आळेफाट्याहून पुणे-नाशिक मार्गाने आळेखिंडीकडे जाताना डाव्या बाजूला एका उंच डोंगरावर कळमजाईचे मंदिर आहे. जुन्नर तालुक्यातील बहुतांश ठिकाणावरून हे मंदिर दिसून येते. त्यादिवशी मंदिरापलीकडील गव्हाळ्या डोंगराच्या माथ्यावर ढगांची बरीच गर्दी जमली होती. वारे देखील सुटले होते. वातावरणात थंडावा वाढत चाललेला होता. अशा नेत्रदीपक आणि आल्हाददायक वातावरणात कळमजाईचे हे मंदिर उठून दिसत होते. पुणे आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर आणि वडगाव आनंद गावात असणाऱ्या या मंदिराकडे जाण्यासाठी पायथ्यापासून छोटासा ट्रेक करत जावे लागते. शिवाय याच वाटेच्या उजव्या बाजूने एक डांबरी रस्ता देखील मंदिराच्या दिशेने जातो. या रस्त्याने आपण आधी नगर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये प्रवेश करतो आणि पुन्हा मंदिरापाशी आल्यावर जुन्नर तालुक्याच्या अर्थात पुणे जिल्ह्याच्या सीमारेषेमध्ये परततो. एका विस्तीर्ण वटवृक्षाला लागून असणारे हे मंदिर कौटुंबिक सहलीसाठी एक उत्तम स्थळ आहे.
Wednesday, November 19, 2025
Saturday, April 5, 2025
मांगणी देवी मंदिर
जवळपास दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा हडसर किल्ल्यावर गिर्यारोहण करण्याची संधी मिळाली. वातावरण पावसाळी होते. त्यामुळे आजूबाजूचा पूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावरून समोरच्या हिरव्यागार डोंगररांगा ढगांच्या गर्दीमध्ये न्याहाळताना एका टोकावर एक मंदिर दृष्टीस पडले. हे मांगणी देवी मंदिर. तेव्हापासूनच या डोंगराच्या टोकावरील मंदिरात जाऊन यावे, असे वाटत होते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये योग आला नाही. एक दिवस मी एकट्यानेच या डोंगराच्या टोकावर जाण्याचे ठरवले. मांगणेवाडी हे या डोंगराच्या पायथ्याचे गाव. जुन्नरचा गणेशखिंड घाट याच डोंगरामध्ये आहे. गणेश खिंडीच्या पश्चिमेला असणाऱ्या डोंगराच्या टोकावर मांगणी देवीचे हे मंदिर स्थित आहे.
सकाळच्या प्रहरी साडेसहाच्या दरम्यान गावातून वाट काढत मी डोंगर सर करायला सुरुवात केली. उन्हाळा असल्याकारणाने रस्त्याच्या आजूबाजूला केवळ वाळलेले गवत होते. त्यामुळे वाट देखील व्यवस्थित दिसत होती. परंतु आजूबाजूला चिटपाखरू देखील नव्हते. वळणावळणाच्या त्या रस्त्याने मार्ग काढत मी पहिल्या टप्प्यावर येऊन पोहोचलो. त्या ठिकाणावरून नाणेघाटापर्यंतच्या डोंगररांगा दृष्टीस येत होत्या. आणि समोरच आणखी एका उंचवट्यावर मांगणी देवीचे मंदिर देखील दिसून आले. अगदी काही मिनिटांमध्येच मी डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर अर्थात मंदिरापाशी पोहोचलो. तिथून दिसणारा नयनरम्य परिसर कदाचित शब्दांमध्ये मांडणे निश्चितच अवघड होते. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला जवळजवळ पूर्ण जुन्नर तालुका, इथले किल्ले, डोंगररांगा, पाणीसाठे तसेच छोटी छोटी गावे स्पष्ट दिसत होती. त्यामुळे इथला व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवरला नाही.
--- तुषार भ. कुटे
Sunday, December 31, 2023
दुधारी डोंगर
शिरोलीच्या या दुधारी डोंगरावर मी यापूर्वी अनेकदा एकट्यानेच ट्रेकिंग केलेली आहे. पण यावेळेस पहिल्यांदाच एका धारेने चढाई तर दुसऱ्या धारेने खाली उतरलो. कदाचित याच दोन पायवाटांमुळे या डोंगराला दुधारी असे म्हणत असावेत. हिवाळ्यातल्या एका शीतल सकाळी चढाई करताना फारशी दमछाक झाली नाही. यावेळेस मागील वेळेपेक्षा पाच मिनिटे लवकरच टोकावर पोहोचलो.
