं मानलं जातं. या वर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पिंपळगाव जोगा धरण बऱ्यापैकी भरलेलं होतं. पावसाची एक सर पडून गेल्यावर वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ झाले होतं. सह्याद्रीच्या कड्यांवर ढगांची गर्दी जमू लागली होती. अशा वातावरणात यंदाच्या पावसाळ्यात ही आमची पहिली भ्रमंती चालू झाली.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून खिरेश्वरच्या दिशेने निघालो. माळशेज घाटात पुणे जिल्ह्याची सीमा संपते, त्याच्या साधारणतः किलोमीटरभर अलीकडे उजवीकडे खिरेश्वर गावाकडे जाणारा रस्ता आहे. हाच रस्ता पुढे हरिश्चंद्रगडाकडे जातो. धरणाच्या मागच्या भिंतीवरून हा रस्ता बांधला आहे. येथून एमटीडीसीचे माळशेज घाटातील विश्रामगृह अगदी स्पष्ट दिसते. शिवाय घाटातील डोंगर रंगांवर ढगही गर्दी करताना दिसतात.
भैरव गडाचा सुळका दिसू लागला की, आपण धरणाच्या भिंतीच्या मध्यावर पोहोचलेलो असतो. इथून माळशेज घाटाचा पहारेकरी सिंदोळा अतिशय मनमोहक भासतो. तसं पाहिलं तर पूर्ण धरणाला फेरी मारेपर्यंत सिंदोळा किल्ल्याची विविध रुपं येथून न्याहाळता येतात.
खिरेश्वर गावापाशी पुष्पावती व काळू नदीची उगमस्थाने आहेत. त्यापैकी काळू नदी ठाणे जिल्ह्यात वाहते व पुष्पावती नदी पुढे पुणे जिल्ह्यातून प्रवास करते. धरणाच्या बांधावरून हेमाडपंती नागेश्वर मंदिर न्याहाळता येऊ शकते. सुंदर वनराईत हे मंदिर एकाकीपणे ठाण मांडून बसल्याचे दिसते. समोरच हरिश्चंद्रगडाच्या उंच उंच डोंगर रांगा पसरलेल्या दिसतात. खिरेश्वर गावातून उजव्या बाजूला जाणारा रस्ता पिंपळगावजोगा गावाच्या दिशेने जातो. अजूनही रस्त्याची स्थिती तशी फारशी चांगली नाही. पण मजा अशी की, या रस्त्यावरून प्रवास करताना उजवीकडे धरणाचा अथांग जलाशय व डावीकडे उंचच उंच पर्वतरांगा पाहता येतात. जुलै-ऑगस्टमध्ये या डोंगररांगात असंख्य जलप्रपात कोसळताना दिसतात. असे अनेक अज्ञात धबधबे या परिसरात आहेत. खिरेश्वरचा जलपरी धबधबा मात्र निश्चित भेट देण्यासारखाच आहे. कोल्हेवाडी, साबळेवाडी, सांगणोरे व भोईरवाडी ह्या रस्त्यावरची प्रमुख गावे वस्त्या होय. सांगणोरे गावच्या परिसरात हिवाळा ऋतूत फ्लेमिंगोही पाहता येतात. शिवाय निसर्गचित्र न्याहाळण्यासाठी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. धरणाचे पाणी शांत असते तेव्हा पलीकडील सिंदोळा, निमगिरी, हडसर किल्ला नयनरम्य निसर्ग चित्र तयार करताना दिसतात.







No comments:

Post a Comment