माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, December 31, 2023

दुधारी डोंगर

शिरोलीच्या या दुधारी डोंगरावर मी यापूर्वी अनेकदा एकट्यानेच ट्रेकिंग केलेली आहे. पण यावेळेस पहिल्यांदाच एका धारेने चढाई तर दुसऱ्या धारेने खाली उतरलो. कदाचित याच दोन पायवाटांमुळे या डोंगराला दुधारी असे म्हणत असावेत. हिवाळ्यातल्या एका शीतल सकाळी चढाई करताना फारशी दमछाक झाली नाही. यावेळेस मागील वेळेपेक्षा पाच मिनिटे लवकरच टोकावर पोहोचलो.
सकाळच्या प्रहरी आजूबाजूच्या परिसरात फारसा गोंगाट जाणवत नाही. त्या दिवशी देखील तो नव्हता. अगदी दोनच मिनिटात दुसऱ्या बाजूने डोंगर उतरायला सुरुवात केली. ही वाट तशी मळलेली आहे. परंतु या मार्गाने मी पहिल्यांदाच खाली उतरत होतो आणि महत्त्वाची म्हणजे या बाजूला उतार कमी आहे. म्हणूनच त्याचे अंतर देखील जास्त आहे. उतरताना रस्त्याला एका ठिकाणी एक बोराचे झाड दिसून आले. ते बोरांनी पूर्ण लगडलेले होते. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी किंबहुना बऱ्याच वर्षांनी अशी रानटी बोरे खायला मिळाली. खाली उतरताना रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. हमरस्त्याला लागलो तिथे देखील कोणीही दिसून आले नाही. एक चांगला भला मोठा रस्ता गावाच्या दिशेने जातो. याच्या आजूबाजूला उसाची, कांद्याची, डाळिंबाची शेती आहे. सूर्य बऱ्यापैकी वर आलेला असला तरी वातावरणातील या ठिकाणची शांतता काहीशी भयावह अशीच होती. बिबट्यांचे निवासस्थान असणाऱ्या आमच्या जुन्नरमध्ये दिवसा देखील त्याचे दर्शन होते. कदाचित तो अशाच कुठल्यातरी शेतामध्ये लपलेला असावा, असं वाटून गेले आणि दुधारी डोंगराचा हा प्रवास सुफल झाला.


 

Saturday, November 18, 2023

दुर्गादेवीचे दुःख

बारा वर्षांपूर्वी पहिल्यांदा दुर्गुवडी किल्ल्याच्या शोधार्थ या भागामध्ये आलो होतो. जुन्नर मधला हा अतिशय पश्चिमेतला दुर्गम भाग. शहरी संस्कृतीपासून दूर आणि खेडेपण जपून होता. इथे आल्यानंतर निसर्गाची एक अद्वितीय अनुभूती मिळाली. इथल्या वृक्षवल्लींच्या रूपाने ऑक्सिजनचं कोठार गवसल्याचा आनंद झाला होता. याच कारणास्तव जुन्नरमधील फिरण्यासाठी हे आमचं सर्वात लाडकं ठिकाण झालं होतं. परंतु मधल्या काळात परिस्थिती बदलत गेली. सोशल मीडियाद्वारे अशी निरनिराळी छुपी ठिकाणे लोकांना समजत गेली. म्हणूनच शहरी लोक फिरण्यासाठी किंबहुना दंगा करण्यासाठी या भागात यायला लागली. वनविभागाने देखील याची दखल घेऊन इथल्या कोकणकड्यावर रेलिंग बांधले, शिवाय अनेक साधन सुविधा देखील निर्माण केल्या. पावसाळ्यामध्ये स्वर्गाची अनुभूती देणारा हा परिसर आहे. म्हणूनच पावसाळी बेडकांचा अर्थात पर्यटकांचा देखील वावर वेगाने वाढत गेला आणि हाच वावर आता इथल्या निसर्गाच्या मुळावर घाव घालू पाहत आहे. आज जेव्हा वृक्ष विविधतेचं भांडार असणाऱ्या दुर्गावाडीला येतो तेव्हा नेहमीच पर्यटकांची गर्दी येथे पाहायला मिळते. त्यांनी फेकलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास, पत्रावळ्या, पिशव्या यांचा खच पडलेला दिसून येतो. भविष्यात तो अजून वेगाने वाढेल यात शंका नाही. हा कचरा निसर्गाची हानी करतो आहे. येणारे लोक बिनदिक्कतपणे सर्व कचरा इथेच टाकून जातात. मग तो उचलणार कोण? ही जबाबदारी स्थानिक रहिवाशांची आहे की निसर्ग स्वच्छतेसाठी पुढाकार घेणाऱ्या स्वयंसेवी संघटनांची? याचे उत्तर ज्याने त्यानेच शोधायला हवे.


