माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label धबधबा. Show all posts
Showing posts with label धबधबा. Show all posts

Friday, June 20, 2025

ताम्हिणी घाट

आत्तापर्यंत मागच्या ४० वर्षांमध्ये मी कधीही मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडलेला पाहिलेला नाही. त्यामुळे जुनच्या सुरुवातीलाच सगळीकडे हिरवाई पसरलेली होती. परंतु पाऊस मात्र थांबला होता. मागच्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये ताम्हिणी घाटातील धबधबे प्रवाहित झाले होते. यावेळेसची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळे होते. कोकणात उतरण्यासाठी यावेळी ताम्हिणी घाटाने निघालो होतो. मागच्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पूर्णपणे थांबलेला होता. आणि म्हणूनच हळूहळू उन्हाच्या झळादेखील बसू लागल्या होत्या. असं असलं तरी घाटमाथ्यावर बऱ्यापैकी ढगांची रेलचेल दिसून येते. शिवाय अधूनमधून पावसाचा शिडकावा देखील होत असतो. 
ताम्हिणी घाट चढायला सुरुवात केली तेव्हा देखील या परिसरात सर्वत्र ऊन पडलेलं होतं. मुळशी धरणातील पाण्याने बऱ्यापैकी तळ गाठलेला होता. त्या वळणावळणांच्या रस्त्यांवरून प्रवास करताना आजूबाजूची वनराई छानपैकी हिरवाईने नटलेली दिसत होती. अगदी पावसाळ्याच्या मध्यावर दिसते तशीच. पुणे जिल्ह्याची हद्द ओलांडून रायगड जिल्ह्यामध्ये प्रवेश केला. याच परिसरामध्ये डावीकडच्या उंच कड्यांवरून पावसाळी जलधारा सातत्याने कोसळत असतात. मागच्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने इथले जलप्रपात दिसतील की नाही, याबाबत साशंकता होती. परंतु निसर्गाने आम्हाला आश्चर्याचा धक्का दिला. अगदी कडक उन्हामध्ये ताम्हिणी घाटाच्या त्या उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे त्या दिवशी पांढऱ्या शुभ्र पाण्याचा वर्षाव करताना दिसून आले. उन्हामध्ये इतके स्वच्छ धबधबे पाहण्याचा योग त्या दिवशी आला. खर तर हा एक दुर्मिळ असा प्रसंग होता! अर्थात मी स्वतः गाडी चालवत असल्याने कॅमेऱ्यामध्ये हा क्षण टिपू शकलो नाही. केवळ एकाच ठिकाणी नाही तर ज्या ज्या ठिकाणी धबधब्यांचे बिंदू आहेत तिथे सर्वच शुभ्र पाण्याचे जलप्रपात कोसळताना दिसून आले. आणि अर्थातच पावसाळी पर्यटकांची गर्दी देखील तितकीच होती. आकाशात ढगांची गर्दी नसताना, पाऊसही पडत नसताना काळ्या पाषाणांवरून जमिनीकडे झेपणाऱ्या त्या जलधारा म्हणजे निसर्गाचा एक सुंदर अविष्कारच होता.


 

Wednesday, July 3, 2024

महादेवगड दृश्यबिंदू

कोल्हापुरातल्या आजरा तालुक्याची हद्द संपली की सिंधुदुर्गातलं निसर्गरम्य आंबोली गाव लागतं. घाटातल्या जगप्रसिद्ध धबधब्यासाठी हे गाव सर्वज्ञात आहे. गाव संपलं की लगेचच उजव्या बाजूला महादेवगड दृश्यबिंदूकडे जाणारा रस्ता आहे. चहूबाजूंनी घनदाट झाडी आणि त्यातल्या त्यात पावसाळ्यात ते अधिक दाट भासायला लागते. सुमारे अडीच किलोमीटरचा रस्ता जंगलातील त्या घनदाट वाटेने पार केल्यानंतर आपण महादेवगडाच्या दृश्यबिंदूपाशी येऊन पोहोचतो. वनविभागाने या ठिकाणी पर्यटकांसाठी काही सुविधा देखील निर्माण केलेल्या दिसतात. या दुर्गाचा इतिहासात कुठेही उल्लेख झालेला मला तरी वाचनात आलेला नाही. दुर्ग असला तरी त्याचे अवशेष पूर्णपणे गळून गेलेले दिसले. परंतु इथलं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महादेवगडाच्या या दृश्यबिंदूवरून आंबोली परिसरातील सह्याद्रीची घनदाट जंगले दूर दूरवर दिसून येतात. महाराष्ट्रातील ऑक्सिजनचे हे कोठार मान्सूनच्या जलवर्षावाने अधिक मनमोहक भासते. आंबोलीचा धबधबा देखील इथून पाहता येतो. तसेच समोरच मनोहर आणि मनसंतोषगडाचे देखील ढगांच्या लपाछपीमध्ये दर्शन होते.
निसर्ग भटकंती करणाऱ्यांसाठी हा परिसर म्हणजे मेजवानीच.


