हर्णै बंदराच्या काठावर तीन किल्ले आहेत. अर्थात हे सर्व किल्ले आपण दोन ते
तीन तासांमध्ये सहज बघू शकतो. संध्याकाळच्या वेळेस आम्ही हर्णै बंदरावर
पोहोचलो होतो. सूर्य जवळपास मावळतीकडे झुकलेलाच होता. आधी कणकदुर्ग आणि
नंतर गोवादुर्ग किल्ला पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खरंतर इथे
येण्याचा येण्याचे उद्दिष्ट हे समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्याचेच
होते. परंतु संध्याकाळी जाऊन येण्यास उशीर लागत असल्याने आम्ही तो बेत रद्द
केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच किल्ला पाहण्याचे ठरवले. या योजनेप्रमाणे
आम्ही सकाळी हर्णै बंदरावर पोहोचलो. कणकदुर्गाच्या पायथ्याशी
सुवर्णदुर्गाच्या दिशेने जाणाऱ्या बोटी लागतात. याची चौकशी आम्ही कालच करून
ठेवलेली होती. त्यामुळे आज गेल्यागेल्या लगेचच बोटीने सुवर्णदुर्गाच्या
दिशेने निघालो. कणकदुर्गाचा समुद्राच्या दिशेने गेलेला सुळका ओलांडून
जवळपास १५ ते २० मिनिटांमध्ये आम्ही सुवर्णदुर्गापाशी पोहोचलो.
किनार्यापासून हा किल्ला एक किलोमीटर देखील आतमध्ये नसावा. अजूनही बांधणी
उत्तम स्थितीमध्ये आहे.
किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी आम्ही पोहोचलो
होतो. समुद्रकिनाऱ्यावर असते तशीच वाळू या ठिकाणी पसरलेली दिसली.
महाद्वाराच्या पायरीवर एक कासवाची प्रतिमा कोरलेली होती. तर उजव्या
बाजूच्या तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसून आली. ही मूर्ती
बऱ्यापैकी प्राचीन असावी, असे दिसले. किल्ल्याच्या नेहमीच्या रचनेप्रमाणे
प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवड्याही दिसून आल्या. आणि
त्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या. अर्थात आजही त्या
भक्कम स्थितीमध्ये आहेत. किल्ल्याची पूर्ण तटबंदी अजूनही उत्तम स्थितीमध्ये
असल्याची दिसते. अर्थात समुद्रकिनाऱ्यापासून लांब असल्याने किल्ला अजूनही
पाहण्यालायक आहे, असे दिसते. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर विहीर आणि काही
राजवाड्याचे अवशेष दिसून आले. तसेच धान्याचे कोठार देखील होते. बऱ्याच
ठिकाणी वाड्यांचे अवशेष दिसतात. आतली जमीन काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी
खोलगट असल्याची दिसली. पश्चिमेकडचा चोर दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे.
त्याच्याजवळ जाऊन बघितले. कदाचित इथून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता
असावा. एकंदरीत सहा ते सात विहिरी किल्ल्यावर होत्या. काही ठिकाणी
तोफेच्या नळ्या देखील दिसून आल्या.
असं म्हणतात की दर्यासारंग कान्होजी
आंग्रे यांची कुलदेवता असणारी कादंबिका देवी हिचे मंदिर त्यांनी कधीतरी
सुवर्णदुर्गावरून हलवून अलिबागच्या किल्ल्यामध्ये नेले होते. किल्ला
पाहण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन तास तरी लागतात. शिवाय इथून इथल्या
तटबंदीवरून अरबी समुद्र दूरवर क्षितिजापर्यंत दिसून येतो. इसवी सन १६६०
मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतल्याचे समजते.
शिवाय ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्याच्यासाठी महाराजांनी दोन हजार रुपये
खर्च केल्याचे देखील लिहिलेलं आहे.
Sunday, September 1, 2024
सुवर्णदुर्ग
Tuesday, August 27, 2024
केशवराज मंदिर
कोकणातील सर्व सुप्रसिद्ध मंदिरे ही समुद्रकिनाऱ्यावर वसलेली आहेत. जसे
गणपतीपुळे, वेळणेश्वर, कुणकेश्वर, हरिहरेश्वर इत्यादी. परंतु दापोलीतील
मागच्या भेटीमध्ये आम्हाला असे एक मंदिर मिळाले जे घनदाट झाडीमध्ये आणि
डोंगरावर वसलेले होते.
