माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, March 31, 2013

खान्देशाचे वैभव: सोनगीर


दगडांचा देश असणा-या महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या काही रांगा या खान्देशापर्यंत जातात. परंतु या तुरळक रांगांना कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील किल्ल्यांइतकी उंची नाही. तरीही या भागात अनेक गडकोट वसलेले आहेत. यात गिरीदुर्गांची संख्या कमी व भुईकोट किल्ल्यांची अधिक आहे.

असे म्हटले जाते की, विंध्य पर्वत पार करून दक्षिणगंगेच्या तीरावर वास्तव्य करणारे अगस्ती ऋषी हे पहिले आर्य होय. त्यांच्या काळात या प्रदेशाचे नाव ‘ऋषिक’ वा ‘रसिक’ असे होते. सम्राट अशोकाच्या अधिपत्याखालील हा प्रदेश कालांतराने सातवाहनांकडे गेला व इ.स. 250मध्ये अहिर राजांनी तो जिंकून घेतला. त्यानंतर वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट व देवगिरीच्या यादवांनी या प्रदेशावर राज्य केले. अल्लाउद्दीन खिलजीने सन 1294मध्ये हा प्रदेश स्वत:च्या ताब्यात घेतला. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी प्रदान केली होती. त्यावरून या प्रदेशाचे नाव ‘खानदेश’ पडले. याच काळात अनेक किल्ल्यांची निर्मिती धुळे व जळगाव या भागांत झाली. यातीलच एक वैभवशाली किल्ला म्हणजे ‘सोनगीर’ होय.

महाराष्ट्रात सोनगीर या नावाचे तीन किल्ले आहेत. त्यातील एक रायगड जिल्ह्यात नागोठणेजवळ, तर दुसरा पुणे जिल्ह्यात कर्जतजवळ आहे. त्यामुळे धुळ्याजवळील या सोनगीरला ‘खान्देशचा सोनगीर’ म्हणतात! धुळे शहरापासून 21 कि.मी. अंतरावर हा किल्ला अगदी मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. त्याची निर्मिती कोणी व केव्हा केली, याची माहिती आज दुर्दैवाने उपलब्ध नाही. इ.स. 1370मध्ये फारुकी सुलतानांनी हा किल्ला स्वत:च्या अधिपत्याखाली आणला. लळिंग किल्ल्यापासून केवळ 30 किलोमीटरवर असल्याने सोनगीरला महत्त्व प्राप्त झाले. मुघल बादशहा अकबराने आपला साम्राज्य विस्तार खान्देशापर्यंत आणल्याने सोनगीरही त्याच्या ताब्यात गेला. औरंगजेब हा सोनगीरवर सत्ता प्रस्थापित करणारा शेवटचा मुघल सम्राट होता. मराठेशाहीत पेशव्यांनी हा किल्ला ताब्यात घेतला. इ.स. 1818मध्ये पेशव्यांचा पराभव करून ब्रिटिशांनी त्याच्यावर सत्ता स्थापन केली. धुळे या शहरापासून सोनगीर किल्ला केवळ 21 किमी अंतरावर आहे. शिवाय तो मुंबई, आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्र. तीनवर वसलेला असल्याने या मार्गावरून जाणा-या गाड्या सोनगीरवरूनच जातात. सोनगीर हे या किल्ल्याच्या पायथ्यालगतच वसलेले गाव होय. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या सर्व गाड्या सोनगीरला थांबतात. या मार्गावर धुळे आगाराची ‘यशवंती’ ही मिनी बस दर अर्ध्या तासाने उपलब्ध होते. शिवाय शहादा, दोंडाईचा या गावांना जाणा-या बसही सोनगीरवरूनच जातात. बसशिवाय खासगी वाहनांचीही सोनगीरला जाण्यासाठी सोय आहे. धुळ्याहून शिरपूरला जाणा-या खासगी वाहनांनी सोनगीरला उतरता येते. महामार्गावर सोनगीर गावात उतरल्यावर गावाच्या पलीकडेच किल्ला दृष्टीस पडतो. तसे हे गाव दाट लोकवस्तीचे आहे. सोनगीरचा किल्ला तयार झाल्यानंतरच पायथ्याला गाव विकसित झाले असावे, असे दिसते. हा किल्ला एका लहानशा टेकडीवर वसलेला आहे. त्यामुळे त्याला भुईकोट म्हणणेही योग्य ठरणार नाही. भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला सह्याद्रीच्या गाळणा शृंखलेमध्ये येतो. सोनगीर गावातून किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्याकरता दहा-पंधरा मिनिटे पुरतात. परंतु, दाट लोकवस्तीमुळे स्थानिकांना विचारत मार्ग शोधावा लागतो.

