माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, December 21, 2016

गिरिभ्रमण [कान्होबा टेकडी]

मानमोडीच्या ट्रेकमध्ये शिवनेरीच्या दक्षिणेला एक छोटेखानी टेकडी पारूंडे रस्त्यावर दिसली होती. त्यावर एक मंदिर बांधलंय. वडज धरण परिसरात ही टेकडी स्थित आहे. जुन्नर-वडज रस्त्यावर इनामवाडीच्या अलिकडे एक रस्ता धरणाच्या जलाशयाच्या दिशेने जातो. कुसूर गावच्या हद्दीत हा परिसर येतो. शिवनेरी किल्लाही याच गावच्या हद्दीत येतो. सध्या हा परिसर वन विभागाच्या ताब्यात आहे.
मागच्या डोंगराआडून सूर्य डोकावत असताना मी कान्होबा मंदिराच्या दिशेने वाटचाल चालू केली. पूर्ण टेकडी कुसळांनी भरलेली आहे. मळलेली अशी विशिष्ट वाट नव्हती. मंदिरापाशी पोहोचल्यावरही निश्चित समजले नाही की मंदिर नक्की कशाचं आहे? शिवनेरीची दक्षिण लेणी येथुन स्पष्ट दिसतात. किल्ल्यावर थेट मारा  करण्यासाठी ही उत्तम जागा होती. वडज धरणाचा विस्तीर्ण जलाशय येथुन पूर्ण टप्प्यात येतो. टेकडी उतरुन खाली आल्यावर सकाळी शाळेत चाललेल्या मुलांना विचारल्यावर त्यांनी टेकडीवरच्या देवाचे नाव सांगितले!














Tuesday, December 20, 2016

गिरिभ्रमण [मानमोडी उत्तरेकडून]

मानमोडीच्या टोकावरुन काल खंडोबा मंदिराचे दर्शन झाले होते. ह्या विस्तृत डोंगरावर पश्चिमेकडे अलिकडच्या काळात सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आहे. आज या बाजुने मानमोडी सर करायचे ठरवले. सकाळी सकाळी कुसुर गाव गाठले. पण, रस्ता येथुन नव्हताच हे तिथे पोहोचल्यावर समजले. जुन्नर गावच्या बारव मधुन एक रस्ता मानमोडीच्या डोंगरावर जातो. मग या भयंकर कच्च्या रस्त्याने माझे मार्गक्रमण जंगलाच्या दिशेने चालु झाले. छोटेसे माळरान व त्यातुन मळलेली पायवाट... अस्सल गावची आठवण करुन देणारी होती. मागे शिवनेरी व त्याची पूर्व लेणी सकाळाच्या उन्हात चमकु लागली होती. एक छोटासा उंचवटा पार केल्यावर जंगलाची वाट चालु झाली. सुर्यदेवाने फोटोग्राफीसाठी एक आयतीच संधी दिली होती. अर्थातच ती मी सोडली नाही. जंगलवाटेचा शेवट गणेश मंदिराच्या पायऱ्यांच्या श्रीगणेशाने झाला. गणपतिचा वार असुनही पूर्ण शुकशुकाट होता. या क्षणी मी भूतलेण्यांच्या अगदी जवळ असेल. तिथे जाण्याकरिता कदाचित जंगलातुन वाट असावी. मागीलप्रमाणे मोरांच्या आवाजाचा वेध घेऊ लागलो पण जराही ’म्यॉंव’ झाले नाही.
सिद्धिविनायकाचं मंदिर अगदी छोटेखानी आहे. पायऱ्या अन बांधकाम वगळता सतरा हजारांपर्यंत देणग्या दिलेल्या दिसतात. या पैशांचा वापर लेण्यांचा जिर्णोद्धार करण्यासाठी करता आला असता... असाही विचार मनात येऊन गेला! या दिशेने गाठलेला मानमोडी काहितरी निराळाच होता. पलिकडच्या बाजुने गेल्यावर एक मोठा काळा पाषाण नजरेस पडला. तिथे बसलो तेव्हा निसर्ग निरिक्षण-वाचन काय असते, याची अनुभुति आली. दुरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा त्यांच्या पोटात हजारो वर्षांचा इतिहास घेऊन ठामपणे उभ्या आहेत. खरंतर या पृथ्वीवर दोनच भौतिक गोष्टी आहेत, निसर्ग अन मानव. हजारो वर्षांपूर्वी मनुष्यप्राणी हा निसर्गाचाच भाग होता. आज मानव प्रगतीचा दिशेने निसर्गापासून दूर चाललाय. पण, थोरला भाऊ म्हणुन निसर्ग आजही परंपरागतपणे आपलं रक्षण करत उभा ठाकलाय.... अविरत प्रवासासाठी...












Sunday, December 18, 2016

माणकेश्वर: एका भग्न शिवालयाची गोष्ट...

