माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Tuesday, October 13, 2020

दुर्गावाडीचा ऊर्ध्व जलप्रपात

कोकणकड्याची सफर करण्यासाठी जुन्नरमध्ये असणाऱ्या अनेक स्थळांपैकी एक म्हणजे दुर्गावाडी होय. केवळ कोकणकडाच नाही तर छोटेखानी किल्ला, निसर्ग सौंदर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उलटा जलप्रपात यासाठी दुर्गावाडी हे नाव मी खास करून लक्षात ठेवतो. जुन्नर मावळातला हा सर्वात लांबचा परिसर होय. नाणेघाटापेक्षाही अवघड वाटेवर आणि पुणे जिल्ह्याच्या अंतिम टोकावर वसलेलं दुर्गावाडी हे गाव होय.
आपटाळे नंतर मावळात प्रवेश केला की, डाव्या बाजूला इंगळुन गाव लागतं. इंगळुन पासून सरळ डोंगराकडे जी वाट जाते, जिथे डांबरी रस्ता बनवलेला आहे त्याला आंबे हातवीज घाट म्हणतात. ह्याच घाटाने वर गेल्यावर सर्वात शेवटचं गाव आहे दुर्गावाडी. घाट तसा डांबरी रस्त्याचा आहे. पावसाळ्यामध्ये इथे सर्व दाट झाडी हिरवाईने नटलेली असते. शिवाय घाटामध्ये एक सुंदर असा धबधबा देखील आहे. शहरी वस्तीपासून दूर असल्यामुळे इथे फारशी गर्दी दिसून येत नाही. कधीतरी एखादं वाहन घाटातून जाताना दिसतं आणि त्याहीपेक्षा राज्य महामंडळाची बस दोन ते तीन वेळा या रस्त्याने जाते. घाट तसा सुंदर आहे जसं आपण वर चढत जातो, जुन्नर मावळातला बराचसा परिसर आपल्या नजरेमध्ये येतो. सात ते आठ किलोमीटर पार केल्यानंतर आपण आंबे-हातवीज पठारावर पोहोचतो. घाट संपल्यानंतर उजव्या बाजूचा रस्ता हा दुर्गावाडीकडे जातो. याच रस्त्यावर आधी आंबे नंतर हातवीज आणि सर्वात शेवटी दुर्गावाडी गाव आहे. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्याच्या संयमाची कसोटी मात्र येथे लागते. कारण माझा तसाच अनुभव आहे. जुन्नर परिसर इतका विस्तीर्ण आहे, हे मला या भागात आल्यानंतर पहिल्यांदा समजले. 



दुर्ग आणि ढाकोबा च्या शोधात आम्ही २०१२ मध्ये पहिल्यांदा याठिकाणी आलो होतो. त्यानंतर बर्‍याचदा पर्यटनाच्या निमित्ताने इकडे येणे झाले. आंबे-हातवीज पठार हे आमचं जुन्नर मधलं फुलांचे पठार होय. ते पार केल्यानंतर बऱ्याच अंतरावर कोकणकडा आहे. या कड्याच्या अलीकडेच दुर्गावाडीची छोटेखाणी वस्ती दिसून येते. दुर्गावाडी संपलं की, पुढे दुर्ग अर्थात दुर्गाबाईचा किल्ला आहे. किल्ला म्हणावं तसं इथे काहीच उरलेले नाहीये. परंतु, एक छोटासा ट्रेक करण्यासाठी मात्र हा किल्ला उत्तमच. या किल्ल्याभोवती एक छोटी वनराई आहे. वनराईत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला किल्ल्यावरती जाता येते. वनराई पार केल्यानंतर समोर एक विस्तीर्ण माळरानही दिसते. तिथुनच दुरवर ढाकोबा शिखर दिसून येतं आणि पठाराच्या शेवटी कोकणकडा आहे. आजकाल इथे जुन्नर वनविभागाने रेलिंग लावलेल्या आहेत. पर्यटकांची गर्दी होत असल्याने या ठिकाणी संरक्षक रेलिंग लावण्यात आल्या असाव्यात. या आम्ही आमच्या पहिल्या भेटीत पाहिल्या नव्हत्या. असं संरक्षण न असता कोकण कड्यावरून खाली पाहणं, म्हणजे डोकं गरगरत होतं. आता तर ही जागा सुरक्षित झाली आहे. पावसाळ्यात भयंकर धुकं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऊर्ध्व अर्थात उलटा धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतो. कोकणकड्याच्या खाली ठाणे जिल्हा आहे. तिकडून येणारे वारे वेगवान वारे अतिशय जोरात कोकणकड्यावर धडकतात. त्यामुळेच इथून खाली वाहणारे पाणी पुन्हा वेगाने मागे सरकते व उलटा धबधबा तयार होतो. पर्यटकांची तशी याठिकाणी कमी गर्दी असते. त्यामुळे ह्या धबधब्याच्या आनंद आपल्याला बिना गर्दीचा घेता येऊ शकतो. इथं वाहणारे वारे मात्र प्रचंड वेगाने वाहत असतात. पाण्याचे असंख्य अगणित तुषार अंगावर घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पावसाळ्यातले दोन ते तीन महिने येथे अशीच परिस्थिती असते. या जलप्रपातात न्हाऊन निघण्यासाठी आम्ही दरवर्षी एकदा तरी याठिकाणी येत असतो.