माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Sunday, April 14, 2013

पारोळ्याचा भारदस्त भुईकोट

  इतिहासातील नोंदींवरून पारोळा हे गाव 260 वर्षांपूर्वी भुईकोट किल्ला बांधणीच्या वेळी अस्तित्वात आले असावे असे दिसते. जहागिरदार हरी सदाशिव दामोदर यांनी पारोळा किल्ला इ.स. 1727मध्ये बांधला. त्या वेळी किल्ल्याच्या परिसरात 50 घरांची पेंढारांची वस्ती होती. आजही पारोळा गावचा एक भाग पेंढारपुरा म्हणून ओळखला जातो. किल्ला बांधणीमुळेच पारोळा गावाचे व्यापारीदृष्ट्या महत्त्व वाढीस लागते. शिवाय किल्लेदारांनी व्यापा-यांना उदारमनाने आश्रय दिल्याने पारोळा गाव भरभराटीस आले. म्हणूनच पेशव्यांचे सरदार नेवाळकरांच्या कारकिर्दीत पारोळा ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी व्यापारी पेठ म्हणून नावारूपास आली. इ. स. 1818मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केल्याने मराठा साम्राज्य धोक्यात आले. महाराष्ट्रावर इंग्रज सत्ता स्थापन होऊ लागली. इ. स. 1821मध्ये पारोळे गावी व आजूबाजूच्या परिसरात इंग्रजांविरुद्ध ठिकठिकाणी बंड होऊ लागले. ब्रिटिश कॅप्टन ब्रिग्ज याच्या खुनाचा प्रयत्न झाला. इंग्रजांनी चवताळून प्रतिहल्ला केला व जहागिरदारांना किल्ला सोडण्यास भाग पाडले. 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबार्इंना मदत केल्याचा ठपका पारोळ्याच्या किल्लेदारावर ठेवण्यात आला होता. 1859मध्ये इंग्रजांनी पारोळा किल्ला व शहर ताब्यात घेतले. याच काळात किल्ल्यामध्ये इंग्रजांनी अनेकांना फाशी दिले. शिवाय द्रव्य मिळवण्यासाठी किल्ल्याची बरीच मोडतोडही केली. त्या घटनांचे भग्न अवशेष किल्ल्यात आजही शाबूत आहेत.

पारोळा गाव एका विशिष्ट ठेवणीतील चौकोनात वसले आहे. त्याचे रस्ते सरळ लांब रेषेत आहेत. याच रस्त्यांवर अधूनमधून पिंपळाचे व लहान लहान देवतांचे पार एका रांगेत बांधलेले दिसून येतात. याच वैशिष्ट्यामुळे या गावाला पारांच्या ओळी अर्थात ‘पारोळी’ व अपभ्रंश होऊन ‘पारोळा’ हे नाव पडले. या गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती. या तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील व मुख्य दरवाजा. अन्य दरवाजांची नावे धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अंमळनेर दरवाजा अशी आहेत.

पारोळा हे धुळे शहरापासून 30 व जळगावपासून सुमारे 55 किमी. अंतरावर आहे. या दोन्ही शहरांपासून पारोळ्याला येण्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध आहे. शिवाय धुळे व जळगावच्या अन्य तालुक्यांच्या ठिकाणांना पारोळी गाडीमार्गाने जोडलेले आहे. बसस्थानकावर उतरल्यावर केवळ दहाच मिनिटांच्या अंतरावर पारोळा किल्ला स्थित आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी येत असल्याने तो शहराच्या आजच्या बाजारपेठेत मुख्य ठिकाणी वसलेला आहे. किल्ल्याभोवती सध्या बाजारपेठेचेच अतिक्रमण झाले आहे. चालत चालत या बाजारपेठेतून मार्ग शोधावा लागतो. किल्ल्यापासून पाचच मिनिटांच्या अंतरावर राणी लक्ष्मीबाई व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळे आहेत.