मराठी भाषा विश्वकोश वाचताना त्यादिवशी एका मंदिराविषयी वाचनात आले. ’पुणे जिल्ह्यात माणकेश्वर ह्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळतात’. या वाक्यात पुणे जिल्ह्यात असलेला माझा शोध जुन्नर परिसरात येऊन स्थिरावला. जुन्नर भोवतालची हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वर, कुकडेश्वर, ब्रह्मनाथ, भीमाशंकर ही हेमाडपंथी मंदिरे ज्ञात होती. परंतु, माणकेश्वर प्रथमच प्रकाशझोतात आले अन दुसऱ्याच दिवशी मी माझे शोधकार्य पार पाडले.
जुन्नरजवळ आणखी एक हेमाडपंथी मंदिर होते ही गोष्ट निश्चितच विस्मयकारक होती.
कुकडेश्वरचं नाव जसं ’पूर’ गावासोबत जोडलं जातं तसं माणकेश्वरचं नाव ’केळी’ गावासोबत जोडून ’केळी-माणकेश्वर’ झालंय. माणिकडोह व चावंडच्या मधल्या भागात हे मंदिर स्थित आहे. अलिकडच्या काळात गावकऱ्यांनी सिमेंटने नव्या मंदिराची बांधणी केलीय. परंतु, आजही मूळ मंदिराचे प्राचीन अवशेष त्याच्याभोवती रचून ठेवल्याचे दिसतात. दाट झाडीच्या रस्त्यातून समोर चावंड किल्ला दिसतोय अन माणिकडोह जलाशयाच्या दिशेने आपण चाललोय, अशा परिसरात माणकेश्वराचे शिवालय आहे. या मंदिराचे मूलस्थान जिथे होते तिथे आता धरणाचे पाणी भरलंय. हे धरण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बांधलं होतं. त्यापूर्वीच माणकेश्वर  मंदिर पूर्णतं मोडकळीस आलेलं होतं. धरण बांधल्यावर त्याची जागा बदलली. त्या जागेवरूनही गावकऱ्यांत वाद झाले होते. शंकराची पिंड अन भले मोठाले नक्षीदार पाषाण गावकऱ्यांनी बैलांच्या साहय्याने धरणाच्या काठावर आणले. मागच्या दुष्काळात धरण पूर्ण कोरडं पडलं होतं. त्यावेळेसही बरेच अवशेष बाहेर काढता आले.
पिंडी ही दरवाज्यापेक्षा मोठी होती असे म्हणतात. मंदिराच्या समोर दोन नंदी आहेत. दोघांचीही मान उजव्या बाजुला वळलेली दिसते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते कुकडेश्वराच्या दिशेने पाहत आहेत. मूळ मंदिरातही अशीच रचना होती. मंदिराच्या बरोबर मागे चावंड किल्ला दिसतो. त्याच्या पलिकडे कुकडेश्वर आहे. कुठल्याश्या भागवतात कुकडेश्वर-माणकेश्वर ही जोडगोळी म्हणुन कुरकुट-मुरकुट असा उल्लेख असल्याचे बोलले जाते.
वऱ्हाडी डोंगररांगा व त्यातील दुर्गांचा परिसर या मंदिरापासून दिसतो. मधल्या भागात शहाजी सागराचा निळेशार जलाशय आहे. इतिहासात गुडूप झालेल्या या भग्न शिवालयाविषयी अधिक संशोधन होणे गरजेचे वाटते...



















Monday, November 28, 2016

भ्रमंती [हिवरे-मिन्हेर]

अलिबाबाला त्याची हिरे-माणिकांनी भरलेली गुहा सापडावी तसा मला हिवरे-मिन्हेरचा हा परिसर गवसला होता. परवा वनदेवाच्या पर्वतावरून दूरवर दिसलेले वरसुबाईच्या डोंगररांगेतील एका टोकावरील मंदिर मला खुणावू लागले होते. हे मंदिर मी यापूर्वी मी कधीही पाहिले नव्हते. त्यामुळे त्याचा मागोवा घेण्याचे मी मनाशी ठरवले. निरगुडेहून इंगळूनला जाणारा हा रस्ता इतका खडतर होता की, एके काळी यावर डांबर होतं यावर कुणाचा विश्वासच बसला नसता! मात्र मंदिराचा वेध घेण्यासाठी हाच मार्ग मला योग्य वाटला. राळेगण गावात आलो अन मंदिराच्या डोंगराकडे जाण्याची वाट दिसू लागली. पायथ्याशी सालोबा महाराजांचे मंदिर उन्हात चमकू लागले होते. डोंगराच्या त्या गर्द झाडीत इतका सुंदर घाट बनविलाय, हे पहिल्यांदाच पाहिले. बालकवींच्या ’हिरवे हिरवे गाल गालिचे, हरिततृणांच्या मखमलीचे’ या कवितेप्रमाणे हिरवी मखमल त्या पूर्ण डोंगरावर पसरलेली अन त्यातून नागमोडी वळणाचे रस्ते बनविलेले! उंचीगणिक जी शुद्ध हवा त्या वातावरणात भरली होती, ती शहराभोवतीही कधीच मिळणार नाही इतकी निर्मळ होती. नागमोडी वळणे घेत मी टोकावरच्या मंदिराचाच वेध घेत होतो. दूरचा बराच मोठा टप्पा दृष्टीस येत होता. झुंजुमुंजु झाल्याने आजुबाजुच्या गावांमधील रेलचल चालु झाली होती. मीना खोरे अन दाऱ्या घाटाचा तो परिसर एकाच दृष्टीत आला होता. असं वाटायचं, एका जागी स्तब्ध उभं राहून फक्त निसर्गदर्शन करत बसावं अन सृष्टीचा तो नेत्रदिपक नजारा डोळ्यांत साठवत राहावं. घाटाच्या एका उंच जागेवरून  प्रसन्नगड, हनुमानगड-निमगिरी अन पर्वतगड किल्ले एकाच रांगेत दिसत होते. किल्ल्यांवर नजर ठेवणारा तो टेहाळणी बुरूजच होता. सह्यपर्वतांचे थर एका रांगेत उभे राहून प्राणीमात्रांचे रक्षण करीत बसले होते. शेवटी मंदिरदर्शन म्हणजे केवळ औपचारिकताच उरली. नुकतेच बांधकाम केलेल्या त्या मंदिरात शेंदूर लावलेले पाषाणदेव पाहायला मिळाले. याच घाटाने भीमाशंकराच्या जंगलात उतरण्याची नवी  वाट दाखवली होती...