 

Monday, July 24, 2023

एका फोटोमागची गोष्ट

बरोबर दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या दिवशी माझ्या लग्नाची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आली होती. अर्थात त्यास अंतिम स्वरूप द्यायचे बाकी राहिले होते. त्याच दिवशी सकाळी मी आणि माझा भाऊ दोघेही ओतूरच्या लागाच्या घाटामध्ये फिरण्यासाठी निघालो होतो. पावसाळ्याचा शेवटचा महिना चालू होता. ओतूर सोडल्यानंतर पुढे फापाळे शिवार नावाचे गाव लागते. तिथे पोहोचल्यावर दूर मुंजाबाच्या डोंगरावर एक धबधबा दिसून आला. या धबधब्यापाशी आम्ही यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. त्यामुळे आज तिथेच जाऊया असे ठरवले. मग लागाच्या घाटाने वरती पठारावर पोहोचलो. इथे अहमदनगर जिल्हा सुरू होतो. तसा हा भाग बऱ्यापैकी दुर्गम आहे. रस्ते मात्र ठीकठाक आहेत. घाट चढून थोडं पुढे गेल्यावर डाव्या बाजूला वळालो. रस्त्यावर एका ठिकाणी एक सुंदर मंदिर दिसून आलं. तिथूनच पुढे कदाचित या धबधब्यापाशी जाणारा रस्ता असावा, असं वाटलं. रस्त्यावर एक गुराखी गुरे वळताना दिसून आला. त्याला या धबधबाविषयी विचारलं. त्यानेच आम्हाला या धबधब्याचे नाव धूरनळी धबधबा आहे, असं सांगितलं आणि मार्गही दाखवला. वातावरणामध्ये पुन्हा पावसाचा खेळ चालू होता. त्यामुळे पावसाची निश्चितता नव्हतीच.
गुराख्याने सांगितलेल्या मार्गाने आम्ही चालत चालत पुढे गेलो आणि थोडंसं खाली उतरल्यानंतर समोरच धुरनळी धबधबा दिसून आला. त्या दिवशी तिथे बऱ्याच वेगाने वारे वाहत होते. अर्थात त्यामध्ये विस्कळीतपणा होता. म्हणून जेव्हा वाऱ्याचा वेग खालच्या दिशेने जोरात यायचा तेव्हा या धबधब्याचे पाणी वेगाने मागे फेकले जायचे. त्या काळात आजच्या इतकी प्रभावी सोशल मीडिया नसल्यामुळे या धबधब्यापाशी काहीच गर्दी नव्हती. आम्ही पाण्याच्या प्रवाहामध्ये पोहोचलो. अचानक वेगाने वारी आले की धबधब्यातून खाली पडणारे पाणी जोरात मागे फेकले जायचे. हा नेहमीचा उर्ध्व जलप्रपात नव्हता. वातावरणाच्या स्थितीमुळे तो आज आम्हाला तसा दिसून येत होता. मी थोडासा मागे थांबलो होतो. भाऊ पाण्यामध्ये चालत गेला आणि समोरून वेगाने वारे आल्यावर त्याच्या अंगावर पाणी उडायला लागले. त्याने दोन्हीही हात उंचावले. आणि त्या क्षणी मी हा फोटो काढला होता.
अनेकांना असं वाटतं की हा ऊर्ध्व जलप्रपात अर्थात "रिवर्स वॉटरफॉल" आहे. पण तसं नाही. अतिशय क्वचित प्रसंगी त्याचे पाणी उलट्या दिशेला फेकले जाते. विशेष म्हणजे हा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यामध्ये कोसळतो. आजकाल पावसाळ्यात या धबधब्याच्या खालच्या दिशेला लोकांची भयंकर गर्दी असते. अनेक जण हा फोटो बघूनच रिवर्स वॉटर फॉल बघायचा म्हणून या ठिकाणी येतात. खराखुरा ऊर्ध्व जलप्रपात बघायचं असेल तर जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी पुणे जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यात कोसळणारा धबधबा किंवा दुर्गवाडी पठारावर असणारा छोटेखानी धबधबा पाहता येऊ शकेल.


 

Monday, November 9, 2020

जुन्नरच्या अणे घाटातील धबधबा

पावसाळा संपून महिना होत आला. झरे आणि धबधब्यांमधलं वाहतं पाणी आता मंद होत चाललंय. काही ठिकाणी तर ते पूर्णतः आटलंय. पण, जुन्नरच्या अणे घाटातील गुळुंचवाडीच्या नैसर्गिक पुलाखालून वाहणारा हा धबधबा आजही त्याच जोमाने वाहतोय. आजूबाजूला मोठमोठाल्या डोंगररांगा नसूनही घाटातील दरीत खुळखुळणाऱ्या पाण्याचं निसर्ग संगीत सातत्याने अबाधित राखतोय. हीच निसर्गाची किमया आहे! 



Tuesday, October 13, 2020

दुर्गावाडीचा ऊर्ध्व जलप्रपात

कोकणकड्याची सफर करण्यासाठी जुन्नरमध्ये असणाऱ्या अनेक स्थळांपैकी एक म्हणजे दुर्गावाडी होय. केवळ कोकणकडाच नाही तर छोटेखानी किल्ला, निसर्ग सौंदर्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उलटा जलप्रपात यासाठी दुर्गावाडी हे नाव मी खास करून लक्षात ठेवतो. जुन्नर मावळातला हा सर्वात लांबचा परिसर होय. नाणेघाटापेक्षाही अवघड वाटेवर आणि पुणे जिल्ह्याच्या अंतिम टोकावर वसलेलं दुर्गावाडी हे गाव होय.
आपटाळे नंतर मावळात प्रवेश केला की, डाव्या बाजूला इंगळुन गाव लागतं. इंगळुन पासून सरळ डोंगराकडे जी वाट जाते, जिथे डांबरी रस्ता बनवलेला आहे त्याला आंबे हातवीज घाट म्हणतात. ह्याच घाटाने वर गेल्यावर सर्वात शेवटचं गाव आहे दुर्गावाडी. घाट तसा डांबरी रस्त्याचा आहे. पावसाळ्यामध्ये इथे सर्व दाट झाडी हिरवाईने नटलेली असते. शिवाय घाटामध्ये एक सुंदर असा धबधबा देखील आहे. शहरी वस्तीपासून दूर असल्यामुळे इथे फारशी गर्दी दिसून येत नाही. कधीतरी एखादं वाहन घाटातून जाताना दिसतं आणि त्याहीपेक्षा राज्य महामंडळाची बस दोन ते तीन वेळा या रस्त्याने जाते. घाट तसा सुंदर आहे जसं आपण वर चढत जातो, जुन्नर मावळातला बराचसा परिसर आपल्या नजरेमध्ये येतो. सात ते आठ किलोमीटर पार केल्यानंतर आपण आंबे-हातवीज पठारावर पोहोचतो. घाट संपल्यानंतर उजव्या बाजूचा रस्ता हा दुर्गावाडीकडे जातो. याच रस्त्यावर आधी आंबे नंतर हातवीज आणि सर्वात शेवटी दुर्गावाडी गाव आहे. पहिल्यांदा प्रवास करणाऱ्याच्या संयमाची कसोटी मात्र येथे लागते. कारण माझा तसाच अनुभव आहे. जुन्नर परिसर इतका विस्तीर्ण आहे, हे मला या भागात आल्यानंतर पहिल्यांदा समजले. 