दापोलीच्या मुरुडमध्ये आमचा मुक्काम होता. इथूनच
सुमारे ११ किलोमीटर अंतरावर असूद गाव आहे. गावातील व्याघ्रेश्वर-गारंबी
रस्त्यावर काही अंतरावर डावीकडे खालच्या दिशेने जाणारा एक रस्ता दिसून
येतो. या पायवाटेने आम्ही चालत चालत जंगलामध्ये प्रवेशकर्ते झालो. कोकणातील
इतर जंगलांप्रमाणे हे देखील एक घनदाट जंगल होते. सुरुवातीला पायवाट
उताराच्या दिशेने जाणारी होती. दाट झाडी असली तरी बऱ्यापैकी मनुष्यवस्ती या
ठिकाणी दिसून आली. आजूबाजूला नारळी, पोफळी, सुपारी आणि फणसाची झाडे जी
कोकणामध्ये निसर्ग अस्तित्वाच्या पाऊलखुणा आहेत, दिसून येत होते. सात ते आठ
मिनिटांमध्ये आम्ही उतार संपवून सपाटीवर पोहोचलो. समोर एक निर्जल ओढा
होता. यावर सुंदरसा पूल देखील बांधलेला होता. ओढ्यातील खडकांची रचना पाहता
पावसाळ्यामध्ये इथे वेगाने पाणी वाहत असावे, असे दिसले. ओढा संपला आणि
पुन्हा चढण सुरू झाली. इथून पुढे बऱ्यापैकी पायऱ्यांची रचना केलेली होती.
जितकी उतरण आम्ही उतरून आलो तेवढीच चढण चढून डोंगराच्या दिशेने निघालो
होतो. अगदी पाचच मिनिटांमध्ये मंदिरापाशी पोहोचलो. मंदिर पूर्ण घनदाट
जंगलामध्ये असले तरी आजूबाजूला बऱ्यापैकी मनुष्यवस्ती होती. विष्णूचे हे
केशवराज मंदिर चहूबाजूंनी वनराईने घेरलेले दिसले. कदाचित अलीकडच्या काळात
मंदिराभोवती दगडांचे कुंपण देखील केले असावे. त्याला एक छोटासा दरवाजा
होता. त्यातून आत गेल्यावर उजव्या बाजूला एक पाण्याचा खळाळता प्रवाह देखील
दिसून आला. समोरच दिसत असलेल्या एका गोमुखातून हे पाणी वेगाने खाली पडत
होते. तो एक पाण्याचा जिवंत झरा होता. मागील बाजूच्या डोंगरावरून हे पाणी
२४ तास मंदिराच्या कडेने वाहत खाली जात होते. शिवाय हे पाणी पूर्णपणे
पिण्यायोग्य होते. निसर्गाच्या कुशीतून वाहणारे असे थंड पाण्याचे झरे
सह्याद्रीच्या रांगेत बऱ्याच ठिकाणी दिसून येतात. याची शितलता आणि स्वच्छता
कदाचित बाटलीतल्या पाण्याला देखील येत नाही.
मंदिरामध्ये आम्ही काही काळ व्यतीत केला. इथल्या निसर्गराईचा आनंद घेतला. आणि पुन्हा परतीच्या वाटेला लागलो.
Thursday, July 27, 2023
गोवादुर्ग
गोवा नावाचा किल्ला महाराष्ट्रामध्ये आहे याची माहिती आम्हाला नव्हती.
हर्णै बंदरावर पोहोचलो तेव्हा इथे कणकदुर्ग आणि गोवादुर्ग नावाचे दोन
किल्ले आहेत, असं समजलं. समुद्रामध्ये जो चिंचोळा भूभाग प्रवेश करतो तो
कणकदुर्ग होय आणि त्याच्याच अलीकडे गोवादुर्ग किल्ला आहे. कणकदुर्गवर भेट
देऊन परतताना या गोवा किल्ल्यावर जावे असे ठरवले. संध्याकाळी सूर्य
मावळायला आला होता. तो पूर्ण गुडूप होण्याच्या आधी या किल्ल्यावर पोहोचावे,
म्हणून आम्ही लगबगीने कणकदुर्गावरून निघालो. गोवा किल्ल्यापाशी पोहोचलो
तोवर सूर्य मावळलेला नव्हता. मी झपझप पावले टाकत किल्ल्याच्या मुख्य प्रवेश
दारातून आत गेलो आणि एका तटबंदीवर जाऊन सूर्याच्या मावळतीचा तो नजारा
न्याहाळू लागलो. इथून समोर समुद्रात दिसणाऱ्या सुवर्णदुर्गवरून सूर्य
मावळतीकडे चाललेला होता. अर्थात हा नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपायचा मोह मला
आवरला नाही. सूर्य मावळल्यानंतर देखील सायंप्रकाशात आम्ही किल्ला पाहून
घेतला. कनकदुर्गपेक्षा बऱ्यापैकी चांगले अवशेष अर्थात किल्ला म्हणावा असे
अवशेष अजूनही गोवादुर्गवर दिसून येतात. तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या,
प्रवेशद्वारे आणि त्यावरील शिल्पे या खुणा किल्ल्यावर अजूनही त्याच्या
ऐतिहासिकतेची साक्ष देत आहेत. या किल्ल्याची पुनर्बांधणी करून तो आणखी
व्यवस्थित करता येऊ शकतो.
