म्हसवंडी हे अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यातलं आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवरचं डोंगरात लपलेलं गाव. पुणे जिल्ह्यातल्या आमच्या गावापासून हे गाव फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे. गावातून म्हसवंडीकडे जाणारा रस्ता देखील पक्का नाही. बालाघाटाच्या या डोंगर रांगेमध्ये अनेक छोट्या छोट्या वाटांनी अहमदनगर आणि पुणे जिल्हा जोडलेला आहे. त्यातीलच पिंपरी पेंढार ते म्हसवंडी जोडणारी ही वाट 'मॉर्निंग वॉक'साठी असणार एक उत्तम ठिकाण होय.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरून उत्तरेकडे जाणारा एक कच्चा रस्ता दिसतो. या रस्त्याने पुढे गेल्यानंतर उजवीकडे जाणारा रस्ता म्हसवंडी कडे जातो. या रस्त्यावर अजूनही मी डांबर पडलेलं पाहिलेलं नाही! डोंगराच्या पायथ्याशी गेलं की बऱ्यापैकी सुंदर वनराई दृष्टीस पडते. याच वनराईतून एक छोटासा घाट रस्ता म्हसवंडीच्या दिशेने जातो.
इथं पायथ्याशी गाडी लावली तेव्हा सकाळच्या प्रहरी निरव शांतता अनुभवता येत होती. विशेष म्हणजे जंगलामध्ये मोरांचे प्रमाण लक्षणीय आहे. पायीच घाटरस्ता चालत असताना उजव्या बाजूला थोडं उंचावर मोर आणि लांडोर अगदी सहजपणे बागडताना दिसले. त्यांच्याही पलीकडे मोरांचे चित्कार ऐकू येत होते. अगदी काही सेकंदांमध्ये त्यांच्याजवळ जाऊन त्यांना पकडू शकतो. इतक्या जवळ ते होते! निसर्गाच्या या खुल्या मैदानामध्ये मुक्त संचार करणारे मोर पाहिले की निसर्ग स्वातंत्र्याची प्रकर्षाने आठवण येते. मोरांव्यतिरिक्त अन्यही निरनिराळ्या पक्षांची किलबिल सकाळच्या प्रहरी व्यवस्थित ऐकू येत होती. या निसर्गसंगीताला कानामध्ये साठवताना काहीतरी नवं शोधल्याचा मलाही भास झाला. तो वळणावळणाचा घाट रस्ता चढत मी मुख्य खिंडीपाशी आलो तेव्हा दोन-तीन गवळ्यांचे दर्शन झाले. इथून उजवीकडचा रस्ता म्हसवंडीच्या दिशेने जातो. मी त्या रस्त्याने चालायला सुरुवात केली. तोवर सूर्योदय झालेला नव्हता. आकाश बऱ्यापैकी ढगांनी अच्छादलेले दिसून आले. पण पूर्वेच्या क्षितिजावर ढगांची तशी कमीच गर्दी होती. चालताना हवेतला गारवा काहीसा जाणू लागला. थोड्याच वेळात सूर्याची केशरी किरणे पूर्व क्षितिजावरून दिसायला लागली आणि दूरवर डोंगराच्या कुशीत वसलेलं म्हसवंडी गाव उजळून निघताना दिसलं. पावसाळा नुकताच संपला असल्याने अजूनही बऱ्यापैकी हिरवाई होती. शिवाय निरनिराळ्या रानफुलांची गर्दी देखील रस्त्याच्या आजूबाजूला दिसून आली. गावाकडचे जीवन म्हणजे याच नैसर्गिक वनराईमध्ये बागडणारं असतं. शहरी जीवनाला वैतागलेल्या अनेक जीवांसाठी तो एक शांततेचा आधार असू शकतो. असेही वाटून गेलं!
बराच वेळ पूर्वेकडून हळूहळू वर येणाऱ्या सूर्याकडे टक लावून मी बघत होतो. त्या समाधीस्थ मुद्रेमध्ये निश्चित किती वेळ गेला असेल, हे मला अजूनही आठवत नाही.
Thursday, November 10, 2022
म्हसवंडी घाट
Friday, October 28, 2022
सप्तशृंगी मंदिर बोटा
जुन्नरच्या परिसरातील सर्व लहान मोठे डोंगर आणि टेकड्या चढून झाल्या होत्या. म्हणून थोडसं तालुक्याच्या सीमेबाहेर जाण्याचे ठरवलं. आळेफाट्यापासून नाशिकच्या रस्त्यावर बारा किलोमीटर अंतरावर बोटा हे छोटेखानी गाव आहे. नवीन रस्ते प्रकल्पामध्ये या गावाला देखील बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे. याच बायपास रस्त्याने गेल्यावर डावीकडे एक छोटी टेकडी दिसून येते. या टेकडीवर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. आज या मंदिराला भेट द्यायची होती.