सकाळच्या प्रहरी आजूबाजूच्या परिसरात फारसा गोंगाट जाणवत नाही. त्या दिवशी देखील तो नव्हता. अगदी दोनच मिनिटात दुसऱ्या बाजूने डोंगर उतरायला सुरुवात केली. ही वाट तशी मळलेली आहे. परंतु या मार्गाने मी पहिल्यांदाच खाली उतरत होतो आणि महत्त्वाची म्हणजे या बाजूला उतार कमी आहे. म्हणूनच त्याचे अंतर देखील जास्त आहे. उतरताना रस्त्याला एका ठिकाणी एक बोराचे झाड दिसून आले. ते बोरांनी पूर्ण लगडलेले होते. त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी किंबहुना बऱ्याच वर्षांनी अशी रानटी बोरे खायला मिळाली. खाली उतरताना रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. हमरस्त्याला लागलो तिथे देखील कोणीही दिसून आले नाही. एक चांगला भला मोठा रस्ता गावाच्या दिशेने जातो. याच्या आजूबाजूला उसाची, कांद्याची, डाळिंबाची शेती आहे. सूर्य बऱ्यापैकी वर आलेला असला तरी वातावरणातील या ठिकाणची शांतता काहीशी भयावह अशीच होती. बिबट्यांचे निवासस्थान असणाऱ्या आमच्या जुन्नरमध्ये दिवसा देखील त्याचे दर्शन होते. कदाचित तो अशाच कुठल्यातरी शेतामध्ये लपलेला असावा, असं वाटून गेले आणि दुधारी डोंगराचा हा प्रवास सुफल झाला.
Monday, September 19, 2022
लेण्यांतील महादेव
लहानपणीपासूनचा तो आमचा ओळखीचाच डोंगर होता. रात्रीच्या अंधारात त्याचा काळाकभिन्न आकार देखील ओळखीचा झाला होता. परंतु काही महिन्यांपासून त्याच्यावर रात्री लाईटचे खांब दिसायला लागले. दिवसा इतक्या दुरून ते दिसत नव्हते. परंतु रात्रीच्या अंधारामध्ये तिथल्या दिव्यांचा प्रकाश व्यवस्थित दिसून यायचा. वरती जाणाऱ्या रस्त्यावर हे विजेचे खांब लावलेले होते. वीज मात्र पूर्ण डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलेली नव्हती. मध्यभागाच्या खालीच शेवटचा खांब दिसत होता. म्हणजेच त्या भागामध्ये कुठलेसे मंदिर निश्चितच होते. मग एक दिवस ठरवले की या मंदिराला भेट देऊन यायची.
गुगल मॅपवर त्याचा माग घेतला तेव्हा समजले की इथे एक छोटीशी गुहा आहे आणि त्या गुहेमध्ये मंदिर बांधलेले आहे. मग एक दिवस सकाळीच मॉर्निंग वॉकच्या उद्देशाने या डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालू केले. मुंबईच्या दिशेने जाताना पिंपरी पेंढार गाव सोडले की लगेचच उजवीकडे जाणारा एक छोटेखानी काँक्रीटचा रस्ता लागला. अगदी थोड्याच अंतरावर त्याला पुन्हा दोन फाटे फुटलेले दिसले. उजवीकडचा रस्ता डोंगरापलीकडील म्हसवंडी गावामध्ये जातो. तर डावीकडचा पिंपरी पेंढार मधील खारावणे या वस्तीच्या दिशेने जातो. हाच रस्ता पकडला आणि पुढे चालू लागलो. थोड्याच अंतरावर वाडीची मुख्य वस्ती लागली. तशी बऱ्यापैकी मोठी वस्ती या ठिकाणी दिसून येत होती. वस्ती संपली की एक कच्चा रस्ता डोंगराच्या दिशेने जाताना दिसला.
सकाळच्या प्रहरी या रस्त्यावर चिटपाखरू देखील नव्हते. सूर्य वर आलेला. परंतु ढगांमागे झाकोळलेला होता. त्याची किरणे अधून मधून पडत. परंतु पावसाळी वातावरणामुळे बहुतांश तो झाकलेलाच दिसत होता. वातावरण तसं शांत होतं. रमतगमत प्रवास करण्यासारखा तो परिसर होता आणि त्याला वातावरणाची देखील साथ लाभली होती. थोड्याच अंतरावर डावीकडे एक छोटासा पाझर तलाव दिसून आला. पावसाळ्याची ही सुरुवातच होती. त्यामुळे अगदी कमी प्रमाणात पाणी त्यामध्ये साठलेले दिसले. विविध पक्षांची रेलचेल आजूबाजूच्या झाडांवर दिसून येत होती. निसर्गाचे ते मनमोहक संगीत ऐकत काही काळ तिथेच उभा राहिलो. पक्ष्यांना ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. नावाचं काही घेणेदेणे नव्हतं पण त्यांचे ते निरनिराळे आवाज मन तृप्त करत होते. कदाचित त्यांनाही माझी चाहूल लागली असावी. म्हणूनच थोड्याच वेळात एका मोठ्या थव्याने तेथून काढता पाय घेतला. आता समोरच्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या देवराईमधून पक्षांचा किलकिलाट ऐकू येत होता. अंतर बरंच असलं तरी वातावरणातल्या त्या नैसर्गिक शांततेमध्ये तो आवाज मन प्रसन्न करत होता.
