माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label रत्नागिरी तालुका. Show all posts
Showing posts with label रत्नागिरी तालुका. Show all posts

Tuesday, August 26, 2025

आरे बीच

सुमारे सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा गणपतीपुळ्याला आलो तेव्हा पहिल्यांदा रत्नागिरी आणि मग गणपतीपुळे प्रवास केला होता. या दोन्ही गावांमधला सुमारे २० किमीचा हा प्रवास. यामध्ये साखरतर आणि आरे-वारे सारखी गावे लागतात. आरे-वारेचा समुद्रकिनारा कोकणातील लोकप्रिय किनाऱ्यांपैकी एक. यानंतर देखील आम्ही बऱ्याचदा या रस्त्याने गेलो. परंतु या समुद्रकिनाऱ्यावर जाण्याचा योग आला नाही. त्या दिवशी मात्र ठरवून आरेच्या किनाऱ्यावर भटकंती केली. शनिवार असल्याने पर्यटकांची बऱ्यापैकी वर्दळ होती. शिवाय आता या ठिकाणी झिपलाईन पर्यटनाचा देखील आनंद घेता येतो. म्हणून बऱ्यापैकी पर्यटक जमा झालेले होते. किनाऱ्यावरील एका घनदाट झाडीच्या मागे पांढऱ्या वाळूचा हा सपाट प्रदेश आहे. परंतु नेहमीप्रमाणे पर्यटकांनी टाकलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्या मधूनच तो ओलांडावा लागतो. वेळ कमी असल्याने यावेळी पाण्याच्या प्रवाहापर्यंत पोहोचता आले नाही. परंतु  झिपलाईनवरून खाली येणाऱ्या उत्साही पर्यटकांकडे बघत आम्ही किनाऱ्याच्या दिशेने चालू लागलो. या बाजूला बऱ्यापैकी सुंदर शिंपल्यांची आरास दिसून आली. अशी शिंपल्यांची नैसर्गिक आरास त्या दिवशी मी पहिल्यांदाच पाहिली. थोड्याच वेळात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली होती. अर्थात त्यांचा वेग वाढण्यापूर्वीच आम्ही तेथून काढता पाय घेतला.






 
 

Monday, July 14, 2025

गणपतीपुळे सकाळ

मागच्या वेळी ज्या हॉटेलमध्ये थांबलो त्याच ठिकाणी याही वेळी आम्ही मुक्काम केला. पावसाळी दिवस असले तरी मुलांच्या सुट्ट्या संपत आल्याने त्यांचा पुरेपूर उपभोग घेण्यासाठी आलेली बरीचशी मंडळी गणपतीपुळ्यामध्ये वावरताना दिसली. अर्थात याही वेळी गर्दी आमचा पिच्छा सोडत नव्हती. सकाळी साडेसहाच्या दरम्यान जाग आली. बाहेर वातावरण ढगाळ झाले होते. कदाचित रात्री पाऊस पडून गेला असावा. नेहमीप्रमाणे सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गणपतीपुळ्याच्या रस्त्यांवर चालू लागलो. गावाच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारापर्यंत चालल्यानंतर पुन्हा मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता घेतला. याच्या डाव्या बाजूला मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग आहे. हे त्यादिवशी पहिल्यांदाच समजले! म्हणजे यापूर्वी गणपतीपुळे नीट निरखून पाहिले नव्हते, हे निश्चित. या मार्गाला समांतर चालत मंदिरापर्यंत आलो. मागच्या वेळेपेक्षा यावेळी बऱ्यापैकी गर्दी होती. हा किनारा असा एक किनारा आहे जिथे बीच फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा जास्त भाविकांची संख्या असते. आणि ते देखील समुद्रकिनाऱ्यावर फिरण्याचा आणि तिथल्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतात. यावेळी मात्र त्यांची संख्या जास्त होती. विशेष म्हणजे ऊन काहीच नव्हते, वातावरण पूर्णतः ढगाळ. हवेमध्ये गारवा तयार झालेला. त्यातही कोकणातील दमट वातावरण लगेच प्रभाव पडत होते.
किनाऱ्यावर मंदिराच्या दिशेने चालत चालत मी मंदिराच्याच पायऱ्यांवर जाऊन बसलो. अर्थात या बाजूने कुलूप लावलेले असल्याने मंदिरातून कोणालाही बाहेर पडता येत नाही. फक्त ते तिला समुद्र पाहू शकतात. म्हणूनच माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. ही अशी जागा होती जिथे समुद्राकडे बघत तंद्री लावून सातत्याने बसू शकतो. शिवाय किनाऱ्यावरची पर्यटकांची वर्दळ बऱ्यापैकी दूरवर होती. त्यांचे वेडे चाळे तिथून मात्र स्पष्ट दिसत होते. समुद्र आपल्या भरतीच्या मूडमध्ये जाणवला. त्याच्याकडे बघितल्यावर नेहमीप्रमाणे ज्या भावना मनामध्ये येतात त्या त्यादिवशी देखील  पुनश्च जागृत झाल्या. मागच्या बाजूला मंदिरातील घंटेचे आवाज भाविकांचा गजबजाट आणि समोर सौम्य पण काही काळ रौद्ररूप धारण केलेल्या समुद्र लाटा. त्यांच्या सहवासात बराच काळ तिथेच बसून होतो.



