माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, April 30, 2013

लालमभूत ठरलेल्या लळिंग !

Fort Laling
बागलाण व खानदेशाच्या सीमारेषेवर लळिंग हा किल्ला उभा ठाकलेला आहे. आमेर हा खानदेशातील सर्वात उंच किल्ला आहे. त्यानंतर लळिंगच्या किल्ल्याचा क्रम लागतो. उत्तर महाराष्ट्रातील सुंदर किल्ल्यांपैकी हा एक किल्ला. केवळ मुघल वा पेशवाईचाच नव्हे तर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनेक घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य लळिंग किल्ल्याला लाभले आहे.

मध्ययुगीन कालखंडात लळिंग ही खानदेशाची राजधानी होती. मुघल साम्राज्याचा विस्तार बागलाण व खानदेशात झाल्यावर लळिंग हे त्यांचे मुख्य लष्करी केंद्र म्हणून उदयास आले. इ.स. 1370 ते 1399 या कालखंडात फारुखी घराण्यातील राजा मलिक याच्याकडे लळिंगचा ताबा होता. त्याच्या पश्चात त्याचा मुलगा मलिक नसीरखान याच्या अधिपत्याखाली लळिंगचा परिसर आल्यावर हा भाग फारुखी राजवटीचे सत्ताकेंद्र बनला. नसीरखानने असिरगड जिंकून तेथे बु-हाणपूर नावाचे शहर वसवले व इ. स. 1400मध्ये त्याला राजधानीचा दर्जा दिला. परंतु, सन 1435मध्ये बहामनी सुलतानाने नसीरखानाचा पराभव केला. बु-हाणपुरात दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. पराभवामुळे नसीरखान पुन्हा लळिंगला परतला. बहामनी सुलतानाने मात्र नसीरखानाचा पाठलाग करून लळिंग गाठले. बहामनी सुलतानाला लळिंगमध्ये मोठी संपत्ती मिळाल्याने तो ती घेऊन बिदरला निघून गेला. तशातच लळिंग किल्ल्यावर नसीरखानाचा 1437मध्ये मृत्यू झाला. इ.स. 1601मध्ये फारुखी घराण्याचे राज्य संपवून मुघलांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. इ.स. 1632मध्ये मालेगावजवळील गाळणा किल्ला मुघलांच्या अधिपत्याखाली येताना झालेली शिष्टाई याच लळिंग किल्ल्याच्या साक्षीने झाली!

इ. स. 1752मध्ये मराठा सैन्याने निजामाचा पराभव केला. त्यामुळे मराठी साम्राज्यात मल्हारराव होळकरांच्या अधिपत्याखाली लळिंगचा कारभार चालत असे. इ.स. 1818मध्ये मराठी सैन्याचा इंग्रजांकडून पराभव झाल्याने लळिंग इंग्रजांच्या ताब्यात गेला व संपत्तीच्या प्राप्तीसाठी त्याची इंग्रजांनी नासधूस केली होती. सन 1930मध्ये गांधीजींनी देशभर सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली होती. त्याला पाठिंबा म्हणून लळिंगच्या पायथ्याशी हजारो भिल्ल व आदिवासी भूमिपुत्रांनी जंगल सत्याग्रहाची घोषणा केली. जंगलातील लाकूड व गवत कापून विकायचे नाही, हे इंग्रज सरकारचे धोरण त्यांनी मातीस मिळवले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच लळिंग किल्ल्याच्या पायथ्याला 31 जुलै 1937रोजी स्त्रियांची सभा घेऊन ‘अंधश्रद्धा मोडा व आपल्या मुलांना शिकवा’ हा संदेश दिला होता. अशा विविध घटनांचा साक्षीदार लळिंगचा किल्ला आहे.

लळिंग हे गाव धुळ्यातून जाणा-या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसलेले आहे. त्याचे धुळ्यापासून अंतर नऊ कि.मी., जळगावपासून 100 कि.मी., मालेगावपासून 40 कि.मी. व नाशिकपासून 146 कि.मी. आहे.  लळिंग गावामध्ये काळ्या पाषाणात बांधलेले महादेवाचे एक छोटे मंदिर आहे व त्यामागे एक पाण्याची टाकी आहे. या टाकीच्या खालूनच किल्ल्याकडे जाण्याची वाट चालू होते. स्थानिकांची व विशेषत: मेंढपाळांची येथे नियमित ये-जा असल्याने गडावर जाणारी वाट ही मळलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर किल्ल्याच्या पाय-यांचे भग्न अवशेष दिसून येतात. पावसाच्या पाण्याच्या रेट्याने ते अस्ताव्यस्त पडले असावेत, असे लक्षात येते. साधारणत: अर्ध्या तासाच्या चढाईनंतर दगडात बनवलेल्या काही पाय-या लागतात. त्या चढून गेले की, समोरच एक थडगे व शेवाळलेले टाके दिसते. येथून डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना जाण्यासाठी रस्ते आहेत. डाव्या बाजूचा रस्ता हा फसवा आहे. तो पडझडीमुळे चुकीचा मार्ग दर्शवतो. हा रस्ता तटबंदीच्या बाहेरच्या बाजूने जातो. उजव्या बाजूचा रस्ता खालच्या तटबंदीकडून थेट मुख्य दरवाजाकडे जातो. याच वाटेमध्ये चार-पाच कातळात कोरलेली दालने दिसून येतात. पाणी साठवण्यासाठी वा राहण्यासाठी या गुहांचा वापर होत असावा. सध्या ती पूर्णपणे कोरडी पडली आहेत. मात्र पावसाळी मोसमात त्यात ब-यापैकी पाणी भरले जात असावे.

ही टाकीसदृश गुंफा मागे पडल्यावर आपण चालत या किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचतो. सध्या तो पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. दरवाजाच्या उजव्या बाजूला एक व्याघ्रशिल्प कोरलेले दिसते. येथून वर गेल्यावर उजव्या बाजूला गडाची तटबंदी दिसून येते .आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलेलो असतो. गड पायथ्यापासून चढताना सतत एक सज्जाची कमानीयुक्त भिंत दिसत राहते. ही भिंत याच ठिकाणी दृष्टीस पडते. विटांचा व चुन्याचा वापर करून ती उभी केलेली आहे. समोरच नव्याने ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्याच्या पलीकडून मुंबई-आग्रा महामार्ग व धुळे शहराचे दर्शन होते. वातावरण स्वच्छ असताना सोनगीरचा किल्लाही येथून दिसतो.

तटबंदी पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी आल्यावर डाव्या बाजूच्या वाटेने किल्ल्याच्या दुस-या भागाकडे जाता येते. रस्त्यात कातळात तयार केलेली एक पाण्याची टाकी आहे. त्यात उन्हाळ्याच्या ब-याच काळापर्यंत पाणी साठलेले असते. परंतु हे पाणी मात्र पिण्यायोग्य नाही. पुढच्या भागात व किल्ल्याच्या मुख्य पठारावर आणखी काही पाण्याची टाकी कातळात तयार केल्याची दिसतात. पठारावर मध्येच काहीसा उंचवटा आहे. काही ठिकाणी राहत्या घरांचे पडीक अवशेष नजरेस पडतात. या पठाराच्या चहुबाजूंनी तटबंदी बांधलेली आहे. मध्य टेकाडाच्या पोटात काही गुहा खोदलेल्या आहेत. अशा गुहांची संख्या मात्र या किल्ल्यावर बरीच दिसून येते. समोरच एक दारू कोठाराची इमारत दृष्टीस पडते. त्याच्या मागच्या बाजूला   पाण्याचा मोठा खंदक व तीन-चार टाकी आहेत. समोरच दुर्गा मातेचे एक छोटेखानी मंदिर आहे. लळिंगच्या किल्ल्यावर कधी राहण्याची वेळ आली तर या मंदिराचा वापर करता येतो. परंतु, येथे केवळ दोनच जण राहू शकतात. समोरील पाण्याच्या टाक्यांना लागून एक कुंड आहे. त्यातही पाणी साठलेले असते. किल्ल्यावर येणारे मेंढपाळ जनावरांना पाणी पाजण्यासाठी या कुंडाचा वापर करतात.

मंदिराच्या मागील बाजूस पुन्हा काही कोरलेल्या गुहा दिसून येतात. या गुहांनी बरीच मोठी जागा व्यापलेली आहे. एका गुहेपाशी एक भुयार आहे. हे भुयार थेट गडाच्या गुप्त दरवाजापाशी येऊन मिळते. या दरवाजापासून खाली कातळात कोरलेले पाण्याचे टाके आहे. खाली उतरल्यावर उजव्या बाजूला एक वाट जाते. वाटेत देवीचे एक पडके मंदिर दिसते. येथूनच लळिंगच्या मुख्य माचीकडे वाट जाते. किल्ल्याच्या मुख्य बुरुजावरूनही ही माची स्पष्ट दिसून येते. माचीवर एक पाण्याचा भव्य तलाव आहे. समोरच एका घुमटीच्या खाली पाण्याची दोन टाकी आहेत. माचीचा परिसर पाहून झाल्यावर दुस-या बाजूची वाट पुन्हा किल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाते. येथून पुन्हा खाली मार्गस्थ होता येते. लळिंगचा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 मी. उंच असल्यामुळे तो सर करताना वा उतरताना थकवा कधी जाणवत नाही.

