 |
ढगांत हरविलेला तोरणा |
छत्रपति शिवाजीराजांनी
स्वराज्याचे तोरण बांधताना सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा होय. त्याच्या
ह्या ओळखीशिवाय इतिहासात त्याची फारशी नोंद आठवत नाही. शिवाजीराजे गेल्यानंतर दहा
वर्षे हा किल्ला राजे संभाजींच्या ताब्यात होता. शिवाजीराजांनी सर्वप्रथम जिंकलेला
किल्ला पाहण्याची उत्सुकता ही प्रत्येक शिवप्रेमीला असते. त्याला राजांनीच
प्रचंडगड असे नाव दिले होते. स्वत: शिवाजीराजांनी असे नाव दिल्याने हा किल्ला किती
प्रचंड असेल, याचा अंदाज हा किल्ला पाहिल्यावर येतोच.
पुणे जिल्ह्यातील सर्वात
उंच गड म्हणून तोरणा नावाजलेला आहे. वेल्हे गावात व अर्थात याच तालुक्यात हा गड
येतो. त्याचे पुण्यापासूनचे अंतर आहे ४२ किलोमीटर. सिंहगड रस्ता संपल्यावर
सिंहगडाच्या पायथ्याशी उजव्या बाजूला एक खानापूरकडे जाणारा रस्ता आहे. त्याच
रस्त्याने वेल्हे गावाकडे जाता येते. हा रस्ता पुढे राजगडालाही जाऊन मिळातो. सिंहगडापासून
तोरणा गड हा रस्त्याने २२ किलोमीटर अंतरावर आहे. रस्त्याला लागणाऱ्या पाबे ह्या
गावापासून डावीकडे राजगडला तीन किमी. तर उजवीकडे पाच किलोमीटरवर तोरणा गड गाठता
येतो. गाडी केवळ किल्याच्या पायथ्यापर्यंतच जाऊ शकते. स्वत:ची गाडी असेल तर उत्तमच
कारण पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावरून वेल्हे गावात जाण्यासाठी गाड्या खूप कमी
आहेत. पावसाळ्यात तोरणा बघण्याची मजा काही औरच असते. पायथ्यापासून अशा वातावरणात
किल्ल्याचा बुरूज दिसणे हे महाकठीण आहे. या काळात त्याचा बुरूज हा धुक्यात
हरविलेला असतो. समुद्रसपाटीपासून गडाचे टोक चार हजार फूट उंच आहे. शिवाय गड
गाठण्यासाठी पायथ्यापासून दोन डोंगर पार करून जावे लागते. पहिल्या डोंगराची चढाई
फारशी कठीण नाही. खरा कस लागतो तो मूळ किल्ला चढण्यासच! तत्पूर्वी उंचीवरून वेगाने
वाहणारे वाऱ्यांना कसेबसे सामोरे जावे लागते. पावसाळ्यात त्यांचा वेग जास्त असतो. या
ठिकाणावरून आपण अतिशय मोठा किल्ला चढत आहोत, याची नक्कीच प्रचिती येते. मूळ किल्ला
चढाईस थोडासा अवघड आहे. पावसाळ्यात घसरणीचा त्रास होऊ शकतो. परंतु, त्यासाठी आधीच
मानसिक तयारी केली असली पाहिजे. जसजसे किल्ला चढत जातो तसतसे धुक्याचे प्रमाण वाढत
जाते व खालचे काहीच दिसत नाही. आणखी काहीसे वर गेल्यावर तिथे आधारासाठी रेलिंग्जची
व्यवस्था केली गेलेली आहे. तोच एकमेव आधार गड चढताना घ्यावा लागतो. ह्या अवघड
वाटेचा अंदाज आल्यावर पूर्वी घोडे किल्यावर कसे नेत असतील? ह्याचा विचार नक्कीच
आपल्या मनात आल्याशिवाय राहत नाही. किल्ला चढण्यास साधारणत: दोन तासांचा अवधी
लागतो. पावसाळी वातावरणात गडावरील परिसर हा प्रफुल्लीत झालेला दिसतो. गडावर पाहण्यासारखी
तोरणजाई मंदिर, मेंगाई मंदिर, बुधलामाची, झुंजारमाची अशी ठिकाणे आहेत. पावसात
त्याची मजा काही औरच असते. पाऊस नसताना येथुन होणारे राजगडाचे दर्शन मात्र निश्चित
सुखावून जाते.
छायाचित्रे:
 |
वेल्हे गावातून दिसणारा तोरणा |
 |
तोरणाकडे जाणारी वाट |
|
|
|
 |
डावीकडून: मी, प्रतिक आवटे, अमोल कुटे, अमित कुटे, ईशान पवार |
No comments:
Post a Comment