 

Monday, November 11, 2024

केशवसुत स्मारक

मराठी भाषेच्या सारस्वतांपैकी कोकणामध्ये जन्मलेले कवी म्हणजे केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले होय. गणपतीपुळ्याजवळचे मालगुंड हे त्यांचे जन्मगाव. यंदा दुसऱ्यांदा गणपतीपुळ्याला आलो. आणि मागच्या वेळेप्रमाणे याही वेळी मालगुंडमधील केशवसुतांच्या स्मारकाला भेट दिल्याशिवाय राहवले नाही. साहित्यिकाचे गाव, घर, परिसर कसा असतो? त्याची उत्सुकता सर्वांनाच असते. अर्थात ती आम्हाला देखील होती. या गावात आल्यानंतर केशवसुतांवर इथल्या नयनरम्य परिसरामध्ये नक्कीच निसर्ग संस्कार झाले असावेत, याची अनुभूती आली.
गणपतीपुळ्यापासून दोनच किलोमीटर अंतरावर मालगुंड वसलेले आहे. गावात प्रवेश केल्यानंतर मध्यवर्ती ठिकाणी डावीकडे समुद्राच्या दिशेने जाणारा एक रस्ता लागतो. इथून अगदीच काही शे मीटर अंतरावर केशवसुतांचे दुमदार घर दिसून येते. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकारातून त्याचे संवर्धन आणि जतन केले आहे. कोकणातील अन्य वैशिष्ट्यपूर्ण घराप्रमाणेच या घराची रचना दिसून येते. आपण या स्मारकात प्रवेश करतो तिथे समोरच मोठ्या अक्षरांमध्ये केशवसुतांचे नाव लिहिलेले आहे. याच खोलीमध्ये केशवसुतांचा जन्म झाला होता. आजही या घराची रचना तत्कालीन परिस्थितीनुरूप जतन करून ठेवल्याचे दिसते. याच्या मागच्याच बाजूला केशवसुतांच्या अनेक कवितांच्या कोनशीला बसविलेल्या आहेत. कोणीही मराठी भाषाप्रेमी या कविता वाचताना दंग होऊन जाईल. या कोनशीला संग्रहालयाच्या समोरच केशवसुतांच्या ‘तुतारी’ या कवितेचे शिल्प सुबक पद्धतीने तयार केल्याचे दिसते. एक अर्थाने त्यांच्या या रचनेला केलेला हा मानाचा मुजराच आहे. स्मारकाच्या शेवटी एका छोट्याखानी इमारतीमध्ये डावीकडे मराठी ग्रंथालय आहे, तर उजवीकडे मराठी कवींचे एक दालन तयार केलेले आहे. या दालनामध्ये आपल्या इतिहासात नोंद घ्यावी अशा मराठी कवींची रेखाचित्रे व त्यांच्या प्रमुख रचना लिहिलेल्या दिसतात. आपली भाषा ज्यांनी समृद्ध केली, त्यांचे आठवण म्हणून हे दालन आपण निश्चित पाहू शकतो.
एकंदरीत साहित्याशी निगडित हा परिसर असल्याने या ठिकाणी पर्यटकांची कधीच गर्दी नसते! अतिशय निवांतपणे आपण हा परिसर न्याहाळू शकतो, इथे फिरण्याचा अनुभव घेऊ शकतो, इथल्या कविता वाचू शकतो आणि इथल्या ग्रंथालयामध्ये पुस्तक वाचन देखील करू शकतो. कोणत्याही मराठी भाषाप्रेमीने किमान एकदा तरी भेट द्यावी असा हा परिसर आहे.


