Original Article: http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-atractive-fort-4248653-NOR.html

Sunday, April 14, 2013

पारोळ्याचा भारदस्त भुईकोट

  इतिहासातील नोंदींवरून पारोळा हे गाव 260 वर्षांपूर्वी भुईकोट किल्ला बांधणीच्या वेळी अस्तित्वात आले असावे असे दिसते. जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी पारोळा किल्ला इ.स. 1727मध्ये बांधला. त्या वेळी किल्ल्याच्या परिसरात 50 घरांची पेंढारांची वस्ती होती. आजही पारोळा गावचा एक भाग पेंढारपुरा म्हणून ओळखला जातो. किल्ला बांधणीमुळेच पारोळा गावाचे व्यापारीदृष्ट्या महत्त्व वाढीस लागते. शिवाय किल्लेदारांनी व्यापा-यांना उदारमनाने आश्रय दिल्याने पारोळा गाव भरभराटीस आले. म्हणूनच पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारी पेठ म्हणून नावारूपास आली. इ. स. 1818मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केल्याने मराठा साम्राज्य धोक्यात आले. महाराष्ट्रावर इंग्रज सत्ता स्थापन होऊ लागली. इ. स. 1821मध्ये पारोळे गावी व आजूबाजूच्या परिसरात इंग्रजांविरुद्ध ठिकठिकाणी बंड होऊ लागले. ब्रिटिश कॅप्टन ब्रिग्ज याच्या खुनाचा प्रयत्न झाला. इंग्रजांनी चवताळून प्रतिहल्ला केला व जहागिरदारांना किल्ला सोडण्यास भाग पाडले. 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबार्इंना मदत केल्याचा ठपका पारोळ्याच्या किल्लेदारावर ठेवण्यात आला होता. 1859मध्ये इंग्रजांनी पारोळा किल्ला व शहर ताब्यात घेतले. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशी दिले. शिवाय द्रव्य मिळवण्यासाठी किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही शाबूत आहेत.

पारोळा गाव एका विशिष्ट ठेवणीतील चौकोनात वसले आहे. त्याचे रस्ते सरळ लांब रेषेत आहेत. याच रस्त्यांवर अधूनमधून पिंपळाचे व लहान लहान देवतांचे पार एका रांगेत बांधलेले दिसून येतात. याच वैशिष्ट्यामुळे या गावाला पारांच्या ओळी अर्थात ‘पारोळी’ व अपभ्रंश होऊन ‘पारोळा’ हे नाव पडले. या गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती. या तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील व मुख्य दरवाजा. अन्य दरवाजांची नावे धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी आहेत.

पारोळा हे धुळे शहरापासून 30 व जळगावपासून सुमारे 55 किमी. अंतरावर आहे. या दोन्ही शहरांपासून पारोळ्याला येण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय धुळे व जळगावच्या अन्य तालुक्यांच्या ठिकाणांना पारोळी गाडीमार्गाने जोडलेले आहे. बसस्थानकावर उतरल्यावर केवळ दहाच मिनिटांच्या अंतरावर पारोळा किल्ला स्थित आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याने तो शहराच्या आजच्या बाजारपेठेत मुख्य ठिकाणी वसलेला आहे. किल्ल्याभोवती सध्या बाजारपेठेचेच अतिक्रमण झाले आहे. चालत चालत या बाजारपेठेतून मार्ग शोधावा लागतो. किल्ल्यापासून पाचच मिनिटांच्या अंतरावर राणी लक्ष्मीबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत.

पारोळा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. ते ओलांडल्यावर आत आणखी एक प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराच्या बाजूने किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. सध्या या दोन्ही भिंतींच्या मध्ये बराच कचरा टाकलेला दिसतो. आतल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पहारेक-यांच्या देवड्या नजरेस पडतात व समोरच मुख्य किल्लाही दिसतो. अन्य भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची बांधणी रेखीव आहे. तो साधारण 160 मीटर लांब व 130 मीटर रुंद आहे. किल्ल्याच्या मध्यभागी मुख्य किल्ला अर्थात बालेकिल्ला दिसून येतो. सध्या या ठिकाणची निगा पुरातत्त्व विभाग घेत असल्याने अनेक ठिकाणी पुनर्बांधणीची कामे झाल्याची दिसून येतात. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहण्यास सुरुवात करणे सोईस्कर ठरते. किल्ल्याच्या अनेक कमानी येथून पुढे दिसून येतात. परंतु त्यांची पडझड झालेली आहे. एका कमानीजवळ चौकोनी विहीर आहे. त्यात पावसाळ्यात ब-यापैकी पाणीसाठा होतो. आतील तटबंदीवर चढण्यासाठी पाय-याही आहेत. या पाय-यांनी वर गेल्यास पारोळा गावाचे दर्शन होते. पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस एक तलाव आहे. अशा प्रकारच्या पाणीसाठ्याची रचना बहुतांश भुईकोट किल्ल्यांना दिसून येते. परंतु हा तलाव ब-यापैकी मोठा आहे. आज त्यावर अतिक्रमण झाल्याने तो बाहेरच्या बाजूने दिसून येत नाही व आतल्या बाजूने पाहिल्यास त्यावर बाटल्या व इतर प्लॅस्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. या तलावात उतरण्यासाठी तटबंदीला दोन मार्गही आहेत. परंतु या भागात झाडे उगवल्याने हा रस्ता जवळपास बंदच झाला आहे.

बालेकिल्ल्याच्या अलीकडे एक टुमदार घर नजरेस पडते. दारूगोळा ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असावा. या घरात सूर्यप्रकाश व चंद्रप्रकाश व्यवस्थित पोहोचावा याकरता झरोक्यांची व्यवस्थित रचना केलेली आहे. या घराजवळच व पूर्वेच्या तटबंदी शेजारी एक महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ एक मोठे भुयार असून त्याचा वापर जुन्या काळापासून होत असे. विशेष म्हणजे, या भुयारातून घोडेस्वार आत जात असे, असे स्थानिक रहिवाशी सांगतात. या भुयाराचे दुसरे तोंड आठ किलोमीटरवरील नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे म्हटले जाते. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता. महादेवाच्या मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या वाड्यांचे अवशेष दिसून येतात. या इमारती दुमजली आहेत. पूर्वेची तटबंदी संपते त्या ठिकाणी ध्वजस्तंभ दिसून येतो. या ठिकाणापासून पूर्ण बालेकिल्ला नजरेस पडतो.

पारोळ्याच्या बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल,   या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूने सौंदर्य नष्ट झाले आहे. बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे जवळच्या चोर दरवाजाने वर प्रवेश करावा लागतो. वर गेल्यावर पूर्ण किल्ल्याचे चहूबाजूंनी दर्शन घेता येते. पुरातत्त्व खात्याने बरेच पुनर्बांधकाम केल्याने येथील अवशेष सुस्थितीत असल्याचे दिसतात. दक्षिणेच्या तटबंदीला लागून तीन पडक्या घरांचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्याच्या कचे-या याच ठिकाणी कार्यरत होत्या. कचे-यांच्या भिंतींवर बाहेर पाहण्यासाठी जंग्यांची रचना केली आहे. अशाच जंग्या तटबंदीवरही दिसून येतात.

बालेकिल्ल्यावरून उतरण्यासाठी पश्चिमेकडे एक दरवाजा आहे. तो आज बंद स्थितीत दिसून येतो. सध्या पारोळ्याच्या या भुईकोट किल्ल्याची डागडुजी चालू आहे. वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहता येते. झाशीच्या राणीच्या वास्तव्याने हा किल्ला तिनेच बांधला, अशीही स्थानिकांची समजूत आहे. राणीच्या माहेरचे वंशच आजही पारोळा गावात राहतात. पारोळ्याचा हा किल्ला जळगाव जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे. परंतु अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले असून ते टिकवण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी.
दि. १४ एप्रिल २०१३.
मूळ लेख इथे वाचा.

Sunday, April 7, 2013

डुबेरे गड

नाशिकच्या सिन्नर तालुक्यात डुबेरे गड वसलेला आहे. नाशिकपासून सुमारे ३५ किलोमीटर व सिन्नरपासून आठ किलोमीटर अंतरावर हा डोंगर आहे. गूगल मॅप्सवर याच्या मार्गाची माहिती मिळू शकेल. सिन्नर-घोटी मार्गावर सिन्नर पासून सुमारे पाऊण ते एक किमी अंतर गेल्यावर डावीकडे जाण्याकरिता एक रस्ता लागतो. हा रस्ता जिल्हामार्ग या प्रकारात येत असला तरी खूप चांगल्या स्थितीत आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजुंना बऱ्यापैकी झाडी आहे. त्यामुळे प्रवास सुखद वाटतो. डुबेरे गांव चालू झाल्यावर सुरूवातीलाच उजवीकडे डुबेरे गड दिसून येतो. गांवातून तिथवर जाण्याचा रस्ता मात्र खडकाळलेला आहे. पावसाच्या पाण्याने कदाचित त्याची तशी अवस्था झाली असावी! गडाच्या पायथ्याशी एक महादेवाचे मोठे मंदिर आहे. आत मोठे शिवलिंग दिसून येते. मंदिराच्या उजव्या बाजुने एक पायऱ्यांची वाट डुबेरे गडाच्या दिशेने जाते. हा रस्ता अगदी अलिकडच्या काळात बांधला असावा. पावसाळ्यात डुबेरेचे वातावरण अगदी सुखद अनुभव देऊन जाते. गडाच्या माथ्यावर जाण्यास पंधरा मिनिटे पुरतात. बहुतांश ठिकाणी ऍल्युमिनियमचे रेलिंग्ज टाकल्याचे दिसून येतात. गडमाथा हा एक पठारच आहे. त्याच्या मध्यभागी एक सप्तशृंगी मातेचे मंदिर बांधलेले आहे. दोन ठिकाणी पाण्याची टाकी दिसून येतात. गडाच्या माथ्यावरून सिन्नर शहराचे तसे नाशिकचेही दर्शन घडते. नशिकच्या पांडवलेणी व विहितगांव या भागातून डुबेरे गड सहज दिसतो. इगतपुरी रांगेतील बहुतांश किल्ले डुबेरे वरून दिसतात. सह्याद्रीची ही पूर्ण रांग लांबपर्यंत दिसून येते. नाशिकहून दोन-तीन तासांचा छोटा ट्रेक करण्यासाठी डुबेरे हे एक चांगले ठिकाण आहे.