मग असाच पुढे चालू लागलो. थोडीशी वस्ती देखील तिथे होती. इथूनच उजव्या बाजूला देवराईची सुरुवात होती. प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना कधीतरी आमची सहल या भागात आली होती. त्यानंतर बहुतेक २५ ते ३० वर्षांनी मी या ठिकाणी आलो होतो! जुन्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न केला. कदाचित याच ठिकाणी बसून आम्ही खेळ खेळलो होतो आणि रमत गमत डबे देखील संपवले होते! आज तो भाग पूर्णपणे देवराईने फुललेला होता. त्या देवराईच्या कडेकडेने गेल्यावर एका ठिकाणी डाव्या बाजूला जाणारा रस्ता होता. कुणाचं तरी बरंच मोठ शेतीक्षेत्र या ठिकाणी दिसून आलं. शिवाय गावठी गायींचा एक मोठा गोठा देखील होता. तो मागे पडल्यावर थोड्याच अंतरावर उजव्या दिशेला जंगलामधून डोंगराच्या दिशेने जाणारा जाणारी एक मस्तपैकी रुळलेली पायवाट दिसून आली. या क्षणी त्या पूर्ण परिसरामध्ये मी एकटाच मनुष्यप्राणी होतो!
जंगल तसं फारसं घनदाट नव्हतं. शिवाय पशुपक्ष्यांच्या आवाजामध्ये तिथली नैसर्गिक शांतताही जास्त भंग पावत नव्हती. वाटसरूंचा हा नेहमीचा रस्ता असल्याचे दिसत होते. म्हणून मी देखील हिमतीने त्या जंगलातल्या वाटेने चालू लागलो. आता दूरवरून मोरांच्या ओरडण्याचे देखील आवाज येऊ लागले होते. कुठेतरी माकडांची मस्ती चालू होती. त्यामुळे झाडांचे शेंडे हलताना दिसायचे. अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये काँक्रिटच्या पायऱ्या दिसायला लागल्या. लेण्यांच्या दिशेने जाण्यासाठी गावकऱ्यांनीच या पायऱ्या बांधल्या असाव्यात. पायऱ्यांचा रस्ता हा पूर्ण नव्हता. मध्येच चांगली पायवाट लागायची आणि काही ठिकाणी खोदलेल्या पायऱ्या दिसत होत्या. या पायऱ्या चढत वर आल्यानंतर जंगलाची तीव्रता काही अंशी कमी झालेली दिसली. मागे पाहिले तर बऱ्यापैकी मोठा परिसर दृष्टिक्षेपामध्ये आलेला होता. ज्या मुख्य रस्त्यावरून आतमध्ये वळालो तो राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ देखील येथून दिसायला लागला होता. आपल्या शेती क्षेत्रावर विविध कामे करणारे शेतकरी देखील आता दिसत होते.
डोंगराच्या दिशेने मार्गक्रमण चालूच ठेवले. वळणावळणाचा आणि चढणीचा तो रस्ता दहा मिनिटांमध्येच सपाटीवर आला. उजव्या बाजूला थोडे चालत गेल्यानंतर डोंगराला असणारी ती अनारम्य नैसर्गिक गुहा दिसायला लागली. पर्वताच्या पोटामध्ये असणारं ते नैसर्गिक लेणं त्याचा नैसर्गिकपणा जपून होतं. याच लेण्यांमध्ये शिवलिंगाची स्थापना केल्याचे दिसले. आजच्या युगातील टाइल्स आणि सिमेंटचा लेप लावून लेण्यांमध्ये मंदिर सजवलेलं होतं. सकाळी सकाळी कुणीतरी येथे दिवा लावून गेलं होतं. मी पोहोचलो त्यावेळेस मात्र हा परिसर पूर्णतः निर्मनुष्य होता. शांत आणि निवांत होता. डोंगराच्या पोटामध्ये आपण बसलेलो आहोत आणि समोर अख्खा तालुका न्याहाळत आहोत, असं भासत होतं. पशु-पक्षांची किलबिल अजूनही निसर्ग संगीत तयार करीत होतं आणि खालच्या घनदाट जंगलामध्ये मोरांचे चित्कार देखील अधून मधून ऐकू येत होते. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला आवडेल अशीच ती अद्भुत जागा होती. शिवाय पावसाळी वातावरण असल्याने वातावरणातील आल्हादपणा मन एकाग्र करायला मदत करीतच होता.
बराच वेळ तिथेच शांतपणे बसून राहिलो. अजूनही एक चतुर्थांश डोंगर चढलेलो होतो. म्हणजेच अजूनही बराचसा डोंगर चढायचा बाकी होता. या डोंगराच्या मुख्य माथ्यावर काय असावे? ही उत्सुकता मला देखील होती. मघाशी थोडं चढून आल्यावर जिथे डावीकडे वळालो त्याच ठिकाणी उजवी दिशेने जाणारा देखील एक रस्ता होता. कदाचित तोच डोंगर माथ्याकडे जात असावा.
