माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label दर्गा. Show all posts
Showing posts with label दर्गा. Show all posts

Monday, November 11, 2019

शमाधर दर्गा, एकलहरे

पुणे-नाशिक महामार्गावर मंचरच्या पुढे मंचर खिंड ओलांडली की डाव्या बाजूला एका डोंगराच्या टोकावर पांढऱ्या रंगाचं बांधकाम दिसतं. तोच शमाधर दर्गा होय. रस्त्यावर जाता-येताना मला नेहमीच्या दर्ग्याच्या डोंगरावर जाण्याचे आकर्षण वाटत आले होते. शेवटी एक दिवस तो योग आलाच. या दर्ग्याचा डोंगर हा बर्‍यापैकी उंच आहे. लांबून मात्र त्याच्याकडे जाण्याचा रस्ता कुठून आहे, हे लवकर ध्यानात येत नाही. त्यासाठी स्थानिकांनाच हा रस्ता विचारावा लागतो. मंचर खिंडीतून साधारणत: एक किलोमीटर पुढे एक चौधरी निसर्ग ढाबा आहे. याच ढाब्याच्या अलीकडे त्याला लागून एक सरळसोट रस्ता वरच्या डोंगराच्या दिशेने जातो. पावसाळ्यात या रस्त्याची स्थिती फारशी बरी नसते. परंतु, अगदी कारही या डोंगराच्या पायथ्यापर्यंत जाईल असे गृहीत धरता येऊ शकते. एकलहरे गावातून पलीकडच्या सुलतानपूर गावात जाण्यासाठीचा हा एक कच्चा रस्ता आहे. खूपच मुश्किलीने या डोंगरातून बाईक पलिकडच्या गावात जाऊ शकते. परंतु शमाधरला जाण्यासाठी पायपीट करत गेले तर योग्यच. मी या दर्ग्याच्या डोंगरावर पहिल्यांदा गेलो, तेव्हा एकटाच होतो मला एकट्यालाच रस्ता शोधायचा होता. पायथ्याशी एका ठिकाणी चौकशी केली तेव्हा समजले की, डोंगराच्या निम्म्या पासून पायऱ्या आहेत. त्यामुळे ही खूण लक्षात ठेवत मार्गक्रमण चालू केले. मळलेल्या पायवाटेने निम्म्यापर्यंत गेल्यावर डाव्या बाजूला शमाधर दर्ग्याचे सर्वोच्च टोक दिसू लागले. तसेच काही अंतरावर पायऱ्याही दिसत होत्या. सिमेंटने बांधलेल्या पांढऱ्या रंगाच्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत होत्या. त्यांच्या समोरच उजव्या बाजूला पाण्याचे छोटेखानी टाके दृष्टीस पडले. ते पावसाळा नुकताच संपल्याने तुडुंब भरलेले होते. उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने पायर्‍यांच्या शेजारच्या एका कठड्यावर थोडी विश्रांती घेतली व पुन्हा मार्गक्रमण चालू ठेवले. थोड्याच वेळात सिमेंटच्या पायर्‍या संपून दगडी पायर्‍या चालू झाल्या होत्या. एखाद्या किल्ल्याला असाव्यात अशा त्या पायऱ्या होत्या. वळणावळणाचा सुन्दर रस्ता व आजूबाजूला दाट झाडी होती. त्यातून एखादा किल्ला चढावा, असे भासत होते. खालच्या सिमेंटच्या पायर्‍या एक दोन वर्षांत खराब होतील परंतु, दगडी पायऱ्या कित्येक वर्षे पाय रोवून उभ्या राहतील, अशाच होत्या. अखेरीस एक छोटी विश्रांती घेऊन मी दर्ग्याच्या जवळपास पोहोचलो. अलीकडे तीन-चार मोठाले दगड लावून ठेवलेत. त्यांनाही दर्ग्याचा पांढरा रंग देण्यात आला होता. त्यातून एक चिंचोळी वाट या डोंगराच्या सर्वोच्च माथ्यावर अर्थात शमाधर दर्ग्यापाशी जाते. अन्य दर्ग्यांसारखा हाही एक दर्गा होता. पण महत्त्वाचे म्हणजे दर्ग्याची जागा वगळता या टोकावर अन्य फारशी जागा नव्हती. उजव्या बाजूला जिथे दर्ग्याची सावली पडत होती, तिथे फरशा टाकलेल्या होत्या. दुपारचे साडेबारा वाजलेले, उन्हाची तीव्रताही वाढलेली होती. त्यात या टोकावर वारा सुटलेला व आजूबाजूच्या पावसाळ्यात वाढलेली दाट झाडी होती. मग काय, त्या सावलीतल्या फरशीवर अंग टाकले व आकाशाकडे बघून डोळे बंद केले. आम्हाला निसर्गसानिध्य इतके का आवडते? तर ते याच आल्हाददायक वातावरणासाठी! खरे तर निसर्ग आपल्याला जितका देतो तितका इतर कोणीच देत नाही.
दहा मिनिटांनी तिथून उठलो व समोरचा परिसर निहाळायला सुरुवात केली. हा डोंगर बराच उंच असल्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्याचा मोठा परिसर या ठिकाणावरून दिसत होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नारायणगाव व मंचर ही दोन्ही गावे एकाच वेळी दिसतील, असे हे एकमेव ठिकाण असावं! शिवाय येथून नारायणगड किल्लाही दिसत होता. अशा या सुंदर ठिकाणाहून परतण्याची इच्छा तर होत नव्हती. त्यामुळे जड अंत:करणाने परतीच्या वाटेला चालायला सुरुवात केली.