माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label तलाव. Show all posts
Showing posts with label तलाव. Show all posts

Tuesday, February 11, 2025

तुतारी शिल्प

नेहमीचीच सवय असल्याने सकाळी सहा वाजताच जाग आली. सावंतवाडीच्या एका छोट्या हॉटेलमध्ये आम्ही काल थांबलो होतो. झोप तशी चांगली झाली. सकाळी रस्त्यांवर गजबज ऐकू येत होती. मॉर्निंग वॉकसाठी आणि गाडी चार्जिंगला लावण्यासाठी मी बाहेर पडलो. तेव्हा रस्त्यावरील गर्दी पाहून लक्षात आले की, आज नगरपरिषदेने मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. रस्त्याच्या कडेने अनेक जण स्पर्धेचे टी-शर्ट घेऊन घालून धावताना दिसले. त्यांच्या मधूनच माग काढत मी गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मोती तलावापाशी आलो. मागच्या एका प्रवासामध्ये आम्ही येथून गेल्याची आठवले. आज पहिल्यांदाच हा तलाव व्यवस्थित पाहता आला. कोल्हापूरच्या रंकाळा तलावाची आठवण झाली. हा तलाव तितकाचा मोठा नव्हता. त्यादिवशी मॅरेथॉनच्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले बहुतांश स्पर्धक याच तलावाभोवती धावताना दिसत होते. त्यांच्या बाजूनेच फुटपाथ वरून मी चालू लागलो. अगदीच थोड्या अंतरावर तलावाच्या आत एक पूल दिसून आला. इथून पुढे गेल्यावर मध्यभागी धातूमधील एक तुतारीचे शिल्प नजरेस पडले. केशवसुतांच्या स्मरणार्थ या शिल्पाची बांधणी येथे केलेली आहे. अर्थात अशा कोनशीला तिथे लावलेल्या दिसल्या. कविवर्य केशवसुत काही काळ सावंतवाडीमध्ये वास्तव्यास होते, असे वाचण्यात आले. सावंतवाडीतील कवी वसंत सावंत यांच्या कविता देखील या ठिकाणी लावलेल्या दिसल्या. त्यांनी सावंतवाडीवर केलेली एक कविता इथे कोनशिलेमध्ये वाचता येते. तलावाच्या बऱ्यापैकी मधोमध हे शिल्प बांधलेले आहे, म्हणून इथून दोन्ही बाजूंचा तलाव व्यवस्थित न्याहाळता येऊ शकतो. त्यादिवशी तलावाभोवती फेरी मारणाऱ्या मॅरेथॉनपटूंचाच गाजावाजा दिसून येत होता. एव्हाना सूर्योदय देखील झालेला नव्हता. त्यांना आयोजक सातत्याने देत असलेल्या सूचना ऐकतच मी तलावाभोवतीच्या मॉर्निंग वॉकचा आनंद घेऊ लागलो!

— तुषार भ. कुटे














 

Friday, September 13, 2024

रंकाळा

आजवर जितक्या वेळा कोल्हापुरामध्ये आलो त्या प्रत्येक वेळेस रंकाळा तलाव मी पाहिलेला आहे.  यंदा पहिल्यांदाच वर्षा ऋतूमध्ये हा तलाव अनुभवयास मिळाला. यंदा देखील कोल्हापुरात वर्षावृष्टी चांगली झाल्याने तलावात बऱ्यापैकी पाणी जमा झाले होते. इथे नियमित दिसणारी बदके पाण्यावर पोहण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसली. शिवाय काहीसे मंद वारे चालू असल्याने समुद्रासारख्या लाटा देखील तयार होताना दिसत होत्या. शहरातल्या लोकांना समुद्राचा अनुभव असेच शहरी तलाव देत असतात. रंकाळा देखील त्याला अपवाद नव्हता. 




 

Friday, March 27, 2020

अंबावडे

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्‍यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे अंबावडे होय! भोर-रायरेश्वर रस्त्यावर हे गाव स्थित आहे. अंबावडे गावाला छोटेखानी निसर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात नक्कीच हरकत नसावी, इतकी नैसर्गिक सुंदरता या ठिकाणी वसलेली दिसते. पावसाळ्याव्यतिरिक्तही येथे झुळझुळ वाहणारे झरे पाहता येतात. शिवाय एक छोटासा झुलता पूलही तलावावर बांधलेला आहे. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांचे मावळे सूर्याजी जेधे व जीवा महाले यांचे स्मृतिस्थळ येथे आहे.
 





Friday, November 15, 2019

इंदिरा पाझर तलाव, खेड घाट

पुणे-नाशिक रस्त्याची सध्याची परिस्थिती पाहता राजगुरुनगर चा खेड घाट हाच सगळ्यात अवघड घाट उरल्याचे दिसते! या घाटाच्या झाडीतुन खाली पाहिल्यास एक सुंदर जलाशय तुडुंब भरलेला दिसतो. या तलावाच्या सर्व बाजूंनी डोंगररांगा असल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होतो. सदर तलावाचे नाव आहे इंदिरा पाझर तलाव.
तलावाच्या मुख्य बांधाकडे जायचे असल्यास राजगुरुनगर कडून घाट सुरू होण्यापूर्वी डाव्या बाजूला एक रस्ता खालच्या दिशेने जाताना दिसतो. या रस्त्याने साधारणतः अर्धा किलोमीटर पुढे गेल्यात इंदिरा पाझर तलावाचा दृष्टीस पडतो. तिथून तलावाचे पूर्ण दृश्य तुम्ही डोळ्यात साठवू शकता.