मागच्या कित्येक वर्षांमध्ये कोकणातल्या विविध ठिकाणी आम्ही भेटी दिल्या. महाराष्ट्रातल्या नयनरम्य ठिकाणांपैकी पहिल्या क्रमांकाचे कोकणच असावे, असे आम्हाला वाटते. दरम्यान अनेक जण जवळच्याच गोव्याला जाऊन यायचे. तसे पाहिलं तर अनेकांसाठी गोवा म्हणजे सर्वोत्तम डेस्टिनेशनच मानले जाते. असेच एक दिवस आम्हाला देखील गोव्याला जाण्याची संधी मिळाली होती. सिंधूदुर्गातल्या शिरोडा येथे आम्ही फिरायला गेलेलो होतो. पणजीमध्ये आमच्या पुस्तकांच्या कामाच्या निमित्ताने आम्ही गोव्यामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. त्या दिवशी काम झाले नाही. परंतु आग्वाडा किल्ला आणि कांदोळी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन आलो. ही आमची गोव्याची पहिली वारी. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी देखील पणजीला परत गेलो होतो. असे सलग दोन दिवस गोव्याच्या राजधानीमध्ये आम्ही जाऊन आलो. अर्थात केवळ फिरण्यासाठी ही भेट नव्हतीच. परंतु या वेळेस गोव्याचा निश्चित प्लॅन बनवला. अर्थात या योजनेमध्ये केवळ गोव्यात फिरण्याचा फिरण्याची योजना होती. कुठे काय? याचे उत्तर तिथे गेल्यावरच शोधणार होतो. माझे सलग दीडशे तास चालणारे प्रशिक्षण वर्ग संपले. त्याच दिवशी पुण्यातून निघण्याचा विचार होता. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी अर्थात रविवारीच निघण्याचे ठरले. पहिल्यांदा कर्नाटकातील गोकर्ण येथे जाण्याचा विचार होता. पण पहिल्या दिवशी गोव्यातच थांबू असा विचार केला. पुण्यातून निघाल्यावर आमचा पहिला थांबा सिंधुदुर्गातल्या आंबोलीमध्ये पडला. इथेच आम्ही महादेवगड आणि शिरगाव पॉईंटला देखील जाऊन आलो. त्यानंतर मात्र थांबलो नाही. अंबोलीच्या त्या नेत्रसुखद आणि वळणावळणाच्या घाटातून खाली उतरत मुंबई-गोवा महामार्गाला लागलो आणि पणजीमध्ये पोहोचलो. पावसाळी वातावरण बऱ्यापैकी तयार झालेले होते. किंबहुना यापूर्वी पावसाच्या बऱ्याच सरी येऊन गेलेल्या होत्या. म्हणून पूर्णपणे ढगाळ वातावरण होते. शिवाय अधूनमधून वर्षाधारा देखील कोसळत होत्याच.
पणजी पार केली. थोड्या वेळात मडगाव देखील गेले आणि आम्ही दक्षिण गोव्यामध्ये प्रवेशकर्ते झालो. अगोंद या समुद्र तटावरील गावी थांबण्याची योजना केली. त्यासाठी मुख्य रस्त्यातून आत मध्ये समुद्रकिनाऱ्यावर एक रिसॉर्ट सापडले. याच ठिकाणी आज मुक्काम करायचे ठरवले. मुंबई-गोवा महामार्गावरून बाळ्ळी या गावाच्या फाट्यापासून किनाऱ्याच्या दिशेने उजवीकडे वळालो. आणि दाट आणि गडद हिरव्यागार वनराईतून भिजलेल्या डांबरी रस्त्यांवरून आम्ही अगोंदच्या दिशेने निघालो. दक्षिण गोव्यातील वनराई अधिक घनदाट दिसून येत होती. किंबहुना कोकणापेक्षा अधिक दाट झाडी या ठिकाणी असावी. अधूनमधून पावसाच्या सरी येतच होत्या. या भागात तशी लोकसंख्या फारशी दिसून आली नाही. घनदाट झाडीतून जाणारे वळणावळणाचे रस्ते या परिसराच्या सौंदर्याची जाणीव करून देत होत्या. अखेरीस महामार्गापासून निघाल्यानंतर अर्ध्या तासात आम्ही अगोंद या गावी पोहोचलो. पोहोचण्याच्या थोडं आधीच ज्या ठिकाणी गावाकडे येण्याचा फाटा आहे तिथे दोन चार चाकी मधील माणसे कोकणी भाषेत भांडताना दिसली. त्यादिवशी आम्ही पहिल्यांदाच कोकणी भांडण अनुभवले. या ठिकाणाला आम्ही कोकणी भांडण पॉईंट असे नाव देखील देऊन टाकले. कारण इथून जवळपास चार ते पाच वेळा नंतर आम्ही गेलो असू!
![]() |
पणजी मधील चर्च |
![]() |
दक्षिण गोव्याच्या झाडीतून |
![]() |
पणजी मधील चर्च |
![]() |
अगोंद मधील चर्च |
![]() |
द गोवा व्हिलेज रिसॉर्ट |
![]() |
मडगांव मधील चर्च |
![]() |
मुंबई-गोवा महामार्ग |
![]() |
पणजीहून मडगावकडे |
![]() |
अटल सेतू, पणजी |
![]() |
गोव्यात प्रवेश |
No comments:
Post a Comment