आळेफाट्याकडून माळशेजच्या दिशेने जाताना पिंपळगाव जोगा धरण लागलं की वातावरणामध्ये थंडावा तयार होताना जाणवतो. उजव्या बाजूला दिसणाऱ्या बालाघाटच्या डोंगररांगा आणि त्याच्या पायथ्याशी सातत्याने झुळझुळणारे पिंपळगाव जोगा धरणाचे पाणी पाहिलं की मन प्रसन्न होतं.
मढ गाव संपलं आणि वेळखिंडीतून खाली उतरलो की हरिश्चंद्रगडाच्या अजस्त्र डोंगररांगा दूरवर नजरेस पडतात. वाटत राहतं खिरेश्वर मार्गे टोलारखिंडीतून उतरावं आणि हरिश्चंद्रगडाच्या निसर्ग कुशीमध्ये स्वतःला सामावून घ्यावे. वर्षा ऋतूमध्ये हा परिसर हिरवाईने भरायला लागतो. यावर्षी तर कमालच झाली. अगदी मे महिन्याच्या मध्यापासूनच पावसाला सुरुवात झाली. याच कारणास्तव माळशेज घाटाच्या अलीकडील हा सर्व परिसर हिरवं लेणं अंगावर घेऊन डोलू लागला होता. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतली. मध्येच ढगांची सावली आणि ऊन यांचा खेळ चालू झाला होता. डोंगरमाथ्यावर असल्याकारणाने माळशेज घाटाचा हा परिसर सातत्याने ऊनपावसाचे लपंडाव अनुभवत असतो. त्या दिवशी देखील हीच परिस्थिती होती. डावीकडे सिंदोळा किल्ला मग उधळा डोंगर न्याहाळत आम्ही महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या रिसॉर्टपाशी पोहोचलो. या रिसॉर्टच्या मागच्याच बाजूला… खरंतर पुढच्या बाजूला बरीच मोकळी जागा आहे. इथून माळशेज घाटाचा अतिशय सुंदर आणि नयनरम्य परिसर न्याहाळता येतो. उंच उंच डोंगर आणि त्याच्या मध्याहून कोरलेला घाट, वळणावळणाचे रस्ते आणि या रस्त्यांवरून हळूहळू पुढे सरकत चाललेल्या गाड्या दूरपर्यंत पाहता येतात. माळशेज घाट चढून येणारे प्रवासी प्रामुख्याने घाटाचे ते दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी या ठिकाणी नेहमीच गर्दी करतात. पावसाळ्यात ही संधी सहसा कोणी सोडत नाही. त्यादिवशी देखील अशीच गर्दी येथे दिसून आली. पाऊस पडून गेला होता. अधून मधून ढगांच्या आडून ऊन डोकावत होतं. थोडं पुढे चालत गेलं की डोंगरकड्याच्या एका ठिकाणी वाऱ्याचा भयंकर झोत वरच्या दिशेने जात असतो.. दरवेळेस हा आम्ही अनुभव घेतोच. घाटाच्या जंगलांमधून वरच्या दिशेने वाहणारे वेगवान वारे या बिंदूपाशी एकवटतात आणि वेगाने ढगांच्या दिशेने जातात. या वाऱ्यांमध्ये टाकलेली कोणतीही वस्तू कड्यावरून खाली जात नाही. ती अतिशय वेगाने वरच्या दिशेने फेकली जाते. आणि तिला जर वजन नसेल तर अगदी रिसॉर्टपर्यंत देखील ती उडून जाऊ शकते! हा आमचा इथला नेहमीचा खेळ. त्यादिवशी देखील पुन्हा एकदा खेळून पाहिला. निसर्गात तयार होणाऱ्या अशा छोट्या छोट्या गमती अनुभवायला देखील एक वेगळीच मजा असते. घाटामध्ये एका ठिकाणी वनविभागातर्फे काही दृश्यबिंदू तयार केलेले आहेत. या ठिकाणावरून देखील माळशेज घाटातील हा परिसर इथली माणसं पाहता येतात. खालच्या त्या घनदाट जंगलामध्ये आपल्या दृष्टीद्वारे स्वतःला सामावता येते.
समोरच्या हरिश्चंद्रगडाच्या डोंगररांगांवर सातत्याने ढगांची गर्दी त्या दिवशी देखील दिसून येत होती. वाऱ्याच्या प्रवाहासोबतच ढग प्रवास करत होते. अचानक वाऱ्यांचे वेग वाढू लागले, ढगांची गर्दी देखील झाली आणि वर्षाधारा कोसळू लागल्या. यावर्षी माझ्या अंगावर अनुभवलेला तो पहिलाच पाऊस. अगदी चिंब भिजून गेलो. निसर्गाचा दरवर्षीचा अविष्कार पाहण्यासाठी मी सज्ज झालो होतो. यावर्षीचा हा पहिला अनुभव. कदाचित येथून पुढे देखील वर्षा ऋतूतील हा अनुभव पुन्हा शरीर सुखावून जाईल, हे निश्चित.
