माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label पुणे शहर. Show all posts
Showing posts with label पुणे शहर. Show all posts

Wednesday, May 29, 2024

लाल महाल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अन्य कोणत्याही किल्ल्यापेक्षा मला राजगड किल्ला हा अतिशय खास वाटतो. कारण शिवरायांच्या एकंदरीत कालखंडातील सर्व प्रमुख घटनांचा तो साक्षीदार राहिलेला आहे. तसेच महाराजांचा सर्वाधिक सहवास या किल्ल्याला लाभलेला आहे.
बालपणी राजमाता जिजाऊंसोबत पुण्यात आले असता शिवाजी महाराज ज्या ठिकाणी राहत होते तो म्हणजे लाल महाल. या वास्तुविषयी देखील असंच काहीतरी आहे. छत्रपती शिवाजी रस्ता आणि जिजामाता चौक या ठिकाणी सिग्नलला जेव्हा जेव्हा गाडी थांबते तेव्हा डावीकडे लाल महाल नजरेस पडतो. सततच्या कामाच्या व्यापामुळे इथे इतक्या वर्षांमध्ये जाण्याची कधीच संधी मिळाली नाही. परंतु त्या दिवशी आवर्जून आम्ही या वास्तूला भेट दिली. शिवरायांचे बालपण या वास्तूमध्ये गेलं होतं. तसेच याच ठिकाणी त्यांनी औरंगजेबाचा मामा असणाऱ्या शाहिस्तेखानाची फजिती करून त्याची तीन बोटे छाटली होती. मुघलशाहीवर जबरदस्त प्रहार करणारा हा प्रसंग आणि त्याचा साक्षीदार म्हणजे लाल महाल होय. शनिवारवाड्याच्या कडेलाच लागून ही वास्तू दिमाखात उभी आहे. आज सुशोभीकरणाद्वारे तसेच विविध प्रकारच्या मूर्तींचा वापर करून ही वास्तू स्थानिक प्रशासनाद्वारे दिमाखात उभी असल्याचे दिसते. जिजाऊंची प्रसन्न मूर्ती महालाच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे. तसेच शिवरायांच्या बालपणातील अनेक प्रसंग इथल्या भिंतीवर रेखाचित्रित केल्याचे देखील दिसतात. 







 

Monday, April 29, 2024

शनिवारवाडा

इसवी सन २००२ मध्ये खऱ्या अर्थाने पहिल्यांदा पुणे शहराचे तोंड पाहिले. त्यानंतर जवळपास बारा वर्षे या शहराचा सहवास मला लाभलेला आहे. या बारा वर्षांमध्ये अनेकदा शनिवारवाड्याच्या चहूबाजूने प्रवास करण्याचा योग आला. परंतु एकदाही ही वास्तू आतून पाहिलेली नव्हती. आज अखेरीस तो योग आला.
१८ व्या शतकामध्ये अखिल हिंदुस्थानात मराठ्यांची सत्ता स्थापन होत असताना राजसत्तेचे प्रमुख केंद्र असलेला पुण्यातील शनिवारवाडा आज पहिल्यांदाच आतून पाहता आला. कोणतीही वास्तू पाहताना अर्थात ऐतिहासिक वास्तूला भेट देताना तिथला इतिहास मनामध्ये अनुभवायला मिळतो. अशीच काहीशी अनुभूती यावेळी मला मिळाली. महाराष्ट्रात आज अनेक भुईकोट किल्ले मरणासन्न अवस्थेत आहेत. शनिवार वाडा देखील अशाच भुईकोट किल्ल्यांपैकी एक. कालौघाने यातील अनेक वास्तू हळूहळू ढासाळत गेल्या. परंतु आजही टिकून असलेल्या वास्तू आपल्याला मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची आठवण करून देतात. १८ व्या शतकाततील सर्वच पेशव्यांचा सहवास तसेच अनेक मराठा वीरांची पदस्पर्श लाभलेली ही भूमी आहे. त्यामुळे निश्चितच या वास्तूचे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण असे स्थान आहे. पुण्यात आलेला प्रत्येक व्यक्ती या वास्तूला भेट देतो आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचे किमान एकदा तरी स्मरण करतो. तसेच कदाचित त्यातून प्रेरणा देखील घेतो.
माझ्याकरिता देखील शनिवारवाडा अनुभवण्याची अनुभूती ही निश्चितच अतिशय वेगळी अशी होती. 









 

Monday, March 30, 2020

थेरगाव बोट क्लब

पिंपरी-चिंचवड शहरात तसे बोट क्लब फारच कमी आहेत. त्यातील एक म्हणजे थेरगावचा बोट क्लब होय. या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने मोठे गार्डन बांधले आहे. नावीन्यपूर्ण वास्तू शैलीतील रचना या ठिकाणी पाहता येतात. पवना नदीच्या काठावर सदर बोट क्लब बांधण्यात आला आहे. त्यामुळे इथे बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीये. पावसाळ्यात वाहणाऱ्या धबधब्यांसाठी एक विशिष्ट रचना येथे पाहता येते. शिवाय फोटोग्राफीचा छंद असणाऱ्यांसाठी आपला छंद जोपासण्याचे हे उत्तम ठिकाण मानता येईल. एक दिवसाच्या कौटुंबिक सहलीचे नियोजनही करता येईल. मागील काही वर्षांपासून प्री-वेडिंग शूटसाठी या जागेचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय, असं दिसतं.