डुबेरे कडे जाण्याचा मार्ग (सिन्नर मधून)
छायाचित्र:

डुबेरे गड

डुबेरे गड

मंदिरातून दिसणारा डुबेरे

माथ्यावर फडकणारा भगवा.

सप्तशृङ्गि मंदिर.

डुबेरे गडावरील ध्यानस्थ कर्मयोगी- भूषण घोलप.

चढतॆच्या पायर्या

शिवलिंग 

दुबेरेचे कडे

गडावरील पाण्याची टाकी

Wednesday, April 3, 2013

त्र्यंबकगड : पुराणकाळाचा भक्कम साक्षीदार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.

तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या   काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.

शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.

गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते.  जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे  ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी (दि. ०३ फेब्रुवारी २०१३).
मूळ लेख: लिंक.

Sunday, March 31, 2013

खान्देशाचे वैभव: सोनगीर


दगडांचा देश असणा-या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या काही रांगा या खान्देशापर्यंत जातात. परंतु या तुरळक रांगांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांइतकी उंची नाही. तरीही या भागात अनेक गडकोट वसलेले आहेत. यात गिरीदुर्गांची संख्या कमी व भुईकोट किल्ल्यांची अधिक आहे.

असे म्हटले जाते की, विंध्य पर्वत पार करून दक्षिणगंगेच्या तीरावर वास्तव्य करणारे अगस्ती ऋषी हे पहिले आर्य होय. त्यांच्या काळात या प्रदेशाचे नाव ‘ऋषिक’ वा ‘रसिक’ असे होते. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. 250मध्ये अहिर राजांनी तो जिंकून घेतला. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. अल्लाउद्दीन खिलजीने सन 1294मध्ये हा प्रदेश स्वत:च्या ताब्यात घेतला. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी प्रदान केली होती. त्यावरून या प्रदेशाचे नाव ‘खानदेश’ पडले. याच काळात अनेक किल्ल्यांची निर्मिती धुळे व जळगाव या भागांत झाली. यातीलच एक वैभवशाली किल्ला म्हणजे ‘सोनगीर’ होय.

महाराष्ट्रात सोनगीर या नावाचे तीन किल्ले आहेत. त्यातील एक रायगड जिल्ह्यात नागोठणेजवळ, तर दुसरा पुणे जिल्ह्यात कर्जतजवळ आहे. त्यामुळे धुळ्याजवळील या सोनगीरला ‘खान्देशचा सोनगीर’ म्हणतात! धुळे शहरापासून 21 कि.मी. अंतरावर हा किल्ला अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. त्याची निर्मिती कोणी व केव्हा केली, याची माहिती आज दुर्दैवाने उपलब्ध नाही. इ.स. 1370मध्ये फारुकी सुलतानांनी हा किल्ला स्वत:च्या अधिपत्याखाली आणला. लळिंग किल्ल्यापासून केवळ 30 किलोमीटरवर असल्याने सोनगीरला महत्त्व प्राप्त झाले. मुघल बादशहा अकबराने आपला साम्राज्य विस्तार खान्देशापर्यंत आणल्याने सोनगीरही त्याच्या ताब्यात गेला. औरंगजेब हा सोनगीरवर सत्ता प्रस्थापित करणारा शेवटचा मुघल सम्राट होता. मराठेशाहीत पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. 1818मध्ये पेशव्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी त्याच्यावर सत्ता स्थापन केली. धुळे या शहरापासून सोनगीर किल्ला केवळ 21 किमी अंतरावर आहे. शिवाय तो मुंबई, आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्र. तीनवर वसलेला असल्याने या मार्गावरून जाणा-या गाड्या सोनगीरवरूनच जातात. सोनगीर हे या किल्ल्याच्या पायथ्यालगतच वसलेले गाव होय. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या सर्व गाड्या सोनगीरला थांबतात. या मार्गावर धुळे आगाराची ‘यशवंती’ ही मिनी बस दर अर्ध्या तासाने उपलब्ध होते. शिवाय शहादा, दोंडाईचा या गावांना जाणा-या बसही सोनगीरवरूनच जातात. बसशिवाय खासगी वाहनांचीही सोनगीरला जाण्यासाठी सोय आहे. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या खासगी वाहनांनी सोनगीरला उतरता येते. महामार्गावर सोनगीर गावात उतरल्यावर गावाच्या पलीकडेच किल्ला दृष्टीस पडतो. तसे हे गाव दाट लोकवस्तीचे आहे. सोनगीरचा किल्ला तयार झाल्यानंतरच पायथ्याला गाव विकसित झाले असावे, असे दिसते. हा किल्ला एका लहानशा टेकडीवर वसलेला आहे. त्यामुळे त्याला भुईकोट म्हणणेही योग्य ठरणार नाही. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीच्या गाळणा शृंखलेमध्ये येतो. सोनगीर गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्याकरता दहा-पंधरा मिनिटे पुरतात. परंतु, दाट लोकवस्तीमुळे स्थानिकांना विचारत मार्ग शोधावा लागतो.

किल्ल्याच्या पाय-यांची सुरुवात एका नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. पर्यटन विकासाच्या नावाखाली या कमानीचे बांधकाम झाले आहे. सुरुवातीच्या काही पाय-याही नजीकच्या काळातच सिमेंटने बांधलेल्या दिसून येतात. परंतु त्यांची सध्याची अवस्था पाहता स्थानिकांना किल्ल्याच्या महत्त्वाचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. थोडे पायी चालत जाईपर्यंत येथील दुर्गंधी आपली पाठ सोडत नाही. चालत असतानाच किल्ल्याची नक्की ठेवण ध्यानात येते. एखाद्या राजस्थानी वास्तुपद्धतीचा हा किल्ला भासतो. किल्ल्याची खरी सुरुवात त्याच्या उद््ध्वस्त प्रवेशद्वाराने होते. सध्या हा दरवाजा कसाबसा तग धरून उभा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची बरीचशी मोडतोड झाली असल्याचे दिसते. पायथ्यापासून दरवाजापर्यंत येण्यास दहा मिनिटे पुरतात. अन्य किल्ल्यांप्रमाणे याच्या दरवाज्यावर कोरीव काम वा नक्षीकाम दिसून येत नाही. कदाचित, कालानुरूप तेही नष्ट झाले असावे. काही वर्षांपूर्वी या दरवाजावर एक संस्कृत शिलालेख लावलेला होता. परंतु तो प्रवेशद्वारावरून खाली निखळून पडला. 27*5 इंचांचा हा शिलालेख आज धुळ्याच्या वि. का. राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर देवनागरी लिपीत काही श्लोक कोरलेले आहेत.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर कातळात कोरलेल्या पाय-या दिसून येतात. कातळात कोरलेल्या असल्याने त्यांची फारशी मोडतोड झालेली नाही. परंतु आजूबाजूला अनेक खांबांचे अवशेष पडल्याचे दिसून येतात. एकेकाळी या प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. पाय-यांच्या सुरुवातीला दरवाजाच्या शेजारी एक कबर आहे. त्याचा संदर्भ मात्र कुठे सापडत नाही. कातळातील पंधरा-वीस पाय-या चढून गेले की, आपण थेट गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून संपूर्ण सोनगीर गावाचे एकाच दृष्टिक्षेपात दर्शन घेता येते. शिवाय धुळे, आग्रा मार्गावरील वाहतूक ब-याच अंतरापर्यंत न्याहाळताही येते. गडमाथ्यावर जाण्याकरता येथून दोन मार्ग आहेत. डाव्या बाजूने चालत जाऊन सोनगीरची माची पाहता येते. तर उजव्या बाजूने गडाचा मुख बुरूज पाहता येतो. किल्ल्याचा गडमाथा समुद्रसपाटीपासून   सुमारे तीनशे मीटर उंचीवर आहे. तो रुंदीला कमी असून लांबीला जास्त असल्याचे दिसते. सद्यस्थितीत पठार हे सपाट आहे. परंतु या गडमाथ्यावरील काही गोष्टींचे निरीक्षण केल्यास या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची जाणीव होते. सोनगीरच्या डावीकडील माचीकडे जाताना ती निमुळती होत गेल्याचे दिसते. तिच्या टोकावरून खाली फारसे अंतर नाही. परंतु तिथून कोणी सहज वरती येऊही शकत नाही. गडमाथ्यावरील तटबंदी ही पूर्णपणे ढासळून गेली आहे. परंतु गडाच्या बाजूंची तटबंदी ही लाल रेखीव दगडांची असल्याचे दिसते. तीही अधूनमधून ढासळलेली आहे. माचीच्या दोन्ही कडांनी चालत गेल्यास येथील ढासळलेले अवशेष दृष्टीस पडतात. किल्ल्याचा मध्यभाग तसा प्रशस्त आहे. त्याच्या उजवीकडील बाजूस किल्ल्याचा मुख्य बुरूज पाहता येतो.
मुख्य बुरुजाकडे जाताना दोन, तीन ठिकाणी हौदासारख्या वास्तू नजरेस पडतात. त्यात तेल व तूप साठवत असल्याचे दिसून येते. त्यांची मोडतोड आज झालेली आहे. या वास्तूला तेलटाके व तूपटाके असेही म्हटले जाते. थोडे पुढे गेल्यावर एक मोठी विहीर लागते. गडावरील ही चौकोनी विहीर खूप खोल आहे. वरून पाहता तिचा तळ ध्यानात येत नाही. पाण्याचा साठा मात्र या विहिरीत सदैव असतो. त्यात दगड टाकून पाण्याच्या सद्य:स्थितीचा अंदाज घेता येतो. या विहिरीची खोली दहामजली इमारतीएवढी असावी, असे म्हटले जाते. तिच्याभोवती सध्या झाडाझुडपांचे साम्राज्य झाले आहे. विहिरीच्या समोरच पुष्करणीचा हौद लागतो. त्याचेही अवशेषच पाहायला मिळतात. सध्या त्याचे चौदा कोनाडे राहिल्याचे दिसतात. याच्याच वर नव्यानेच काही शिवप्रेमी संस्थांनी हवनस्तंभ उभारला आहे. मोक्याच्या ठिकाणी असल्याने तिथून किल्ला दिसतो. तिथून हा ध्वजस्तंभही नजरेस पडतो. मुख्य बुरुजाकडे जाताना पडीक घरांचे अवशेष दिसून येतात. या बुरुजावरील तटबंदीही ढासळलेली आहे. येथून ब-याच लांबपर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. बुरुजावरील भग्न अवशेष मात्र खान्देशच्या या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची कल्पना देऊन जातात. अगदी मोक्याच्या ठिकाणी असणा-या सोनगीरच्या या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नाही. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तो अस्तित्वाशी झुंजत उभा आहे.