किल्ल्याच्या पाय-यांची सुरुवात एका नव्यानेच बांधलेल्या कमानीने होते. पर्यटन विकासाच्या नावाखाली या कमानीचे बांधकाम झाले आहे. सुरुवातीच्या काही पाय-याही नजीकच्या काळातच सिमेंटने बांधलेल्या दिसून येतात. परंतु त्यांची सध्याची अवस्था पाहता स्थानिकांना किल्ल्याच्या महत्त्वाचे सोयरसुतक नसल्याचे दिसते. थोडे पायी चालत जाईपर्यंत येथील दुर्गंधी आपली पाठ सोडत नाही. चालत असतानाच किल्ल्याची नक्की ठेवण ध्यानात येते. एखाद्या राजस्थानी वास्तुपद्धतीचा हा किल्ला भासतो. किल्ल्याची खरी सुरुवात त्याच्या उद््ध्वस्त प्रवेशद्वाराने होते. सध्या हा दरवाजा कसाबसा तग धरून उभा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये त्याची बरीचशी मोडतोड झाली असल्याचे दिसते. पायथ्यापासून दरवाजापर्यंत येण्यास दहा मिनिटे पुरतात. अन्य किल्ल्यांप्रमाणे याच्या दरवाज्यावर कोरीव काम वा नक्षीकाम दिसून येत नाही. कदाचित, कालानुरूप तेही नष्ट झाले असावे. काही वर्षांपूर्वी या दरवाजावर एक संस्कृत शिलालेख लावलेला होता. परंतु तो प्रवेशद्वारावरून खाली निखळून पडला. 27*5 इंचांचा हा शिलालेख आज धुळ्याच्या वि. का. राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर देवनागरी लिपीत काही श्लोक कोरलेले आहेत.

मुख्य दरवाजातून आत प्रवेश केल्यावर कातळात कोरलेल्या पाय-या दिसून येतात. कातळात कोरलेल्या असल्याने त्यांची फारशी मोडतोड झालेली नाही. परंतु आजूबाजूला अनेक खांबांचे अवशेष पडल्याचे दिसून येतात. एकेकाळी या प्रवेशद्वाराची अतिशय सुंदर रचना केलेली असावी. पाय-यांच्या सुरुवातीला दरवाजाच्या शेजारी एक कबर आहे. त्याचा संदर्भ मात्र कुठे सापडत नाही. कातळातील पंधरा-वीस पाय-या चढून गेले की, आपण थेट गडाच्या माथ्यावर पोहोचतो. येथून संपूर्ण सोनगीर गावाचे एकाच दृष्टिक्षेपात दर्शन घेता येते. शिवाय धुळे, आग्रा मार्गावरील वाहतूक ब-याच अंतरापर्यंत न्याहाळताही येते. गडमाथ्यावर जाण्याकरता येथून दोन मार्ग आहेत. डाव्या बाजूने चालत जाऊन सोनगीरची माची पाहता येते. तर उजव्या बाजूने गडाचा मुख बुरूज पाहता येतो. किल्ल्याचा गडमाथा समुद्रसपाटीपासून   सुमारे तीनशे मीटर उंचीवर आहे. तो रुंदीला कमी असून लांबीला जास्त असल्याचे दिसते. सद्यस्थितीत पठार हे सपाट आहे. परंतु या गडमाथ्यावरील काही गोष्टींचे निरीक्षण केल्यास या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची जाणीव होते. सोनगीरच्या डावीकडील माचीकडे जाताना ती निमुळती होत गेल्याचे दिसते. तिच्या टोकावरून खाली फारसे अंतर नाही. परंतु तिथून कोणी सहज वरती येऊही शकत नाही. गडमाथ्यावरील तटबंदी ही पूर्णपणे ढासळून गेली आहे. परंतु गडाच्या बाजूंची तटबंदी ही लाल रेखीव दगडांची असल्याचे दिसते. तीही अधूनमधून ढासळलेली आहे. माचीच्या दोन्ही कडांनी चालत गेल्यास येथील ढासळलेले अवशेष दृष्टीस पडतात. किल्ल्याचा मध्यभाग तसा प्रशस्त आहे. त्याच्या उजवीकडील बाजूस किल्ल्याचा मुख्य बुरूज पाहता येतो.
मुख्य बुरुजाकडे जाताना दोन, तीन ठिकाणी हौदासारख्या वास्तू नजरेस पडतात. त्यात तेल व तूप साठवत असल्याचे दिसून येते. त्यांची मोडतोड आज झालेली आहे. या वास्तूला तेलटाके व तूपटाके असेही म्हटले जाते. थोडे पुढे गेल्यावर एक मोठी विहीर लागते. गडावरील ही चौकोनी विहीर खूप खोल आहे. वरून पाहता तिचा तळ ध्यानात येत नाही. पाण्याचा साठा मात्र या विहिरीत सदैव असतो. त्यात दगड टाकून पाण्याच्या सद्य:स्थितीचा अंदाज घेता येतो. या विहिरीची खोली दहामजली इमारतीएवढी असावी, असे म्हटले जाते. तिच्याभोवती सध्या झाडाझुडपांचे साम्राज्य झाले आहे. विहिरीच्या समोरच पुष्करणीचा हौद लागतो. त्याचेही अवशेषच पाहायला मिळतात. सध्या त्याचे चौदा कोनाडे राहिल्याचे दिसतात. याच्याच वर नव्यानेच काही शिवप्रेमी संस्थांनी हवनस्तंभ उभारला आहे. मोक्याच्या ठिकाणी असल्याने तिथून किल्ला दिसतो. तिथून हा ध्वजस्तंभही नजरेस पडतो. मुख्य बुरुजाकडे जाताना पडीक घरांचे अवशेष दिसून येतात. या बुरुजावरील तटबंदीही ढासळलेली आहे. येथून ब-याच लांबपर्यंतचा प्रदेश दृष्टिक्षेपात येतो. बुरुजावरील भग्न अवशेष मात्र खान्देशच्या या किल्ल्याच्या एकेकाळच्या वैभवाची कल्पना देऊन जातात. अगदी मोक्याच्या ठिकाणी असणा-या सोनगीरच्या या किल्ल्याची रचना फार भव्यदिव्य नाही. तरीही गतइतिहासात हरवलेल्या वैभवाची साक्ष देत तो अस्तित्वाशी झुंजत उभा आहे.

No comments:

Post a Comment