माझा हा ब्लॉग सर्व मराठी वाचकांसाठी खुला आहे. इथुन काही कॉपी केल्यास कृपया ब्लॉगचा पत्ता व लेखकाचे नाव (तुषार भ. कुटे) संदर्भात नमूद करावे...
Showing posts with label जलदुर्ग. Show all posts
Showing posts with label जलदुर्ग. Show all posts

Sunday, September 1, 2024

सुवर्णदुर्ग

हर्णै बंदराच्या काठावर तीन किल्ले आहेत. अर्थात हे सर्व किल्ले आपण दोन ते तीन तासांमध्ये सहज बघू शकतो. संध्याकाळच्या वेळेस आम्ही हर्णै बंदरावर पोहोचलो होतो. सूर्य जवळपास मावळतीकडे झुकलेलाच होता. आधी कणकदुर्ग आणि नंतर गोवादुर्ग किल्ला पाहून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. खरंतर इथे येण्याचा येण्याचे उद्दिष्ट हे समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्याचेच होते. परंतु संध्याकाळी जाऊन येण्यास उशीर लागत असल्याने आम्ही तो बेत रद्द केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच किल्ला पाहण्याचे ठरवले. या योजनेप्रमाणे आम्ही सकाळी हर्णै बंदरावर पोहोचलो. कणकदुर्गाच्या पायथ्याशी सुवर्णदुर्गाच्या दिशेने जाणाऱ्या बोटी लागतात. याची चौकशी आम्ही कालच करून ठेवलेली होती. त्यामुळे आज गेल्यागेल्या लगेचच बोटीने सुवर्णदुर्गाच्या दिशेने निघालो. कणकदुर्गाचा समुद्राच्या दिशेने गेलेला सुळका ओलांडून जवळपास १५ ते २० मिनिटांमध्ये आम्ही सुवर्णदुर्गापाशी पोहोचलो. किनार्‍यापासून हा किल्ला एक किलोमीटर देखील आतमध्ये नसावा. अजूनही बांधणी उत्तम स्थितीमध्ये आहे.
किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापाशी आम्ही पोहोचलो होतो. समुद्रकिनाऱ्यावर असते तशीच वाळू या ठिकाणी पसरलेली दिसली. महाद्वाराच्या पायरीवर एक कासवाची प्रतिमा कोरलेली होती. तर उजव्या बाजूच्या तटबंदीवर हनुमानाची मूर्ती कोरलेली दिसून आली. ही मूर्ती बऱ्यापैकी प्राचीन असावी, असे दिसले. किल्ल्याच्या नेहमीच्या रचनेप्रमाणे प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पहारेकऱ्यांच्या देवड्याही दिसून आल्या. आणि त्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधलेल्या होत्या. अर्थात आजही त्या भक्कम स्थितीमध्ये आहेत. किल्ल्याची पूर्ण तटबंदी अजूनही उत्तम स्थितीमध्ये असल्याची दिसते. अर्थात समुद्रकिनाऱ्यापासून लांब असल्याने किल्ला अजूनही पाहण्यालायक आहे, असे दिसते. डाव्या बाजूने पुढे गेल्यावर विहीर आणि काही राजवाड्याचे अवशेष दिसून आले. तसेच धान्याचे कोठार देखील होते. बऱ्याच ठिकाणी वाड्यांचे अवशेष दिसतात. आतली जमीन काही ठिकाणी उंच तर काही ठिकाणी खोलगट असल्याची दिसली. पश्चिमेकडचा चोर दरवाजा अजूनही सुस्थितीत आहे. त्याच्याजवळ जाऊन बघितले. कदाचित इथून समुद्राच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता असावा. एकंदरीत सहा ते सात विहिरी किल्ल्यावर होत्या. काही ठिकाणी तोफेच्या नळ्या देखील दिसून आल्या.
असं म्हणतात की दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांची कुलदेवता असणारी कादंबिका देवी हिचे मंदिर त्यांनी कधीतरी सुवर्णदुर्गावरून हलवून अलिबागच्या किल्ल्यामध्ये नेले होते. किल्ला पाहण्यासाठी कमीत कमी दीड ते दोन तास तरी लागतात. शिवाय इथून इथल्या तटबंदीवरून अरबी समुद्र दूरवर क्षितिजापर्यंत दिसून येतो. इसवी सन १६६० मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहीकडून जिंकून घेतल्याचे समजते. शिवाय ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये त्याच्यासाठी महाराजांनी दोन हजार रुपये खर्च केल्याचे देखील लिहिलेलं आहे.
