अजूनही परतीसाठी बराच वेळ होता म्हणून डोंगर माथ्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. लेण्यांपासून परत फिरताना जाणारा रस्ता याच डोंगराला काहीसा वळसा मारून वरच्या दिशेने जातो. हा वळसा पूर्ण झाला. त्या ठिकाणी सरळसोट रस्ता डोंगर माथ्याच्या दिशेने जाताना दिसला. डोंगराच्या मागच्या बाजूने बहुतांश परिसर दृष्टीक्षेपात येत होता. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा, नारायणगाव, ओतूर आणि जुन्नर हे चारही मोठी गावे या ठिकाणावरून दिसत होती! कदाचित अतिशय कमी ठिकाणांपैकी हे एक ठिकाण असावे. अधून मधून पावसाचे भुरभुरणारे थेंब पडत होते. परंतु ते लागून राहिले नाहीत. वातावरणातील मंद ओली हवा मन प्रसन्न करत होती. असं वाटत होतं की याच ठिकाणावरून तासनतास हा परिसर न्याहाळत बसावा.
वातावरणातील शांतता विलक्षण होती म्हणूनच पशुपक्ष्यांचे आवाज सुस्पष्टपणे ऐकू येत होते. या डोंगराच्या माथ्यावर कुणीतरी झेंडा लावलेला होता. कदाचित त्या ठिकाणी आणखी छोटेसे मंदिर बनवलेले असावे. या डोंगर माथ्याकडे जायची इच्छा होती परंतु वेळ तितका शिल्लक राहिलेला नव्हता. म्हणून आलेल्या रस्त्याने पुन्हा मागे फिरलो. प्रत्यक्ष आपल्याच गावामध्ये इतका सुंदर मनोहारी आणि नयनरम्य परिसर आहे, याची प्रचिती मला देखील पहिल्यांदाच आली होती!
गुगल लोकेशन: https://goo.gl/maps/MUf86CfPyatL8NmT9
Friday, May 7, 2021
कानिफनाथाच्या डोंगरावर
हायवेवरून दुरच्या डोंगरावर असणारं ते मंदिर बऱ्याचदा मी पाहिलं होतं. पण
तिथे जाण्याचा निश्चित रस्ता माहीत नव्हता. अशावेळी गुगल मॅप पुन्हा मदतीला
धावला. आळे गावाच्या बरोबर मागच्या डोंगरांमध्ये असणारं ते मंदिर गुगल
मॅपवर शोधून काढलं. हे मंदिर होतं कानिफनाथाचं आणि गाव होतं कोळवाडी.
दुपारचं ऊन ओसरल्यानंतर आळे गावात प्रवेश केला. इथून एक रस्ता संत
ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी मंदिराकडे अर्थात संतवाडीच्या दिशेने जातो.
याच रस्त्यावर थोड्या अंतरावर एक फाटा उजवीकडे कोळवाडीच्या दिशेने जातो. हे
वळण घेतलं आणि समोरच्या डोंगरावर कानिफनाथाचे ते मंदिर दिसून यायला लागलं.
मुख्य फाट्यापासून सुमारे दोन किलोमीटरवर कोळवाडी गाव असावं. गावात
पोहोचल्यावर पुनश्च एक रस्ता उजवीकडे डोंगराच्या दिशेने जाताना दिसला. हा
डांबरी रस्ता नसला तरी त्याची स्थिती बर्यापैकी चांगली होती. आजूबाजूला
फक्त शेतीच शेती नजरेत येत होती. दहा मिनिटांमध्ये मी डोंगराच्या पायथ्याशी
असणाऱ्या एका जंगलामध्ये पोहोचलो. इथे पुर्णतः शांतता होती. फक्त झाडांवर
फिरणाऱ्या पक्ष्यांचे आवाज येत होते. मानवी अस्तित्वाचा कोणताच आवाज ऐकू
आला नाही. जंगलाच्या सुरुवातीलाच गाडी पार्क केली आणि पदभ्रमंतीला सुरुवात
केली. वारा नसल्यामुळे जंगलातील सर्व झाडे स्तब्ध होती. थोड्याच वेळामध्ये
जंगल संपले आणि डोंगरावर जाणाऱ्या पायवाटेला सुरुवात झाली. सुरुवातीलाच
सिमेंटच्या पायऱ्या याठिकाणी बनवलेल्या दिसून आल्या. कदाचित या मार्गाने
नियमितपणे गावकरी डोंगरावर कानिफनाथांच्या दर्शनाला जात असावेत. थोडं चढुन
गेल्यावर पायवाट आणखीन मळलेली दिसून आली. पायऱ्या संपल्या होत्या. पण
दगडांच्या साहाय्याने अनेक ठिकाणी पायऱ्या निर्मिल्याच्या दिसून येत
होत्या. झाडांची गर्दी कमी झाली होती. पण डोंगरावरून आलेले मोठमोठाले दगड
रस्त्यामध्ये दिसून येत होते. पावसाळ्यात याच मार्गाने पाणी खाली येत
असावे, असेही भासत होते. वाट उत्तम आणि वळणावळणाची होती. सूर्य मावळतीकडे
झुकत होता आणि मी सूर्याच्या विरुद्ध दिशेने डोंगरावर चढत चाललो होतो.