घरून निघायला तसा मला उशीरच झाला होता. सूर्योदय झालेला होता. आकाश निरभ्र होतं. आणि नेहमीप्रमाणे पुणे नाशिक महामार्गावरील वाहने ९०-१०० च्या वेगाने प्रवास करीत होती. बोटा गावाच्या बायपासला लागलो तेव्हाच सप्तशृंगीची ही टेकडी व्यवस्थित दिसायला लागली होती. टेकडीच्या माथ्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. परंतु माथ्यावर मंदिराचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. जवळ आल्यानंतर गाडीचा वेग थोडा कमी केला व रस्त्याशेजारी उभे असलेल्या ग्रामस्थाला मंदिराच्या रस्त्याविषयी विचारले. त्याने रस्त्याची माहिती दिली. मग थोडसं पुढे जाऊन एका मोकळ्या ठिकाणी गाडी महामार्गाच्या बाजूला लावली आणि टेकडी चढायला सुरुवात केली. गुगल मॅप मध्ये देखील मंदिर याच टेकडीवर दाखवण्यात आले होते. पण ते अजूनही मला दिसत नव्हते. रस्ता मात्र बऱ्यापैकी मळलेला दिसत होता.३००-४०० मीटर पर्यंत अगदी कार देखील जाऊ शकेल इतका तो रुंद होता. टेकडीला थोडासा वळसा घालून मग वरच्या दिशेने जाणारी पायवाट दिसून आली. चालताना रस्त्यावरून महामार्गावरून वेगाने वाहणाऱ्या वाहनांचे आवाज सातत्याने येतच होते. आपण मानवी रहदारीपासून दूर नाही याची आठवण ते करून देत होते. इतर टेकड्यांवरील मंदिरांकडे जाण्यासाठी जशी पायवाट असते तशाच प्रकारची तसेच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या ओहोळाने ती तयार झालेली होती. अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये मी मंदिरापाशी पोहोचलो. पूर्ण टेकडीमध्ये दाट झाडी असणारी ती एकमेव जागा होती. या ठिकाणी बाभळीच्या छोट्या छोट्या झाडांचा भला मोठा पुंजका दिसून आला. या पुंजक्याच्या मागेच एका नैसर्गिक गुहेमध्ये सप्तशृंगी चे मंदिर बांधलेले आहे.
गुहा नैसर्गिक असली तरी काही ठिकाणी विटांचे व बाहेरच्या बाजूला सिमेंटचे तसेच लोखंडाचे देखील बांधकाम दिसून आले. गुहेच्या मध्यवर्ती भागात सप्तशृंगीची भिंतीला जोडलेली मूर्ती दिसत होती. मंदिरावर सन २००३ चे बांधकाम असल्याचे लिहिलेले होते. सूर्य एव्हाना बऱ्यापैकी वर आलेला होता. तिथून दूर दूर पर्यंतचा परिसर आता न्याहाळता येऊ शकत होता. पायथ्याशी असणारे बोटा गाव देखील पूर्ण दृष्टीमध्ये येत होते. शिवाय पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळपास दहा किलोमीटर पर्यंत पाहता येऊ शकत होता. मंदिराच्या आसपास कोणीही नव्हते. एकांतात बसण्यासाठी ही एक उत्तम जागा होती. पण गाड्यांचा गोंगाट त्या एकांताला एकांत म्हणू देत नव्हता.
मंदिर डोंगराच्या माथ्यावर नाहीये तरी डोंगराच्या माथ्याकडे जाण्यासाठी एक छोटेखानी पायवाट मंदिरा शेजारून जाताना दिसली. केवळ एका मिनिटांमध्ये मी त्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. तिथे सप्तशृंगी नावाचा लोखंडी फलक दिसून आला. खरंतर याला फलक म्हणता येणार नाही. लोखंडी सळ्यांनी हे नाव तयार केले होते. कदाचित या नावांमध्ये पूर्वी रोषणाई केलेली असावी. जेणेकरून रात्रीच्या अंधारात देखील ही टेकडी दुरून पाहता येत असेल. टेकडीच्या सर्वोच्च टोकावर खालून दिसत असलेला भगवा झेंडा फडकत होता. मागच्या बाजूला बऱ्यापैकी रान होतं आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा देखील दिसून येत होत्या.
उन्हाची तीव्रता फारशी नव्हती म्हणून बराच वेळ या ठिकाणी ध्यानस्थ बसून राहिलो. हायवे वरच्या वाहनांचे आवाज एकाग्रता होऊ देत नव्हते. मग पुन्हा माघारी फिरलो आणि पाचच मिनिटांमध्ये पायथ्याशी पोहोचलो होतो. गाडी काढली आणि हायवेवर गोंगाट करणाऱ्या त्या वाहनांचा मी देखील पुन्हा एकदा भाग होऊन गेलो.