मध्यभागी असणाऱ्या ध्वजस्तंभापाशी गेलो की इथून कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्गासहित हर्णै बंदरही व्यवस्थित दिसून येते.
Tuesday, July 18, 2023
कणकदुर्ग
दापोलीच्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून पश्चिमेकडे समुद्रामध्ये आत आलेला भूभाग नजरेस पडतो. दापोलीच्या दोन दिवसांच्या वास्तव्यामध्ये या ठिकाणी पण जाऊन यायचे ठरवले. हा एक किल्ला होता. माशांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हर्णै बंदरावर स्थित असलेला हा किल्ला म्हणजे कणकदुर्ग होय.
दुपारचे ऊन ओसरल्यानंतर आम्ही हर्णै गावात पोहोचलो. माशांचं बरंच मोठं मार्केट या ठिकाणी आहे. सगळीकडे माशांच्या वासाचा नुसता घमघमाट पसरलेला होता. आमच्यासारख्या शाकाहारी लोकांना या वासाची किळस वाटते! तरीही त्यातून माग काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. हर्णै बंदराचा समुद्रकिनारा नक्की कसा आहे(?), हे तिथे भेट दिलेल्या अनेकांना माहीत असेलच. याच रस्त्याने माग काढत आम्ही कणकदुर्गपाशी येऊन पोहोचलो. सूर्य मावळतीकडे चाललेला होता. बंदरावर नेहमीप्रमाणेच लगबग आणि गोंगाट दिसून येत होता. समुद्रात जो चिंचोळा डोंगर प्रवेश करतो त्या रस्त्याने आम्ही पुढे आलो. याठिकाणी किल्ल्याचे कोणतेच अवशेष दिसून आले नाही. आजच्या काळात बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या मात्र होत्या. त्या चढून वरती गेलो. समोरच समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला नजरेस पडला. याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी समुद्रकिनाऱ्यावर हर्णै बंदरावर तीन किल्ले बांधले होते, असं ऐकलंय. त्यातीलच हा एक किल्ला होय. येथून संध्याकाळचा सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. केशरी सुर्यकिरणे समुद्राच्या पाण्यावर विविध रंगछटा तयार करतात. सूर्य पूर्णपणे मावळत नाही तोपर्यंत हा नजारा केवळ पाहतच राहावा, असा दिसतो. तीनही बाजूंनी समुद्र आणि एका बाजूने किल्ल्यावर येणारी पायवाट एवढेच नजरेस पडतं.
Friday, June 9, 2023
महर्षी कर्वे जन्मस्थळ
सकाळी रत्नागिरीच्या मुरुड गावामध्ये पोहोचलो, त्यादिवशी सुट्टीचा दिवस नसल्यामुळे गावात पर्यटकांची फारशी रेलचेल नव्हती. गावातील जिल्हा परिषद शाळा महर्षी कर्वे यांच्या नावाने उभारलेली आहे. या शाळेच्या जवळच त्यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्या दिवशी या पुतळ्याभोवती फुलांची आरास केलेली होती. तेव्हा समजले की आज महर्षी कर्वे यांची जयंती आहे. भारतरत्न मिळालेल्या या महान व्यक्तीच्या गावात त्यादिवशी आम्ही पहिल्यांदाच आलो. कोकणाने या देशाला अनेक मोठी व्यक्तिमत्वे दिलेली आहेत. त्यातीलच एक महर्षी कर्वे होय. स्त्री शिक्षणच्या प्रणेत्यांपैकी एक असणाऱ्या कर्वे यांच्या मुरुड गावात काही विसाव्याचे क्षण घालवले.








