उन्हाची तीव्रता कमी झाली असल्याने दमछाक होत नव्हती. अगदी पंधरा
मिनिटांमध्येच डोंगराच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो. येथून आजूबाजूचा
विस्तीर्ण परिसर नजरेच्या टप्प्यात आला होता. शिवाय दूरवर सूर्यकिरणांचा
अभिषेक होत असलेला नारायणगड किल्लाही व्यवस्थित दिसत होता. सूर्यकिरणांच्या
वर्षावामुळे आजूबाजूचा परिसर प्रकाशमय झाला होता. त्यामुळे मध्यभागी
असलेला नारायणगड अधिक उठून दिसत होता. पहिला डोंगर संपल्यानंतर थोडीशी
सपाटी लागली आणि पुढच्या चढाकडे मार्गक्रमण चालू केले. इथपर्यंत पायवाट
अतिशय चांगली होती. पुढची पायवाट काही शांत जंगलातल्या रस्त्याने पुढे जात
होती. चढण सुरु झाली नि पायर्यांची रचना केलेला रस्ता दिसू लागला.
डोंगराच्या वरच्या भागात असलेले हे जंगल पायथ्यापासूनही व्यवस्थित दिसत
होते. इथे पोहोचल्यावर मात्र त्याची शीतलता मन प्रसन्न करून गेली. आता
चढाईचा रस्ता सुरू झाला होता. ही चढण आधीच्या सर्व चढणीपेक्षा अधिक तीव्र
होती. परंतु पायर्यांचा मार्ग असल्याने ती अवघड जाणवत नव्हती. आजूबाजूला
उगवलेले गवत अजूनही आपला हिरवा रंग ठेवूनच होते. वळणावळणाची ती वाट हळूहळू
डोंगरमाथ्याकडे जाऊ लागली. अतिउच्च माथ्यावर पोहोचल्यावर वरील मंदिराचे
अस्तित्व झाडीतून दिसायला लागले होते. डोंगराच्या पूर्ण माथ्यावर आलो
तेव्हा पुन्हा सूर्यकिरणे अंगावर पडायला लागली व समोरच पूर्ण मंदिर स्पष्ट
दिसायला लागलं. अलीकडच्या काळातच त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार झाला
असावा, असे दिसले. शेजारीच रहाण्यासाठी एक छोटेसे झोपडीवजा घर दिसून आले.
मी मंदिरापाशी पोहोचलो तेव्हा आजूबाजूला कोणीही नव्हते. एव्हाना मागच्या
बाजूचा परिसरही दिसायला लागला होता. मागील बाजूस बऱ्याच अंतरापर्यंत झाडीच
झाडी दिसून आली. जंगलाची घनता मात्र अधिक नव्हती. शिवाय त्या बाजूने
डोंगरावर उतरण्यासाठी एक पायवाट जाताना दिसली. समोरच्या डोंगरावर दूरवर एक
छोटेखानी दर्गा दिसत होता. डोंगराच्या पायथ्यापासून हे दोन्ही डोंगर सलग
वाटत होते. परंतु इथे आल्यावर ते एकमेकांपासून वेगळे असल्याचे दिसले.
समोरच्या डोंगरावरील दर्ग्याकडे जाण्यासाठी कानिफनाथांचा हा डोंगर पूर्ण
उतरून समोरचा डोंगर चढावे लागत होते. पायवाटेने थोडे खाली उतरलो आणि उजव्या
बाजूला एका भव्य पाषाण नजरेस पडला. तिथे बसून समोरचा विस्तीर्ण परिसर
न्याहाळता येऊ शकत होता. मनन, चिंतन आणि ध्यान करण्यासाठी ही एक सर्वोत्तम
अशी जागा होती. सूर्य बऱ्यापैकी पश्चिम क्षितिजाकडे झुकलेला होता. त्यामुळे
सूर्याची कोवळी किरणे अंगावर तीव्रतेने पडत नव्हती. या ठिकाणी बसून समोरचा
परिसर तासनतास न्याहाळत बसावा, असे वाटत होते. पण दहा मिनिटांमध्ये मी घरी
लवकर जायचे म्हणून तेथून काढता पाय घेतला. पुन्हा मंदिरापाशी आलो तोवर
कोणीतरी वाटसरू मंदिरात आल्याचा दिसला. मंदिराच्या मागच्या बाजूने पुन्हा
परतीच्या वाटेला लागलो. उतरताना मात्र फारसे कष्ट पडले नाहीत. परंतु एक
सुंदरश्या ट्रेकचा आनंद घेतल्याचे समाधान मात्र लाभले.
#ऑक्टोबर #२०२०
Wednesday, January 20, 2021
अविस्मरणीय दौंड्या
कोरोना विलगीकरणाचे ते १४ दिवस संपता संपत नव्हते. एक-एक दिवस मोजत पूर्ण केला आणि हा कालावधी संपल्यानंतर पाचव्या दिवशी आठ महिने घरी बसून काढलेला दुष्काळ संपवण्याची वेळ आली. जुन्नर मधला नवीन पर्वत सर करण्याचे ध्येय होते. त्यातच माळशेजच्या रांगेमध्ये असलेला दौंड्या डोंगर सापडला.
