माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, February 13, 2021

इतिहासाचे भीष्माचार्य: वा. सी. बेंद्रे

शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये इतिहास या विषयाच्या अभ्यासाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. किंबहुना महाराष्ट्रीय समाज आपल्या इतिहासापासून बराचसा वंचित होता. या काळात वि. का. राजवाडेंसारख्या इतिहासकारांनी शास्त्रशुद्ध इतिहास लेखनास सुरुवात केली. त्यांचाच वारसा चालवणारे इतिहास संशोधक लेखक व अभ्यासक म्हणजे वा. सी. बेंद्रे अर्थात वासुदेव सीताराम बेंद्रे होय. 


इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून वा. सी. बेंद्रे यांची ओळख आहे. इतिहास कसा अभ्यासावा व त्याची लिखाण पद्धती कशी असावी? याची शास्त्रशुद्ध रचना व मार्गदर्शन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केल्यास बेंद्रे यांचे अतिशय बहुमूल्य योगदान आपल्याला दिसून येते. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९६ मध्ये रायगड जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे एकंदरीत कार्य पाहता महाराष्ट्राच्या भूमी जन्मल्याचे भाग्य मराठी भाषिकांना लाभले, असेच म्हणावे लागेल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात शिवजयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो. महाराष्ट्रभर किंबहुना पूर्ण भारतात व जगभरात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे व प्रतिमा आहेत. आज शिवाजी महाराज कसे दिसतात? हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, शंभर वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. महाराष्ट्र पाठ्यमंडळाच्या इतिहासाच्या पुस्तकात निकोलावो मनुची या प्रवाशाने 'इब्राहिम खान' या सरदाराचे काढलेले चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून छापले जात होते. त्या काळात शिवाजी महाराज यांचे हेच एकमेव चित्र अस्तित्वात होते. परंतु, वा. सी. बेंद्रे यांनी या चित्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, शिवाजी महाराजांच्या भोवती सर्व मुस्लिम सैनिक दिसत आहेत. यावरून ते शिवरायांचे चित्र नक्कीच नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते, हे शोधण्याचा बेंद्रे यांनी प्रयत्न केला. इतिहासाचे विविध ग्रंथ चाळत असताना त्यांना मॅकेंझीने संपादित केलेल्या ग्रंथाचा भाग हाती लागला. इसवी सन १६६४ च्या सुरत मोहिमेच्या वेळी डच गव्हर्नर व्हॅलेंटाईन आणि शिवाजी महाराजांच्या भेटीदरम्यान यांचे काढलेले चित्र व व्हॅलेंटाईनचे पत्र वा. सी. बेंद्रे यांना या ग्रंथात मिळाले. शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वर्णन व सदर चित्र जुळवल्यास हे चित्र शिवाजी महाराजांचे आहे, याची त्यांना खात्री पटली. याच चित्राचा आधार घेऊन आज अस्तित्वात असणारी शिवाजी महाराजांची विविध चित्रे तयार करण्यात आलेली आहेत.
शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर खऱ्या अर्थाने प्रकाशझोत टाकण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले. अनेक वर्षांपासून शिवपुत्र संभाजी म्हणजे व्यसनाधीन, व्याभिचारी, दुर्वर्तनी असा विविध नाटककारांनी तसेच कवींनी जनमानसासमोर रेखाटला होता. बेंद्रे यांसारख्या हाडाच्या इतिहासकाराला ही गोष्ट पटली नाही. म्हणूनच त्यांनी संभाजी महाराजांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये शिवकालीन इतिहासाची साधने फारशी उपलब्ध नसल्याने त्यांनी युरोपियन साधनांचा जसे इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज साधनांचा अभ्यास करून संभाजी महाराजांचे चरित्र पूर्ण केले. यासाठी त्यांना जवळपास चाळीस वर्षे लागली! इसवी सन १९६० मध्ये बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचे पहिले शास्त्रशुद्ध चरित्र मराठी माणसांसमोर आणले. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने मराठी जनांना समजली. छत्रपती संभाजी म्हणजे पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी, स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, संस्कृत जाणकार अशा विविध रूपाने महाराष्ट्राला समजला. त्यांच्या जीवनातील सर्व विसंगती व कल्पोकल्पित कथा बेंद्रे यांनी खोडून काढल्या. इतिहासाचे पान न पान चाळून त्यांनी हे चरित्र लिहिले होते. याच चरित्राचा आधार घेऊन संभाजी महाराजांवर अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या व आजच्या काळातील चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका लिहिल्या गेल्या आहेत. बेंद्रे यांचे हे योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. संभाजी महाराजांच्या मुळ समाधीचा शोधही वा. सी. बेंद्रे यांनीच लावला आहे. प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळापुर येथे आहे, असे समजले जात होते. परंतु, कालांतराने अनेक ऐतिहासिक संदर्भ शोधल्यानंतर विविध पुराव्यांच्या आधारे ही समाधी वढू बुद्रुक या गावापाशी आहे, असे बेंद्रे यांच्या लक्षात आले. आज त्या समाधीचे सुशोभीकरण करून उत्कृष्ट स्मारक करण्यात आलेले आहे.
केवळ छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी या विषयांचेच नाही तर मालोजीराजे, शहाजी राजे तसेच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम राजे यांचे चरित्र देखील वा. सी. बेंद्रे यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिले आहे. याशिवाय कुतुबशाही व आदिलशाही सारख्या मुसलमानी शाह्यांचे देखील मराठीत लेखन करण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. इतिहासकार कसा असावा? याचा वस्तुनिष्ठ पाठ बेंद्रे यांनी घालून दिला. इतिहास म्हणजे कादंबरी नाही, इतिहास म्हणजे नाटकही नाही, आजच्या परिभाषेत चित्रपट किंवा मालिकाही नाही. तर इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने पुराव्यांचा आधार घेऊन लिहिलेला असतो, हेच वा. सी. बेंद्रे यांच्या लिखाणातून प्रतीत झाले. इतिहास कसा लिहावा, त्याचा अभ्यास कसा करावा, याची शास्त्रशुद्ध पद्धती मार्गदर्शक रूपाने त्यांनी "साधन चिकित्सा" नावाच्या पुस्तकामध्ये केली आहे. इतिहास संशोधकांची ती गीता मानली जाते. आज वा. सी. बेंद्रे यांची १२५ वी जयंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांच्या इतिहास संशोधनात मोलाची कामगिरी केलेल्या बेंद्रेंना महाराष्ट्रीय जनता सदैव स्मरणात ठेवेल, अशी आशा वाटते.

इब्राहिम खानचे चित्र

बेंद्रेंनी शोधलेले शिवाजी महाराजांचे पहिले चित्र