माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Wednesday, April 3, 2013

त्र्यंबकगड : पुराणकाळाचा भक्कम साक्षीदार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.

तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या   काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.

शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.

गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते.  जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे  ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी (दि. ०३ फेब्रुवारी २०१३).
मूळ लेख: लिंक.

No comments:

Post a Comment