फेसबुकवर वाचलेली जुजबी माहिती ज्ञात होती. तिच्या आधारावर ट्रेकिंगच्या नव्या मोसमाची सुरुवात आम्ही करणार होतो. ऑक्टोबर महिना आणि गारवा यांचं फार असं नातं नसतं पण पहाटे पहाटे थोडी का होईना थंडी जाणवत असते. याच थंडीमध्ये सकाळी सहा वाजता मार्गक्रमण सुरू केले. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी याच डोंगरावर एक आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे विमान कोसळले होते. त्यामुळे हा डोंगर इथल्या लोकांना विशेष परिचित आहे. सकाळी सातच्या सुमारास आम्ही तळमाची गावामध्ये पोहोचलो. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ मधून आत गावाकडे जाणारा वळणावळणाचा व काहीसा घाट मार्ग असलेला रस्ता मात्र अतिशय सुंदर आहे. पावसाळ्यात बहरलेली झाडी वातावरणात गारवा निर्माण करत होती. गावामध्ये पोहोचलो तोवर सुर्योदय झालेला होता. तळमाचीच्या तीनही बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरलेल्या दिसल्या. बऱ्याच ठिकाणी सरळसोट कडे आहेत आणि या कड्यांच्याच मागच्या बाजूला माळशेज घाट आहे. डोंगराकडे बघितल्यावर वाटत नाही की इथून वर माथ्यावर जायला रस्ता असावा. तो शोधून काढण्याचे पहिले आव्हान आमच्यासमोर होते. गावांमध्ये एकाला रस्ता विचारला. त्यांने माहिती सांगितली. पण प्रत्यक्ष चालायला सुरुवात केल्यावर आपण जंगलातील न मळलेल्या वाटेवर चालत आहोत, हे ध्यानात आले. वाट चुकली तर होतीच. पण त्यातूनही मार्ग काढत काढत आम्ही जंगलातल्या एका मळलेल्या वाटेला लागलो. जंगल बर्यापैकी घनदाट होतं पण पायवाट देखील तितकीच सहज व सुंदर होती. ती पाहता या वाटेने सातत्याने लोकांची ये-जा असावी असे वाटले. कदाचित जंगलांमध्ये लाकडे तोडण्यासाठी लोक येत असावेत. आता वाट रस्त्याच्या दिशेने जात होती. वातावरण तसं स्तब्ध होतं होतं. अधून-मधून रस्त्याच्या कडेला डोंगरावरून तुटून आलेले मोठमोठाले दगड दिसून यायचे. त्याला वळसा घालून पुन्हा मळलेल्या वाटेला लागायचो. अगदी थोड्याच वेळात चढण सुरू झाली. काही ठिकाणी दगड व्यवस्थित रचून रस्ता तयार केलेला होता. चढण फारशी खडी नव्हती. अगदी लहान मुलेही व्यवस्थित या रस्त्याने चालू शकतील, असे वाटून गेले. थोडेच वरती गेल्यावर जंगलाच्या वरच्या भागात आम्ही पोहोचलो. इथून तळमाची गाव व्यवस्थित दिसत होतं. सूर्याची ढगांबरोबर लपाछपी चाललेली होती. रस्ता योग्य आहे, याची खात्री करून आम्ही पुन्हा मार्गक्रमण चालू केले. अनेक ठिकाणी रस्ता खोदून तयार केल्याचे दिसत होते. काही ठिकाणी तर माथ्यावरुन येणारे झुळझुळ पाणी रस्ता पार करताना दिसत होते. डोंगर चढाई सुरू झाल्यानंतर मात्र आजूबाजूला फारशी झाडे दिसली नाहीत. एव्हाना दुरवर राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक काही व्यवस्थित दिसत होती. डोंगर चढणीच्या मध्यावर गेल्यावर माथ्याच्या दिशेने काही लोक रस्ता उतरताना दिसले. आता मात्र आमची वाट योग्य आहे, याची खात्री झाली. ते झपाझप पावले टाकत खाली उतरत होते. आम्ही मात्र अनेक महिन्यांचा वनवास संपवून अतिशय आनंदाने रमत-गमत डोंगर चढत चाललो होतो. दूरवरून या उंच डोंगराला कुठून रस्ता असेल, याची खात्री नव्हती. पण रस्ता मात्र अतिशय सुंदर तयार झालेला दिसला. डोंगर बऱ्यापैकी चढून आल्यावर एक मोठी घळ दिसून आली. आजूबाजूला अजस्त्र दगड चक्क लोंबकळताना दिसत होते. कदाचित ते कधीही पडतील, अशी परिस्थिती होती. त्याच्याच कडेकडेने आमची चढाई चालू राहिली. घळी मधून अजूनही झुळझुळ वाहणारे पाणी व त्याचा खळखळाट जाणवत होता. याठिकाणी भर पावसाळ्यामध्ये चांगला