Friday, March 29, 2013

मंगळग्रह मंदिर, अंमळनेर

भारत हा एक मंदिरांचा प्रदेश आहे. येथे निरनिराळ्या प्रकारची मंदिरे पहायला मिळतात. असेच एक वेगळ्या प्रकारचे मंदिर जळगांव जिल्ह्यातील अंमळनेर इथे पहायला मिळते. हे मंदिर आहे, मंगळग्रहाचे! भारतात मंगळग्रहाची केवळ दोनच मंदिरे आहेत. त्यातील एक मंदिर कोलकता येथे तर दुसरे अंमळनेर येथे आहे. अंमळनेरचा नगरदुर्ग पाहायला गेलो तेव्हा या मंदिराचे दर्शन झाले. अंमळनेर मधील बोरी नदी पार करून गेले की डाव्या बाजुला चोपडा कडे जाण्याकरिता रस्ता आहे. याच रस्त्यावर मंगळग्रह मंदिर आहे. मुख्य बसस्थानकापासून ते सुमारे दोन कि.मी. अंतरावर असावे. मंगळवारी गेल्याने या ठिकाणी मोठी गर्दी होती, त्यामुळे अधिक छायाचित्रे काढता आली नाहीत. श्रद्धाळूंची संख्या मात्र मोठी होती, अगदी ’देऊळ’ प्रमाणेच. नाशिकच्या विहितगांव येथे नवग्रहांचे एक मंदिर आहे, तेथेही मंगळाचे छोटेखानी मंदिर पाहता येते.
.
Mangalgrah Temple Road Way(Chopda Road), Amalner

Sunday, March 24, 2013

देदीप्यमान इतिहासाचा भरभक्कम साक्षीदार: अहमदनगर किल्ला.


सह्याद्रीच्या या प्रदेशात भुईकोट किल्ल्यांचे अस्तित्व तसे कमीच. मराठ्यांच्या राजवटीत गिरिदुर्गांचा वापर मोठ्या प्रमाणात झाला व त्याच काळात या किल्ल्यांचे महत्त्वही वाढीस लागले. परिणामी भुईकोट किल्ल्यांचा महाराष्ट्राला मोठा इतिहास नाही. केवळ सपाट भूप्रदेशावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भुईकोट किल्ल्यांची बांधणी करण्यात आली होती. अशाच काही अभेद्य भुईकोट किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे सुमारे पाचशे वर्षांपासून विविध रोमांचक घटनांचा साक्षीदार बनून बलाढ्यपणे उभा असलेला अहमदनगरचा ‘कोटवण निजाम’ भुईकोट किल्ला. ‘अहमदनगरचा किल्ला’ असेच या भुईकोट किल्ल्याचे प्रचलित नाव.

किल्ल्याची सध्याची भक्कम स्थिती पाहून तो पाचशे वर्षांपूर्वी बांधला असे वाटत नाही, इतक्या सुस्थितीत हा भुईकोट किल्ला आहे. अहमदनगर शहरामध्येच पूर्वेला हा किल्ला वसलेला आहे. त्याचा परीघ एक मैल व ऐंशी यार्ड असून तो आशिया खंडातील सर्वोत्तम भुईकोट किल्ल्यांपैकी एक गणला जातो. महाराष्ट्रातील बहामनी राजवटीच्या अखेरच्या काळात इ. स. 1486 मध्ये राज्याचे पाच तुकडे झाले. यातूनच विभक्त झालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजामशहाने भिंगार गावाजवळ नवे शहर स्थापन करण्यास सुरुवात केली होती. सन 1490 मध्ये सिना नदीच्या तीरावर हा किल्ला बांधण्यास सुरुवात झाली. सन 1494 मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली व हा किल्ला निजामशाहीचा राजधानीचा किल्ला बनला. मलिक अहमदशहामुळेच या शहराला अहमदनगर हे नाव पडले. हा किल्ला स्थापत्यशास्त्राचा एक उत्तम नमुना मानला जातो.

अहमदनगरच्या या किल्ल्यात फंदफितुरीची कारस्थाने शिजली व भाऊबंदकीची नाट्येही रंगली. अनेक तहाचे प्रसंग व शौर्याचे प्रसंग या किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले. अहमदशहा, बु-हाणशहा, सुलताना चांदबीबी यांची कारकीर्द घडवणारी निजामशाही सन 1636पर्यंत इथे नांदत होती. सन 1636 नंतर मुघल बादशहा शहाजहानने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला. त्या काळात मुघलांचा किल्लेदार मुफलत खान अहमदनगरची बाजू सांभाळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांनाही या किल्ल्याने भुरळ घातली होती. या किल्ल्याची महती ते जाणून होते. शिवरायांच्या सैन्याने या प्रांतात तीन वेळा स्वारी केली होती. मात्र हा किल्ला जिंकण्याची महाराजांची इच्छा अपूर्णच राहिली. कालांतराने मुघल सरदार कवी जंग यांना वैयक्तिक जहागिरी प्रदान करून पेशव्यांनी हा किल्ला आपल्या पदरी पाडून घेतला. पुढे सन 1817मध्ये इंग्रजांनी अहमदनगरवर विजय मिळवला. तदनंतर 1947 पर्यंत हा किल्ला त्यांच्याच ताब्यात होता.

अहमदनगरच्या या किल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे याचा वापर अनेक राजकीय कैदी ठेवण्यासाठी बर्‍याच वेळा केला गेला. किल्ल्याच्या भक्कमतेमुळे मुघल, पेशव्यांपासून इंग्रजांपर्यंत अनेकांचे बंदिवान या किल्ल्यात कैद होते. सन 1767 मध्ये तोतया सदाशिवराव भाऊ, 1776 मध्ये पेशव्यांचे सरदार सखाराम हरी गुप्ते तसेच चिंतो रायरीकर, नाना फडणवीस, मोरोबा दादा, बाळोबा तात्या, सदाशिव मल्हार, भागीरथीबाई शिंदे इत्यादींना या किल्ल्यात कैदी म्हणून राहावे लागले होते. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर इंग्रजांनी अनेक जर्मन कैद्यांना कैद करून ठेवण्यासाठीही या किल्ल्याचा वापर केला होता. तसेच 1942 मध्ये ‘चले जाव’ आंदोलनात इंग्रजांनी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची धरपकड केली. पंडित नेहरू, मौलाना अबुल कलाम आझाद, गोविंद वल्लभ पंत, आचार्य नरेंद्र देव, सरदार पटेल, पंडित हरिकृष्ण मेहताब, आचार्य कृपलानी, डॉ. सय्यद मेहबूब, डॉ. वट्टामी सीतारामय्या, असफ अली, डॉ. पी. सी. घोष, आचार्य शंकरराव देव या काँग्रेस नेत्यांना या किल्ल्यात बंदिस्त केले गेले होते. चौथ्या शिवाजी महाराजांचा गूढ मृत्यू याच ठिकाणी झाला. कैदेत असताना पंडित नेहरूंनी ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’, मौलाना आझाद यांनी ‘गुबार-ए-खातिर’, पी. सी. घोष यांनी ‘हिस्ट्री ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन’ हे ग्रंथ याच किल्ल्यात लिहिले.

