माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Friday, May 7, 2021

कानिफनाथाच्या डोंगरावर

हायवेवरून दुरच्या डोंगरावर असणारं ते मंदिर बऱ्याचदा मी पाहिलं होतं. पण तिथे जाण्याचा निश्चित रस्ता माहीत नव्हता. अशावेळी गुगल मॅप पुन्हा मदतीला धावला. आळे गावाच्या बरोबर मागच्या डोंगरांमध्ये असणारं ते मंदिर गुगल मॅपवर शोधून काढलं. हे मंदिर होतं कानिफनाथाचं आणि गाव होतं कोळवाडी. दुपारचं ऊन ओसरल्यानंतर आळे गावात प्रवेश केला. इथून एक रस्ता संत ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिराकडे अर्थात संतवाडीच्या दिशेने जातो. याच रस्त्यावर थोड्या अंतरावर एक फाटा उजवीकडे कोळवाडीच्या दिशेने जातो. हे वळण घेतलं आणि समोरच्या डोंगरावर कानिफनाथाचे ते मंदिर दिसून यायला लागलं. मुख्य फाट्यापासून सुमारे दोन किलोमीटरवर कोळवाडी गाव असावं. गावात पोहोचल्यावर पुनश्च एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. हा डांबरी रस्ता नसला तरी त्याची स्थिती बर्‍यापैकी चांगली होती. आजूबाजूला फक्त शेतीच शेती नजरेत येत होती. दहा मिनिटांमध्ये मी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या एका जंगलामध्ये पोहोचलो. इथे पुर्णतः शांतता होती. फक्त झाडांवर फिरणाऱ्या पक्ष्यांचे आवाज येत होते. मानवी अस्तित्वाचा कोणताच आवाज ऐकू आला नाही. जंगलाच्या सुरुवातीलाच गाडी पार्क केली आणि पदभ्रमंतीला सुरुवात केली. वारा नसल्यामुळे जंगलातील सर्व झाडे स्तब्ध होती. थोड्याच वेळामध्ये जंगल संपले आणि डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच सिमेंटच्या पायऱ्या याठिकाणी बनवलेल्या दिसून आल्या. कदाचित या मार्गाने नियमितपणे गावकरी डोंगरावर कानिफनाथांच्या दर्शनाला जात असावेत. थोडं चढुन गेल्यावर पायवाट आणखीन मळलेली दिसून आली. पायऱ्या संपल्या होत्या. पण दगडांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी पायऱ्या निर्मिल्याच्या दिसून येत होत्या. झाडांची गर्दी कमी झाली होती. पण डोंगरावरून आलेले मोठमोठाले दगड रस्त्यामध्ये दिसून येत होते. पावसाळ्यात याच मार्गाने पाणी खाली येत असावे, असेही भासत होते. वाट उत्तम आणि वळणावळणाची होती. सूर्य मावळतीकडे झुकत होता आणि मी सूर्याच्या विरुद्ध दिशेने डोंगरावर चढत चाललो होतो. उन्हाची तीव्रता कमी झाली असल्याने दमछाक होत नव्हती. अगदी पंधरा मिनिटांमध्येच डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. येथून आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. शिवाय दूरवर सूर्यकिरणांचा अभिषेक होत असलेला नारायणगड किल्लाही व्यवस्थित दिसत होता. सूर्यकिरणांच्या वर्षावामुळे आजूबाजूचा परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामुळे मध्यभागी असलेला नारायणगड अधिक उठून दिसत होता. पहिला डोंगर संपल्यानंतर थोडीशी सपाटी लागली आणि पुढच्या चढाकडे मार्गक्रमण चालू केले. इथपर्यंत पायवाट अतिशय चांगली होती. पुढची पायवाट काही शांत जंगलातल्या रस्त्याने पुढे जात होती. चढण सुरु झाली नि पायर्‍यांची रचना केलेला रस्ता दिसू लागला. डोंगराच्या वरच्या भागात असलेले हे जंगल पायथ्यापासूनही व्यवस्थित दिसत होते. इथे पोहोचल्यावर मात्र त्याची शीतलता मन प्रसन्न करून गेली. आता चढाईचा रस्ता सुरू झाला होता. ही चढण आधीच्या सर्व चढणीपेक्षा अधिक तीव्र होती. परंतु पायर्‍यांचा मार्ग असल्याने ती अवघड जाणवत नव्हती. आजूबाजूला उगवलेले गवत अजूनही आपला हिरवा रंग ठेवूनच होते. वळणावळणाची ती वाट हळूहळू डोंगरमाथ्याकडे जाऊ लागली. अतिउच्च माथ्यावर पोहोचल्यावर वरील मंदिराचे अस्तित्व झाडीतून दिसायला लागले होते. डोंगराच्या पूर्ण माथ्यावर आलो तेव्हा पुन्हा सूर्यकिरणे अंगावर पडायला लागली व समोरच पूर्ण मंदिर स्पष्ट दिसायला लागलं. अलीकडच्या काळातच त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला असावा, असे दिसले. शेजारीच रहाण्यासाठी एक छोटेसे झोपडीवजा घर दिसून आले. मी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा आजूबाजूला कोणीही नव्हते. एव्हाना मागच्या बाजूचा परिसरही दिसायला लागला होता. मागील बाजूस बऱ्याच अंतरापर्यंत झाडीच झाडी दिसून आली. जंगलाची घनता मात्र अधिक नव्हती. शिवाय त्या बाजूने डोंगरावर उतरण्यासाठी एक पायवाट जाताना दिसली. समोरच्या डोंगरावर दूरवर एक छोटेखानी दर्गा दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून हे दोन्ही डोंगर सलग वाटत होते. परंतु इथे आल्यावर ते एकमेकांपासून वेगळे असल्याचे दिसले. समोरच्या डोंगरावरील दर्ग्याकडे जाण्यासाठी कानिफनाथांचा हा डोंगर पूर्ण उतरून समोरचा डोंगर चढावे लागत होते. पायवाटेने थोडे खाली उतरलो आणि उजव्या बाजूला एका भव्य पाषाण नजरेस पडला. तिथे बसून समोरचा विस्तीर्ण परिसर न्याहाळता येऊ शकत होता. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही एक सर्वोत्तम अशी जागा होती. सूर्य बऱ्यापैकी पश्चिम क्षितिजाकडे झुकलेला होता. त्यामुळे सूर्याची कोवळी किरणे अंगावर तीव्रतेने पडत नव्हती. या ठिकाणी बसून समोरचा परिसर तासनतास न्याहाळत बसावा, असे वाटत होते. पण दहा मिनिटांमध्ये मी घरी लवकर जायचे म्हणून तेथून काढता पाय घेतला. पुन्हा मंदिरापाशी आलो तोवर कोणीतरी वाटसरू मंदिरात आल्याचा दिसला. मंदिराच्या मागच्या बाजूने पुन्हा परतीच्या वाटेला लागलो. उतरताना मात्र फारसे कष्ट पडले नाहीत. परंतु एक सुंदरश्या ट्रेकचा आनंद घेतल्याचे समाधान मात्र लाभले.
#ऑक्टोबर #२०२०

 












 



No comments:

Post a Comment