Thursday, July 27, 2023

गोवादुर्ग

गोवा नावाचा किल्ला महाराष्ट्रामध्ये आहे याची माहिती आम्हाला नव्हती. हर्णै बंदरावर पोहोचलो तेव्हा इथे कणकदुर्ग आणि गोवादुर्ग नावाचे दोन किल्ले आहेत, असं समजलं. समुद्रामध्ये जो चिंचोळा भूभाग प्रवेश करतो तो कणकदुर्ग होय आणि त्याच्याच अलीकडे गोवादुर्ग किल्ला आहे. कणकदुर्गवर भेट देऊन परतताना या गोवा किल्ल्यावर जावे असे ठरवले. संध्याकाळी सूर्य मावळायला आला होता. तो पूर्ण गुडूप होण्याच्या आधी या किल्ल्यावर पोहोचावे, म्हणून आम्ही लगबगीने कणकदुर्गावरून निघालो. गोवा किल्ल्यापाशी पोहोचलो तोवर सूर्य मावळलेला नव्हता. मी झपझप पावले टाकत किल्ल्याच्या मुख्य प्रवेश दारातून आत गेलो आणि एका तटबंदीवर जाऊन सूर्याच्या मावळतीचा तो नजारा न्याहाळू लागलो. इथून समोर समुद्रात दिसणाऱ्या सुवर्णदुर्गवरून सूर्य मावळतीकडे चाललेला होता. अर्थात हा नजारा कॅमेऱ्यामध्ये टिपायचा मोह मला आवरला नाही. सूर्य मावळल्यानंतर देखील सायंप्रकाशात आम्ही किल्ला पाहून घेतला. कनकदुर्गपेक्षा बऱ्यापैकी चांगले अवशेष अर्थात किल्ला म्हणावा असे अवशेष अजूनही गोवादुर्गवर दिसून येतात. तटबंदी, बुरुज, पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वारे आणि त्यावरील शिल्पे या खुणा किल्ल्यावर अजूनही त्याच्या ऐतिहासिकतेची साक्ष देत आहेत. या किल्ल्याची पुनर्बांधणी करून तो आणखी व्यवस्थित करता येऊ शकतो.
मध्यभागी असणाऱ्या ध्वजस्तंभापाशी गेलो की इथून कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्गासहित हर्णै बंदरही व्यवस्थित दिसून येते.