अहमदनगरच्या मध्यवर्ती व तारकपूर या दोन्ही बसस्थानकांपासून हा किल्ला जवळपास सारख्याच अंतरावर आहे. दोन्ही बसस्थानकांवरून किल्ल्याकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध होतात. त्यामुळे केवळ दहा मिनिटांतच किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचता येते. सध्या किल्ला भारतीय सैन्यदलाच्या ताब्यात असल्याने आत त्यांचा बंदोबस्त दिसून येतो. मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला भारताचा राष्ट्रध्वज डौलाने फडकताना दिसतो. इंग्रजांनी पेशव्यांकडून किल्ला ताब्यात घेतला व किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी इंग्रज सेनापती ऑर्थर वेलस्ली याने किल्ल्याजवळील चिंचेच्या झाडाखाली बसून न्याहारी केली होती. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ इथे चार तोफा ठेवण्यात आल्या आहेत. जुन्या मजबूत बनावटीच्या तोफा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पाहण्यास मिळतात. किल्ल्याच्या संपूर्ण बाजूने खोल खंदक आहेत. त्या काळी या खंदकाबाहेर मातीच्या उंच टेकड्या असत. यामुळे किल्ल्याची बांधणी सहजासहजी बाहेरून ध्यानात येत नसे. आज खंदकाच्या बाहेरच्या बाजूने सिमेंटची भिंत व त्यावर कुंपण केले आहे. पूर्वी खंदकात मगरी व सुसरी ठेवल्या जायच्या, जेणेकरून चहुबाजूंनी किल्ल्याचे संरक्षण व्हावे. या अंडाकृती किल्ल्याला एकूण 22 बुरूज आहेत. आजही ते खूप सुस्थितीत असल्याचे दिसतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूने बुरुजांवर चढून किल्ला पाहण्यास सुरुवात करावी. याच बाजूला खाली जुन्या काळातील तुरुंग दिसून येतात. तसेच किल्ल्याचे दरवाजे आजही शाबूत असल्याचे दिसतात.   इथून बुरुजांवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. अहमदशहाने आपल्या पराक्रमी सेनापती व कर्तबगार सरदारांची नावे या सर्व बुरुजांना दिली होती. परंतु त्यांचे उल्लेख इतिहासाच्या पानांत आढळत नाहीत.  मात्र अनेक ठिकाणी शिळांवर  फारसी, अरबी भाषेतील मजकूर दिसून येतो.

किल्ल्याच्या मध्यभागात व तटबंदीच्या आतल्या बाजूस एकूण सहा राजमहाल होते. या किल्ल्यात इंग्रजांनी एक झुलता पूल बांधला होता. आपत्तीप्रसंगी बाहेर पडता यावे, याकरिता या पुलाचा वापर होत असे. किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ‘नेता कक्ष’ नावाची जागा आहे. इंग्रजांनी भारतीय नेत्यांना याच ठिकाणी स्थानबद्ध केले होते. पंडित नेहरूंच्या काही वस्तू येथे पाहता येतात. तसेच काही नेत्यांच्या हस्ताक्षरातील पत्रेही या ठिकाणी संग्रही आहेत. पाचशे वर्षांच्या रोमांचक इतिहासाचा साक्षीदार असलेला अहमदनगर किल्ला खर्‍या अर्थाने महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यांचा राजाच शोभतो.

Published in daily Divya Marathi dated: 17th March  2013
मूळ लेख: लिंक.

Sunday, March 17, 2013

दुर्ग साहित्‍य संमेलनातील मंथन


प्रसिद्ध दिवंगत साहित्यिक गोपाळ नीळकंठ दांडेकर अर्थात ‘गोनीदा’ यांना अवघा महाराष्ट्र दुर्गप्रेमी म्हणून ओळखतो. महाराष्ट्रातील बहुतांश दुर्ग त्यांनी सर केले. त्यावर अप्रतिम साहित्यरचनाही केली. एका पुस्तकात त्यांनी म्हटले आहे, ‘हे दुर्ग म्हणजे डोंगर चढणे आहे, रान तुडवणे आहे. तिथे असतो भरार वारा. असते कळाकळा तापणारे ऊन. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असते जिद्दीला, पुरुषार्थाला! ध्यानात घ्या, तिथे आपले पराक्रमी पूर्वज काहीएक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला न् कित्येकदा पराभवही. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाचे स्मरण आहे या दुर्गभ्रमंतीचा उद्देश!’ गोनीदांच्या या विचारांनी प्रेरित होऊन ‘गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची’ स्थापना करण्यात आली. या मंडळातर्फे निरनिराळे उपक्रम राबवले जातात. अशाच उपक्रमांपैकी एक भाग म्हणजे, ‘दुर्ग साहित्य संमेलन’ होय.

2009 मध्ये गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या दुर्ग साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. दर दोन वर्षांनी विविध किल्ल्यांवर हे संमेलन भरवले जाते. 2009 मध्ये राजमाचीवर तर 2011 मध्ये कर्नाळा किल्ल्यावर तर 2013 मध्ये विजयदुर्गवर हे संमेलन घेण्यात आले. विशेष म्हणजे, हे तिन्ही किल्ले अनुक्रमे गिरिदुर्ग, भुईकोट व जलदुर्ग या प्रकारात मोडतात. त्यातील विजयदुर्ग हा जलदुर्ग होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे केंद्र असणारा हा किल्ला. 11व्या शतकाच्या शेवटी शिलाहार घराण्यातील मोन राजाने या किल्ल्याची बांधणी केली होती. शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये हा किल्ला जिंकला. या किल्ल्याने इंग्रज, डच, पोर्तुगीज आणि जंजिºयाच्या सिद्दींचा पराभव पाहिला. याच किल्ल्यावर यंदा 25 ते 27 जानेवारी 2013 दरम्यान तिसरे दुर्ग साहित्य संमेलन भरवले गेले.

भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अ‍ॅडमिरल मनोहर आवटी हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज राघोजी आंग्रे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. साहित्याद्वारे दुर्गांची ओळख सामान्य जनांना व्हावी, हा या संमेलनामागील मुख्य उद्देश होता. महाराष्ट्रात साहित्यप्रेमींची तशी कमतरता नाही, पण दुर्ग साहित्यप्रेमी किती आहेत? या प्रश्नाचे उत्तर शोधणे मात्र महत्त्वाचे ठरते. त्याकरिता अशी संमेलने नेहमीच उपयोगी ठरत असतात.
दुर्ग साहित्य संमेलनात बोलताना अ‍ॅडमिरल मनोहर आवटी म्हणाले की सर्वसाधारणपणे भारतीयांना इतिहासात रुची नाही. ते इतिहासातून काही शिकत नाहीत. दुर्दैवाने आपले राजकारणीही इतिहासापासून चार हात लांब राहिले आहेत. त्यामुळे परराष्ट्र धोरणात व विशेषत: पाकिस्तानच्या बाबतीत आपण कायम फसलो आहोत. अ‍ॅडमिरल आवटींची भावना ही खरे तर अनेक दुर्गप्रेमींची भावना होती. अर्थात, इतिहास हा शिकण्यासाठी आणि प्रेरणा घेण्यासाठी असतो. इतिहास व भूगोल हे शास्त्राचे एकसमान अंग आहे, हे फक्त दुर्गप्रेमीच ओळखू शकतात. इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय एखाद्याला भूगोल कळत नाही आणि भूगोल समजावून घेतल्याशिवाय इतिहासाचे सर्वंकष भान येत नाही, हे सांगून परदेशी नागरिक व भारतीय यांच्यातील फरकावरही अ‍ॅडमिरल आवटींनी या प्रसंगी अचूक बोट ठेवले. परदेशात प्रत्येक मुलाला त्यांच्या इतिहासाबद्दल साद्यंत माहिती असते. मग ते पहिले महायुद्ध असो वा एखादी ऐतिहासिक वास्तू असो. इथे असणारे दुर्ग परदेशात असले असते तर पर्यटनाच्या दृष्टीने त्यांचा कायापालट झाला असता. पण, इथे या वारशाकडे आपले लक्ष नाही, अशी खंतही आवटी यांनी या प्रसंगी बोलून दाखवली.

सार्वजनिक पातळीवर दुर्ग संवर्धनाबाबत अनास्थेचे दर्शन घडत असले तरीही महाराष्ट्रातील अनेक दुर्गप्रेमी संस्था अडीअडचणींवर मात करत दुर्गसंवर्धनासाठी (दुर्गवीर प्रतिष्ठान तसेच शिवदुर्ग संवर्धन यासारख्या संस्था यास ‘शिवकार्य’असे संबोधतात.) आजही तळमळीने कार्य करत असल्याचे संमेलनाच्या निमित्ताने दिसून आले. संमेलनात पुरातत्त्व खात्यातर्फे किल्ले व लेण्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवले गेले. पुरातत्त्व खात्याचे हे कार्य उल्लेखनीय खरे, परंतु अशा चित्र व माहिती प्रदर्शनाची खरी गरज शहरी भागात आहे. या निमित्ताने महाराष्ट्राची ही ऐतिहासिक संपत्ती शहरी इतिहासप्रेमींना निदान छायाचित्रांतून तरी न्याहाळता येईल, असा सूरही या वेळी उपस्थितांत उमटला. एरवी, अनेक किल्ल्यांवर व पुरातन वास्तूंच्या परिसरात केवळ पुरातत्त्व खात्याचे फलक दिसून येतात. त्यांनी संवर्धनासाठी नक्की कोणते कार्य केले? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. अशा वेळी पुरातत्त्व खात्याच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व कैकपटीने वाढलेले असते. असो. पुरातत्त्व खात्याबरोबरच गोवा राज्यातील 47 किल्ल्यांचे प्रदर्शन व कोकणातील गड व पर्यटनाचे चित्रदर्शनही संमेलनात उल्लेखनीय ठरले.

समस्त शिवप्रेमी शिवरायांना दैवत व महाराष्ट्रातील दुर्गांना आपली मंदिरे मानतो. या दुर्गमंदिरांच्या माहितीचा साठा असलेले दुर्ग साहित्य सुरुवातीला मुख्यत: पारशी व इंग्रजी भाषेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. 1860मध्ये ‘गव्हर्नमेंट लिस्ट आॅफ सिव्हिल फोटर््स’ या इंग्रजी पुस्तकात सर्वप्रथम देशातील किल्ल्यांची माहिती प्रसिद्ध झाली. यात दिलेल्या 485 किल्ल्यांपैकी 289 किल्ले हे एकट्या महाराष्ट्रात होते. तोवर मराठीत किल्ल्यांवर फारशी पुस्तके लिहिली गेली नाहीत.