Monday, June 16, 2025
माळशेज व्ह्यू पॉईंट, एमटीडीसी रिसॉर्ट
Wednesday, November 6, 2024
गणपतीपुळे जेवण
गणेशोत्सवाच्या काळामध्ये पहिल्यांदाच आम्ही गणपतीपुळ्यामध्ये आलो होतो. पण गावामध्ये नेहमीप्रमाणे गर्दी नव्हती. अगदी शुकशुकाट म्हणावा असंच काहीतरी जाणवलं. त्या दिवशी राहण्याची खोली मात्र मनासारखी मिळाली होती. आता रात्रीच्या जेवणाची सोय करायची होती. बहुतांश हॉटेल्स बंद होते. कोकणामध्ये गणेशोत्सव हा व्यवसायाच्या दृष्टीने ‘ऑफ-सीजन’ असतो, असं म्हणायला हरकत नाही. कारण कोकणी लोक गणेशोत्सवाचे सर्व दिवस केवळ गणपतीच्या सेवेमध्ये मग्न असतात! अगदी गणपतीपुळ्यात देखील हाच अनुभव आम्हाला आला.
अखेरीस शोधत शोधत गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी एका हॉटेलमध्ये आम्हाला जेवण मिळाले. तशी तिथे गर्दी देखील बऱ्यापैकी होती. बरेच कमी हॉटेल्स चालू असल्याने कदाचित असं असावं. कोकणात आल्यावर इथल्या ओल्या नारळात बनविलेल्या मोदकांचा आस्वाद आम्ही नेहमी घेत असतो. आज देखील आम्ही आमची सवय मोडली नाही.
Monday, July 29, 2024
ग्रेस एक्झॉटिका, नाकारी
खोला गावातील समुद्रकिनारा बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. शिवाय या ठिकाणी समुद्रावर कायकिंग देखील केली जाते. परंतु त्याकडे जाणारा रस्ता मात्र पावसाळ्यामध्ये खराब झालेला दिसतो. एका रिसॉर्टच्या निमित्ताने आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न केला परंतु खराब रस्त्यामुळे तिथवर पोहोचता आले नाही. पुन्हा काही रिसॉर्ट गुगल मॅपवर शोधले. परंतु काही ठिकाणी रूम्स उपलब्ध नव्हत्या. अखेरीस खोला गावातून बाहेर पडलो. पुढच्याच नाकारी गावांमध्ये गुगल मॅपवर एक नवीन रिसॉर्ट दिसून आले. २० ते २५ मिनिटांमध्ये आम्ही या ठिकाणी पोहोचलो होतो. पाहता दर्शनीच हे रिसॉर्ट मनामध्ये भरले. अतिशय नीटनेटके भरीव आणि ठेवणेतील रचना केलेले हे रिसॉर्ट होते…. ग्रेस एक्झॉटिका.
दोन्ही बाजूंनी कौलारू खोल्यांची बांधकामे केलेली होती. जवळपास २० रूम्स या ठिकाणी असाव्यात. येथे प्रवेश केल्या केल्या समोरच गौतम बुद्धांची मूर्ती होती, त्याच्या शेजारी एक वाहणारा झरा आणि मागच्या बाजूला स्विमिंग पूल. याशिवाय परिसरात इतरत्र सुंदर झाडी आणि अन्य सुखसोयी देखील होत्या. मध्यभागी रेस्टॉरंट आणि त्याच्यामागे रिसेप्शन. पाहता क्षणी रिसॉर्ट मनामध्ये भरले. हे देखील लाकडानेच बांधलेले होते. परंतु बहुतांश लाकडी भाग प्लास्टिकच्या कागदांनी झाकलेला होता. तरीदेखील त्याचे सौंदर्य कमी झालेले नव्हते. अर्थातच ऑफ-सीजन असल्यामुळे या ठिकाणी देखील काहीच गर्दी नव्हती. आम्ही रिसेप्शनला जाऊन रूमची चौकशी केली रूम्स बघितल्या देखील आणि बजेटमध्ये बसल्याने बूक देखील केल्या. आमच्या दोन्ही रूम्स एकमेकांना एका दरवाजाने जोडलेल्या होत्या. अर्थातच आम्हाला हवी तशी राहण्याची जागा मिळाली होती. एका दिवसाची बुकिंग केली होती परंतु आम्ही दोन दिवस याच ठिकाणी थांबलो.
