माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label देवी. Show all posts
Showing posts with label देवी. Show all posts

Friday, October 28, 2022

सप्तशृंगी मंदिर बोटा

जुन्नरच्या परिसरातील सर्व लहान मोठे डोंगर आणि टेकड्या चढून झाल्या होत्या. म्हणून थोडसं तालुक्याच्या सीमेबाहेर जाण्याचे ठरवलं. आळेफाट्यापासून नाशिकच्या रस्त्यावर बारा किलोमीटर अंतरावर बोटा हे छोटेखानी गाव आहे. नवीन रस्ते प्रकल्पामध्ये या गावाला देखील बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे. याच बायपास रस्त्याने गेल्यावर डावीकडे एक छोटी टेकडी दिसून येते. या टेकडीवर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. आज या मंदिराला भेट द्यायची होती.
घरून निघायला तसा मला उशीरच झाला होता. सूर्योदय झालेला होता. आकाश निरभ्र होतं. आणि नेहमीप्रमाणे पुणे नाशिक महामार्गावरील वाहने ९०-१०० च्या वेगाने प्रवास करीत होती. बोटा गावाच्या बायपासला लागलो तेव्हाच सप्तशृंगीची ही टेकडी व्यवस्थित दिसायला लागली होती. टेकडीच्या माथ्यावर भगवा झेंडा डौलाने फडकत होता. परंतु माथ्यावर मंदिराचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. जवळ आल्यानंतर गाडीचा वेग थोडा कमी केला व रस्त्याशेजारी उभे असलेल्या ग्रामस्थाला मंदिराच्या रस्त्याविषयी विचारले. त्याने रस्त्याची माहिती दिली. मग थोडसं पुढे जाऊन एका मोकळ्या ठिकाणी गाडी महामार्गाच्या बाजूला लावली आणि टेकडी चढायला सुरुवात केली. गुगल मॅप मध्ये देखील मंदिर याच टेकडीवर दाखवण्यात आले होते. पण ते अजूनही मला दिसत नव्हते. रस्ता मात्र बऱ्यापैकी मळलेला दिसत होता.३००-४०० मीटर पर्यंत अगदी कार देखील जाऊ शकेल इतका तो रुंद होता. टेकडीला थोडासा वळसा घालून मग वरच्या दिशेने जाणारी पायवाट दिसून आली. चालताना रस्त्यावरून महामार्गावरून वेगाने वाहणाऱ्या वाहनांचे आवाज सातत्याने येतच होते. आपण मानवी रहदारीपासून दूर नाही याची आठवण ते करून देत होते. इतर टेकड्यांवरील मंदिरांकडे जाण्यासाठी जशी पायवाट असते तशाच प्रकारची तसेच डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या ओहोळाने ती तयार झालेली होती. अगदी पाच ते सहा मिनिटांमध्ये मी मंदिरापाशी पोहोचलो. पूर्ण टेकडीमध्ये दाट झाडी असणारी ती एकमेव जागा होती. या ठिकाणी बाभळीच्या छोट्या छोट्या झाडांचा भला मोठा पुंजका दिसून आला. या पुंजक्याच्या मागेच एका नैसर्गिक गुहेमध्ये सप्तशृंगी चे मंदिर बांधलेले आहे.
गुहा नैसर्गिक असली तरी काही ठिकाणी विटांचे व बाहेरच्या बाजूला सिमेंटचे तसेच लोखंडाचे देखील बांधकाम दिसून आले. गुहेच्या मध्यवर्ती भागात सप्तशृंगीची भिंतीला जोडलेली मूर्ती दिसत होती. मंदिरावर सन २००३ चे बांधकाम असल्याचे लिहिलेले होते. सूर्य एव्हाना बऱ्यापैकी वर आलेला होता. तिथून दूर दूर पर्यंतचा परिसर आता न्याहाळता येऊ शकत होता. पायथ्याशी असणारे बोटा गाव देखील पूर्ण दृष्टीमध्ये येत होते. शिवाय पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग जवळपास दहा किलोमीटर पर्यंत पाहता येऊ शकत होता. मंदिराच्या आसपास कोणीही नव्हते. एकांतात बसण्यासाठी ही एक उत्तम जागा होती. पण गाड्यांचा गोंगाट त्या एकांताला एकांत म्हणू देत नव्हता.
मंदिर डोंगराच्या माथ्यावर नाहीये तरी डोंगराच्या माथ्याकडे जाण्यासाठी एक छोटेखानी पायवाट मंदिरा शेजारून जाताना दिसली. केवळ एका मिनिटांमध्ये मी त्या टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. तिथे सप्तशृंगी नावाचा लोखंडी फलक दिसून आला. खरंतर याला फलक म्हणता येणार नाही. लोखंडी सळ्यांनी हे नाव तयार केले होते. कदाचित या नावांमध्ये पूर्वी रोषणाई केलेली असावी. जेणेकरून रात्रीच्या अंधारात देखील ही टेकडी दुरून पाहता येत असेल. टेकडीच्या सर्वोच्च टोकावर खालून दिसत असलेला भगवा झेंडा फडकत होता. मागच्या बाजूला बऱ्यापैकी रान होतं आणि सह्याद्रीच्या डोंगररांगा देखील दिसून येत होत्या.
उन्हाची तीव्रता फारशी नव्हती म्हणून बराच वेळ या ठिकाणी ध्यानस्थ बसून राहिलो. हायवे वरच्या वाहनांचे आवाज एकाग्रता होऊ देत नव्हते. मग पुन्हा माघारी फिरलो आणि पाचच मिनिटांमध्ये पायथ्याशी पोहोचलो होतो. गाडी काढली आणि हायवेवर गोंगाट करणाऱ्या त्या वाहनांचा मी देखील पुन्हा एकदा भाग होऊन गेलो.







