माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, January 6, 2013

स्वराज्याची ऐतिहासिक राजधानी: रायगड

समस्त शिवप्रेमींचे तीर्थस्थान म्हणजे, किल्ले रायगड. छत्रपतींचा राज्याभिषेक याच किल्ल्याने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिला. असे म्हटले जाते, की ‘वृंदावन, मधुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला? ज्या अभाग्याने रायगड न देखिला!’

रायगड हा निसर्गत: अभेद्य व अतिशय सुरक्षित ठिकाणी आहे. तो सर्वच बाजूंनी डोंगरद-यांनी वेढलेला आहे. खरेखुरे कोकण या किल्ल्याच्या परिसरात सामावलेले आहे. पावसाळ्यात रायगड अतिशय मनमोहक असतो, तर हिवाळ्यात रायगडाच्या कुशीतील सह्याद्रीचे रौद्र रूप सहज डोळ्यात साठवता येते. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2900 मीटर उंचीवर आहे. पुणे ते रायगड हे अंतर केवळ 125 किमी आहे. येथे पोहोचण्याकरता सर्वात जवळचे बसस्थानक म्हणजे मुंबई-गोवा मार्गावरील महाड. महाड बसस्थानकावरून रायगडसाठी बसेस सुटतात. शिवाय बसस्थानकाबाहेरून जीपचीही सुविधा उपलब्ध आहे. बस थेट रायगडाच्या चितदरवाजापाशी येऊन थांबते. या दरवाजाचे अवशेष आज अस्तित्वात नाहीत. रायगडाच्या पाय-या येथूनच सुरू होतात. आता रोप-वेची सुविधा उपलब्ध झाल्याने 10-15 मिनिटांत गडावर पोहोचता येते. किल्ल्याच्या नाना दरवाजाकडूनही गड चढता येतो. रायगडाला एकूण 1435 पाय-या आहेत. या चढता चढता किल्ल्याचे सौंदर्य डोळ्यांत साठवता येते.

गड चढू लागल्यावर सर्वप्रथम बुरुजाचे ठिकाण दिसते. हा खुबलढा बुरुज. चित दरवाजापासून याचे व्यवस्थित दर्शन होते. रायगडाच्या पाचाड खिंडीत विरुद्ध दिशेला अवघ्या 4-5 मिनिटांच्या चढणीवर एक गुहा आहे. तिला ‘वाघबीळ’ असे म्हटले जाते. पुणे-मुंबईकडील दुर्गप्रेमी तिला ‘गन्स आॅफ पाचाड’ असे म्हणतात. गुहा म्हणजे आपल्या मनात एक विशिष्ट रचना तयार होते. पण, ही गुहा या पारंपरिक रचनेत मोडत नाही. पाचाड खिंडीतून आल्यावर या गुहेचे तोंड दिसते. या तोंडातून समोर असणा-या भोकांमधून पाचाडचा भुईकोट किल्ला नजरेस पडतो. रायगडाची आणखी काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.

मशीद मोर्चा - चित दरवाजाने पुढे गेल्यावर काही सपाटीचा भाग आहे. या जागेवर दोन पडक्या इमारती नजरेस पडतात. पहारेक-यांच्या विश्रांतीसाठी यापैकी एका जागेचा वापर होत असे. दुस-या ठिकाणी धान्याची साठवण केली जाई. मदनशहा नावाच्या साधूची समाधी येथे दृष्टीस पडते. शिवाय एक मोठी तोफही येथे आहे.

राजसभा - शिवरायांचा राज्याभिषेक रायगडावरील राजसभेत झाला होता. राजसभा सव्वाशे फूट रुंद व सव्वा दोनशे फूट लांब आहे. येथे बत्तीस मणांचे पूर्वमुखी सोन्याचे सिंहासन होते. या राजसभेत प्रवेश केल्यावर प्रत्यक्ष शिवरायांच्या उपस्थितीचा भास झाल्याशिवाय राहत नाही.

नगारखाना - बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजे नगारखाना होय. रायगडावरील सर्वात उंच ठिकाण हेच आहे. सिंहासनाच्या समोरच असणा-या नगारखान्यातून पुढे गेल्यावर आपण रायगडाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचतो.

बाजारपेठ - रायगडावर पूर्वी भव्य बाजारपेठ होती. नगारखान्याच्या डावीकडून खाली उतरल्यास समोरच्या सपाट जागेला ‘होळीचा माळ’ असे म्हणतात. शिवछत्रपतींचा पुतळा येथे बसवलेला आहे. पुतळ्याच्या समोर डाव्या व उजव्या बाजूला बाजारपेठेचे भव्य अवशेष नजरेस पडतात. या बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना 22 दुकाने आहेत.

टकमक टोक - हौशी ट्रेकर्सचे हे सर्वात आवडते ठिकाण. बाजारपेठेच्या समोरून खाली उतरल्यावर या टोकाकडे जाण्याचा रस्ता आहे. या टोकाच्या दोहोंबाजूनी खोल द-या आहेत. उजव्या बाजूला सुमारे 2600 फूट थेट खाली जाणारा कडा आहे. ब-यापैकी मोकळे वातावरण व पाइपचे कुंपण असल्याने चालण्यास फारसा धोका नसतो. परंतु, जागा कमी असल्याने सावधानता बाळगायला हवी. या ठिकाणी दारूगोळा कोठाराचे अवशेषही दिसून येतात.