मात्र, विसाव्या शतकाच्या प्रारंभी चिंतामण गोगटे यांनी प्रथमच ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ हे पुस्तक लिहिले. त्या वेळी दोन भागांत हे पुस्तक प्रकाशित झाले होते. नंतरच्या काळात य. न. केळकर यांचे   ‘चित्रमय शिवाजी’, कृ. वा. पुरंदरे यांचे ‘किल्ले पुरंदर’, शि. म. परांजपे यांचे ‘मराठ्यांच्या लढ्यांचा इतिहास’, ग. ह. खरे यांचे ‘स्वराज्यातील तीन दुर्ग’ ही पुस्तके प्रकाशित झाली आणि दुर्गसाहित्य तसेच पर्यटनास टप्प्याटप्प्याने चालना मिळत गेली. आज मराठी मातीला दुर्गसाहित्याच्या माध्यमातून  गड-किल्ल्यांचा इतिहास नव्याने सांगावा लागत असला, तरीही या प्रेरणादायी इतिहासाचा प्रचार आणि प्रसार दुर्ग साहित्य संमेलनातून होणे, ही निश्चितच सुखावह बाब आहे.

Original Article: Link

Sunday, March 3, 2013

भीम प्रराक्रमी: रामशेज किल्ला

छत्रपती संभाजी महाराजांशी जोडले गेलेले इतिहासातील एक सुवर्णपान किल्ले रामशेजच्या लढाईला वाहिलेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मावळ्यांनी तब्बल 65 महिने हा किल्ला झुंजत ठेवला होता. संभाजीराजांच्या जीवनावर आधारित कादंबर्‍यांमध्ये व पुस्तकांत या लढाईचे वर्णन वाचायला मिळते.
मराठा साम्राज्यातील बरेचसे किल्ले सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत व घनदाट झाडींमध्ये होते. रामशेज किल्ला मात्र यास अपवाद ठरतो. नाशिकच्या जवळ असलेला हा किल्ला मैदानी प्रदेशात आहे. संपूर्ण नाशिकमधून या किल्ल्याचे दर्शन करता येते. ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ ही उक्ती सार्थ ठरवणारा किल्ला म्हणजे रामशेज. रामशेजच्या लढाईचे वर्णन सर्वप्रथम मुघलांच्या कागदपत्रांत वाचायला मिळाले व खरा इतिहास उजेडात आला. ‘रामशेज’ या शब्दाचा अर्थ ‘रामाची शय्या’ असा होतो. वनवासात असताना भगवान श्रीराम यांनी याच डोंगरावर काही दिवस मुक्काम केला होता. त्यामुळे प्राचीन काळापासूनच या डोंगराला व किल्ल्यालाही ‘रामशेज’ हे नाव मिळाले आहे. शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठेशाहीला सहज नामोहरम करता येईल, या उद्देशाने औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोजजंग या सरदाराला महाराष्टÑाच्या मोहिमेवर पाठवले होते. त्या काळात नाशिक व आसपासचा प्रांत मुघलांच्या ताब्यात होता. औरंगजेबाच्या या आक्रमणाची कुणकुण लागताच संभाजीराजांनी रक्षणार्थ साल्हेरचा किल्लेदार रामशेजवर रवाना केला. ऐतिहासिक कागदपत्रांत रामशेजच्या किल्लेदाराचे स्पष्ट नाव सापडत नाही, परंतु बहुतांश इतिहासकारांच्या मते, सूर्याजी जेधे हे रामशेजचे किल्लेदार होते. रामशेजच्या लढाईने किल्ल्याच्या किल्लेदाराचे कार्यही इतिहासात अजरामर केले आहे.
औरंगजेबाचा सरदार फिरोजजंग रामशेजवर चाल करून आला, तेव्हा किल्ल्यावर केवळ 600 मावळे होते. चार-पाच तासांत किल्ला ताब्यात घेऊ, असा फिरोजजंगचा उद्देश होता. त्यासाठी त्याने नाना तºहेने हल्ला चढवला. वेढा कडक केला, सुरुंग लावले, मोर्चे बांधले, तसेच लाकडी दमदमे तयार करून त्यावर तोफा चढवल्या. तरीही रामशेज हाती येत नव्हता. गडावरच्या मावळ्यांनी गोफणीच्या दगडांच्या साहाय्याने प्रतिकार चालू ठेवला होता. किल्लेदाराने चहुबाजूंनी मुघली सैन्यावर हल्ले चढवले. मुघलांचे मनसुबे धुळीस मिळवले गेले. मग वेढा फोडण्यासाठी संभाजीराजांनी 5 ते 7 हजारांची फौज पाठवली. युद्ध झाल्यावर मात्र मुघलांना माघार घ्यावी लागली. फिरोजजंग किल्ल्याचा वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. नंतर औरंगजेबाने बहादूरखानाला रामशेजला पाठवले. किल्ला जिंकण्यासाठी त्याने मांत्रिकाचा अवलंब केला. परंतु त्यास अपयश आले. मुघली सैन्याचा धीर मात्र सतत चार वर्षांच्या अपयशाने खचून गेला होता. बहादूरशहाने संतापून रामशेजच्या पायथ्याशी बरीच जाळपोळ केली. औरंगजेबाने कासिमखान किरमानी या सरदाराला अखेरीस रामशेजच्या मोहिमेवर पाठवले. परंतु तोही अपयशाचा धनी ठरला. एवढा छोटासा गड मराठा, सैन्याने तब्बल 65 महिने अजिंक्य ठेवला होता!
नाशिकच्या मध्यवर्ती बसस्थानकापासून रामशेज किल्ला 15 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिक-पेठ रस्त्यालगत हा किल्ला उभा ठाकलेला दिसतो. पेठकडे जाणार्‍या बसेस या किल्ल्याला वळसा घालून जातात. नाशिकच्या निमाणीजवळील पेठनाका येथूनही खासगी वाहनांची सोय आहे. आशेवाडी हे रामशेजच्या पायथ्याचे गाव आहे. पेठ रस्त्यापासून आशेवाडी सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्यावर उतरल्यावरच रामशेजच्या टुमदार किल्ल्याचे दर्शन होते. समुद्रसपाटीपासून हा किल्ला 3270 मीटर उंचीवर आहे. परंतु प्रत्यक्ष पायथ्यापासून त्याची उंची अधिक नसल्याने कोणत्याही ऋतूत हा किल्ला नजरेस पडतो. पावसाळ्यात तो ढगांमध्ये लपाछपी खेळत असला तरी ही लपाछपी फार काळ चालत नाही. त्यामुळे ढगांच्या थंड वातावरणात किल्ला पाहता येतो. रामशेजला भेट देण्यासाठी हिवाळाही तसा उत्तमच. वातावरण साफ असल्याने आजूबाजूचा मोठा परिसर न्याहाळता येतो.
आशेवाडी गावातून किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यास 45 मिनिटे पुरतात. गावाबाहेर पडताना किल्ल्याच्या मुख्य कड्याचे दर्शन होते. इथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. त्यावरचा जरीपटका डौलाने फडकताना दिसून येतो. पायथ्याला वळसा घालून थोडे पुढे गेल्यास पायर्‍या लागतात. आजच्या काळातील सिमेंटने या पायर्‍या बांधल्या आहेत. पायर्‍या चढत असताना रामशेज किल्ल्याचा आवाका ध्यानात येतो. किल्ल्याच्या दोन्ही टोकांमधील कड्यांचा परिसर दृष्टीस पडतो. गडावर जाताना वाटेत एक गुहा लागते. या गुहेमध्ये रामाचे मंदिर आहे. तसेच एका बाजूला शिलालेख कोरलेला दिसून येतो. सध्या रामशेजवर काही साधूंचे वास्तव्य आहे. गुहेच्या खालच्या बाजूस एक पाण्याचे टाके दृष्टीस पडते. पावसाळ्यात ते पूर्ण भरून जाते. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे.

गुहेच्या समोरून जाणार्‍या पायर्‍या थेट गडमाथ्यावर जातात. गडाच्या दोन्ही टोकांमधील भागात आपण येऊन पोहोचतो. हा भाग बराचसा अरुंद आहे. समोरच बुजलेल्या अवस्थेत गुप्त दरवाजा आहे. या वाटेने खाली गेल्यास समोर देहेरच्या किल्ल्याचे दर्शन होते. पेठ रोडने चालणारी दूरवरची वाहतूक येथून न्याहाळता येते. गुप्त दरवाजाच्या वर जाणारी वाट रामशेजच्या दुसर्‍या टोकाकडे जाते व डावीकडची वाट थेट गडाच्या माचीकडे अर्थात, मुख्य बुरुजाकडे जाते. उजवीकडच्या वाटेने थोडे पुढे गेल्यास काही पायर्‍या दिसून येतात. एका कड्यावर या पायर्‍यांची रचना केलेली आहे. येथे समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा दिसून येतो. आज या दरवाजाची अवस्था खराब झालेली आहे व बाहेर पडण्याच्या वाटाही बंद झाल्या आहेत. येथून खाली जाण्यासाठी केवळ एका मनुष्याचा रस्ता दिसून येतो. दरवाजा पाहून मुख्य वाटेला आल्यावर समोर मोठा ध्वजस्तंभ नजरेस पडतो. शंभू छत्रपतींच्या जन्मदिनी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. ध्वजस्तंभ हा किल्ल्याच्या मुख्य बुरुजावर उभारलेला आहे. या ठिकाणी उंच कडा आहे. खाली आशेवाडी गाव दिसते. सुमारे चार-पाच कि.मी. अंतरावर चामर लेणींचा डोंगर दृष्टीस पडतो. त्याहीपलीकडे दूरदूर पांडवलेणींचा डोंगर दिसतो. वातावरण स्वच्छ असेल, तर उजव्या बाजूला दूरवर अंजनेरी व ब्रह्मगिरीचे   पर्वत न्याहाळता येतात. बरेच हौशी ट्रेकर्स रामशेज व चामर लेणींचा ट्रेक एका दिवसात पूर्ण करतात.