मोठा धबधबा असावा, असे जाणवले. थोडं आणखी चढून आल्यावर आम्ही लवकरच माथ्यावर पोहोचलो. माळशेजच्या सर्व डोंगररांगा तसे सिंदोळा आणि निमगिरी किल्ला आता व्यवस्थित दिसत होता. सूर्याची कोवळी किरणं अंगावर येत होती. अशा वातावरणात फोटोग्राफीचा मोह मात्र आवरला नाही. इथून पुढचा रस्ता शोधायला लागणार होता. समोरच काही कच्ची घर दिसून आली. जवळ जाउन पाहिले तर तिथे कुणीही राहत नव्हते. पाळीव प्राण्यांना विशेषतः गाई-म्हशींना बांधण्यासाठी त्या घरांचा वापर होत असावा, असे दिसले. आम्हाला माळशेजच्या डोंगरांवर जायचे होते म्हणून घरांच्या उजव्या बाजूने मार्गक्रमण चालू केले. माथ्यावर जंगल फारसे घनदाट नव्हते. अजूनही बऱ्याच ठिकाणी पावसाचा ओलावा जाणवत होता. इथे फुलपाखरांची काही कमी नव्हती. वातावरणात बऱ्यापैकी शांतता होती. त्यामुळे पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू यायचे. डोंगरमाथ्यावर उजव्या बाजूने कडेकडेने आम्ही मार्ग शोधायला सुरुवात केली. पुढे गेल्यावर जंगलाच्या आत जाणारा रस्ता होता. तो आम्ही पकडला पण दुरून कोणीतरी आम्हाला पाहिले होते. त्याने ओरडूनच उजव्या बाजूचा रस्ता पकडा असे आम्हाला सांगितले. इतक्या लांबून कोणीतरी आम्हाला पाहत आहे, याचे जरा आश्चर्य वाटले. रस्ता दाखवणारा मार्गदर्शक मिळाल्याने आमचे काम सोपे झाले होते. थोडं अंतर चालून गेल्यावर दोन डोंगरांना जोडणारा एक अतिशय रुंद रस्ता होता. या जागेला वानरदरा असे म्हटले जाते. तो ओलांडून पुढे आलो तर दूरवर अस्वलदरा दिसून आला. अतिशय छोट्या प्रवाहासह जमिनीवर कोसळणारे धबधब्यांचे आवाज ऐकू यायला लागले होते. डोंगराच्या मागच्या बाजूला आलो तर जुन्नर मावळातला सर्व परिसर दिसून आला आणि समोर दिसत होता नाणेघाटातील जीवधन किल्ला! जीवधन किल्ल्याची इतक्या लांबून एका वेगळ्याच डोंगरावरची छटा आम्ही पहिल्यांदाच पाहिली. नाणेघाट जवळ असला तरी नानाचा अंगठा काही दिसला नाही मावळातला खूप मोठा परिसर मात्र नजरेत आला होता. अगदी अंजनावळे गावातली वऱ्हाडी रांगही स्पष्ट दिसत होती. या डोंगराचा माथा पहिल्यांदाच पाहायला मिळाला. सहसा तो कोणत्याही इतर डोंगरावरून दिसत नाही. अगदी जीवधन किल्ल्यावरूनही नाही. दौंड्याच्या मागच्या बाजूला देखील तितकीच मोठी झाडी आहे आणि आणि दूरवर वसलेली छोटी आदिवासी गावेही आहेत. त्यांचं निरीक्षण करत या टोकावर आम्ही बसलो. वातावरणातील गारवा मनाला प्रसन्न करत होता. दौंड्याचा पहिला टप्पा आम्ही समर्थपणे पार केला होता व त्याचा आनंद घेत होतो. इथून पुढे पुन्हा वाटचाल सुरू केली. जायला पुन्हा दोन वाटा होत्या त्यापैकी डावी वाट निवडली. माथ्यावर गाईंचे सर्वत्र पडलेले शेण पाहून इथे जनावरांचा सातत्याने वावर असावा, असे दिसले. मनुष्य प्राण्याचा वावर मात्र कुठेच नव्हता! दहा मिनिटांच्या वाटचालीनंतर आम्ही एका मोठ्या पठारापाशी पोहोचलो. समोर आणखी एक टेकडी होती. ती खालूनही आम्हाला दिसली होती. याच टेकडीवर एक छोटेखानी मंदिर बांधलेले आहे. तिथे जाणारी पायवाट सापडत नव्हती. कदाचित ती दुसऱ्या बाजूने असावी, असे वाटून गेले. म्हणून उगलेल्या गवतातूनच आम्ही आमची पाय वाट तयार केली व त्या माथ्याच्या दिशेने जाऊ लागलो. एव्हाना पोटात कावळे ओरडायला लागले होते. म्हणून पुढे जाण्याआधी एखादी रिकामी जागा शोधली व पेटपूजा उरकून घेतली. त्यामुळे तरतरी आली होती. आता आम्ही त्या माथ्याच्या अगदी समोर होतो. त्याच्या उजव्या बाजूने एक रस्ता पुढे जात होता. तिथून मार्गक्रमण चालू केले. परंतु टेकडीवर जाण्याचा रस्ता मात्र सापडला नाही. तिच्या कडेकडेने