माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...

Saturday, July 27, 2024

अगोंद मधील पहिली रात्र

पावसाळा म्हणजे तसा गोव्यातील ऑफ-सीजनच. या काळामध्ये बहुतांश रिसॉर्ट आणि हॉटेल्स गोव्यात बंद असतात. गोव्यात प्रवेश केल्यानंतर गुगल मॅपच्या साह्याने आम्ही बऱ्याच रिसॉर्र्टसला कॉल केले. परंतु अनेकांनी पावसाळ्यामध्ये रिसॉर्ट बंद असल्याचे सांगितले. बहुतांश रिसॉर्ट हे लाकडामध्ये बांधण्यात आलेले आहेत. म्हणूनच पावसाळ्यात ते पूर्णपणे झाकले जातात. प्लास्टिकच्या कागदाने झाकल्याने लाकडाला पावसामुळे काहीच नुकसान होत नाही. आणि याच कारणास्तव रिसॉर्ट देखील बंद केलेले असतात. परंतु आमच्या नशिबाने अगोंदच्या किनाऱ्यावर असणारे ‘द गोवा व्हिलेज’ हे रिसॉर्ट आम्हाला मिळाले. बाहेरून पाहिलं तर बऱ्यापैकी ठीकठाक होते. आत मध्ये राहण्यासाठी झोपड्या सारखी रचना केलेली होती. आत एक भला मोठा बेड, शेजारी छोटासा बेड आणि कडेला पत्राच्या शेडमध्ये असणारे बाथरूम! अशा पद्धतीची निवास व्यवस्था येथे होती. रिसॉर्टच्या समोरच समुद्रकिनारा होता. पाऊस चालू झाल्याने बऱ्यापैकी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळेच समुद्राच्या लाटा देखील नेहमीपेक्षा अधिक वेगाने बाहेर पाणी टाकत होत्या. त्याचा आवाज निश्चितच नेहमीपेक्षा रौद्र भासत होता. रिसॉर्ट तसे पाहिले तर आमच्यापैकी कुणाला फारसे आवडले नाही. परंतु आजच्याच रात्रीचा प्रश्न होता म्हणून आम्ही सर्वांनी एकाच खोलीत राहायचे ठरवले. या रिसॉर्टमधील बाथरूमची तर एक निराळीच गंमत होती. खोलीच्या शेजारी पत्राच्या शेडमध्ये बाथरूम बांधलेले होते. पाऊस चालू झाल्यामुळे वरून सातत्याने पाण्याचे थंडगार थेंब गळू लागले होते. आमच्या बाथरूममध्ये तर एक नारळाचे झाड देखील होते. बाथरूममध्ये गेल्या गेल्या बाहेरच्या पावसाचा आणि वाऱ्याचा भयावह आवाज यायला लागायचा. इथे गेल्यानंतर एक वेगळाच अनुभव सर्वांना आला. त्या दिवशी रात्री मात्र जेवणाची समस्या निर्माण झाली. रेस्टॉरंटमधील जेवण हे मसालेदार आणि अतिशय महागडे होते. म्हणूनच आम्ही गावामध्ये दुसरे कोणते हॉटेल आहे का, हे बघण्यासाठी बाहेर पडलो. नऊ नंतर बाहेर गेल्यामुळे जवळपास गावात सर्व काही शांत झाले होते. आधी मध्ये एखाद दुसरे दुकान उघडे असलेले दिसायचे. जवळपास एक किलोमीटर चालून गेल्यानंतर आम्ही गुगल मॅपवर शोधलेले रेस्टॉरंट बंद झाल्याचे दिसले. पुन्हा मागे निघालो रस्त्यामध्ये ‘मारिया पावलो’ नावाचे एक रेस्टॉरंट उघडे दिसले. त्या ठिकाणी मात्र आम्हाला जेवण मिळाले. जेवण झाल्यानंतर रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. त्या अंधारात आम्ही चालत चालत परत रिसॉर्ट पर्यंत आलो. रस्त्यात कुत्र्यांच्या भुंकण्याचा थरार अनुभवयास मिळाला. रात्री झोपायला अकरा वाजून गेले होते. दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर या रिसॉर्टमधून निघून दुसरे रिसॉर्ट शोधायचे होते. त्यामुळे सकाळीच समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारून आलो. स्वच्छता पाहिजे तशी नव्हती. पण गोव्यातील एक समुद्रकिनारा मात्र पाहायला मिळाला. किनाऱ्यावर बऱ्यापैकी पाळीव गुराढोरांची रेलचेल होती. असा नजारा  कोकणात देखील बघायला मिळाला नव्हता! दहा-साडेदहाच्या सुमारास आम्ही सकाळची न्याहारी करून रिसॉर्ट सोडले. कदाचित या ठिकाणी पुढे कधीही येणार नसू हाच उद्देश मनात होता.

 




 


No comments:

Post a Comment