 

Monday, April 30, 2012

अंबिकादेवी देवस्थान: देवी भोयरे (जि. अहमदनगर)

देवीभोयरे या छोटयाशा गावातील श्री अंबि‍का देवीचे हे पवि‍त्र स्वयंभू स्थान जागृत देवस्थान आहे. माहूरची श्री रेणुकामाता या ठि‍काणी तादुंळाकार पाषाण मूर्ति‍च्या स्वरूपात स्वयंभू प्रगट झालेली असून ती दक्षि‍णभि‍मुखी आहे. दक्षि‍णेकडे मुख असलेली देवस्था‍ने जागृत असल्याचे मानण्यात येते. या स्थानाची उत्‍त्पतीची‍ कथा वि‍स्मयकारक आहे.

क्षीरसागर हे गावातील प्रति‍ष्ठि‍‍त ब्राम्‍हण घराणे. माहूरची श्री रेणुकामाता हे त्यांचे कुलदैवत. या घराण्याचे मूळ पुरूष रेणुकामातेच्या नि‍स्सीम भक्तीपोटी नवरात्रामध्ये माहूरगडाची वारी नि‍यमि‍तपणे करीत असत. त्याकाळी हा दूरचा प्रवास अति‍शय खडतर असे. पुढे वार्धक्यामुळे त्यांना हा जि‍कीरीचा प्रवास झेपेनासा झाल्यामुळे वारीचा त्यांचा नि‍त्यनेम खंडि‍त झाला. त्यांमुळे अति‍शय व्यथि‍त होऊन त्यांना रेणुकामातेच्या दर्शनाची तळमळ लागून राहि‍ली. आणि‍ काय आश्चर्य—श्री रेणुकामातेने सतत तीन दि‍वस त्यांना स्वप्न दृष्टांत देवून ‘’मीच तुला दर्शन द्यावयास आले आहे.’’असे सांगून वि‍शि‍ष्ट जागा दाखवि‍ली आणि‍ त्या ठि‍काणी खणल्यास ‘’मी प्रगट होईन’’असे संकेत दि‍ले. तेच हे पवि‍त्र स्थान की जेथे स्वप्न दृष्टांतानुसार खणल्यासनंतर श्री अंबि‍केची तांदुळाकार पाषाण मूर्ति‍-(‘’तांदळाजमि‍नीमधून म्हणजे भुयारामधून स्व यंभू प्रगट झाली. या मूर्ति‍भोवती हळदीकुंकवाच्या- पेटयाही आढळून आल्या.

या ठि‍काणी श्रीरेणुकामाता भुयारातून म्हणजे भूवि‍वरातून प्रगट झाली म्हणून गावाला देवीभूवि‍वर असे नाव प्राप्‍त झाले. त्याचाच पुढे अपभ्रंश होऊन गावाचे नाव 'देवीभोयरे' असे रूढ झाले.
श्रीक्षेत्र देवीभोयरे श्री. अंबिकादेवी हे ठिकाण महाराष्ट्रात, अहमदनगर जिल्‍‍हयात, पारनेर तालुक्यात आहे. पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला पारनेर पासून 18 कि. मी. वर व शिरूर पासून 24 कि.मी. अंतरावर देवीभोयरे हे क्षेत्र आहे.
पुणे ते शिरूर, शिरुर ते कल्याण (मुंबई), नगर पारनेर देवीभोयरे इत्यादी ठिकाणी सर्व डांबरी रस्ता आहे. पुणे मुंबईतून शिरूर कडे जाणा-या अनेक एस. टी. बसेस आहेत. त्या सर्व देविभोयरे येथे थांबतात. तसेच अहमदनगर येथुनही सुपे मार्गे अनेक बसेस उपलब्ध आहेत.  

संदर्भ: http://www.devibhoyare.com

छायाचित्रे:

दीपस्तंभ

मुख्य प्रवेशद्वार

मंदीराची मागील बाजू

वड व पिंपळाचे एकत्रित झाड

देवीभोयरे देवस्थान

देवी