माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, December 3, 2012

त्र्यंबक गड



गोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.
इ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.
इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.  [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]
किल्ला म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी त्र्यंबकेश्वराच्या भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे. गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते! गडमाथ्यावरील पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या, त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...

छायाचित्रे:
त्र्यंबक गडाचे कडे

त्र्यंबक वरील गडाचे अवशेष

समोर दिसणारा हरिहर किल्ला

किल्ल्याच्या मागच्या बाजूस गंगा-गोदावरी मंदिर

कातळांत कोरलेल्या गडवाटा