दुर्ग आणि ढाकोबा च्या शोधात आम्ही २०१२ मध्ये पहिल्यांदा याठिकाणी आलो होतो. त्यानंतर बर्‍याचदा पर्यटनाच्या निमित्ताने इकडे येणे झाले. आंबे-हातवीज पठार हे आमचं जुन्नर मधलं फुलांचे पठार होय. ते पार केल्यानंतर बऱ्याच अंतरावर कोकणकडा आहे. या कड्याच्या अलीकडेच दुर्गावाडीची छोटेखाणी वस्ती दिसून येते. दुर्गावाडी संपलं की, पुढे दुर्ग अर्थात दुर्गाबाईचा किल्ला आहे. किल्ला म्हणावं तसं इथे काहीच उरलेले नाहीये. परंतु, एक छोटासा ट्रेक करण्यासाठी मात्र हा किल्ला उत्तमच. या किल्ल्याभोवती एक छोटी वनराई आहे. वनराईत प्रवेश केल्यानंतर उजव्या बाजूला किल्ल्यावरती जाता येते. वनराई पार केल्यानंतर समोर एक विस्तीर्ण माळरानही दिसते. तिथुनच दुरवर ढाकोबा शिखर दिसून येतं आणि पठाराच्या शेवटी कोकणकडा आहे. आजकाल इथे जुन्नर वनविभागाने रेलिंग लावलेल्या आहेत. पर्यटकांची गर्दी होत असल्याने या ठिकाणी संरक्षक रेलिंग लावण्यात आल्या असाव्यात. या आम्ही आमच्या पहिल्या भेटीत पाहिल्या नव्हत्या. असं संरक्षण न असता कोकण कड्यावरून खाली पाहणं, म्हणजे डोकं गरगरत होतं. आता तर ही जागा सुरक्षित झाली आहे. पावसाळ्यात भयंकर धुकं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऊर्ध्व अर्थात उलटा धबधबा या ठिकाणी पाहायला मिळतो. कोकणकड्याच्या खाली ठाणे जिल्हा आहे. तिकडून येणारे वारे वेगवान वारे अतिशय जोरात कोकणकड्यावर धडकतात. त्यामुळेच इथून खाली वाहणारे पाणी पुन्हा वेगाने मागे सरकते व उलटा धबधबा तयार होतो. पर्यटकांची तशी याठिकाणी कमी गर्दी असते. त्यामुळे ह्या धबधब्याच्या आनंद आपल्याला बिना गर्दीचा घेता येऊ शकतो. इथं वाहणारे वारे मात्र प्रचंड वेगाने वाहत असतात. पाण्याचे असंख्य अगणित तुषार अंगावर घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. पावसाळ्यातले दोन ते तीन महिने येथे अशीच परिस्थिती असते. या जलप्रपातात न्हाऊन निघण्यासाठी आम्ही दरवर्षी एकदा तरी याठिकाणी येत असतो.

Friday, July 10, 2020

ठिकेकरवाडी

जुन्नर मधल्या पुष्पावती नदीच्या काठावर वसलेलं ठिकेकरवाडी हे गाव होय. ते ओतूर-ओझर मार्गावर स्थित आहे. नेतवड गावात पुष्पावती व मांडवी नदी एकत्र आल्यावर दोन्हींचा एकत्रित जलप्रवाह ठिकेकरवाडीपाशी फेसाळत्या जलप्रपातामध्ये पाहता येतो. नदीतल्या उंच-सखल पाषाण रचनांमुळे इथे बरेच धबधबे नदीपात्रात तयार झालेले दिसतात. गावातून नेतवडकडे जाण्यासाठी नदीवर एक पूल बांधलेला आहे. तिथून नदीचे नयनरम्य रूप दिसून येते. जलप्रवाहाचा वेग वाढला की, फेसाळत्या दूधसागरांचे धवधबे पाहण्याचा मनमुराद आनंद येथे घेता येतो.





 


Friday, March 27, 2020

अंबावडे

पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्‍यात निसर्गाच्या कुशीत वसलेलं गाव म्हणजे अंबावडे होय! भोर-रायरेश्वर रस्त्यावर हे गाव स्थित आहे. अंबावडे गावाला छोटेखानी निसर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात नक्कीच हरकत नसावी, इतकी नैसर्गिक सुंदरता या ठिकाणी वसलेली दिसते. पावसाळ्याव्यतिरिक्तही येथे झुळझुळ वाहणारे झरे पाहता येतात. शिवाय एक छोटासा झुलता पूलही तलावावर बांधलेला आहे. या गावाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे शिवरायांचे मावळे सूर्याजी जेधे व जीवा महाले यांचे स्मृतिस्थळ येथे आहे.