माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, October 28, 2022

सप्तशृंगी मंदिर बोटा

जुन्नरच्या परिसरातील सर्व लहान मोठे डोंगर आणि टेकड्या चढून झाल्या होत्या. म्हणून थोडसं तालुक्याच्या सीमेबाहेर जाण्याचे ठरवलं. आळेफाट्यापासून नाशिकच्या रस्त्यावर बारा किलोमीटर अंतरावर बोटा हे छोटेखानी गाव आहे. नवीन रस्ते प्रकल्पामध्ये या गावाला देखील बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे. याच बायपास रस्त्याने गेल्यावर डावीकडे एक छोटी टेकडी दिसून येते. या टेकडीवर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. आज या मंदिराला भेट द्यायची होती.
घरून निघायला तसा मला उशीरच झाला होता. सूर्योदय झालेला होता. आकाश निरभ्र होतं. आणि नेहमीप्रमाणे पुणे नाशिक महामार्गावरील वाहने ९०-१०० च्या वेगाने प्रवास करीत होती. बोटा गावाच्या बायपासला लागलो तेव्हाच सप्तशृंगीची ही टेकडी व्यवस्थित दिसायला लागली होती. टेकडीच्या माथ्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. परंतु माथ्यावर मंदिराचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. जवळ आल्यानंतर गाडीचा वेग थोडा कमी केला व रस्त्याशेजारी उभे असलेल्या ग्रामस्थाला मंदिराच्या रस्त्याविषयी विचारले. त्याने रस्त्याची माहिती दिली. मग थोडसं पुढे जाऊन एका मोकळ्या ठिकाणी गाडी महामार्गाच्या बाजूला लावली आणि टेकडी चढायला सुरुवात केली. गुगल मॅप मध्ये देखील मंदिर याच टेकडीवर दाखवण्यात आले होते. पण ते अजूनही मला दिसत नव्हते. रस्ता मात्र बऱ्यापैकी मळलेला दिसत होता.३००-४०० मीटर पर्यंत अगदी कार देखील जाऊ शकेल इतका तो रुंद होता. टेकडीला थोडासा वळसा घालून मग वरच्या दिशेने जाणारी पायवाट दिसून आली. चालताना रस्त्यावरून महामार्गावरून वेगाने वाहणाऱ्या वाहनांचे आवाज सातत्याने येतच होते. आपण मानवी रहदारीपासून दूर नाही याची आठवण ते करून देत होते. इतर टेकड्यांवरील मंदिरांकडे जाण्यासाठी जशी पायवाट असते तशाच प्रकारची तसेच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या ओहोळाने ती तयार झालेली होती. अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये मी मंदिरापाशी पोहोचलो. पूर्ण टेकडीमध्ये दाट झाडी असणारी ती एकमेव जागा होती. या ठिकाणी बाभळीच्या छोट्या छोट्या झाडांचा भला मोठा पुंजका दिसून आला. या पुंजक्याच्या मागेच एका नैसर्गिक गुहेमध्ये सप्तशृंगी चे मंदिर बांधलेले आहे.
गुहा नैसर्गिक असली तरी काही ठिकाणी विटांचे व बाहेरच्या बाजूला सिमेंटचे तसेच लोखंडाचे देखील बांधकाम दिसून आले. गुहेच्या मध्यवर्ती भागात सप्तशृंगीची भिंतीला जोडलेली मूर्ती दिसत होती. मंदिरावर सन २००३ चे बांधकाम असल्याचे लिहिलेले होते. सूर्य एव्हाना बऱ्यापैकी वर आलेला होता. तिथून दूर दूर पर्यंतचा परिसर आता न्याहाळता येऊ शकत होता. पायथ्याशी असणारे बोटा गाव देखील पूर्ण दृष्टीमध्ये येत होते. शिवाय पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळपास दहा किलोमीटर पर्यंत पाहता येऊ शकत होता. मंदिराच्या आसपास कोणीही नव्हते. एकांतात बसण्यासाठी ही एक उत्तम जागा होती. पण गाड्यांचा गोंगाट त्या एकांताला एकांत म्हणू देत नव्हता.
मंदिर डोंगराच्या माथ्यावर नाहीये तरी डोंगराच्या माथ्याकडे जाण्यासाठी एक छोटेखानी पायवाट मंदिरा शेजारून जाताना दिसली. केवळ एका मिनिटांमध्ये मी त्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. तिथे सप्तशृंगी नावाचा लोखंडी फलक दिसून आला. खरंतर याला फलक म्हणता येणार नाही. लोखंडी सळ्यांनी हे नाव तयार केले होते. कदाचित या नावांमध्ये पूर्वी रोषणाई केलेली असावी. जेणेकरून रात्रीच्या अंधारात देखील ही टेकडी दुरून पाहता येत असेल. टेकडीच्या सर्वोच्च टोकावर खालून दिसत असलेला भगवा झेंडा फडकत होता. मागच्या बाजूला बऱ्यापैकी रान होतं आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा देखील दिसून येत होत्या.
उन्हाची तीव्रता फारशी नव्हती म्हणून बराच वेळ या ठिकाणी ध्यानस्थ बसून राहिलो. हायवे वरच्या वाहनांचे आवाज एकाग्रता होऊ देत नव्हते. मग पुन्हा माघारी फिरलो आणि पाचच मिनिटांमध्ये पायथ्याशी पोहोचलो होतो. गाडी काढली आणि हायवेवर गोंगाट करणाऱ्या त्या वाहनांचा मी देखील पुन्हा एकदा भाग होऊन गेलो.