माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, December 18, 2016

माणकेश्वर: एका भग्न शिवालयाची गोष्ट...

मराठी भाषा विश्वकोश वाचताना त्यादिवशी एका मंदिराविषयी वाचनात आले. ’पुणे जिल्ह्यात माणकेश्वर ह्या हेमाडपंथी मंदिराचे अवशेष आढळतात’. या वाक्यात पुणे जिल्ह्यात असलेला माझा शोध जुन्नर परिसरात येऊन स्थिरावला. जुन्नर भोवतालची हरिश्चंद्रेश्वर, खिरेश्वर, कुकडेश्वर, ब्रह्मनाथ, भीमाशंकर ही हेमाडपंथी मंदिरे ज्ञात होती. परंतु, माणकेश्वर प्रथमच प्रकाशझोतात आले अन दुसऱ्याच दिवशी मी माझे शोधकार्य पार पाडले.
जुन्नरजवळ आणखी एक हेमाडपंथी मंदिर होते ही गोष्ट निश्चितच विस्मयकारक होती.
कुकडेश्वरचं नाव जसं ’पूर’ गावासोबत जोडलं जातं तसं माणकेश्वरचं नाव ’केळी’ गावासोबत जोडून ’केळी-माणकेश्वर’ झालंय. माणिकडोह व चावंडच्या मधल्या भागात हे मंदिर स्थित आहे. अलिकडच्या काळात गावकऱ्यांनी सिमेंटने नव्या मंदिराची बांधणी केलीय. परंतु, आजही मूळ मंदिराचे प्राचीन अवशेष त्याच्याभोवती रचून ठेवल्याचे दिसतात. दाट झाडीच्या रस्त्यातून समोर चावंड किल्ला दिसतोय अन माणिकडोह जलाशयाच्या दिशेने आपण चाललोय, अशा परिसरात माणकेश्वराचे शिवालय आहे. या मंदिराचे मूलस्थान जिथे होते तिथे आता धरणाचे पाणी भरलंय. हे धरण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बांधलं होतं. त्यापूर्वीच माणकेश्वर  मंदिर पूर्णतं मोडकळीस आलेलं होतं. धरण बांधल्यावर त्याची जागा बदलली. त्या जागेवरूनही गावकऱ्यांत वाद झाले होते. शंकराची पिंड अन भले मोठाले नक्षीदार पाषाण गावकऱ्यांनी बैलांच्या साहय्याने धरणाच्या काठावर आणले. मागच्या दुष्काळात धरण पूर्ण कोरडं पडलं होतं. त्यावेळेसही बरेच अवशेष बाहेर काढता आले.
पिंडी ही दरवाज्यापेक्षा मोठी होती असे म्हणतात. मंदिराच्या समोर दोन नंदी आहेत. दोघांचीही मान उजव्या बाजुला वळलेली दिसते. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते कुकडेश्वराच्या दिशेने पाहत आहेत. मूळ मंदिरातही अशीच रचना होती. मंदिराच्या बरोबर मागे चावंड किल्ला दिसतो. त्याच्या पलिकडे कुकडेश्वर आहे. कुठल्याश्या भागवतात कुकडेश्वर-माणकेश्वर ही जोडगोळी म्हणुन कुरकुट-मुरकुट असा उल्लेख असल्याचे बोलले जाते.
वऱ्हाडी डोंगररांगा व त्यातील दुर्गांचा परिसर या मंदिरापासून दिसतो. मधल्या भागात शहाजी सागराचा निळेशार जलाशय आहे. इतिहासात गुडूप झालेल्या या भग्न शिवालयाविषयी अधिक संशोधन होणे गरजेचे वाटते...



















1 comment: