माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, June 26, 2020

जुन्नरचा मैलाचा दगड

हा आहे जुन्नर शहरात असणारा मैलाचा दगड. प्र. के. घाणेकरांच्या 'जुन्नरच्या परिसरात' (स्नेहल प्रकाशन) या पुस्तकात याविषयी सविस्तर माहिती वाचनात आली. 


जुन्नर हे थेट सातवाहन काळापासून महत्त्वाचे ठरलेले एक प्रमुख व्यापारी शहर आहे. युरोपमधून भृगुकच्छ (भडोच), शूर्पारक (नालासोपारा), कल्याण (कल्याण) आदी आंतरराष्ट्रीय बंदरांमध्ये उतरवलेला माल सातवाहनवंशीय राजांनी निर्मिलेल्या नाणेघाटातून जुन्नरमार्गे प्रतिष्ठान (पैठण) या राजधानीकडे जात असे. मध्ययुगीन इतिहासातही जुन्नरचं महत्त्व आणि वैभव कायम होते. शिवजन्मभूमी असणारा शिवनेरी किल्ला जुन्नरला खेटून आहे.

ब्रिटिश आमदानीत कल्याणकडे जाणारा जुन्नर ते कल्याण हा महत्वाचा व्यापारी मार्ग होता. त्यासाठी एक उत्तम रस्ताही बनविला गेला होता. आता जरी पुणे-नाशिक महामार्ग आणि कल्याण-नगर महामार्ग यापासून जुन्नर थोडे दुरावले असले, तरी जुन्नरमध्ये या ब्रिटिशांच्या व्यापार मार्गाची 'माइलस्टोन मेमरी' जागा असल्याची कुणकुण मला लागली होती. मात्र नेमकी जागा कळत नव्हती.

परंतु जुन्नर चा ऐतिहासिक ठिकाणांचा धांडोळा घेण्यासाठी आवर्जुन जुन्नरला गेलो असताना, मोठ्या योगायोगाने जुन्नरचे उपनगराध्यक्ष अॅडव्होकेट राजेंद्र बुट्टे पाटील यांची भेट झाली. त्यांना या संदर्भात विचारले असता, त्यांनी त्यांच्या निवासस्थानाजवळच असलेला 'जुना मैलाचा दगड' तेथे नेऊन दाखविला. त्या वैशिष्ट्यपूर्ण दगडावर एका वर्तुळात निळ्या तैलरंगाने स्पष्ट दिसेल असे कोरलेले 56 आणि ५६ असे आकडे दिसतात.

तळाशी जरा रुंद असलेल्या, वर निमुळत्या होत गेलेल्या आणि अगदी टोकाशी एखाद्या पिरॅमिडसारखी घडाई केलेल्या या दगडाच्या उभ्या दुसऱ्या बाजूला वर्तुळामध्ये असणारे 1 आणि १ असे आकडेही दिसतात. मुळात हे सर्व आकडे खोदलेले होते.

हे स्पष्ट दिसावेत म्हणून कोण्या जाणकार कल्पक व्यक्तीने ते तैलरंगाने स्पष्ट केले आहेत.

या आकड्यांशिवाय इतर कोणतेही आकडे किंवा अक्षरे अथवा खुणा या दगडावर नाहीत. जुन्नर ते कल्याण हे अंतर ५६ मैल (म्हणजे सुमारे ८४ कि. मी.) असे दाखविणाऱ्या रस्त्यावरील हा पहिला अंतरदर्शक दगड आहे. म्हणूनच त्यावर १ आणि ५६ हे आकडे मराठी/देवनागरी आणि इंग्लिशमध्ये नोंदलेले आहेत.

असाच एक मैलाचा दगड' पाडळी रस्त्यावरही आणि नाणेघाटाजवळ आहे, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले, परंतु वेळेअभावी आणि अचूक ठावठिकाणा व तपशीलाअभावा त्याचा शोध घेणे जमू शकले नाही.

जुन्नरच्या कल्याण पेठेमध्ये रावसाहेब बुट्टेपाटील मार्गावर ऍड. राजेंद्र बुट्टेपाटील यांच्या घराजवळ जुन्नर ही ऐतिहासिक माइलस्टोन मेमरी पाहावयास मिळते. जुन्या महत्त्वाच्या दगडाची नीट व्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे.