माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label इतिहासकार. Show all posts
Showing posts with label इतिहासकार. Show all posts

Thursday, February 12, 2026

वा. सी. बेंद्रे: एक ध्येयवेडे इतिहासकार

जगाची प्रगती शहाण्या लोकांमुळे होत नाहीत ती होते वेड्या लोकांमुळे अर्थात ध्येयवेड्या लोकांमुळेच! महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असाच एक ध्येयवेडा व्यक्ती होऊन गेला ज्याने आपल्या इतिहास लेखनाची दिशा बदलून गेली. विस्कळीत असलेला मराठी इतिहास सुसंगतपणे पूर्णत्वास आला.
सुमारे शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं, उच्च आणि समाजाला उपयोगाचे होईल असं काहीतरी करण्याच्या हेतूने रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये जन्मलेल्या या युवकाने शीघ्रलेखनपद्धती शिकायला सुरुवात केली. शिवाय त्या काळात अतिशय कमी लोकांना ज्ञात असणारी टंकलेखनपद्धती अर्थात टाईपरायटिंग देखील त्याने सहजपणे आत्मसात केली. इसवी सन १९२२ मध्ये त्याचे मराठीतील शीघ्रलेखन पद्धती हे पुस्तक प्रकाशित झाले. नुसते पुस्तक प्रकाशित करूनच तो थांबला नाही. तर या कौशल्याचा वापर प्रत्यक्ष करायला त्याने सुरुवात केली. त्याचे सन १९२८ मध्ये "साधन-चिकित्सा: शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास" हे पुस्तक प्रकाशित झाले. इतिहास लेखन पद्धती, इतिहासाची रचना आणि साधनांचा अभ्यास कसा करायचा, याची चिकित्सा या पुस्तकांमध्ये विस्तृतपणे केली होती. तोपर्यंत महाराष्ट्राचा इतिहास विस्कळीत असाच होता. काही मराठी आणि इंग्रजी इतिहासकारांनी आपल्या पद्धतीने इतिहास लिहिला होता. पण त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. म्हणूनच या युवकाने आपले सारे आयुष्य महाराष्ट्राच्या इतिहासाला वाहून घेण्याचे ठरवले. पुण्यातील पेशवे दप्तरमध्ये असणारी कागदपत्रे व्यवस्थित रचनावर लावून दिली आणि याच कार्यामुळे तंजावर संस्थानातील कागदपत्रे देखील रचनावार लावण्याचे कार्य त्याला मिळाले. त्याची धडपडी आणि ध्येयवेडी वृत्ती बघून इंग्रज अधिकाऱ्यांनी इतिहास संशोधनासाठी त्याला युरोपला पाठविण्याचे ठरवले. हा युवक म्हणजे इतिहासाचे भीष्माचार्य वा. सी. बेंद्रे होत.


लॉर्ड ब्रेबॉर्न या इंग्रज अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वा. सी. बेंद्रे यांची रवानगी इतिहास संशोधनासाठी इंग्लंडला करण्यात आली. भारतामध्ये त्याकाळी उपलब्ध असणारी अनेक कागदपत्रे इंग्रजांनी त्यांच्या देशामध्ये नेली होती. याशिवाय तत्कालीन भारतावर राज्य करणाऱ्या अनेक परकीय राज्यकर्त्यांची कागदपत्रे देखील युरोपात त्यांच्या देशांमध्ये उपलब्ध होती. या कागदपत्रांचा अभ्यास करण्याचे काम बेंद्रे यांच्यावर सोपवण्यात आले. आधीच ध्येयवेडी वृत्ती अंगात असल्याने आणि आपल्या आवडीचे काम मिळाल्याने बेंद्रे यांनी अहोरात्र लाखो कागदपत्रांचा अभ्यास केला. त्यातून हजारो पानांची टिपणे देखील काढली. महाराष्ट्राच्या इतिहासाची अद्भुत आणि अज्ञात माहिती देखील त्यांना याच कागदपत्रांतून मिळाली. यातमध्येच एक महत्त्वाचे चित्र देखील त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळाले. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हॅलेंटाईन नावाच्या डच चित्रकाराने काढलेले चित्र होय. महाराष्ट्राला तोपर्यंत एका वेगळ्याच चित्राद्वारे शिवाजी महाराज दिसले होते. परंतु बेंद्रे यांनी पुराव्यानिशी शिवाजी महाराजांचे पहिले चित्र भारतीयांना दाखवले. सन १९३३ मध्ये ह्याच चित्राची प्रत त्यांनी पुण्यात प्रदर्शित केली होती. इंग्लंडमध्ये अभ्यास करत असताना तत्कालीन ब्रिटिश पंतप्रधान नेव्हिल केंबर्लेन यांच्यापर्यंत त्यांचे नाव पोहोचले. या अभ्यासू इतिहासकाराची त्यांनी भेट देखील घेतली होती. तो काळ द्वितीय महायुद्धाचा होता. जर्मनी अतिशय मोठ्या फौजेसह इंग्लंड बरोबरच अन्य दोस्त राष्ट्रांवर चालून आलेले होते. म्हणूनच इंग्लंडमधील स्थिती आणखी बिघडत चाललेली होती. याच कारणास्तव बेंद्रे यांना केवळ दोन वर्षांमध्ये आपला अभ्यास पूर्ण करून परतीच्या मार्गाने जावे लागले. पण या दोन वर्षांमध्ये त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांचा भला मोठा साठा तयार केला होता. जल मार्गाने परतत असताना देखील त्यांच्यावर युद्धजन्य परिस्थितीची टांगती तलवार होती. आपली दोन वर्षांची मेहनत घेऊन ते जहाजात चढले. प्रवास अतिशय कठीण होता. भारताच्या दिशेने निघालेले त्यांचे जहाज केवळ रात्री प्रवास करत होते. एकीकडे भारतामध्ये त्यांचे आप्तस्वकीय त्यांच्या वाटेला डोळे लावून बसलेले होते. अखेरीस ऐतिहासिक ज्ञानाचा तो सागर घेऊन त्यांनी महासागर पार केले व अनेक महिन्यांनी भारतामध्ये पोहोचले.
भारतात परतल्यानंतर त्यांनी इतिहास संशोधनाच्या विविध विषयांमध्ये हात घातला. पुण्यातील भारत इतिहास संशोधन मंडळ तसेच मुंबईच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या पायाउभारणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. युरोपामध्ये जमवलेल्या सर्व कागदपत्रांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. पुरावे तपासले आणि महाराष्ट्राचा व विशेषतः शिवशाही कालखंडाचा विस्कळीत इतिहास सुसंगतपणे आणि विस्तृतपणे लिहायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर नाटककार आणि कादंबरीकारांनी लावलेले डाग त्यांनी पुराव्यानिशी धुवून काढले व शंभूराजांचे पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. शिवाय पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रुक गावामध्ये झाडाझुडपांमध्ये दडलेली संभाजी महाराजांची समाधी देखील त्यांनी शोधून काढली. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांची समाधी देखील त्यांनीच शोधली. मालोजीराजे, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज  या सर्वांची शास्त्रशुद्ध चरित्र लिहिणारे बेंद्रे हे आजही एकमेव इतिहासकार आहेत. त्यांच्या इतिहास संशोधन प्रवासामध्ये मिळालेले अनेक संस्कृत ग्रंथही त्यांनी मराठीमध्ये भाषांतरित केले. यात प्रामुख्याने केशव पंडितकृत राजाराम चरितम, गागाभट्टकृत शिवराज्याभिषेक प्रयोग:, दंडनीतीप्रकरणम सारख्या दुर्मिळ ग्रंथांचा समावेश होतो. याशिवाय गोवळकोंड्याची कुत्बशाही, विजापूरची आदिलशाही, राणा जयसिंग, पोर्तुगीज यांच्यावरही त्यांनी ग्रंथ लिहिले. 
संत तुकाराम महाराजांचा इतिहासकाराच्या दृष्टीने अभ्यास करणारे ते पहिलेच संशोधक होते. भगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद असणारी तुकाराम महाराज रचित 'मंत्रगीता' देखील बेंद्रे यांनी शोधून काढली, संपादित आणि प्रकाशित केली. तुकारामांचे चरित्र तीन खंडांमध्ये त्यांनी लिहून काढले. याशिवाय त्यांची अनेक इंग्रजी पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या ६० पेक्षा अधिक आहे. वयाच्या ९० व्या वर्षांपर्यंत त्यांचा अभ्यास आणि लिखाण सुरू होते.
आजही वा. सी. बेंद्रे यांचे ग्रंथ नवइतिहासकार प्रमाण मानतात. त्यांच्याकडे असणारी इतिहास अभ्यासदृष्टी आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या विस्कळीत इतिहासाला सुसंगत दिशा देणाऱ्या या इतिहासकाराची आज १४२ वी जयंती. त्यामुळे त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचे कार्य करणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. 

--- तुषार भ. कुटे



Saturday, February 13, 2021

इतिहासाचे भीष्माचार्य: वा. सी. बेंद्रे

शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये इतिहास या विषयाच्या अभ्यासाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते. किंबहुना महाराष्ट्रीय समाज आपल्या इतिहासापासून बराचसा वंचित होता. या काळात वि. का. राजवाडेंसारख्या इतिहासकारांनी शास्त्रशुद्ध इतिहास लेखनास सुरुवात केली. त्यांचाच वारसा चालवणारे इतिहास संशोधक लेखक व अभ्यासक म्हणजे वा. सी. बेंद्रे अर्थात वासुदेव सीताराम बेंद्रे होय. 


इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाला इतिहासाचे भीष्माचार्य म्हणून वा. सी. बेंद्रे यांची ओळख आहे. इतिहास कसा अभ्यासावा व त्याची लिखाण पद्धती कशी असावी? याची शास्त्रशुद्ध रचना व मार्गदर्शन वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केल्यास बेंद्रे यांचे अतिशय बहुमूल्य योगदान आपल्याला दिसून येते. त्यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९६ मध्ये रायगड जिल्ह्यातील पेण येथे झाला. त्यांचे एकंदरीत कार्य पाहता महाराष्ट्राच्या भूमी जन्मल्याचे भाग्य मराठी भाषिकांना लाभले, असेच म्हणावे लागेल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अर्थात शिवजयंती आपण मोठ्या उत्साहाने साजरी करतो. महाराष्ट्रभर किंबहुना पूर्ण भारतात व जगभरात शिवाजी महाराजांचे अनेक पुतळे व प्रतिमा आहेत. आज शिवाजी महाराज कसे दिसतात? हे सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु, शंभर वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. महाराष्ट्र पाठ्यमंडळाच्या इतिहासाच्या पुस्तकात निकोलावो मनुची या प्रवाशाने 'इब्राहिम खान' या सरदाराचे काढलेले चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र म्हणून छापले जात होते. त्या काळात शिवाजी महाराज यांचे हेच एकमेव चित्र अस्तित्वात होते. परंतु, वा. सी. बेंद्रे यांनी या चित्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, शिवाजी महाराजांच्या भोवती सर्व मुस्लिम सैनिक दिसत आहेत. यावरून ते शिवरायांचे चित्र नक्कीच नव्हते. त्यामुळे शिवाजी महाराज नक्की कसे दिसत होते, हे शोधण्याचा बेंद्रे यांनी प्रयत्न केला. इतिहासाचे विविध ग्रंथ चाळत असताना त्यांना मॅकेंझीने संपादित केलेल्या ग्रंथाचा भाग हाती लागला. इसवी सन १६६४ च्या सुरत मोहिमेच्या वेळी डच गव्हर्नर व्हॅलेंटाईन आणि शिवाजी महाराजांच्या भेटीदरम्यान यांचे काढलेले चित्र व व्हॅलेंटाईनचे पत्र वा. सी. बेंद्रे यांना या ग्रंथात मिळाले. शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक वर्णन व सदर चित्र जुळवल्यास हे चित्र शिवाजी महाराजांचे आहे, याची त्यांना खात्री पटली. याच चित्राचा आधार घेऊन आज अस्तित्वात असणारी शिवाजी महाराजांची विविध चित्रे तयार करण्यात आलेली आहेत.
शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासावर खऱ्या अर्थाने प्रकाशझोत टाकण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले. अनेक वर्षांपासून शिवपुत्र संभाजी म्हणजे व्यसनाधीन, व्याभिचारी, दुर्वर्तनी असा विविध नाटककारांनी तसेच कवींनी जनमानसासमोर रेखाटला होता. बेंद्रे यांसारख्या हाडाच्या इतिहासकाराला ही गोष्ट पटली नाही. म्हणूनच त्यांनी संभाजी महाराजांवर संशोधन करण्यास सुरुवात केली. भारतामध्ये शिवकालीन इतिहासाची साधने फारशी उपलब्ध नसल्याने त्यांनी युरोपियन साधनांचा जसे इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज साधनांचा अभ्यास करून संभाजी महाराजांचे चरित्र पूर्ण केले. यासाठी त्यांना जवळपास चाळीस वर्षे लागली! इसवी सन १९६० मध्ये बेंद्रे यांनी संभाजी महाराजांचे पहिले शास्त्रशुद्ध चरित्र मराठी माणसांसमोर आणले. त्यातून संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा खऱ्या अर्थाने मराठी जनांना समजली. छत्रपती संभाजी म्हणजे पराक्रमी, धोरणी, मुत्सद्दी, स्वाभिमानी, धर्मनिष्ठ, संस्कृत जाणकार अशा विविध रूपाने महाराष्ट्राला समजला. त्यांच्या जीवनातील सर्व विसंगती व कल्पोकल्पित कथा बेंद्रे यांनी खोडून काढल्या. इतिहासाचे पान न पान चाळून त्यांनी हे चरित्र लिहिले होते. याच चरित्राचा आधार घेऊन संभाजी महाराजांवर अनेक नाटके, कथा, कादंबऱ्या व आजच्या काळातील चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका लिहिल्या गेल्या आहेत. बेंद्रे यांचे हे योगदान मराठी माणूस कधीही विसरणार नाही. संभाजी महाराजांच्या मुळ समाधीचा शोधही वा. सी. बेंद्रे यांनीच लावला आहे. प्रारंभी संभाजी महाराजांची समाधी तुळापुर येथे आहे, असे समजले जात होते. परंतु, कालांतराने अनेक ऐतिहासिक संदर्भ शोधल्यानंतर विविध पुराव्यांच्या आधारे ही समाधी वढू बुद्रुक या गावापाशी आहे, असे बेंद्रे यांच्या लक्षात आले. आज त्या समाधीचे सुशोभीकरण करून उत्कृष्ट स्मारक करण्यात आलेले आहे.
केवळ छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी या विषयांचेच नाही तर मालोजीराजे, शहाजी राजे तसेच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे आणि छत्रपती राजाराम राजे यांचे चरित्र देखील वा. सी. बेंद्रे यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहिले आहे. याशिवाय कुतुबशाही व आदिलशाही सारख्या मुसलमानी शाह्यांचे देखील मराठीत लेखन करण्याचे कार्य वा. सी. बेंद्रे यांनी केले आहे. इतिहासकार कसा असावा? याचा वस्तुनिष्ठ पाठ बेंद्रे यांनी घालून दिला. इतिहास म्हणजे कादंबरी नाही, इतिहास म्हणजे नाटकही नाही, आजच्या परिभाषेत चित्रपट किंवा मालिकाही नाही. तर इतिहास शास्त्रशुद्ध पद्धतीने पुराव्यांचा आधार घेऊन लिहिलेला असतो, हेच वा. सी. बेंद्रे यांच्या लिखाणातून प्रतीत झाले. इतिहास कसा लिहावा, त्याचा अभ्यास कसा करावा, याची शास्त्रशुद्ध पद्धती मार्गदर्शक रूपाने त्यांनी "साधन चिकित्सा" नावाच्या पुस्तकामध्ये केली आहे. इतिहास संशोधकांची ती गीता मानली जाते. आज वा. सी. बेंद्रे यांची १२५ वी जयंती आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी यांच्या इतिहास संशोधनात मोलाची कामगिरी केलेल्या बेंद्रेंना महाराष्ट्रीय जनता सदैव स्मरणात ठेवेल, अशी आशा वाटते.

इब्राहिम खानचे चित्र

बेंद्रेंनी शोधलेले शिवाजी महाराजांचे पहिले चित्र