किल्ल्याच्या दुसर्‍या टोकाकडे जाण्यासाठी माचीवरून परत मागे फिरावे लागते. या टोकाचा परिसर पहिल्यापेक्षा अधिक उंचवट्याचा आहे. थोडे वर चढून आल्यावर आपण एका सपाटीवर येऊन पोहोचतो. येथे पाण्याची दोन टाकी व एक तलाव आहे. तलावापासून थोडे पुढे चालत गेल्यास एक देवीचे मंदिर दृष्टीस पडते. देवीभक्तांचे येथे सतत येणे-जाणे असावे, असे तेथील पाऊलखुणांवरून दिसून येते. नवरात्रात येथे मोठा उत्सवही होत असतो. मंदिराच्या मागच्या बाजूस पुन्हा उतार चालू होतो. गडाचा दुसरा गुप्त दरवाजा याच ठिकाणी आहे. दुसर्‍या टोकाशीही दोन पाण्याची टाकी दिसून येतात. या माथ्यावर अनेक पडक्या घरांचे अवशेष विखुरलेले आहेत. मागील बाजूला मोठे उतरते पठार आहे. त्यास वळसा घातल्यास किल्ल्याच्या या टोकाचा घेर ध्यानात येतो. समोरच टेहळणीसाठी वापरण्यात येणारा भोरगड नजरेस पडतो. नाशिक-पेठ रस्त्याचे पूर्ण दर्शन या भागातून होते. या टोकाच्या उजव्या बाजूला काही भग्न मूर्ती व पिंडीचे अवशेष दिसून येतात. त्याचा संदर्भ मात्र इतिहासात सापडत नाही.

रामशेज पाहताना एक गोष्ट मात्र ध्यानात येते की, या किल्ल्याची रचना ही साधीच आहे. परंतु तरीही मराठ्यांनी साडेपाच वर्षे हा किल्ला झुंजत ठेवला होता, यावरूनच त्यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. किल्ल्यावरील अवशेष मात्र पडझडीत नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्टÑाच्या पराक्रमाची माहिती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी या किल्ल्याचे जतन-संवर्धन ही अत्यावश्यक बाब आहे.

Original Article: (Daily Divya Marathi- 03/03/2013)
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-ramshej-fort-at-nashik-4196061-NOR.html

Sunday, January 27, 2013

दुर्गराज राजगड

गडांचा राजा व राजांचा गड असे ज्या किल्ल्याचे वर्णन केले जाते, तो किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होती. राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात मोडतो. राजगड हा एक बुलंद, बळकट व बेलाग असा किल्ला आहे. शिवाजीराजांनी त्याचा ताबा घेण्यापूर्वी या गडाला मुरुंबदेवाचा किल्ला म्हणून ओळखले जायचे. सातवाहनकाळात ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. आजही किल्ल्यावर ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर दिसून येते. कालांतराने हा किल्ला आदिलशाही व निझामशाही राजवटींमुळे फिरत राहिला. त्या काळात राजगडचा बालेकिल्लाच मुख्य किल्ला म्हणून गणला जात होता. शिवाजी महाराजांनी त्याचा ताबा कधी घेतला, याचा लिखित उल्लेख कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. सन 1646-1647च्या सुमारास तोरणासोबत राजांनी हाही किल्ला जिंकून घेतला होता. त्याचे नामकरण त्यांनी   ‘राजगड’ असे केले.
मुरुंबदेवाच्या या डोंगराचे चार भाग पाडतात. त्यात संजीवनी, सुवेळा व पद्मावती या तीन माची व बालेकिल्ल्याचा समावेश होतो. त्यामुळे किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा असल्याचे दिसून येते. राजगडावर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, सिंहगड मार्गे पावे गावातून भोसलेवाडी या गावी येणे होय. पुण्यापासून राजगड 75 कि.मी. अंतरावर आहे. सिंहगड रस्त्याने सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे या गावी पोहोचल्यावर वेल्हे गावात जाण्याकरिता उजवीकडे एक फाटा फुटतो. या ठिकाणावरून राजगड तीस कि.मी. अंतरावर आहे. या मार्गे बसने फक्त पावे गावापर्यंतच पोहोचता येते. तेथून पुढे कानद नदी पार करून राजगडाच्या पायथ्याशी जाता येते. राजगडचा मुख्य दरवाजा-पाली दरवाजा हा याच मार्गे सर करता येतो. पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. रस्त्यात निम्म्यापर्यंत पायवाट व निम्मा रस्ता पायर्‍यांनी बांधलेला आहे. दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार हे भक्कम व मोठे आहे. त्यातून हत्तीसुद्धा आत येऊ शकतो. दुसरे प्रवेशद्वार बुरुजांवर बांधलेले व पहिल्यापेक्षा अधिक भक्कम आहे. या प्रवेशद्वाराद्वारे आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो. डाव्या बाजूला संजीवनी माचीकडे व उजव्या बाजूचा रस्ता सुवेळा माचीकडे जातो. प्रथम संजीवनी माची, नंतर सुवेळा माची, पद्मावती माची व बालेकिल्ला असा क्रम ठेवला तर एका दिवसात किल्ला पाहण्यास सोपे पडते. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूने एक चिंचोळा रस्ता संजीवनी माचीच्या दिशेने जातो. या माचीची एकूण लांबी सुमारे अडीच किलोमीटर आहे. माचीवरून तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो. तीन टप्प्यांमध्ये ही माची बांधली गेलेली आहे. अनेक राहत्या घरांचे अवशेष या माचीवर दिसून येतात. शिवाय तिच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज बांधलेले आहेत. एकंदर 19 बुरुज या माचीवर बांधलेले आहेत. माचीच्या मध्यभागी उंच टेहळणी बुरूज उभारण्यात आलेला आहे. या बुरुजावरून व माचीच्या टोकावरून आजूबाजूचा प्रचंड परिसर न्याहाळता येतो. माचीवरून परत फिरताना उजव्या बाजूला भाटघर धरण दृष्टीस पडते. डोंगरांच्या रांगांत मोठ्या परिसरात भाटघर धरण पसरलेले आहे. संजीवनी माचीकडून सुवेळा माचीकडे जाण्याकरता बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे, एक पायवाटच असल्याने येथून हळू चालत जावे लागते. सुवेळा माचीही संजीवनी माचीइतकीच प्रशस्त व लांब आहे. तिची लांबी दोन किलोमीटर आहे. मुरुंबदेवाचा किल्ला हस्तगत केल्यावर शिवरायांनी प्रथम या माचीचे बांधकाम केले होते. संजीवनीपेक्षा सुवेळा माचीची रुंदी तुलनेने कमी आहे.
सुवेळा माचीलाही तीन टप्पे आहेत. शेवटपर्यंत तिची रुंदी कमी होत गेलेली आहे. या माचीवरून डावीकडे सिंहगड व समोरच्या बाजूला पुरंदर व वज्रगड पडतात. माचीच्या सुरुवातीला एक टेकडीसारखा भाग आहे. त्याला ‘डुबा’ असे म्हटले जाते. सुवेळा माचीवर मध्यभागी एक उंच खडक लागतो. या खडकावर 3 मीटर व्यासाचे छिद्र आढळून येते. त्यास हस्तीप्रस्तर म्हणतात. माचीवर हस्तीप्रस्तराच्या विरुद्ध बाजूला गुप्त दरवाजा आहे. त्यास ‘मढे दरवाजा’ म्हणतात. हस्तिप्रस्तर संपल्यावरही असाच गुप्त दरवाजा नजरेस पडतो.
सुवेळा माचीवरून परत फिरताना बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने पद्मावती माचीकडे जाता येते. लांबीने कमी असली तरी ही प्रशस्त माची आहे. पद्मावती माची प्रशस्त असल्याने इथे निवासाची बरीच ठिकाणे दिसून येतात. शिवाय पद्मावती देवीचे मंदिर, सईबार्इंची समाधी, पद्मावती तलाव, रत्नशाळा, सदर, हवालदारांचा वाडा, दारूगोळ्याची कोठारे व गुप्त दरवाजा ही ठिकाणे पद्मावती माचीवर आहेत. शिवरायांनी मुरुंबदेव किल्ल्याचे राजगड असे नामकरण केल्यावर पद्मावती मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरात सध्या 20-25 जणांची राहण्याची सोय होते. तसेच शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध होते. माचीच्या टोकावर गुप्त दरवाजा आहे. वाजेघर गावातून या दरवाजामार्गे किल्ल्यावर येता येते. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे सरळ रस्ता आहे. हा रस्ता कठीण व अरुंद असल्याने त्यावर सांभाळून चालावे लागते. या रस्त्यावर सध्या संरक्षक कठडे टाकल्याने बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाण्याचा रस्ता फारसा अवघड वाटत नाही. महादरवाजा आजही अत्यंत सुस्थितीत असल्याचे दिसून येते. त्यावर कमळ व स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर नजरेस पडते व मागे पाहिल्यास महादरवाजातून सुवेळा माचीचे दर्शन होते. बालेकिल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बांधलेली आहे. तसेच चंद्रतळे ओलांडून गेल्यावर उत्तरबुरूज नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावरून पद्मावती माची, सुवेळा माची व संजीवनी माची पूर्णपणे न्याहाळता येतात. पद्मावती माचीकडे उतरणारी एक वाट सध्या बंद केली गेलेली आहे. उत्तर बुरुजाच्या बाजूलाच ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर आहे. शिवाय बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी भग्न इमारती, वाडे व दारूगोळ्याच्या कोठारांचे अवशेष दिसून येतात. स्वच्छ वातावरण असेल तर केवळ तोरणा, सिंहगड, पुरंदरच नाही तर रोहिडा, रायरेश्वर, लोहगड, विसापूर व रायगड हेही किल्ले पाहता येतात.