जंगलातून जाणारी वाट आम्ही धरली. हीसुद्धा बऱ्यापैकी मळलेली होती. डोंगर पायथ्याचा बराच मोठा परिसर जंगलांनी व्यापलेला दिसत होता. पहिली टेकडी मागे पडली तर पुढे आणखी तशीच टेकडी दिसून आली. ती मात्र सरळसोट होती. तिच्यावर कोणत्याही प्रकारचे मंदिर दिसून आले नाही. किंबहुना तिच्यावर जाण्यासाठी रस्ताही नसावा. काही अंतरावर अनेक प्रयत्न करून देखील पुढचा रस्ता सापडला नाही. कदाचित पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा वाटा नष्ट झाल्या असाव्यात. तिथे आम्ही डोंगराच्या तिसऱ्या टप्प्यावर होतो. येथून दुसर्या टप्प्यावर दूरवर एका पानवठ्यापाशी सांबराचे दर्शन झाले. तसे पाहिले तर सांबर एकटी फिरत नाहीत. पण ते एकटेच दुडूदुडू फिरताना दिसले. त्याला आमची चाहूल लागली असावी, म्हणून त्याने लगेच जवळच्या झाडीमध्ये झेप घेतली व ते गायब झाले. आमच्या प्रवासाचा हा अंतिम बिंदू होता. येथून पुन्हा माघारी फिरायचे आम्ही ठरवले. जंगलातली आणखी कोणती वाट सापडते का, ते पाहिले. पण त्यात यशस्वी झालो नाही. परतीच्या वाटेने अतिशय कमी वेळात आम्ही पुन्हा पायथ्याशी पोहोचलो. येताना चुकलेली वाट पुन्हा समजली. गावांमध्ये पोहोचलो तेव्हा वर जाण्याची योग्य वाट कोणती, हे ध्यानात आले.
तीन ते चार तासांचा कित्येक महिन्यांपासून रखडलेला ट्रेक सफल झाला होता. परतीच्या वाटेत गाडीमध्ये बसलो आणि पुढच्या प्रवासाची अर्थात ट्रेकची मनोमनी तयारी सुरू केली.
Wednesday, December 23, 2020
स्पायडरमॅन
जाळ्यांच्या निर्माणकर्त्याला आम्ही लाडाने "स्पायडरमॅन" म्हणतो! शहरातला कोळी आणि जंगलातला कोळी यात कित्येक पटीचा फरक आहे. जंगलात त्याने लावलेली जाळी अगदी मोठमोठाले कीटकही तोडू शकत नाहीत, इतकी भक्कम होती. अनेकदा त्याची कलाकुसर आणि सुबकता पाहता निसर्गाने दिलेल्या वरदानाचाही हेवा वाटतो. किती मन लावून एकाग्रतेने तो आपले काम करत असतो. एका अर्थाने आपल्याला मार्गदर्शन करण्याचेही कार्य त्याच्याकडून घडत असते.
इवलासा असला तरी त्याच्या जाळ्याची ताकत मात्र जबरदस्त होती. जंगलातल्या वाटांवर त्याचे साथीदार आणि अनेक सगेसोयरे अशीच सुंदर जाळी टाकून भक्ष्याची वाट बघत होते. निसर्गाने प्रत्येकाला काहीतरी कौशल्य प्रदान केलेले आहे. त्याचे कौशल्य त्याला पूर्णपणे माहित आहे. माणसाच्या बाबतीत मात्र असे नाही. वर्षानुवर्षे आपण आपली मूळ कौशल्ये विसरत चाललो आहोत. कदाचित हाच संदेश देत तो मानवासाठी जंगलात जागोजागी जाळी लावत बसला असावा.
Saturday, November 7, 2020
दौंड्या डोंगर
जवळपास एक तासाच्या चढाईनंतर दौंड्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचलो. उजव्या बाजूने एक रस्ता माळशेजच्या डोंगर रांगांकडे कडे जात होता. थोड्याच अंतरावर दोन डोंगरांना जोडणारा माकडदरा पार केला. थोडेसे चढून आलो. समोरच अस्वलदऱ्यातून पाण्याच्या नाजूक धारा वाहत होत्या. त्यांचा हळुवार आवाज पूर्ण परिसरामध्ये भरून गेला होता. दौंड्या डोंगराच्या मागचा पूर्ण परिसर दिसू लागला. दूरवर जीवधन किल्ला आकाशाकडे डोळे लावून उभा होता. शेजारी नाणेघाटाचा कोकणकडा आणि वऱ्हाडी डोंगरांची रांग लांबच लांब पसरलेली दिसली. एकच दृष्टीमध्ये सह्याद्रीच्या त्या अफाट डोंगररांगा निसर्गाची अद्भूत रचना आम्हाला दाखवित होत्या.
सर्व काही शांत… त्यात केवळ पक्ष्यांचा किलबिलाट आणि झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्यांचे निर्मळ आवाज घुमत होते. निसर्गसंगीत काय असतं? ते अनुभवण्याचा तो परमोच्च क्षण होता.



















































