माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label गणपतीपुळे. Show all posts
Showing posts with label गणपतीपुळे. Show all posts

Wednesday, April 3, 2019

आमचा पहिलाच कोकणानुभव

कोकण म्हणजे महाराष्ट्रातील सौंदर्याची सगळ्यात मोठी खाण...  कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रात सगळीकडे फिरायला मिळतं, परंतु अजून पर्यंत एकदाही कोकणात जाण्याचा योग आलेला नव्हता. आजवर फक्त पुस्तकांमध्ये, चित्रपटांमधून, मालिकांमधूनच कोकणचे दर्शन झाले.  परंतु, प्रत्यक्ष जाण्याचा योग मात्र जुळून येत नव्हता. अखेरीस तो योग जुळला. या वर्षी जानेवारीमध्ये कोकणातल्या गणपतीपुळ्याची सहल आम्ही आयोजित केली. जवळपास तीन दिवसांच्या ट्रीपचे पूर्ण नियोजन आम्ही केले होते. पहिल्यांदाच स्वतःची गाडी घेऊन जात असल्यामुळे थोडी धाकधूक तर होतीच परंतु मनाची पूर्ण तयारी केली होती. तसा हा माझा पहिलाच कोकणदौरा नव्हता. सन 2006 मध्ये मी एकदा डिप्लोमाला शिकणाऱ्या मुलांसोबत कोकणात गेलो होतो. पण तेव्हा फक्त मार्गदर्शक म्हणून होतो. यावेळेसची ट्रिप ही खरी ट्रीप होती.
अखेर तो दिवस उजाडलाच. पहाटे पाच वाजता आम्ही पुण्याहून प्रयाण केले. गुगल मॅप सोबतीला होते, त्यामुळे फारशी अडचण वाटली नाही. कराड सोडल्यानंतर रत्नागिरीचा रस्ता चालू झाला. हळूहळू सातारा, सांगली करत कोल्हापूरची सीमा संपू लागली अन कोकणातली हिरवळ हळू-हळू जवळ येऊ लागली होती. घाट रस्त्याची सुरुवात झाली होती.  मी स्वतः पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणातल्या घाट रस्त्यावर गाडी चालवत होतो. पण
सकाळी पूर्ण न झालेली झोप आणि मनावरील ताण यांच्यावर औत्सुक्याने मात केली. कोल्हापूरचे आंबा गाव संपले आणि आंबा घाटाला सुरुवात झाली रत्नागिरी जिल्हा चालू झाल्याची पार्टी तिथे लावलेली होती. घाट सुरू झाला आणि एक शांत वाऱ्याची लहर अंगावरून गेली.  आम्ही कोकणात प्रवेश केला होता. माळशेज नंतर इतका उंच पाहिला मी हा पहिलाच घाट!
हळु हळु गाडी चालवत सौंदर्याचा आस्वाद घेऊ लागलो. जिकडे पाहावे तिकडे फक्त झाडीच झाडी आणि डोंगरच डोंगर!!! ती अनुभूती काहीतरी विलक्षण होती मी आजवर केलेल्या प्रवासातला हा सर्वात सुंदर प्रवास होता. झाडी झाडी अन वळणावळणांच्या रस्त्यावर गाडी चालवताना जो आनंद आला होता, तो आजवर मी कधी अनुभवला नव्हता. रत्नागिरी जवळ येत होतं तसं आमची एक्साईटमेंट वाढत होती. जिकडे पाहावे तिकडे नुसती आंब्याची झाडे!! या प्रवासातून कधी बाहेर येऊ नये, असं वाटू लागलं होतं. रत्नागिरीला पोहोचायला अकरा वाजले. मग तिथून प्रवास सुरू झाला गणपतीपुळ्याला. खऱ्या अर्थाने कोकणच्या समुद्रकिनाऱ्याचा प्रवास चालू झाला होता.  समुद्र दृष्टीस पडला आणि डोळ्याचे पारणे फेडले गेले. उंच उंच नारळाची झाडे आणि सळसळणाऱ्या लाटा विलक्षण होत्या. कोकणातल्या गावांची रचना अतिशय सुंदर होती. अशा शांत आणि निवांत वातावरणात राहणाऱ्या लोकांचा आम्हाला हेवा वाटायचा.  नंतरचे दोन दिवस कोकणात भरपूर एन्जॉय केला. परंतु काही कारणास्तव आम्हाला लगेच मागे फिरावं लागलं होतं, त्यामुळे हा प्रवास अपूर्णच राहिला.  कदाचित त्याला पुढच्या वेळेस अपूर्णकात पूर्णत्वास नेण्यासाठी आणखी वेळ असाच वेळ हवा असावा. यावेळच्या प्रवासात गणपतीपुळे मंदिर, समुद्र किनारा, मालगुंड, केशवसुत स्मारक, जयगड किल्ला, जय विनायक मंदिर, उंडी समुद्रकिनारा इतकंच पाहून झालं होतं. एकंदर प्रवासा उत्साह देणारा होता. परतताना मात्र हिरवळीतून कुठेतरी वाळवंटात आल्यासारखं वाटत होतं. ही तर फक्त सुरुवात आहे, कदाचित पुढे अनेक वर्षे याच कोकणाला आम्ही परत जाऊ अशी आशा वाटते... 









 

Friday, March 15, 2019

कवी केशवसुत स्मारक

कवी केशवसुत हे मराठीतील एक उच्च प्रतिभा लाभलेले कवी. त्यांचे जन्मस्थान कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड या गावी आहे. याच ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेने त्यांचे स्मारक बनवले आहे. अगदी शंभर वर्षानंतर सुद्धा आजही हे घर जसेच्या तसे असल्याचे दिसते. टिपिकल कोकणी पद्धतीच्या अन नारळाच्या झाडांनी वेढलेल्या या घराच्या मागच्या बाजूला मराठीतल्या अनेक कवींचे रेखाचित्र असलेले एक संग्रहालय आहे. मराठी सारस्वतांची मांदियाळी या संग्रहालयात दिसते. ही उच्च प्रतीची रेखाचित्रे पाहताना मराठीला समृद्ध करणाऱ्या कवींना मनोमन प्रणाम करावासा वाटतो.