माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label ब्रह्मगिरी. Show all posts
Showing posts with label ब्रह्मगिरी. Show all posts

Wednesday, April 3, 2013

त्र्यंबकगड : पुराणकाळाचा भक्कम साक्षीदार

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणा-या नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमधील दुर्ग म्हणजे त्र्यंबकगड होय. हा किल्ला त्र्यंबक या नावापेक्षा ‘ब्रह्मगिरी’ या नावाने अधिक सुपरिचित आहे. ऐतिहासिकतेपेक्षा पौराणिक महत्त्व या गडाला अधिक असल्याचे दिसते. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे सह्याद्रीची एक डोंगररांग गेली आहे. या रांगेस त्र्यंबकरांग असे म्हणतात. ब्रह्मगिरी, अंजनेरी, बसगड, उतवड यासारखे गडकोट या रांगेत उभे आहेत. यातील ब्रह्मगिरी हा सर्वात मोठा गड आहे. या गडाचे ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व तर आहेच, शिवाय पर्यटकांच्या दृष्टीने ब्रह्मगिरी ही एक पर्वणीच मानली जाते.

तेराव्या शतकात त्र्यंबक किल्ला व परिसरात देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. कालांतराने हा किल्ला बहामनी राजवटीकडे गेला. नंतर निझामशाही, शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व मुघल अशा राजवटींत या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. मुघल इतिहासकारांनी या किल्ल्याचा ‘नासिक’ असाच उल्लेख केला आहे. सन 1670मध्ये शिवाजी महाराजांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने हा किल्ला जिंकून घेतला होता. छत्रपती संभाजी राजांच्या   काळात राधो खोपडे हा फितूर झाल्याने मुघलांनी त्र्यंबकगड मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सन 1689 पर्यंत हा किल्ला छत्रपती संभाजी राजांच्याच ताब्यात होता. त्र्यंबकेश्वर हे त्र्यंबकगडाच्या पायथ्याचे ठिकाण होय. चहुबाजूंनी पर्वतांच्या वेढ्यात हे गाव वसलेले आहे. नाशिक शहरापासून त्र्यंबकेश्वर सुमारे 28 किलोमीटर अंतरावर आहे. नाशिकच्या मेळा बसस्थानकावरून राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांची येथे सतत ये-जा चालूच असते.

शिवाय नाशिकहून पालघर, जव्हार, वाडा या ठिकाणी जाणा-या सर्व बसेस त्र्यंबकेश्वर मार्गे जातात. त्र्यंबकेश्वर
बसस्थानकापासून दहा मिनिटांत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी पोहोचता येते. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने त्र्यंबकगडाच्या पायथ्याजवळ ‘संस्कृती रिसॉर्ट’ बांधलेले आहे. या रिसॉर्टपासून गडाच्या दिशेने दोन वाटा जातात. दोन्हीही वाटा या पाय-यांच्या आहेत. उजव्या बाजूच्या वाटेने गंगाद्वारापाशी पोहोचता येते, तर डावी वाट थेट गडाच्या दिशेने जाते.

गंगाद्वाराच्या वाटेने वर गेल्यावरही पुन्हा त्र्यंबकगडाकडे जाण्यासाठी पायवाट तयार केलेली आहे. प्रत्यक्ष गडाच्या दिशेने जाण्याकरता मात्र डाव्या बाजूच्या रस्त्यानेच जाणे योग्य ठरते. पावसाळ्यात येथील संपूर्ण परिसर हिरव्या वनराईने नटलेला असतो. त्र्यंबक गडावर येण्याचा रस्ता पाय-यांनी बनवलेला असल्याने फारसा अवघड भासत नाही. चालता चालता रस्त्यात ठिकठिकाणी छोटी मंदिरे दृष्टीस पडतात. सुमारे एक तास पाय-या चढत गेल्यावर किल्ल्याचे मुख्यद्वार लागते. यापुढील पाय-या या कातळात कोरलेल्या आहेत. अखंड दगडांत बनवलेल्या पाय-या पाहता सातवाहनांच्या गडरचनेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. अतिशय कुशलतेने या पाय-यांची रचना दगडांमध्ये करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी पाय-या खोलवर असल्याने अंधार जास्त होतो. पाय-या संपल्यावर किल्ल्याचे प्रशस्त पठार नजरेस पडते. पूर्ण त्र्यंबकेश्वर गावाचे दर्शन या ठिकाणाहून व्यवस्थित करता येते. किल्ल्याचे कडे अतिशय भक्कम आहेत. येथूनच पाय-यांच्या बाजूने समोरच्या दिशेला अंजनेरी गड दृष्टीस पडतो. वातावरण स्वच्छ असताना रामशेज व देहेरच्या किल्ल्याचेही दर्शन होते. किल्ल्याचा माथा प्रशस्त असला तरी ‘किल्ला’ म्हणावा असे जास्त अवशेष येथे शिल्लक राहिलेले नाहीत. काही ठिकाणी सपाट प्रदेशावर राहत्या घरांचे प्राचीन अवशेष दिसून येतात. त्या ठिकाणी कोणी फिरकत नाही. हा किल्ला दोन्ही बाजूंनी प्रचंड विस्तारलेला आहे. उजव्या बाजूच्या टोकाला काही ठिकाणी पडलेली तटबंदी नजरेस पडते. या ठिकाणी जाण्याची वाट अवघड असल्याने इथे फिरकणा-यांची संख्या तशी कमीच आहे. सरळ उभे ठाकलेले कडे गडमाथ्यावरून न्याहाळता येतात. गडमाथ्याचा एक उंचवटा पार केल्यावर मागच्या बाजूला गडावरील गोदावरी उगमस्थान, गंगा-गोदावरी मंदिर व जटा मंदिर नजरेस पडते. समोरच्या पर्वतरांगांमध्ये हरिहर किल्ला डौलाने उभा असलेला दिसून येतो. अनेक ट्रेकर्स त्र्यंबक ते हरिहर असाही ट्रेक आयोजित करतात. ही वाट पर्वतांच्या एका खिंडीतून जाते. त्र्यंबक पठारावरील पाय-यांच्या वाटेने मध्येच एक नवी वाट डावीकडे ‘सिद्धगुंफा’ या ठिकाणी जाते. कड्यात कोरलेली गुहा या ठिकाणी पाहता येते. उजवीकडील रस्त्यावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. गंगा-गोदावरी मंदिरात गोदावरीचा प्रवाह पाहता येतो. या मंदिराच्या शेजारी एक बारमाही पाण्याचे टाके आहे. प्राचीन काळापासून या टाक्याचा वापर पाणी साठवण्याकरता होत असावा, असे दिसते.  जटा मंदिराच्या मागच्या बाजूला असणा-या टेकडीच्या पलीकडे त्र्यंबक किल्ल्याचा मुख्य बुरूज आहे. परंतु त्याचीही पडझड झाली आहे. त्र्यंबकवरून आजूबाजूचा मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. पावसाळ्यात पर्यटकांची मोठी वर्दळ येथे दिसून येते, तर इतर वेळेस शिवभक्त या पर्वतावर गंगा-गोदावरीचे दर्शन घेण्यासाठी येतात. एका अर्थाने या गडामुळे नाशिक जिल्ह्याचे  ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व अधोरेखित होत जाते.
tushar@tusharkute.com

प्रसिद्धी: दै. दिव्य मराठी (दि. ०३ फेब्रुवारी २०१३).
मूळ लेख: लिंक.

Monday, December 3, 2012

त्र्यंबक गड



गोदावरीचे उगमस्थान म्हणून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर ओळखले जाते. इथेच बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग वसलेले आहे. त्र्यंबकेश्वर जवळच्या ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. या विषयी माझ्या या ब्लॉगवर मी आधीच एक पोस्ट केलेली आहेच. परंतु, ब्रम्हगिरीचे इतिहासात गड-किल्ला म्हणून स्थान अधोरेखित केले नव्हते. म्हणूनच ही पोस्ट करत आहे.
इ.स. १२७१ - १३०८ त्र्यंबकेश्वर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरावर देवगिरीचा राजा रामचंद्र याच्या भावाची राजवट होती. मोगल इतिहासकार किल्ल्याचा उल्लेख नासिक असा करतात. पुढे किल्ला बहमनी राजवटीकडे गेला. तिथून पुढे तो अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. इ.स. १६२९ मध्ये शहाजी राजांनी बंड करून हा किल्ला व आजूबाजूचा परिसर जिंकला. मोगल राजा शाहजान याने ८ हजाराचे घोडदळ हा परिसर जिंकण्यासाठी पाठवले. इ.स. १६३३ मध्ये त्रिंबक किल्ल्याचा किल्लेदार मोगलांकडे गेला. इ.स. १६३६ मध्ये शहाजी राजांचा माहुली येथे पराभव झाल्यावर त्रिंबकगड मोगलांचा सेनापती खानजमान ह्याच्या हवाली केला. इ.स. १६७० मध्ये शिवरायांचा पेशवा मोरोपंत पिंगळे याने त्रिंबक किल्ला जिंकून घेतला.
इ.स. १६८७ मध्ये मोगलांच्या अनेक ठिकाणी आक्रमक हालचाली चालू होत्या. याच सुमारास मोगलांचा अधिकारी मातबर खान याची नासिक येथे नेमणूक झाली. १६८२ च्या सुमारास सुमारास मराठ्यांची फौज गडाच्या भागात गेल्याने खानजहान बहाद्दरचा मुलगा मुझ्झफरखान याला मोगली फौजेत नेमण्यात आले. याने गडाच्या पायथ्याच्या तीन वाड्या जाळून टाकल्या. १६८३ च्या फेब्रुवारी महिन्यात राधो खोपडा हा मराठा अनामतखानाकडे जाऊन मराठयांना फितुर झाला. त्याच्यावर बादशाही कृपा झाली, तर तो मोगलांना त्रिंबकगड मिळवून देणार होता. या राधो खोपड्याने त्रिंबक किल्ल्याच्या किल्लेदाराला फितुर करण्याचा प्रयत्न केला, पण किल्लेदार त्याला वश झाला नाही. तो संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहिला. राधो खोपड्याचे कारस्थान अयशस्वी झाल्यामुळे त्याला मोघलांनी कैद केले. पुढे १६८४ मध्ये नोव्हेंबर महिन्यात अकरमतखान आणि महमतखान यांनी त्रिंबकगडाच्या पायथ्याच्या काही वाडया पुन्हा जाळल्या व तेथील जनावरे हस्तगत केली. १६८२ आणि १६८४ मध्ये मोगलांनी किल्ला घेण्याचा हरप्रकारे प्रयत्न केला, पण तो फसला. इ.स. १६८८ मध्ये मोगल सरदार मातबरखानाने ऑगस्ट महिन्यात किल्ल्याला वेढा घातला. त्याने औरंगजेबाला पत्र पाठविले आणि त्यात तो म्हणतो, ’‘त्र्यंबकच्या किल्ल्याला मी सहा महिन्यांपासून वेढा घातला होता किल्ल्याभोवती मी चौक्या वसविल्या आहेत. सहा महिन्यांपासून किल्ल्यामध्ये लोकांचे येणे जाणे बंद आहे. किल्ल्यामध्ये रसदेचा एकही दाणा पोहोचणार नाही याची व्यवस्था मी केली आहे. त्यामुळे किल्ल्यातील लोक हवालदील होतील आणि शरण येतील’’.  [संदर्भ: ट्रेक क्षितीज़.कॉम]
किल्ला म्हणावा असे या ठिकाणी फारसे अवशेष दिसून येत नाहीत. गोदावरी त्र्यंबकेश्वराच्या भाविकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी बऱ्यापैकी वर्दळ दिसून येते. प्राचीन किल्ला म्हणून या ठिकाणी फार भेटी दिल्या जात नाहीत. तसं पाहिलं तर त्र्यंबक पर्वतांची ही रांग अत्यंत भक्कम कड्यांनी बनलेली आहे. किल्ल्यावरील परिसरही विस्तीर्ण आहे. गडमाथ्यावरून पूर्वेकडे नाशिकचा रामशेज, भोरगड तर पश्चिमेकडे हरिहर किल्ला स्पष्ट दिसून येतो. हरिहर व भास्करगडांची रांग त्र्यंबक उतरून पार करता येते, असे कुठेतरी वाचलं होतं. पण वाट मात्र सापडली नाही. किल्ल्याच्या पायऱ्या ह्या कातळात कोरलेल्या आहेत. येथुन पावसाळ्यात गड चढत जाणं म्हणजे एक प्रकारचे थ्रीलच असते! गडमाथ्यावरील पठारावर किल्ल्यातील सैनिकांना राहण्यासाठी ज्या जागा बनविल्या गेल्या होत्या, त्यांचे केवळ अवशेषच पाहायला मिळतात...

छायाचित्रे:
त्र्यंबक गडाचे कडे

त्र्यंबक वरील गडाचे अवशेष

समोर दिसणारा हरिहर किल्ला

किल्ल्याच्या मागच्या बाजूस गंगा-गोदावरी मंदिर

कातळांत कोरलेल्या गडवाटा

Tuesday, May 1, 2012

दक्षिण गंगेचे उगमस्थान - ब्रम्हगिरी


दक्षिणगंगा म्हणुन ओळखली जाणारी गोदावरी नदी नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते व बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक देवस्थान होय. येथील ब्रम्हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. सह्याद्रिच्या नयनरम्य पर्वतरांगात त्र्यंबकेश्वर वसलेले आहे. चहुबाजूंनी ब्रम्हगिरीचा डोंगर या परीसराला लाभलेला आहे. श्रावणातील सोमवारी या ठिकाणी दरवर्षी भक्तांचा महापूर येत असतो. ब्रम्हगिरी पर्वतावर गंगा-गोदावरीचे उगमस्थान साधारणत: ४ ते ५ किमीवर आहे. त्र्यंबकेश्वर गावातून या पर्वताच्या पायथ्यापर्यंत सहज पोहचता येते. त्याची रचना एखाद्या किल्ल्याप्रमाणे भासते. विशेषत: जून ते डिसेंबर या कालावधीत घनदाट हिरवळीने हा परीसर नटलेला दिसून येतो. जणू काही निसर्गाने हिरव्या रंगाची सर्व उधळण याच परिसरात केल्याचा भासही होतो. गोदावरीच्या उगमस्थानापर्यंत जाण्याकरीता एक पर्वत पुर्ण पार करावा लागतो. चढाईच्या वाटेवर पायऱ्या बनविल्या गेल्या असल्याने चालण्याचा त्रास जाणवत नाही. अनेक ठिकाणी कोरुन पायऱ्यांची रचना केली अशा जागेवरुन जाताना प्राचीन ठिकाणी भेट दिल्याचा अविष्कार नक्कीच होतो. पावसाळ्यात या पर्वतावरील धबधबे सतत वाहत असतात. असे अनेक धबधबे या लांबलचक पर्वतावर दिसून येतात शिवाय संततधार असल्याने पर्वताच्या वरील परिसर सतत धुक्यात असल्याचा जाणवतो. येथून त्र्यंबकेश्वर शहराचे नयनरम्य दर्शनही घेता येते. गंगा-गोदावरीच्या ऊगमस्थानी भेट दिल्याचा व येथील पाणी स्पर्श केल्याचा आनंद काही निराळाच असतो. प्राचीन काळी शंकराने जटा आपटून गोदावरीला जगतकल्याणासाठी दिशा दिली, तेथे एक मंदिर बांधण्यात आलेले आहे. शंकराच्या जटेच्या व गुडघ्यांच्या पाऊलखुणा येथे पाहता येतात. गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन वाहताना प्रत्येकाने जीवनात एकदा तरी पहायलाच हवे.

छायाचित्रे:

नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत

धुक्यात हरविलेले गोदावरी मंदीर

नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत

नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत

डावीकडून: मी, विवेक पाटील, भूषण पवार

ब्रम्हगिरीवरून दिसणारे त्र्यंबकेश्वर शहर

मंदीर

नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत

नयनरम्य ब्रम्हगिरी पर्वत

गोदावरी मुख

गोदावरी मंदीर

गोदावरी उगम