Saturday, July 27, 2024
अगोंद मधील पहिली रात्र
पावसाळा म्हणजे तसा गोव्यातील ऑफ-सीजनच. या काळामध्ये बहुतांश रिसॉर्ट आणि हॉटेल्स गोव्यात बंद असतात. गोव्यात प्रवेश केल्यानंतर गुगल मॅपच्या साह्याने आम्ही बऱ्याच रिसॉर्र्टसला कॉल केले. परंतु अनेकांनी पावसाळ्यामध्ये रिसॉर्ट बंद असल्याचे सांगितले. बहुतांश रिसॉर्ट हे लाकडामध्ये बांधण्यात आलेले आहेत. म्हणूनच पावसाळ्यात ते पूर्णपणे झाकले जातात. प्लास्टिकच्या कागदाने झाकल्याने लाकडाला पावसामुळे काहीच नुकसान होत नाही. आणि याच कारणास्तव रिसॉर्ट देखील बंद केलेले असतात. परंतु आमच्या नशिबाने अगोंदच्या किनाऱ्यावर असणारे ‘द गोवा व्हिलेज’ हे रिसॉर्ट आम्हाला मिळाले. बाहेरून पाहिलं तर बऱ्यापैकी ठीकठाक होते. आत मध्ये राहण्यासाठी झोपड्या सारखी रचना केलेली होती. आत एक भला मोठा बेड, शेजारी छोटासा बेड आणि कडेला पत्राच्या शेडमध्ये असणारे बाथरूम! अशा पद्धतीची निवास व्यवस्था येथे होती. रिसॉर्टच्या समोरच समुद्रकिनारा होता. पाऊस चालू झाल्याने बऱ्यापैकी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळेच समुद्राच्या लाटा देखील नेहमीपेक्षा अधिक वेगाने बाहेर पाणी टाकत होत्या. त्याचा आवाज निश्चितच नेहमीपेक्षा रौद्र भासत होता. रिसॉर्ट तसे पाहिले तर आमच्यापैकी कुणाला फारसे आवडले नाही. परंतु आजच्याच रात्रीचा प्रश्न होता म्हणून आम्ही सर्वांनी एकाच खोलीत राहायचे ठरवले. या रिसॉर्टमधील बाथरूमची तर एक निराळीच गंमत होती. खोलीच्या शेजारी पत्राच्या शेडमध्ये बाथरूम बांधलेले होते. पाऊस चालू झाल्यामुळे वरून सातत्याने पाण्याचे थंडगार थेंब गळू लागले होते. आमच्या बाथरूममध्ये तर एक नारळाचे झाड देखील होते. बाथरूममध्ये गेल्या गेल्या बाहेरच्या पावसाचा आणि वाऱ्याचा भयावह आवाज यायला लागायचा. इथे गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव सर्वांना आला. त्या दिवशी रात्री मात्र जेवणाची समस्या निर्माण झाली. रेस्टॉरंटमधील जेवण हे मसालेदार आणि अतिशय महागडे होते. म्हणूनच आम्ही गावामध्ये दुसरे कोणते हॉटेल आहे का, हे बघण्यासाठी बाहेर पडलो. नऊ नंतर बाहेर गेल्यामुळे जवळपास गावात सर्व काही शांत झाले होते. आधी मध्ये एखाद दुसरे दुकान उघडे असलेले दिसायचे. जवळपास एक किलोमीटर चालून गेल्यानंतर आम्ही गुगल मॅपवर शोधलेले रेस्टॉरंट बंद झाल्याचे दिसले. पुन्हा मागे निघालो रस्त्यामध्ये ‘मारिया पावलो’ नावाचे एक रेस्टॉरंट उघडे दिसले. त्या ठिकाणी मात्र आम्हाला जेवण मिळाले. जेवण झाल्यानंतर रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. त्या अंधारात आम्ही चालत चालत परत रिसॉर्ट पर्यंत आलो. रस्त्यात कुत्र्यांच्या भुंकण्याचा थरार अनुभवयास मिळाला. रात्री झोपायला अकरा वाजून गेले होते. दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर या रिसॉर्टमधून निघून दुसरे रिसॉर्ट शोधायचे होते. त्यामुळे सकाळीच समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारून आलो. स्वच्छता पाहिजे तशी नव्हती. पण गोव्यातील एक समुद्रकिनारा मात्र पाहायला मिळाला. किनाऱ्यावर बऱ्यापैकी पाळीव गुराढोरांची रेलचेल होती. असा नजारा कोकणात देखील बघायला मिळाला नव्हता! दहा-साडेदहाच्या सुमारास आम्ही सकाळची न्याहारी करून रिसॉर्ट सोडले. कदाचित या ठिकाणी पुढे कधीही येणार नसू हाच उद्देश मनात होता.
Sunday, March 29, 2020
मुळशी धरणाच्या सहवासात
शनिवारी सकाळची बॅच मी घेतली व निघता निघता बराच उशीर झाला. हिंजवडीच्या रहदारी मार्गातून रस्ता काढत आम्ही मुळशीच्या वाटेला लागलो. पावसाळा संपून तीन महिने झाले होते. परंतु तरीही झाडांची हिरवाई अजून सगळीकडे तग धरून होती. वळणावळणाचे रस्ते पार करत मुळशी धरणाच्या जवळ जाऊन पोहोचलो. एका ठिकाणी वाट चुकली होती. परंतु नंतर ती दुरुस्त झाली. अखेरचा घाट हा अतिशय वळणांचा व दाट झाडीतून जाणारा होता. हाच रस्ता मुळशी धरणाच्या माथ्यावर घेऊन जाणार होता. त्यातून वाट काढत आम्ही माथ्यावर पोहोचलो. रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकावर रिसॉर्ट स्थित होते. गाडीतुन उतरल्या उतरल्या मुळशी धरणाचा अथांग सागर दृष्टीस पडला. समोरच सूर्य मावळतीकडे झुकत चालला होता. त्याचेही प्रतिबिंब पाण्यात पडले होते. पाण्याच्या त्या विस्तीर्ण पसार्यात धरणाचे शेवटचे टोक काही दिसत नव्हते. आजूबाजूला होती फक्त डोंगर आणि झाडी. अतिशय दिव्य असा तो नजारा होता. स्थिर व स्तब्ध पाण्यावरून पक्षी मात्र घरी जाण्याची लगबग करीत होते. सूर्य आणखी खाली आला व डोंगराखाली जावयास निघाला तेव्हा एक सुंदर निसर्गचित्र या ठिकाणी तयार झाले होते. त्यावेळी फोटो काढण्याचा मोह मात्र कुणालाही आवरला नाही.
बर्याच दिवसांनी निसर्ग सृष्टीचा असा नजारा दृष्टीस पडला होता. त्यामुळे तो कित्येक काळ आमच्या आम्ही नजरेत साठवून ठेवत होतो. सूर्य मावळल्यानंतर ही तयार झालेला संधिप्रकाश सृष्टीसौंदर्याची अनुभूती देत असल्याचं दिसलं. राहण्यासाठी दोन खोल्या व एका तंबूची सुविधा केली होती. मग रात्रीची धमाल, मस्ती, गाणी अशी आमची एकंदरीत व्यूहरचना(!) होती. रात्री बारा वाजता केक कापून त्याची सांगता झाली. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायण दुसर्या दिशेने वर आले होते. त्यामुळे धरणाचा पूर्ण परिसर सोनेरी किरणांनी न्हाऊन निघालेला दिसला. रिसॉर्टच्या इथूनच एक रस्ता धरणाच्या पाण्यापाशी जात होतात. त्या रस्त्याने मी खाली गेलो. निसर्गाची अतीव शांतता या ठिकाणी अनुभवयास येत होती. मध्येच पक्ष्यांचा कोलाहल व त्यांचे निरनिराळे आवाज ऐकू येत. असं वाटायचं तासन्तास तेच आवाज ऐकत राहावं. निसर्गाशी हितगुज करण्याची ही सर्वात मोठी संधी मला प्राप्त झाली होती. मनाची खरी शांतता या ठिकाणी लाभत असते. त्याची तुलना अन्य कशाचीही होऊ शकत नाही. लवकर आवरायचे असल्याने तिथून निघणे कमी क्रमप्राप्त होते. त्यामुळे जड पावलांनी मी तिथून काढता पाय घेतला. सकाळची आवराआवरी झाल्यावर झिपलाईन सारखा साहसी प्रकार मी पहिल्यांदाच अनुभवला. त्यानंतर तिरंदाजीचीही काही काळ मजा लुटली व आम्ही परतीच्या वाटेला लागलो. एक विस्मयकारी अनुभव त्या दिवशी आला होता. तिथून निघताना निसर्ग सृष्टीला रामराम केला... तो पुन्हा इथे येण्यासाठीच!



