Tuesday, July 18, 2023

कणकदुर्ग

दापोलीच्या मुरुड समुद्रकिनाऱ्यावरून पश्चिमेकडे समुद्रामध्ये आत आलेला भूभाग नजरेस पडतो. दापोलीच्या दोन दिवसांच्या वास्तव्यामध्ये या ठिकाणी पण जाऊन यायचे ठरवले. हा एक किल्ला होता. माशांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हर्णै बंदरावर स्थित असलेला हा किल्ला म्हणजे कणकदुर्ग होय.
दुपारचे ऊन ओसरल्यानंतर आम्ही हर्णै गावात पोहोचलो. माशांचं बरंच मोठं मार्केट या ठिकाणी आहे. सगळीकडे माशांच्या वासाचा नुसता घमघमाट पसरलेला होता. आमच्यासारख्या शाकाहारी लोकांना या वासाची किळस वाटते! तरीही त्यातून माग काढत आम्ही समुद्रकिनाऱ्यावर पोहोचलो. हर्णै बंदराचा समुद्रकिनारा नक्की कसा आहे(?), हे तिथे भेट दिलेल्या अनेकांना माहीत असेलच. याच रस्त्याने माग काढत आम्ही कणकदुर्गपाशी येऊन पोहोचलो. सूर्य मावळतीकडे चाललेला होता. बंदरावर नेहमीप्रमाणेच लगबग आणि गोंगाट दिसून येत होता. समुद्रात जो चिंचोळा डोंगर प्रवेश करतो त्या रस्त्याने आम्ही पुढे आलो. याठिकाणी किल्ल्याचे कोणतेच अवशेष दिसून आले नाही. आजच्या काळात बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या मात्र होत्या. त्या चढून वरती गेलो. समोरच समुद्रामध्ये सुवर्णदुर्ग किल्ला नजरेस पडला. याच किल्ल्याच्या संरक्षणासाठी समुद्रकिनाऱ्यावर हर्णै बंदरावर तीन किल्ले बांधले होते, असं ऐकलंय. त्यातीलच हा एक किल्ला होय. येथून संध्याकाळचा सूर्यास्त अतिशय सुंदर दिसतो. केशरी सुर्यकिरणे समुद्राच्या पाण्यावर विविध रंगछटा तयार करतात. सूर्य पूर्णपणे मावळत नाही तोपर्यंत हा नजारा केवळ पाहतच राहावा, असा दिसतो. तीनही बाजूंनी समुद्र आणि एका बाजूने किल्ल्यावर येणारी पायवाट एवढेच नजरेस पडतं.





 


Friday, March 10, 2023

जंजिरा

मराठ्यांच्या इतिहासात किंबहुना एकंदरीत महाराष्ट्राच्या इतिहासात देखील नावाजलेला किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला होय. त्याच्या अजिंक्यपणाबद्दल आणि अभेद्यतेबद्दल सर्वांनीच ऐकलेले व वाचलेले असेल. मीही त्यातलाच एक. म्हणूनच उत्सुकतेपोटी जंजिरा किल्ल्याची सैर केली. तत्पूर्वी सकाळीच मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील पद्मदुर्ग किल्ला पाहून आलो होतो. या किल्ल्याच्या बरोबर समोर दूरवर जंजिऱ्याचे दर्शन होते. तसं पाहिलं तर समुद्रकिनाऱ्यापासून पद्मदुर्गपेक्षा हा किल्ला अतिशय जवळ आहे.
मुरुडमध्ये प्रवेश करताना भरलेले शुल्क, नंतर जंजिरा किल्ल्याच्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये भरलेले शुल्क, नंतर पार्किंगसाठी लागणारे शुल्क, नंतर बोटीने प्रवास करण्यासाठी लागणारे शुल्क, नंतर भारतीय पुरातत्व खात्याचे शुल्क भरून आम्ही अखेरीस किल्ल्याकडे जाणाऱ्या बोटीमध्ये बसलो! ती एक शिडाची नाव होती. वाऱ्याच्या वेगाचा वापर करून अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आम्ही किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी पोहोचलो. तोवर स्थानिक नावाड्याने इतिहासाची वाताहत करून स्वतःच्या मनाचा इतिहास आमच्या कानावर घातला होता!
असं म्हणतात की, हा दरवाजा किनाऱ्यावरून लवकर लक्षात येत नाही. ते काहीसं खरं देखील असावं. किल्ला पाहण्यासाठी आम्हाला ४५ मिनिटांचा कालावधी दिला होता. अजूनही किल्ल्यामध्ये किल्ला म्हणून शाबूत असलेल्या अनेक गोष्टी चांगल्या परिस्थितीमध्ये दिसून येतात. किल्ल्यावरील अनेक तोफा हा किल्ला अजिंक्य का राहिला, याचे उत्तर देखील देतात. पाण्याचे स्त्रोत, बुरुज आणि भक्कम तटबंदी या येथील पाहण्याच्या गोष्टी आहेत. एक जलदुर्ग कसा असावा, याचे उत्तम उदाहरण म्हणून जंजिरा किल्ल्याकडे पाहता येईल.