मॉलमधली दिवाळी

पाश्चात्य संस्कृतीचे सातत्याने प्रदर्शन आणि समर्थन करणारे ठिकाण म्हणजे मॉल! परंतु, यावर्षी चिंचवडच्या एल्प्रो सिटी मॉलमध्ये आम्हाला काहीतरी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या इतिहासात मानाचे स्थान असणारे शिवरायांचे किल्ले या मॉलमध्ये दिसून आले. आपल्या सर्व प्रमुख किल्ल्यांच्या प्रतिकृती भव्य स्वरूपात येथे तयार करण्यात आलेल्या आहेत. त्या सर्वांनी एकदातरी निश्चितच पाहाव्या आणि कौतुक कराव्या अश्याच आहेत. 



Thursday, July 27, 2023

गोवादुर्ग

गोवा नावाचा किल्ला महाराष्ट्रामध्ये आहे याची माहिती आम्हाला नव्हती. हर्णै बंदरावर पोहोचलो तेव्हा इथे कणकदुर्ग आणि गोवादुर्ग नावाचे दोन किल्ले आहेत, असं समजलं. समुद्रामध्ये जो चिंचोळा भूभाग प्रवेश करतो तो कणकदुर्ग होय आणि त्याच्याच अलीकडे गोवादुर्ग किल्ला आहे. कणकदुर्गवर भेट देऊन परतताना या गोवा किल्ल्यावर जावे असे ठरवले. संध्याकाळी सूर्य मावळायला आला होता. तो पूर्ण गुडूप होण्याच्या आधी या किल्ल्यावर पोहोचावे, म्हणून आम्ही लगबगीने कणकदुर्गावरून निघालो. गोवा किल्ल्यापाशी पोहोचलो तोवर सूर्य मावळलेला नव्हता. मी झपझप पावले टाकत किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दारातून आत गेलो आणि एका तटबंदीवर जाऊन सूर्याच्या मावळतीचा तो नजारा न्याहाळू लागलो. इथून समोर समुद्रात दिसणाऱ्या सुवर्णदुर्गवरून सूर्य मावळतीकडे चाललेला होता. अर्थात हा नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपायचा मोह मला आवरला नाही. सूर्य मावळल्यानंतर देखील सायंप्रकाशात आम्ही किल्ला पाहून घेतला. कनकदुर्गपेक्षा बऱ्यापैकी चांगले अवशेष अर्थात किल्ला म्हणावा असे अवशेष अजूनही गोवादुर्गवर दिसून येतात. तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वारे आणि त्यावरील शिल्पे या खुणा किल्ल्यावर अजूनही त्याच्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहेत. या किल्ल्याची पुनर्बांधणी करून तो आणखी व्यवस्थित करता येऊ शकतो.
मध्यभागी असणाऱ्या ध्वजस्तंभापाशी गेलो की इथून कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्गासहित हर्णै बंदरही व्यवस्थित दिसून येते.















