माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, December 20, 2016

गिरिभ्रमण [मानमोडी उत्तरेकडून]

मानमोडीच्या टोकावरुन काल खंडोबा मंदिराचे दर्शन झाले होते. ह्या विस्तृत डोंगरावर पश्चिमेकडे अलिकडच्या काळात सिद्धिविनायकाचे मंदिर बांधले आहे. आज या बाजुने मानमोडी सर करायचे ठरवले. सकाळी सकाळी कुसुर गाव गाठले. पण, रस्ता येथुन नव्हताच हे तिथे पोहोचल्यावर समजले. जुन्नर गावच्या बारव मधुन एक रस्ता मानमोडीच्या डोंगरावर जातो. मग या भयंकर कच्च्या रस्त्याने माझे मार्गक्रमण जंगलाच्या दिशेने चालु झाले. छोटेसे माळरान व त्यातुन मळलेली पायवाट... अस्सल गावची आठवण करुन देणारी होती. मागे शिवनेरी व त्याची पूर्व लेणी सकाळाच्या उन्हात चमकु लागली होती. एक छोटासा उंचवटा पार केल्यावर जंगलाची वाट चालु झाली. सुर्यदेवाने फोटोग्राफीसाठी एक आयतीच संधी दिली होती. अर्थातच ती मी सोडली नाही. जंगलवाटेचा शेवट गणेश मंदिराच्या पायऱ्यांच्या श्रीगणेशाने झाला. गणपतिचा वार असुनही पूर्ण शुकशुकाट होता. या क्षणी मी भूतलेण्यांच्या अगदी जवळ असेल. तिथे जाण्याकरिता कदाचित जंगलातुन वाट असावी. मागीलप्रमाणे मोरांच्या आवाजाचा वेध घेऊ लागलो पण जराही ’म्यॉंव’ झाले नाही.
सिद्धिविनायकाचं मंदिर अगदी छोटेखानी आहे. पायऱ्या अन बांधकाम वगळता सतरा हजारांपर्यंत देणग्या दिलेल्या दिसतात. या पैशांचा वापर लेण्यांचा जिर्णोद्धार करण्यासाठी करता आला असता... असाही विचार मनात येऊन गेला! या दिशेने गाठलेला मानमोडी काहितरी निराळाच होता. पलिकडच्या बाजुने गेल्यावर एक मोठा काळा पाषाण नजरेस पडला. तिथे बसलो तेव्हा निसर्ग निरिक्षण-वाचन काय असते, याची अनुभुति आली. दुरवर दिसणाऱ्या सह्याद्रीच्या रांगा त्यांच्या पोटात हजारो वर्षांचा इतिहास घेऊन ठामपणे उभ्या आहेत. खरंतर या पृथ्वीवर दोनच भौतिक गोष्टी आहेत, निसर्ग अन मानव. हजारो वर्षांपूर्वी मनुष्यप्राणी हा निसर्गाचाच भाग होता. आज मानव प्रगतीचा दिशेने निसर्गापासून दूर चाललाय. पण, थोरला भाऊ म्हणुन निसर्ग आजही परंपरागतपणे आपलं रक्षण करत उभा ठाकलाय.... अविरत प्रवासासाठी...












No comments:

Post a Comment