Original Articles:


Sunday, January 6, 2013

स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी: रायगड

समस्त शिवप्रेमींचे तीर्थस्थान म्हणजे, किल्ले रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक याच किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. असे म्हटले जाते, की ‘वृंदावन, मधुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला? ज्या अभाग्याने रायगड न देखिला!’

रायगड हा निसर्गत: अभेद्य व अतिशय सुरक्षित ठिकाणी आहे. तो सर्वच बाजूंनी डोंगरद-यांनी वेढलेला आहे. खरेखुरे कोकण या किल्ल्याच्या परिसरात सामावलेले आहे. पावसाळ्यात रायगड अतिशय मनमोहक असतो, तर हिवाळ्यात रायगडाच्या कुशीतील सह्याद्रीचे रौद्र रूप सहज डोळ्यात साठवता येते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2900 मीटर उंचीवर आहे. पुणे ते रायगड हे अंतर केवळ 125 किमी आहे. येथे पोहोचण्याकरता सर्वात जवळचे बसस्थानक म्हणजे मुंबई-गोवा मार्गावरील महाड. महाड बसस्थानकावरून रायगडसाठी बसेस सुटतात. शिवाय बसस्थानकाबाहेरून जीपचीही सुविधा उपलब्ध आहे. बस थेट रायगडाच्या चितदरवाजापाशी येऊन थांबते. या दरवाजाचे अवशेष आज अस्तित्वात नाहीत. रायगडाच्या पाय-या येथूनच सुरू होतात. आता रोप-वेची सुविधा उपलब्ध झाल्याने 10-15 मिनिटांत गडावर पोहोचता येते. किल्ल्याच्या नाना दरवाजाकडूनही गड चढता येतो. रायगडाला एकूण 1435 पाय-या आहेत. या चढता चढता किल्ल्याचे सौंदर्य डोळ्यांत साठवता येते.

गड चढू लागल्यावर सर्वप्रथम बुरुजाचे ठिकाण दिसते. हा खुबलढा बुरुज. चित दरवाजापासून याचे व्यवस्थित दर्शन होते. रायगडाच्या पाचाड खिंडीत विरुद्ध दिशेला अवघ्या 4-5 मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला ‘वाघबीळ’ असे म्हटले जाते. पुणे-मुंबईकडील दुर्गप्रेमी तिला ‘गन्स आॅफ पाचाड’ असे म्हणतात. गुहा म्हणजे आपल्या मनात एक विशिष्ट रचना तयार होते. पण, ही गुहा या पारंपरिक रचनेत मोडत नाही. पाचाड खिंडीतून आल्यावर या गुहेचे तोंड दिसते. या तोंडातून समोर असणा-या भोकांमधून पाचाडचा भुईकोट किल्ला नजरेस पडतो. रायगडाची आणखी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

मशीद मोर्चा - चित दरवाजाने पुढे गेल्यावर काही सपाटीचा भाग आहे. या जागेवर दोन पडक्या इमारती नजरेस पडतात. पहारेक-यांच्या विश्रांतीसाठी यापैकी एका जागेचा वापर होत असे. दुस-या ठिकाणी धान्याची साठवण केली जाई. मदनशहा नावाच्या साधूची समाधी येथे दृष्टीस पडते. शिवाय एक मोठी तोफही येथे आहे.

राजसभा - शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरील राजसभेत झाला होता. राजसभा सव्वाशे फूट रुंद व सव्वा दोनशे फूट लांब आहे. येथे बत्तीस मणांचे पूर्वमुखी सोन्याचे सिंहासन होते. या राजसभेत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष शिवरायांच्या उपस्थितीचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

नगारखाना - बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगारखाना होय. रायगडावरील सर्वात उंच ठिकाण हेच आहे. सिंहासनाच्या समोरच असणा-या नगारखान्यातून पुढे गेल्यावर आपण रायगडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो.

बाजारपेठ - रायगडावर पूर्वी भव्य बाजारपेठ होती. नगारखान्याच्या डावीकडून खाली उतरल्यास समोरच्या सपाट जागेला ‘होळीचा माळ’ असे म्हणतात. शिवछत्रपतींचा पुतळा येथे बसवलेला आहे. पुतळ्याच्या समोर डाव्या व उजव्या बाजूला बाजारपेठेचे भव्य अवशेष नजरेस पडतात. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना 22 दुकाने आहेत.

टकमक टोक - हौशी ट्रेकर्सचे हे सर्वात आवडते ठिकाण. बाजारपेठेच्या समोरून खाली उतरल्यावर या टोकाकडे जाण्याचा रस्ता आहे. या टोकाच्या दोहोंबाजूनी खोल द-या आहेत. उजव्या बाजूला सुमारे 2600 फूट थेट खाली जाणारा कडा आहे. ब-यापैकी मोकळे वातावरण व पाइपचे कुंपण असल्याने चालण्यास फारसा धोका नसतो. परंतु, जागा कमी असल्याने सावधानता बाळगायला हवी. या ठिकाणी दारूगोळा कोठाराचे अवशेषही दिसून येतात.

जगदीश्वर मंदिर - बाजारपेठेच्या पूर्वेला खाली उतरल्यावर समोर एक भव्य मंदिर नजरेस पडते. हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर. शिवरायांच्या इतिहासात या मंदिराचा ब-याचदा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या समोर भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे, तर आतील सभामंडपात मध्यभागी कासवाची मूर्ती दृष्टीस पडते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा शिलालेखही कोरलेला आहे. हिरोजी इंदूलकरांनी रायगडाचे बांधकाम केले होते, ते पूर्ण झाल्यावर हा शिलालेख जगदीश्वराच्या मंदिरापाशी स्थापन केला होता. ‘रायगड किल्ला चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो’ या आशयाचा हा शिलालेख आहे.

पालखी दरवाजा - बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असणारा आणखी एक दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा. रायगडावरील स्तंभांच्या पश्चिमेला असलेल्या तटबंदीस 31 पाय-या आहेत. त्या चढून गेल्यास पालखी दरवाजा लागतो.

रत्नशाळा - यास खलबतखाना असेही म्हणतात. गुप्त खलबते करण्यासाठी रत्नशाळेचा वापर होत असावा. राजप्रासादाच्या उजव्या बाजूला एका तळघरात ही रत्नशाळा वसलेली आहे.

शिरकाई देऊळ - शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर आहे, त्याला शिरकाई देऊळ म्हणतात.

हिरकणी टोक - हिरकणी नावाच्या गवळणीची कथा प्रसिद्ध आहे. गडावरून हिरकणी या वाटेने खाली उतरली होती. या टोकास ‘हिरकणी टोक’ म्हणतात. इथे काही तोफा ठेवलेल्या दिसून येतात. बुरुजावर उभे राहून कोकणातील दोन नद्यांची पात्रे येथून दिसतात. डावीकडे गांधारी व उजवीकडे काळ नदीचे खोरे आहे. या ठिकाणावरून गड उतरणे म्हणजे, अग्निपरीक्षाच. युद्धाच्या दृष्टीने मात्र हे ठिकाण अत्यंत मोक्याचे मानले जाते.

महादरवाजा - या दरवाजावर लक्ष्मी व   सरस्वतीची प्रतीके म्हणून दोन कमळाकृती कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यास पहारेक-यांच्या देवड्या दिसून येतात. तटबंदीची सुरुवात या दरवाज्यापासून होते. हिरकणी टोक व टकमक टोकापर्यंत या ठिकाणापासून तटबंदी आहे. टकमक टोकाच्या तटबंदीच्या शेवटी एक चोर दरवाजा आहे. त्यास ‘चोरदिंडी’ असे म्हटले जाते. इथे बुरुजातून दरवाजापर्यंत यायला पाय-या बांधलेल्या आहेत. महादरवाजातून पुढे आल्यावर हत्ती तलाव दृष्टीस पडतो. हत्तींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय या तलावात करण्यात येत असे. हत्ती तलावाजवळ असणा-या धर्मशाळांच्या डावीकडे गंगासागर तलाव आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी आणलेली महानद्यांची तीर्थे याच तलावात टाकली गेली, त्यामुळे यास गंगासागर तलाव म्हणतात.

शिवरायांची समाधी - जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पुढे एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडतो. तीच शिवरायांची समाधी होय. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दु:खद प्रसंग म्हणजे, शिवाजी महाराजांचे निधन रायगडाने अनुभवले होते. वाघ दरवाजा- आणीबाणीच्या प्रसंगी रायगडावरून खाली उतरण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. इथून वर येणे अवघड होते. परंतु, दोर टाकून खाली जाता येत होते. छत्रपती राजारामांनी या दरवाजाचा वापर वेढा फोडून निसटण्यासाठी केला होता. शिवरायांची राजधानी असलेला हा किल्ला प्रेरणेचा ऊर्जास्रोत आहे. त्याची सैर एका दिवसात पूर्ण करणे हे जवळपास कठीणच असते; परंतु किल्ला पाहून झाल्यावर तेथून काढता पाय घेण्याची इच्छा होत नाही.

मूळ लेख: दै. दिव्य मराठी (दि. ६ जानेवारी २०१३).
लिंक-१: http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperpdf/06012013/5RASIKA-PG4-0.PDF

लिंक-२: http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-shivaji-rajas-killa-on-raigad-4138558-NOR.html