माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Monday, April 29, 2024

शनिवारवाडा

इसवी सन २००२ मध्ये खऱ्या अर्थाने पहिल्यांदा पुणे शहराचे तोंड पाहिले. त्यानंतर जवळपास बारा वर्षे या शहराचा सहवास मला लाभलेला आहे. या बारा वर्षांमध्ये अनेकदा शनिवारवाड्याच्या चहूबाजूने प्रवास करण्याचा योग आला. परंतु एकदाही ही वास्तू आतून पाहिलेली नव्हती. आज अखेरीस तो योग आला.
१८ व्या शतकामध्ये अखिल हिंदुस्थानात मराठ्यांची सत्ता स्थापन होत असताना राजसत्तेचे प्रमुख केंद्र असलेला पुण्यातील शनिवारवाडा आज पहिल्यांदाच आतून पाहता आला. कोणतीही वास्तू पाहताना अर्थात ऐतिहासिक वास्तूला भेट देताना तिथला इतिहास मनामध्ये अनुभवायला मिळतो. अशीच काहीशी अनुभूती यावेळी मला मिळाली. महाराष्ट्रात आज अनेक भुईकोट किल्ले मरणासन्न अवस्थेत आहेत. शनिवार वाडा देखील अशाच भुईकोट किल्ल्यांपैकी एक. कालौघाने यातील अनेक वास्तू हळूहळू ढासाळत गेल्या. परंतु आजही टिकून असलेल्या वास्तू आपल्याला मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतात. १८ व्या शतकाततील सर्वच पेशव्यांचा सहवास तसेच अनेक मराठा वीरांची पदस्पर्श लाभलेली ही भूमी आहे. त्यामुळे निश्चितच या वास्तूचे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण असे स्थान आहे. पुण्यात आलेला प्रत्येक व्यक्ती या वास्तूला भेट देतो आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे किमान एकदा तरी स्मरण करतो. तसेच कदाचित त्यातून प्रेरणा देखील घेतो.
माझ्याकरिता देखील शनिवारवाडा अनुभवण्याची अनुभूती ही निश्चितच अतिशय वेगळी अशी होती. 









 

Monday, April 8, 2024

चांदबिबी महल

बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्याला पहिल्यांदा भेट दिली होती तेव्हाच या शहरातील चांदबिबी महल बद्दल इंटरनेटवर वाचले होते. त्यावेळेस वेळेअभावी येथे जाता आले नाही. परंतु आज तो योग जुळून आला. शहरापासून याची अंतर होते सुमारे १५ किलोमीटर.
अहमदनगर-पाथर्डी रस्त्याने प्रवास सुरू केला. सूर्य हळूहळू पूर्वेकडून वर येत होता. त्यामुळे अजूनही उन्हाची तीव्रता तितकी नव्हती. प्रत्यक्ष या स्थळापाशी पोहोचलो तेव्हा समजले की हा महल एका टेकडीवर बांधलेला आहे. गुगल मॅपवर अगदी वर पर्यंत रस्ता जातो असे दिसले. त्यामुळे पायथ्यापासून वरच्या दिशेने जाणाऱ्या डांबरी रस्त्याने गाडी घेऊन निघालो. मागच्या काही वर्षांपासून कदाचित डागडुजी न केल्याने रस्त्याची अवस्था तितकीशी चांगली नव्हती. परंतु आजूबाजूच्या झाडांमुळे काहीसे आल्हाददायक वातावरण निश्चित वाटत होते. जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये मी त्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. नियमितपणे सकाळी टेकडी चढण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या लोकांचीच रेलचेल या ठिकाणी होती. इंटरनेटवर बघितलेल्या फोटोंप्रमाणेच हा महल मला दिसून आला. त्याच्या आतमध्ये विशेष सांगावं असं काही नाही. परंतु प्राचीनत्व असलं की स्थळाला निश्चितच एक वेगळे महत्त्व प्राप्त होत असतं. तसंच काहीसं या स्थळाच्या बाबतीत देखील असावं. पर्शियन वास्तुकालेप्रमाणे याची रचना अष्टकोनी प्रकारची आहे. त्यावर तीन मजले दिसून येतात. असं म्हणतात की, ही रचना आठ मजल्यांमध्ये करण्यात येणार होती. परंतु केवळ तीनच मजले तयार झाले.
या ठिकाणाला चांदबिबी महल का म्हणतात? हे मला अजूनही समजलेले नाही. कारण हे स्थळ मुर्तजा निजामाचा प्रधान दुसरा सलाबतखान याची कबर आहे!
आजूबाजूला बऱ्यापैकी सुशोभीकरण केल्यामुळे अहमदनगर मधील हे एक पर्यटन स्थळ आहे, असे निश्चित म्हणता येईल. 