Monday, July 24, 2023

एका फोटोमागची गोष्ट

बरोबर दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या दिवशी माझ्या लग्नाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली होती. अर्थात त्यास अंतिम स्वरूप द्यायचे बाकी राहिले होते. त्याच दिवशी सकाळी मी आणि माझा भाऊ दोघेही ओतूरच्या लागाच्या घाटामध्ये फिरण्यासाठी निघालो होतो. पावसाळ्याचा शेवटचा महिना चालू होता. ओतूर सोडल्यानंतर पुढे फापाळे शिवार नावाचे गाव लागते. तिथे पोहोचल्यावर दूर मुंजाबाच्या डोंगरावर एक धबधबा दिसून आला. या धबधब्यापाशी आम्ही यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे आज तिथेच जाऊया असे ठरवले. मग लागाच्या घाटाने वरती पठारावर पोहोचलो. इथे अहमदनगर जिल्हा सुरू होतो. तसा हा भाग बऱ्यापैकी दुर्गम आहे. रस्ते मात्र ठीकठाक आहेत. घाट चढून थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला वळालो. रस्त्यावर एका ठिकाणी एक सुंदर मंदिर दिसून आलं. तिथूनच पुढे कदाचित या धबधब्यापाशी जाणारा रस्ता असावा, असं वाटलं. रस्त्यावर एक गुराखी गुरे वळताना दिसून आला. त्याला या धबधबाविषयी विचारलं. त्यानेच आम्हाला या धबधब्याचे नाव धूरनळी धबधबा आहे, असं सांगितलं आणि मार्गही दाखवला. वातावरणामध्ये पुन्हा पावसाचा खेळ चालू होता. त्यामुळे पावसाची निश्चितता नव्हतीच.
गुराख्याने सांगितलेल्या मार्गाने आम्ही चालत चालत पुढे गेलो आणि थोडंसं खाली उतरल्यानंतर समोरच धुरनळी धबधबा दिसून आला. त्या दिवशी तिथे बऱ्याच वेगाने वारे वाहत होते. अर्थात त्यामध्ये विस्कळीतपणा होता. म्हणून जेव्हा वाऱ्याचा वेग खालच्या दिशेने जोरात यायचा तेव्हा या धबधब्याचे पाणी वेगाने मागे फेकले जायचे. त्या काळात आजच्या इतकी प्रभावी सोशल मीडिया नसल्यामुळे या धबधब्यापाशी काहीच गर्दी नव्हती. आम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहोचलो. अचानक वेगाने वारी आले की धबधब्यातून खाली पडणारे पाणी जोरात मागे फेकले जायचे. हा नेहमीचा उर्ध्व जलप्रपात नव्हता. वातावरणाच्या स्थितीमुळे तो आज आम्हाला तसा दिसून येत होता. मी थोडासा मागे थांबलो होतो. भाऊ पाण्यामध्ये चालत गेला आणि समोरून वेगाने वारे आल्यावर त्याच्या अंगावर पाणी उडायला लागले. त्याने दोन्हीही हात उंचावले. आणि त्या क्षणी मी हा फोटो काढला होता.
अनेकांना असं वाटतं की हा ऊर्ध्व जलप्रपात अर्थात "रिवर्स वॉटरफॉल" आहे. पण तसं नाही. अतिशय क्वचित प्रसंगी त्याचे पाणी उलट्या दिशेला फेकले जाते. विशेष म्हणजे हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये कोसळतो. आजकाल पावसाळ्यात या धबधब्याच्या खालच्या दिशेला लोकांची भयंकर गर्दी असते. अनेक जण हा फोटो बघूनच रिवर्स वॉटर फॉल बघायचा म्हणून या ठिकाणी येतात. खराखुरा ऊर्ध्व जलप्रपात बघायचं असेल तर जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी पुणे जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात कोसळणारा धबधबा किंवा दुर्गवाडी पठारावर असणारा छोटेखानी धबधबा पाहता येऊ शकेल.