जगदीश्वर मंदिर - बाजारपेठेच्या पूर्वेला खाली उतरल्यावर समोर एक भव्य मंदिर नजरेस पडते. हे जगदीश्वर महादेवाचे मंदिर. शिवरायांच्या इतिहासात या मंदिराचा ब-याचदा उल्लेख आलेला आहे. मंदिराच्या समोर भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे, तर आतील सभामंडपात मध्यभागी कासवाची मूर्ती दृष्टीस पडते. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर एक छोटासा शिलालेखही कोरलेला आहे. हिरोजी इंदूलकरांनी रायगडाचे बांधकाम केले होते, ते पूर्ण झाल्यावर हा शिलालेख जगदीश्वराच्या मंदिरापाशी स्थापन केला होता. ‘रायगड किल्ला चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो’ या आशयाचा हा शिलालेख आहे.

पालखी दरवाजा - बालेकिल्ल्यात प्रवेश करण्यासाठी असणारा आणखी एक दरवाजा म्हणजे पालखी दरवाजा. रायगडावरील स्तंभांच्या पश्चिमेला असलेल्या तटबंदीस 31 पाय-या आहेत. त्या चढून गेल्यास पालखी दरवाजा लागतो.

रत्नशाळा - यास खलबतखाना असेही म्हणतात. गुप्त खलबते करण्यासाठी रत्नशाळेचा वापर होत असावा. राजप्रासादाच्या उजव्या बाजूला एका तळघरात ही रत्नशाळा वसलेली आहे.

शिरकाई देऊळ - शिवरायांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूला एक मंदिर आहे, त्याला शिरकाई देऊळ म्हणतात.

हिरकणी टोक - हिरकणी नावाच्या गवळणीची कथा प्रसिद्ध आहे. गडावरून हिरकणी या वाटेने खाली उतरली होती. या टोकास ‘हिरकणी टोक’ म्हणतात. इथे काही तोफा ठेवलेल्या दिसून येतात. बुरुजावर उभे राहून कोकणातील दोन नद्यांची पात्रे येथून दिसतात. डावीकडे गांधारी व उजवीकडे काळ नदीचे खोरे आहे. या ठिकाणावरून गड उतरणे म्हणजे, अग्निपरीक्षाच. युद्धाच्या दृष्टीने मात्र हे ठिकाण अत्यंत मोक्याचे मानले जाते.

महादरवाजा - या दरवाजावर लक्ष्मी व   सरस्वतीची प्रतीके म्हणून दोन कमळाकृती कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत प्रवेश केल्यास पहारेक-यांच्या देवड्या दिसून येतात. तटबंदीची सुरुवात या दरवाज्यापासून होते. हिरकणी टोक व टकमक टोकापर्यंत या ठिकाणापासून तटबंदी आहे. टकमक टोकाच्या तटबंदीच्या शेवटी एक चोर दरवाजा आहे. त्यास ‘चोरदिंडी’ असे म्हटले जाते. इथे बुरुजातून दरवाजापर्यंत यायला पाय-या बांधलेल्या आहेत. महादरवाजातून पुढे आल्यावर हत्ती तलाव दृष्टीस पडतो. हत्तींसाठी पिण्याच्या पाण्याची सोय या तलावात करण्यात येत असे. हत्ती तलावाजवळ असणा-या धर्मशाळांच्या डावीकडे गंगासागर तलाव आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी आणलेली महानद्यांची तीर्थे याच तलावात टाकली गेली, त्यामुळे यास गंगासागर तलाव म्हणतात.

शिवरायांची समाधी - जगदीश्वर मंदिराच्या पूर्व दरवाजापासून पुढे एक अष्टकोनी चौथरा नजरेस पडतो. तीच शिवरायांची समाधी होय. महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दु:खद प्रसंग म्हणजे, शिवाजी महाराजांचे निधन रायगडाने अनुभवले होते. वाघ दरवाजा- आणीबाणीच्या प्रसंगी रायगडावरून खाली उतरण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. इथून वर येणे अवघड होते. परंतु, दोर टाकून खाली जाता येत होते. छत्रपती राजारामांनी या दरवाजाचा वापर वेढा फोडून निसटण्यासाठी केला होता. शिवरायांची राजधानी असलेला हा किल्ला प्रेरणेचा ऊर्जास्रोत आहे. त्याची सैर एका दिवसात पूर्ण करणे हे जवळपास कठीणच असते; परंतु किल्ला पाहून झाल्यावर तेथून काढता पाय घेण्याची इच्छा होत नाही.

मूळ लेख: दै. दिव्य मराठी (दि. ६ जानेवारी २०१३).
लिंक-१: http://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperpdf/06012013/5RASIKA-PG4-0.PDF

लिंक-२: http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-article-on-shivaji-rajas-killa-on-raigad-4138558-NOR.html

No comments:

Post a Comment