पारोळा किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख आहे. ते ओलांडल्यावर आत आणखी एक प्रवेशद्वार लागते. प्रवेशद्वाराच्या बाजूने किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. सध्या या दोन्ही भिंतींच्या मध्ये बराच कचरा टाकलेला दिसतो. आतल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पहारेक-यांच्या देवड्या नजरेस पडतात व समोरच मुख्य किल्लाही दिसतो. अन्य भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची बांधणी रेखीव आहे. तो साधारण 160 मीटर लांब व 130 मीटर रुंद आहे. किल्ल्याच्या मध्यभागी मुख्य किल्ला अर्थात बालेकिल्ला दिसून येतो. सध्या या ठिकाणची निगा पुरातत्त्व विभाग घेत असल्याने अनेक ठिकाणी पुनर्बांधणीची कामे झाल्याची दिसून येतात. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने किल्ला पाहण्यास सुरुवात करणे सोईस्कर ठरते. किल्ल्याच्या अनेक कमानी येथून पुढे दिसून येतात. परंतु त्यांची पडझड झालेली आहे. एका कमानीजवळ चौकोनी विहीर आहे. त्यात पावसाळ्यात ब-यापैकी पाणीसाठा होतो. आतील तटबंदीवर चढण्यासाठी पाय-याही आहेत. या पाय-यांनी वर गेल्यास पारोळा गावाचे दर्शन होते. पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस एक तलाव आहे. अशा प्रकारच्या पाणीसाठ्याची रचना बहुतांश भुईकोट किल्ल्यांना दिसून येते. परंतु हा तलाव ब-यापैकी मोठा आहे. आज त्यावर अतिक्रमण झाल्याने तो बाहेरच्या बाजूने दिसून येत नाही व आतल्या बाजूने पाहिल्यास त्यावर बाटल्या व इतर प्लॅस्टिकचा कचरा तरंगताना दिसतो. या तलावात उतरण्यासाठी तटबंदीला दोन मार्गही आहेत. परंतु या भागात झाडे उगवल्याने हा रस्ता जवळपास बंदच झाला आहे.

बालेकिल्ल्याच्या अलीकडे एक टुमदार घर नजरेस पडते. दारूगोळा ठेवण्यासाठी त्याचा वापर होत असावा. या घरात सूर्यप्रकाश व चंद्रप्रकाश व्यवस्थित पोहोचावा याकरता झरोक्यांची व्यवस्थित रचना केलेली आहे. या घराजवळच व पूर्वेच्या तटबंदी शेजारी एक महादेवाचे मंदिर आहे. या मंदिराजवळ एक मोठे भुयार असून त्याचा वापर जुन्या काळापासून होत असे. विशेष म्हणजे, या भुयारातून घोडेस्वार आत जात असे, असे स्थानिक रहिवाशी सांगतात. या भुयाराचे दुसरे तोंड आठ किलोमीटरवरील नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे म्हटले जाते. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता. महादेवाच्या मंदिराच्या पुढे किल्लेदाराच्या वाड्यांचे अवशेष दिसून येतात. या इमारती दुमजली आहेत. पूर्वेची तटबंदी संपते त्या ठिकाणी ध्वजस्तंभ दिसून येतो. या ठिकाणापासून पूर्ण बालेकिल्ला नजरेस पडतो.

पारोळ्याच्या बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल,   या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूने सौंदर्य नष्ट झाले आहे. बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे जवळच्या चोर दरवाजाने वर प्रवेश करावा लागतो. वर गेल्यावर पूर्ण किल्ल्याचे चहूबाजूंनी दर्शन घेता येते. पुरातत्त्व खात्याने बरेच पुनर्बांधकाम केल्याने येथील अवशेष सुस्थितीत असल्याचे दिसतात. दक्षिणेच्या तटबंदीला लागून तीन पडक्या घरांचे अवशेष नजरेस पडतात. किल्ल्याच्या कचे-या याच ठिकाणी कार्यरत होत्या. कचे-यांच्या भिंतींवर बाहेर पाहण्यासाठी जंग्यांची रचना केली आहे. अशाच जंग्या तटबंदीवरही दिसून येतात.

बालेकिल्ल्यावरून उतरण्यासाठी पश्चिमेकडे एक दरवाजा आहे. तो आज बंद स्थितीत दिसून येतो. सध्या पारोळ्याच्या या भुईकोट किल्ल्याची डागडुजी चालू आहे. वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहता येते. झाशीच्या राणीच्या वास्तव्याने हा किल्ला तिनेच बांधला, अशीही स्थानिकांची समजूत आहे. राणीच्या माहेरचे वंशच आजही पारोळा गावात राहतात. पारोळ्याचा हा किल्ला जळगाव जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे. परंतु अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले असून ते टिकवण्यासाठी स्थानिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी.
दि. १४ एप्रिल २०१३.
मूळ लेख इथे वाचा.

No comments:

Post a Comment