 

Wednesday, July 19, 2023

मोशी -> कुरुळी -> मोई -> चिखली वर्तुळ सायकलस्वारी

रात्रभर कोसळून दमलेल्या पावसाने सकाळी विश्रांती घेतली त्यामुळे जॉगिंग करताना पावसाची भेट झाली नाही. अगदीच पाच किलोमीटर पळल्यानंतर पावसाची रिमझिम चालू झाली होती. त्यामुळे लगेच सायकल काढली आणि मार्ग निश्चित केला. पावसाचा जोर तसा नव्हताच. अगदी कपडे ओले करेल, इतपत पाऊस चालू होता. नंतर त्याचा वेग कमी जास्त व्हायला लागला. पावसामुळे रस्त्यावरची रहदारी कमी होत असते. पण आजकाल तसेही काही होताना दिसत नाही.
पुणे नाशिक महामार्गावला लागलो त्यावेळेस या हायवेवरची गर्दी अजुनही तशीच होती. इंद्रायणीच्या पुलावरून जाताना नदीचा तो वेगवान प्रवाह अनुभवता आला. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच इतक्या वेगाने नदीतून पाणी वाहत होते. काल तर वरच्या दिशेने वाहत आलेल्या जलपर्णी देखील दिसून आल्या. म्हणजेच पावसाचा एकंदरीत जोर वाढतोय, असं दिसतं. नदी ओलांडल्यानंतर डावीकडे एक रस्ता मोई गावाच्या दिशेने जातो. इथे कुरळी गावाच्या हद्दीत अनेक कंपन्या आहेत. एमआयडीसीमधला हा रस्ता आता काँक्रीटचा बांधलेला आहे. सकाळी या रस्त्यावर फारशी गर्दी नव्हतीच. वरून कोसळणाऱ्या रिमझिम पावसामध्ये मी मोईच्या दिशेने सायकल चालवत निघालो. या रस्त्याने मी पहिल्यांदाच आलो होतो. मोई गाव अजूनही गावाच्या खुणा राखून आहे. गावाच्या मुख्य वेशीतूनच प्रवेश केला आणि मागच्या वेशीतून पुन्हा नदीच्या दिशेने निघालो. रस्त्यामध्ये भैरवनाथ मंदिराचे भले मोठे बांधकाम चालू आहे. हे मंदिर बऱ्याच लांब होऊन देखील नजरेस पडते. आज ते पहिल्यांदाच इतक्या जवळून पाहिले. थोड्याच अंतरावर नदीवरील पूल लागला. या पुलाची उंची तशी फारशी नाही. पाण्याची पातळी आणखी वाढली तर कदाचित या पुलावरून देखील पाणी जाऊ शकते. नदीचा तर रौद्रप्रवाह इथून चांगलाच अनुभवता येत होता. पूल पार केल्यानंतर शहरीकरणाची चिन्हे पुन्हा दिसू लागली. खराब रस्ते, गटारातून नदीमध्ये वाहणारे पाणी आणि पाण्यामुळे ओला झालेला कचरा व त्यातून येणारा दुर्गंध हे सर्वच काही पाहायला मिळाले. लगेचच देहू-आळंदी रस्ता लागला आणि डावीकडे वळून परतीच्या मार्गाला लागलो. घरी येईपर्यंत पूर्ण भिजून गेलो होतो. आज-काल या भागात जास्त सायकलस्वार दिसून येत नाहीत. कदाचित पावसाचा परिणाम असावा.