 

Sunday, November 3, 2024

जयगड फेरीबोट

रायगडच्या अलिबाग पासून तर सिंधुदुर्गातील शिरोड्यापर्यंत बहुतांश कोकण आम्ही फिरलो होतो. परंतु एकाही ठिकाणी फेरीबोटने जाण्याचा अनुभव घेतला नाही. अखेरीस त्या दिवशी तो योग आला. वेळणेश्वरमध्ये मनासारखे हॉटेल न मिळाल्याने आम्ही येथून जवळच असणाऱ्या गणपतीपुळेला जाण्याचा विचार केला. अंतर होते ३७ किलोमीटर.
समुद्रकिनाऱ्यावरच्या रस्त्याने मार्गक्रमण करत आम्ही गणपतीपुळेच्या दिशेने निघालो. तवसाळ या किनाऱ्यावरील गावापाशी आल्यावर येथून जयगडच्या दिशेने फेरीबोट घेण्याचे योजिले. त्यादिवशी हा आमचा पहिलाच अनुभव होता. जलप्रवाहाला मोठा वळसा घालून जाण्याऐवजी फेरीबोटीचा प्रवास सोयीस्कर होता. आमची गाडी बोटीवर चढवली आणि आम्ही देखील प्रवासाला सज्ज झालो. तवसाळच्या किनाऱ्यावरून समोरच जयगड किल्ला दिसतो. इथे जेएसडब्ल्यू कंपनीचे बंदर आहे, तसेच समोरच जयगडचे दीपगृह देखील नजरेस पडले. आमचा प्रवास सुरू झाला तेव्हा वातावरण ढगांनी भरून आलेले होते. वारा देखील काहीसा वाहत होता. म्हणूनच अधूनमधून लाटा उसळत होत्या. समुद्रात बोटींची गर्दी दिसून आली. रंगीबेरंगी झेंडे लावलेल्या बोटी चहुदिशांनी फिरत होत्या. समुद्रातल्या त्या प्रवासाचा आनंद घेत आम्ही निघालो. अगदी अर्ध्याच तासाच्या अंतराने आम्ही जयगडच्या किनाऱ्यावर लागलो. जय
गड किल्ल्यावर पाच ते सहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा आलो होतो. त्याच्या जवळच्या रस्त्याने वळसा घालून गणपतीपुळेच्या दिशेने मार्गक्रमण चालू केले.

 





Sunday, October 27, 2024

कातळशिल्प

महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पूर्व भागातील डोंगरांमध्ये प्राचीन काळी खोदलेल्या लेण्या आढळतात तशीच कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये काळ्या पाषाणातील भूभागावर कोरलेली कातळशिल्पे देखील आढळतात. यापूर्वी बातम्यांमधून, लेखांमधून मी याविषयी वाचले व ऐकले होते. परंतु यंदाच्या गणपतीपुळ्याच्या भेटीमध्ये पहिल्यांदाच हे कातळशिल्प पाहायला मिळाले. गणपतीपुळे ते संगमेश्वर रस्त्यावर अगदी थोड्याच अंतरावर डावीकडे रस्त्यालगतच अशाच प्रकारचे एक कातळशिल्प कोरल्याचे दिसते. अगदी अलीकडच्याच काळामध्ये त्या भोवती संरक्षणभिंत देखील बांधलेली दिसून येते. काळ्या पाषाणातील जमिनीवर दहा हजारपेक्षा अधिक वर्षांपूर्वी हे कातळ शिल्प कोरले असावे असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. आम्ही या ठिकाणी पाहिलेले शिल्प हे मानवी आकृतीशी जुळत होते, परंतु ती आकृती मानवाची देखील नव्हती. त्याच्या शेजारीच आणखी एका प्राण्याचे शिल्प देखील दिसून आले. या कातळ शिल्पांचा निश्चित अर्थ अजूनही पुरातत्ववेत्यांना लागलेला नाही. पण कोकणाच्या प्राचीन इतिहासामध्ये त्यांचं निश्चित काहीतरी वेगळं स्थान असणार हे मात्र निश्चित. इंटरनेटवर शोधलेल्या माहितीनुसार अशी बरीच विविध प्रकारची शिल्पे कोकणामध्ये सापडलेली आहेत.  आमची अजूनही बरीच कातळ शिल्पे पहायची बाकी आहेत. कदाचित पुढच्या भेटीमध्ये ही मनोकामना पूर्ण होऊ शकेल.