Monday, March 25, 2024

बागरौझा

गुगल मॅपवर बागरौझा हे ऐतिहासिक स्थळ दिसून आले. नावावरून हे नक्की काय असावे, याची उत्सुकता मला होतीच. शहराच्या बऱ्यापैकी मध्यवर्ती भागामध्ये हे ठिकाण स्थित होते. प्रत्यक्ष जेव्हा या परिसरामध्ये पोहोचलो तेव्हा आतमध्ये जाण्याचा रस्ता सापडायला मला बरेच कष्ट घ्यावे लागले. कारण या भागाच्या आजूबाजूला बऱ्यापैकी अतिक्रमित जागा दिसून येते. गाडी जाण्याचे रस्ते अतिशय चिंचोळे होते. म्हणून मी गाडी बाहेरच एका ठिकाणी पार्क केली आणि चालत चालत आत गेलो. काहीशा चिंचोळ्या भागातून आत मध्ये गेल्यानंतर समोरच मुस्लिम वास्तुकलेसारखी रचना असणारा हा भाग दिसून आला. पुरातत्व खात्याने त्याच्या बाहेर माहिती देणारा फलक लावलेला आहे. यावरून असे समजले की, अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक असणारा अहमद निजामशाह याची ही कबर आहे. अहमदनगर शहराला नाव देणारा शासक व त्याची कबर म्हणजेच बागरौझा होय. अहमदनगरमध्ये असणाऱ्या दुर्लक्ष स्थळांपैकी हे एक स्थळ होय. अहमदशहाच्या कबरीला संरक्षक म्हणून इस्लामी वास्तुकलेनुसार स्मारक तयार करण्यात आलेले आहे. आजही या स्मारकाच्या आतमध्ये देखील शेती केली जाते हे विशेष. शिवाय या परिसराच्या आजूबाजूला देखील अशा अनेक वास्तू रचना दिसून येतात. त्याबद्दलची अधिक माहिती इथल्या कोणत्याही नागरिकांना नाही. अहमदनगर पर्यटन विकास होण्याच्या दृष्टीने या भागाची डागडुजी करण्याची आवश्यकता वाटते.
#अहमदनगरचा_इतिहास











Wednesday, March 20, 2024

लांडोर

बेलगाव ढगा आणि तळेगाव अंजनेरी या दोन गावांना जोडणारा एक डांबरी रस्ता त्र्यंबकेश्वर रस्त्याला समांतर आहे. सहसा या रस्त्याने वाहनांची गर्दी तशी कमीच असते. दोन्ही गावांच्या मधल्या भागात काहीसा ओसाड आणि थोडासा जंगली परिसर आहे. याच रस्त्याने सायकल चालवत असताना. महिरावणीच्या संतोषा डोंगराच्या पायथ्याशी एक छोटेसे रान दिसून आले. ते बऱ्यापैकी उजाड झालेले आहे. शिवाय वणव्यांमुळे त्याची हानी देखील झालेली आहे. याच रानात पाण्याच्या शोधार्थ दोन लांडोर भटकताना दिसल्या. रानाची हिरवळ नाहीशी झाल्याने त्या अगदी सहजपणे दुरून दिसून येत होत्या. पाण्याचे स्त्रोत शोधण्याचा त्यांचा प्रयत्न असावा. संध्याकाळीच्या त्या निरव वातावरणात माझ्या सायकलच्या चाकांचा आवाज ऐकून त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि पटकन जंगलाच्या दिशेने पळून गेल्या. त्यांच्यातीलच ही एक. 

 


 


 

Tuesday, March 19, 2024

दंडोबावरील सूर्यास्त

सोलापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वरून उजव्या बाजूला वळालो तेव्हा सूर्य हळूहळू पश्चिम क्षितिजाकडे निघालेला होता. दंडोबाच्या टेकडीवरील धुळीने माखलेली झाडे सूर्यप्रकाशातील रंगात वेगळ्या तऱ्हेची भासत होती.
दंडोबाला दंडवत घालून पुन्हा परतीच्या मागे मार्गाने निघालो तेव्हा सूर्य बऱ्यापैकी खाली आलेला होता. टेकडीवरच्या त्या वळणावळणाच्या रस्त्याने तो जणूकाही माझ्याशी लपंडावच खेळत होता, असे वाटले!
#dandoba #hills #sangli #maharashtra #sunset