माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, January 15, 2023

पद्मदुर्ग

अनेक वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरा किल्ला बघण्यासाठी मुरुडला जाण्याचे उद्दिष्ट तर होतेच. पण त्याचबरोबर निग्रहाने पद्मदुर्ग किल्ला देखील बघायचा होता. असं म्हणतात की जंजिरा किल्ला काबीज करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधण्याचे ठरवले होते. काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याची सांगितले आहे. शेवटी काय मराठा साम्राज्याच्या दोन छत्रपतींसाठी हा एक महत्त्वाचा जलदुर्ग होता, हे मात्र नक्की.
हा किल्ला तटरक्षक दल, नौदल तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे हे ऐकून होतो. तसेच तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी काढावी लागते, याचीही माहिती होती. आम्ही ज्या दिवशी किल्ल्यावर जाण्याचे ठरवले त्या दिवशी तटरक्षक दल व नौदलाचा सराव या किल्ल्यावर होणार होता. त्यामुळे जाणे तसे अवघडच होते. मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर एका खाजगी बोट चालकाला विचारून बघितले. तसा तो अनेकांना या किल्ल्यावर नियमितपणे घेऊन जात असावा. त्यामुळे त्याने आम्हाला देखील एक मोठी रक्कम सांगून लगेचच होकार दिला. त्यादिवशी पद्मदुर्ग बघायचाच या उद्देशाने आम्ही आलो होतो. त्यामुळे बोटीतून जाण्याचे ठरवले. किनाऱ्यापासून सुमारे अडीच किलोमीटर आतमध्ये एका खडकावर हा किल्ला बांधलेला आहे. म्हणून किनाऱ्यावरून तो नीटसा दिसून येत नाही.
बोट जशी जशी आतमध्ये जायला लागली तसतसा किल्ला अजून स्पष्ट दिसायला लागला होता. आज या किल्ल्यावर तटरक्षक दल असावे, असे बोटवाल्याला वाटत होते. त्यामुळे बोट किल्ल्याजवळ लावण्याऐवजी त्याने फक्त फेरी मारून आणण्याचे कबूल केले. किल्ल्याजवळ आल्यावर त्याने किल्ल्याला फेरी मारायला घेतली तेव्हा पाण्यामध्ये आम्हाला जेलीफिशचे देखील दर्शन झाले. किल्ल्याला एक वळसा घालून बोट पुन्हा मागे परतू लागली. परंतु तेवढ्यातच बोटवाल्याला फोनवरून असे समजले की आज तटरक्षक दल या ठिकाणी येणार नाही. एकंदरीत आमचे नशीब जोरावर होते. त्याने बोट किल्ल्याच्या दिशेने फिरवली. मुख्य दरवाजाजवळ आणून त्याने दोर व्यवस्थित बांधून ठेवला. समुद्राच्या इतक्या आतमध्ये असणारा मी बघितलेला हा पहिलाच किल्ला होय.
आज त्याची बऱ्यापैकी पडझड झालेली दिसते. कदाचित तो मुख्य भूमीपासून अलग असल्यामुळे आहे त्या स्थितीला आपण सुस्थितीत आहे, असे देखील म्हणू शकतो! किल्ला म्हणून असणारी सर्व स्थळे तिथे दिसून येत होती. तोफा तर होत्याच शिवाय टेहाळणीसाठी लागणाऱ्या सर्व रचना त्यावर दिसून आल्या. आपण समुद्राच्या मधोमध आजूबाजूचा परिसर न्याहाळत आहोत, याची प्रचिती आली. अजूनही किल्ला खूप चांगल्या स्थितीत आहे, असं म्हणावं लागेल. आमच्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे आम्ही पुन्हा मागे फिरलो. माघारी जाताना मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या एका बोटाने आम्हाला अडवले होते. अगदी पाण्यात देखील महाराष्ट्र पोलीस पकडू शकतात, याचा अनुभव त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच आला. पण शिवाजी महाराजांचा एक उत्तम जलदुर्ग पाहिल्याचा अनुभव हा अवर्णनीय असाच होता!