चहूबाजूंनी डोंगरांच्या रांगा आणि कुठेतरी छोट्याशा खिंडीतून पलीकडे जाणारे रस्ते ओलांडत मी या जलाशयाच्या काठाशी पोहोचलो. मानवी वस्तीपासून बऱ्यापैकी दूर असणारा हा परिसर सकाळच्या वेळी खूपच शांत दिसत होता. ऐकू येत होती फक्त पक्षांची किलबिल. मध्येच वाऱ्याचा मंदसा आवाज देखील यायचा. जलाशयाच्या पाण्यामध्ये जलचर मस्ती करत होते, असं वाटत होतं. पलीकडच्या डोंगररांगातून सूर्यदेव त्या जलाशयात आपलं प्रतिबिंब न्याहाळत होता. पाणी स्थिर आणि स्थितप्रज्ञ भासत होतं. निसर्गाची अशी अद्वितीय अनुभूती फारच क्वचित वेळा पाहायला मिळते. या प्रसंगांचा अनुभव आपल्याला निसर्गाशी एकरूप करायला मदत करतो. मन:शांती मिळवण्यासाठी कुठलाही कोर्स करण्याची आवश्यकता भासत नाही. मानवी गर्दी पासून दूर निसर्गाच्या कुशीत गेलं की निसर्गलेणी आपल्याला मनःशांती मिळवून देतात.
No comments:
Post a Comment