 

Tuesday, July 18, 2023

कणकदुर्ग

दापोलीच्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून पश्चिमेकडे समुद्रामध्ये आत आलेला भूभाग नजरेस पडतो. दापोलीच्या दोन दिवसांच्या वास्तव्यामध्ये या ठिकाणी पण जाऊन यायचे ठरवले. हा एक किल्ला होता. माशांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हर्णै बंदरावर स्थित असलेला हा किल्ला म्हणजे कणकदुर्ग होय.
दुपारचे ऊन ओसरल्यानंतर आम्ही हर्णै गावात पोहोचलो. माशांचं बरंच मोठं मार्केट या ठिकाणी आहे. सगळीकडे माशांच्या वासाचा नुसता घमघमाट पसरलेला होता. आमच्यासारख्या शाकाहारी लोकांना या वासाची किळस वाटते! तरीही त्यातून माग काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. हर्णै बंदराचा समुद्रकिनारा नक्की कसा आहे(?), हे तिथे भेट दिलेल्या अनेकांना माहीत असेलच. याच रस्त्याने माग काढत आम्ही कणकदुर्गपाशी येऊन पोहोचलो. सूर्य मावळतीकडे चाललेला होता. बंदरावर नेहमीप्रमाणेच लगबग आणि गोंगाट दिसून येत होता. समुद्रात जो चिंचोळा डोंगर प्रवेश करतो त्या रस्त्याने आम्ही पुढे आलो. याठिकाणी किल्ल्याचे कोणतेच अवशेष दिसून आले नाही. आजच्या काळात बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या मात्र होत्या. त्या चढून वरती गेलो. समोरच समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला नजरेस पडला. याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी समुद्रकिनाऱ्यावर हर्णै बंदरावर तीन किल्ले बांधले होते, असं ऐकलंय. त्यातीलच हा एक किल्ला होय. येथून संध्याकाळचा सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. केशरी सुर्यकिरणे समुद्राच्या पाण्यावर विविध रंगछटा तयार करतात. सूर्य पूर्णपणे मावळत नाही तोपर्यंत हा नजारा केवळ पाहतच राहावा, असा दिसतो. तीनही बाजूंनी समुद्र आणि एका बाजूने किल्ल्यावर येणारी पायवाट एवढेच नजरेस पडतं.





 


Sunday, July 2, 2023

मान्सून मधली पहिली राईड

गेले कित्येक महिने इंद्रायणीच्या पाण्यावर जलपर्णी पसरलेल्या दिसत होत्या. परंतु मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे जलपर्णींचं ते जाळं हळूहळू कमी होत गेलं. नदी प्रवाही झाली. नदीचा तो खळाळता प्रवाह पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये अनुभवता यावा म्हणून सायकलद्वारे इंद्रायणीची लघु परिक्रमा करायचे ठरवले.
आज सकाळचं वातावरण ढगाळ असलं तरी पावसाची शक्यता वाटत नव्हती. रविवारचा दिवस, त्यामुळे गर्दी देखील कमी. बऱ्याच महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ऊन नसताना सायकल चालवत होतो! अलंकापुरीमध्ये प्रवेश केला आणि पावसाचे तुषार अंगावर यायला लागले. जोर फारसा नव्हता. इंद्रायणीच्या पुलावर पोहोचलो तेव्हा नदीचा तो खडाळता प्रवाह दिसून येत होता. नदी ओलांडून थेट मरकळच्या दिशेला लागलो. गावातून बाहेर पडल्यावर पावसाचा जोर कमी झाला होता. आता रस्ते ओले देखील दिसत नव्हते. पण आजूबाजूच्या खड्ड्यांमध्ये पाणी मात्र साठलेले दिसले. आळंदी-मरकळ रस्त्यावर असणाऱ्या धानोरे गावाच्या दिशेने उजवीकडे वळालो. आता शहर वस्ती संपली होती. सगळीकडे हिरवेगार झाडेझुडपे दिसायला लागली होती.
अगदी पाचच मिनिटांमध्ये धानोरे आणि निरगुडी गावाला जोडणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पुलावर आलो. इथल्या बंधाऱ्या खालून इंद्रायणीचा प्रवाह वेगाने खालच्या दिशेने जात होता. शहरात कडून आलेल्या जलपर्णी ह्या बंधार्‍यापाशी अडकलेल्या दिसल्या. इथून निरगुडी गावामध्ये आलो आणि पश्चिमेच्या दिशेने चऱ्होली बुद्रुकचा रस्ता धरला. वातावरण आल्हाददायक बनलं होतं. डोंगर टेकड्या आता हिरव्या दिसायला लागल्या होत्या. ढगाळ वातावरण काहीसं विरळ होत होतं आणि अधून मधून सूर्याची किरणे डोकावत होती. एका छोटेखानी टेकडीवर आलो तेव्हा तिथून शहरीकरणाचे दृश्य व्यवस्थित दिसत होते. काँक्रीटची जंगले निसर्गाच्या जंगलातून वेगळीच दिसतात. चऱ्होली गावाच्या पूर्वेकडील भाग अजूनही गाव म्हणावा असाच आहे. इथून गावठाणात प्रवेश करताना अतिशय छोटा रस्ता दिसतो. कदाचित त्याला पर्याय म्हणूनच नदीच्या बाजूने बायपास रस्ता करण्यात आला असावा. गावातून जाताना गावाचं जुनं गावपण मात्र ठळकपणे जाणवतं. अजूनही गावात जुने लाकडी बांधाचे वाडे दिसून येतात. अनेक वाड्यांची व्यवस्थित डागडुजी देखील झालेली आहे. आपण पुणे शहरातीलच वाडे पाहत आहोत की काय असाही भास होतो. गावच्या वेशीतून बाहेर आलो तेव्हा पुन्हा काँक्रीटच्या जंगलाच्या दिशेने प्रवास चालू केला. रहदारी वाढली होती, वर्दळ देखील वाढत होती. आणि त्याच वर्दळीमध्ये मी देखील माझा प्रवास चालू ठेवला.