 

Sunday, January 15, 2023

पद्मदुर्ग

अनेक वर्षे अभेद्य आणि अजिंक्य राहिलेल्या जंजिरा किल्ला बघण्यासाठी मुरुडला जाण्याचे उद्दिष्ट तर होतेच. पण त्याचबरोबर निग्रहाने पद्मदुर्ग किल्ला देखील बघायचा होता. असं म्हणतात की जंजिरा किल्ला काबीज करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर पद्मदुर्ग हा जलदुर्ग बांधण्याचे ठरवले होते. काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याची सांगितले आहे. शेवटी काय मराठा साम्राज्याच्या दोन छत्रपतींसाठी हा एक महत्त्वाचा जलदुर्ग होता, हे मात्र नक्की.
हा किल्ला तटरक्षक दल, नौदल तसेच महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे हे ऐकून होतो. तसेच तिथे जाण्यासाठी विशेष परवानगी काढावी लागते, याचीही माहिती होती. आम्ही ज्या दिवशी किल्ल्यावर जाण्याचे ठरवले त्या दिवशी तटरक्षक दल व नौदलाचा सराव या किल्ल्यावर होणार होता. त्यामुळे जाणे तसे अवघडच होते. मुरुडच्या समुद्रकिनाऱ्यावर एका खाजगी बोट चालकाला विचारून बघितले. तसा तो अनेकांना या किल्ल्यावर नियमितपणे घेऊन जात असावा. त्यामुळे त्याने आम्हाला देखील एक मोठी रक्कम सांगून लगेचच होकार दिला. त्यादिवशी पद्मदुर्ग बघायचाच या उद्देशाने आम्ही आलो होतो. त्यामुळे बोटीतून जाण्याचे ठरवले. किनाऱ्यापासून सुमारे अडीच किलोमीटर आतमध्ये एका खडकावर हा किल्ला बांधलेला आहे. म्हणून किनाऱ्यावरून तो नीटसा दिसून येत नाही.
बोट जशी जशी आतमध्ये जायला लागली तसतसा किल्ला अजून स्पष्ट दिसायला लागला होता. आज या किल्ल्यावर तटरक्षक दल असावे, असे बोटवाल्याला वाटत होते. त्यामुळे बोट किल्ल्याजवळ लावण्याऐवजी त्याने फक्त फेरी मारून आणण्याचे कबूल केले. किल्ल्याजवळ आल्यावर त्याने किल्ल्याला फेरी मारायला घेतली तेव्हा पाण्यामध्ये आम्हाला जेलीफिशचे देखील दर्शन झाले. किल्ल्याला एक वळसा घालून बोट पुन्हा मागे परतू लागली. परंतु तेवढ्यातच बोटवाल्याला फोनवरून असे समजले की आज तटरक्षक दल या ठिकाणी येणार नाही. एकंदरीत आमचे नशीब जोरावर होते. त्याने बोट किल्ल्याच्या दिशेने फिरवली. मुख्य दरवाजाजवळ आणून त्याने दोर व्यवस्थित बांधून ठेवला. समुद्राच्या इतक्या आतमध्ये असणारा मी बघितलेला हा पहिलाच किल्ला होय.
आज त्याची बऱ्यापैकी पडझड झालेली दिसते. कदाचित तो मुख्य भूमीपासून अलग असल्यामुळे आहे त्या स्थितीला आपण सुस्थितीत आहे, असे देखील म्हणू शकतो! किल्ला म्हणून असणारी सर्व स्थळे तिथे दिसून येत होती. तोफा तर होत्याच शिवाय टेहाळणीसाठी लागणाऱ्या सर्व रचना त्यावर दिसून आल्या. आपण समुद्राच्या मधोमध आजूबाजूचा परिसर न्याहाळत आहोत, याची प्रचिती आली. अजूनही किल्ला खूप चांगल्या स्थितीत आहे, असं म्हणावं लागेल. आमच्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे आम्ही पुन्हा मागे फिरलो. माघारी जाताना मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या एका बोटाने आम्हाला अडवले होते. अगदी पाण्यात देखील महाराष्ट्र पोलीस पकडू शकतात, याचा अनुभव त्यादिवशी आम्हाला पहिल्यांदाच आला. पण शिवाजी महाराजांचा एक उत्तम जलदुर्ग पाहिल्याचा अनुभव हा अवर्णनीय असाच होता!