माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, January 5, 2024

प्रसन्नगड

जुन्नरमधल्या देखण्या किल्ल्यांपैकी एक म्हणजे चावंडचा किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव 'प्रसन्नगड' असे ठेवले होते, असा इतिहास सांगतो. सातवाहन काळामध्ये या किल्ल्याची रचना केली गेली असावी. विशेष म्हणजे नाणेघाटाचा दुसरा पहारेकरी म्हणून देखील या किल्ल्याला ओळखले जाते. जवळपास दशकभरापूर्वी मी पहिल्यांदा या किल्ल्यावर आलो होतो. त्यावेळी त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती आणि किल्ला देखील बऱ्यापैकी पडलेल्या अवस्थेमध्ये होता. आज इतक्या वर्षांनी पुन्हा चावंड किल्ल्यावर जाण्याचा योग आला. मागच्या दशकभरामध्ये दुर्गसंवर्धकांनी किल्ल्याची अतिशय उत्तम डागडुजी केल्याची दिसली. कातळवाटा लागेपर्यंतचा प्रवास नव्याने बांधलेल्या दगडी पायऱ्यांद्वारे झाला. अगदी दुपारच्या प्रहरी आम्ही चढाई सुरू केली होती, पण हिवाळा नुकताच चालू झाल्यामुळे उन्हाची तीव्रता अधिक भासली नाही. चढता चढता पूर्वेकडे माणिकडोह धरणाचा अवाढव्य पसारा दिसून येत होता. शिवाय किल्ल्याच्या पायथ्याच्या झाडीत लपलेले चावंड गाव मनमोहक भासून आले. कातळातील पायऱ्या जिथून सुरू होतात तिथे आज उत्तम प्रकारचे रेलिंग करण्यात आलेले आहे. जेव्हा पहिल्यांदा या ठिकाणी आलो तेव्हा तिथे कातळाला एक बारीकशी तार बांधलेली होती, ज्याचा आधार घेत वरती चढत जावे लागत असत. आजही ती तार तिथे तशीच आहे.
किल्ल्याविषयी सर्वच माहिती आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्याच माहितीप्रमाणे किल्ल्याचा मुख्य दरवाजा, सप्तमातृका टाके, किल्ल्यावरील लेणी आणि चावंडा देवीचे मंदिर हे ठिकाणे प्रामुख्याने विशेष पाहण्यासारखी आहेत. किल्ल्यावरून माणिकडोह धरणाचा संपूर्ण पसारा दिसून येतो. याच धरणाच्या जागेवर प्राचीन काळी नाणेघाटाचा व्यापारी मार्ग जात होता. आज चावंड किल्ला याच जलपसाऱ्याकडे पाहत ठामपणे पायऱ्यावरून उभा आहे!