Friday, June 9, 2023

महर्षी कर्वे जन्मस्थळ

सकाळी रत्नागिरीच्या मुरुड गावामध्ये पोहोचलो, त्यादिवशी सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गावात पर्यटकांची फारशी रेलचेल नव्हती. गावातील जिल्हा परिषद शाळा महर्षी कर्वे यांच्या नावाने उभारलेली आहे. या शाळेच्या जवळच त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्या दिवशी या पुतळ्याभोवती फुलांची आरास केलेली होती. तेव्हा समजले की आज महर्षी कर्वे यांची जयंती आहे. भारतरत्न मिळालेल्या या महान व्यक्तीच्या गावात त्यादिवशी आम्ही पहिल्यांदाच आलो. कोकणाने या देशाला अनेक मोठी व्यक्तिमत्वे दिलेली आहेत. त्यातीलच एक महर्षी कर्वे होय. स्त्री शिक्षणच्या प्रणेत्यांपैकी एक असणाऱ्या कर्वे यांच्या मुरुड गावात काही विसाव्याचे क्षण घालवले. 



Wednesday, June 7, 2023

सांगुर्डी सायकलस्वारी

इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेल्या अनेक छोट्या निसर्ग सौंदर्यस्थळांपैकी एक म्हणजे सांगुर्डी हे गाव होय. सकाळी नेहमीप्रमाणे सायकलस्वारी करत देहूच्या दिशेने निघालो. अतिशय कमी वेळा मी प्रत्यक्ष देहू गावातून सायकल चालवत नेली आहे. नेहमीच देहूच्या बाहेरचा रस्ता पकडतो आणि दोन चाकांचा वेगवान प्रवास सुरू होतो. अर्थात या देहू बायपास रस्त्याने पुढे गेल्यावर इंद्रायणी नदीचा एक पूल लागतो. येथून देहू गावाच्या काठावरून वाहणारी इंद्रायणी अतिशय मनमोहक दिसते. सकाळच्या वेळी तर सूर्य त्याच दिशेने वर आलेला असतो. त्याचे प्रतिबिंब देखील नदीमध्ये पडलेले दिसते. इंद्रायणी ओलांडली की लगेचच डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता गावाच्या दिशेने जाताना दिसतो. याच रस्त्याने सायकल वळवली आणि पुन्हा आधीचा वेग धारण केला. इथून बऱ्याच अंतरापर्यंत देहू गावाचे शहरीकरण झालेले दिसते. साधारणत: अर्धा किलोमीटर नंतर गावाकडची खरीखुरी शेती दिसू लागते. थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला रस्ता वळतो आणि एका छोटेखानी पुलानंतर सांगुर्डी गावाची हद्द सुरू होते. हे गाव इंद्रायणी नदीच्या काठावरच वसलेले आहे. देहू सारख्या निमशहरी गावापासून जवळ असून देखील शहरीकरणाची फारशी चिन्हे इथे दिसत नाहीत. नदी ओलांडण्यासाठी एक सिमेंटचा पूल बांधलेला आहे. या पुलावरूनच इंद्रायणी नदीचे विहंगम दृश्य दिसते. माझी इथली भ्रमंती उन्हाळ्यात झाली होती त्यामुळे नदीला फारसे पाणी नव्हते. जे काही पाणी वाहत होते त्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्यामुळे निसर्गाचा नयनरम्य नजारा इथून अनुभवता येत होता. शिवाय नदीचे कुठलेही पात्र सकाळच्या प्रहरी अतिशय सुंदर दिसते. त्याला हा परिसर देखील अपवाद नव्हता. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जलतुषारांचे विहंगम दृश्य दिसत असावे, हे मात्र नक्की.


 






Friday, March 10, 2023

जंजिरा

मराठ्यांच्या इतिहासात किंबहुना एकंदरीत महाराष्ट्राच्या इतिहासात देखील नावाजलेला किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला होय. त्याच्या अजिंक्यपणाबद्दल आणि अभेद्यतेबद्दल सर्वांनीच ऐकलेले व वाचलेले असेल. मीही त्यातलाच एक. म्हणूनच उत्सुकतेपोटी जंजिरा किल्ल्याची सैर केली. तत्पूर्वी सकाळीच मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील पद्मदुर्ग किल्ला पाहून आलो होतो. या किल्ल्याच्या बरोबर समोर दूरवर जंजिऱ्याचे दर्शन होते. तसं पाहिलं तर समुद्रकिनाऱ्यापासून पद्मदुर्गपेक्षा हा किल्ला अतिशय जवळ आहे.
मुरुडमध्ये प्रवेश करताना भरलेले शुल्क, नंतर जंजिरा किल्ल्याच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये भरलेले शुल्क, नंतर पार्किंगसाठी लागणारे शुल्क, नंतर बोटीने प्रवास करण्यासाठी लागणारे शुल्क, नंतर भारतीय पुरातत्व खात्याचे शुल्क भरून आम्ही अखेरीस किल्ल्याकडे जाणाऱ्या बोटीमध्ये बसलो! ती एक शिडाची नाव होती. वाऱ्याच्या वेगाचा वापर करून अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. तोवर स्थानिक नावाड्याने इतिहासाची वाताहत करून स्वतःच्या मनाचा इतिहास आमच्या कानावर घातला होता!
असं म्हणतात की, हा दरवाजा किनाऱ्यावरून लवकर लक्षात येत नाही. ते काहीसं खरं देखील असावं. किल्ला पाहण्यासाठी आम्हाला ४५ मिनिटांचा कालावधी दिला होता. अजूनही किल्ल्यामध्ये किल्ला म्हणून शाबूत असलेल्या अनेक गोष्टी चांगल्या परिस्थितीमध्ये दिसून येतात. किल्ल्यावरील अनेक तोफा हा किल्ला अजिंक्य का राहिला, याचे उत्तर देखील देतात. पाण्याचे स्त्रोत, बुरुज आणि भक्कम तटबंदी या येथील पाहण्याच्या गोष्टी आहेत. एक जलदुर्ग कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून जंजिरा किल्ल्याकडे पाहता येईल.









 

Sunday, January 15, 2023

पद्मदुर्ग

अनेक वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरा किल्ला बघण्यासाठी मुरुडला जाण्याचे उद्दिष्ट तर होतेच. पण त्याचबरोबर निग्रहाने पद्मदुर्ग किल्ला देखील बघायचा होता. असं म्हणतात की जंजिरा किल्ला काबीज करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधण्याचे ठरवले होते. काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याची सांगितले आहे. शेवटी काय मराठा साम्राज्याच्या दोन छत्रपतींसाठी हा एक महत्त्वाचा जलदुर्ग होता, हे मात्र नक्की.
हा किल्ला तटरक्षक दल, नौदल तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे हे ऐकून होतो. तसेच तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी काढावी लागते, याचीही माहिती होती. आम्ही ज्या दिवशी किल्ल्यावर जाण्याचे ठरवले त्या दिवशी तटरक्षक दल व नौदलाचा सराव या किल्ल्यावर होणार होता. त्यामुळे जाणे तसे अवघडच होते. मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर एका खाजगी बोट चालकाला विचारून बघितले. तसा तो अनेकांना या किल्ल्यावर नियमितपणे घेऊन जात असावा. त्यामुळे त्याने आम्हाला देखील एक मोठी रक्कम सांगून लगेचच होकार दिला. त्यादिवशी पद्मदुर्ग बघायचाच या उद्देशाने आम्ही आलो होतो. त्यामुळे बोटीतून जाण्याचे ठरवले. किनाऱ्यापासून सुमारे अडीच किलोमीटर आतमध्ये एका खडकावर हा किल्ला बांधलेला आहे. म्हणून किनाऱ्यावरून तो नीटसा दिसून येत नाही.
बोट जशी जशी आतमध्ये जायला लागली तसतसा किल्ला अजून स्पष्ट दिसायला लागला होता. आज या किल्ल्यावर तटरक्षक दल असावे, असे बोटवाल्याला वाटत होते. त्यामुळे बोट किल्ल्याजवळ लावण्याऐवजी त्याने फक्त फेरी मारून आणण्याचे कबूल केले. किल्ल्याजवळ आल्यावर त्याने किल्ल्याला फेरी मारायला घेतली तेव्हा पाण्यामध्ये आम्हाला जेलीफिशचे देखील दर्शन झाले. किल्ल्याला एक वळसा घालून बोट पुन्हा मागे परतू लागली. परंतु तेवढ्यातच बोटवाल्याला फोनवरून असे समजले की आज तटरक्षक दल या ठिकाणी येणार नाही. एकंदरीत आमचे नशीब जोरावर होते. त्याने बोट किल्ल्याच्या दिशेने फिरवली. मुख्य दरवाजाजवळ आणून त्याने दोर व्यवस्थित बांधून ठेवला. समुद्राच्या इतक्या आतमध्ये असणारा मी बघितलेला हा पहिलाच किल्ला होय.
आज त्याची बऱ्यापैकी पडझड झालेली दिसते. कदाचित तो मुख्य भूमीपासून अलग असल्यामुळे आहे त्या स्थितीला आपण सुस्थितीत आहे, असे देखील म्हणू शकतो! किल्ला म्हणून असणारी सर्व स्थळे तिथे दिसून येत होती. तोफा तर होत्याच शिवाय टेहाळणीसाठी लागणाऱ्या सर्व रचना त्यावर दिसून आल्या. आपण समुद्राच्या मधोमध आजूबाजूचा परिसर न्याहाळत आहोत, याची प्रचिती आली. अजूनही किल्ला खूप चांगल्या स्थितीत आहे, असं म्हणावं लागेल. आमच्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे आम्ही पुन्हा मागे फिरलो. माघारी जाताना मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या एका बोटाने आम्हाला अडवले होते. अगदी पाण्यात देखील महाराष्ट्र पोलीस पकडू शकतात, याचा अनुभव त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच आला. पण शिवाजी महाराजांचा एक उत्तम जलदुर्ग पाहिल्याचा अनुभव हा अवर्णनीय असाच होता!